Meenal

Meenal Patil

सौ. मीनल मंगेश पाटील ह्यांचे मूळ गाव घिवली. त्या पूर्वाश्रमीच्या कु. शालीनी वामन पाटील, पंचाळी येथील श्री वामन रामजी पाटील यांच्या कन्या. लग्नानंतर पती श्री. मंगेश गणपत पाटील यांचे बरोबर नोकरीनिमित्त पालघर येथे रहावयास आल्या, आणि कायमस्वरूपी पालघरवासीय झाल्या. सुरुवातीच्या खडतर काळात पतीच्या मागे खंबीरपणे उभे रहात, भारतीय पोस्ट खात्यात 32 वर्षे नोकरी करून, त्यांनी संसाराला मोलाचा हातभार लावला. दोनही मुलींना उच्चशिक्षित करून त्यांचे संसार मार्गी लावले. दोन विवाहीत मुली, जावई तसेच नातवंड असा त्यांचा समाधानी परीवार आहे. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचे छंद , अवांतर वाचन,लेखन आणि गायन हे छंद त्यांनी जोपासले आहेत. त्यांना सामाजीक कार्याची आवड आहे. निरनिराळे पौष्टीक खाद्य पदार्थ बनविण्यात त्यांना विषेश आनंद मिळतो. भ्रमंती करून अनेक अनुभव गाठीशी बांधण्यात त्या सदैव उत्सुक असतात. त्यांना गायनाची आवड असल्यामुळे घरगुती मैफलीत मराठी चित्रपट संगितातील बहुतेक नावाजलेल्या गाण्यांचा आस्वाद त्यांच्या निकटवर्तीयांना नेहमीच घेता येतो. गाण्यांचा आस्वाद जरी आपणा सर्वांना नाही घेता आला, तरी त्यांच्या लेखणीचा आस्वाद आपणास या इथे नक्कीच घेता येईल.

चौकळशी वाडवळ समाजातील लग्नविधी - भाग पहिला

2524

प्रस्तावना :

                              आज आपल्या चौकळशी वाडवळ समाजातील तरुण वर्ग आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने आपल्या मूळ गावापासून दूर शहरात राहतो. त्यामुळे मूळ एकत्र असलेली कुटुंब पध्दतीही विभागली गेली आहे. आईवडिल आणि त्यांची दोन अपत्ये असाच छोटा परिवार बहुतेकांचा असतो. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या समाजातील(गावातील)मूळ धार्मिक परंपरा आणि लग्न सोहळ्या सारख्या धार्मिक विधी या तरुण पिढीतील मुलांच्या नजरेसमोर सहज पडत नाहीत. परिणामी त्यांना त्याविषयी मार्गदर्शनही मिळत नाही. म्हणून त्या शहरवाशी तरुण मुलामुलींना आपल्या समाजातील लग्नविधीची माहिती कळावी यासाठी मी माझ्या परीने थोडा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. काही रीती काही गावात थोड्याफार फरकाने वेगळ्या असू शकतील. मला जसं आठवलं त्याप्रमाणे लिहण्याचा प्रयत्न केला आहे. या लिहण्याच्या प्रयत्नामध्ये काही रीती विषयीची माहिती माझ्या दोन ज्येष्ठ भगिनींनी दिलेली आहे; १) श्रीम. दामीनी राऊत, उमरोळी आणि  २) सौ. सुलोचना ठाकूर, अल्याळी

 

समाजातील लग्न ठरविण्याच्या पध्दती :

 

आपल्या चौकळशी वाडवळ समाजात एखाद्या उपवर मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवायचं असेल तर आपल्या समाजातील गावामधून आपल्या नजरेसमोर असलेल्या किंवा एखाद्या नातेवाईकाकडून सुचविलेल्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न ठरविले जाते.त्यासाठी त्या मुलाची किंवा मुलीची चौकशी जवळच्या नातेवाईकाकडून किंवा शेजाऱ्याकडून केली जाते.आज वधू-वर सूचक मंडळ स्थापन झालेली आहेत; परंतु यापूर्वी वर उल्लेख केलेल्या प्रमाणेच लग्न ठरविली जात असत .तेव्हा आजच्या काळासारखी वधु-वराच्या जन्मपत्रिकेवरुनच लग्न जुळविली जात नसत तर एखाद्या मुलीचं एखाद्या मुलाशी लग्न जुळत नसेल तर त्या मुलीचं नांव बदलून सासरच्या नांवाने सुध्दा लग्न जुळवीत असत.

 

लग्न विधीच्या रितीची माहिती

 

साखरपुडा किंवा साक्षविडा :

उपवर मुलाचं किंवा उपवर मुलीचं लग्न जुळल्यानंतर मुलाकडील चार-पाच मंडळी मुलीकडील घरी जाऊन येतात याला मुलीच्या घरची पायरी चढणे असे म्हणतात. नंतर दोन्ही घरची मंडळी लग्नाविषयी चर्चा करून लग्नाची तारीख ठरवितात तसेच दोन्ही नातेवाईकांनी केलेल्या चर्चेतून साक्षविड्याची  किंवा साखरपुड्याची तारीख ठरविली जाते. पूर्वी आपल्या मुला/मुलीचं लग्न ठरलं आहे हे लोकांना कळावं म्हणून एक विधी होत होता त्याचं नांव साक्षविडा. परंतु हल्ली सर्वजण साखरपुडाच करतात. हा साखरपुडा काही जण लग्नाच्या आदल्या दिवशीही करतात .यात मुलीला पाटावर बसवून तिला साडी चोळी देतात व तिची ओटी भरतात. मुलीला हिरव्या रंगाची साडी देतात.मुलीला ओटीतून करंडा ,बांगड्या, फणी व ओटीचे सामान देतात.( हे ओटीचे सामान लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाताना आपल्या सोबत घेऊन जाते. )साखरपुडा  लग्नाच्या काही काळ आधी केला तर मुलीच्या समोर मुलाला पाटावर बसवून मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या बोटात अंगठी घालतात,व मुलाला मुलीकडून कपडे दिले जातात.

 

लग्नाच्या आधीच्या खरेदी विषयी :

               लग्नाची तारीख ठरल्यानंतर लग्नाच्या पत्रिका छापतात व त्या लग्नाच्या  साधारण २०-२५ दिवस आधी संबंधीत लोकांना आणि नातेवाईकांना पत्रिका  देऊन लग्नाचे आमंत्रण दिले जाते.

  १) लग्नाआधी काही खरेदी करावी लागते ती म्हणजे माहीजोग (मातीची मडकी) .(पूर्वी अर्धा /आख्खा माहिजोग असा प्रकार होता) हल्ली मडकी कमी आणतात. ती लग्नाआधी घरात आणली तर नवऱ्या मुलाच्या/मुलीच्या नजरेत पडणार नाहीत अश्या ठिकाणी लपवून ठेवतात. सोबत चार छोटी मडकी नवरा/नवरीच्या आंघोळीच्या पाण्यासाठी आणतात.(हल्ली कळश्या वापरतात.)

 २) घाणा कुटण्यासाठी उखळी आणि चार मुसळं आणली जातात.

३) बळी म्हणून कापण्यासाठी कोहळं आणले जाते.

४) पाटा, कोयती, दोन मुहूर्तमेढ(एक सागाची-दुसरी उंबराची म्हणजे औदुंबराची) मुलाचं लग्न असेल तर दोन मेढी मुलासाठी आणि दोन मुलीसाठी अशा मेढी आणतात.

५) आख्खा भात ,शेणाच्या गोवरी ,नाचणी.

६) आख्खी हळद, झेंडूची फुले, आंब्याची पाने .

७) चार लांबणदिवे व चार नवणे (छोटी मडकी)

 

लग्न सटी :

 

      वरील वस्तू जमविल्यावर घरासमोर मांडव टाकला जातो त्या मांडवाला मधल्या बाजूने चारही बाजूला आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं जाते. लग्न कार्यात पहिला विधी केला जातो त्याचं नाव लग्न सटी किंवा लगीन सटी.( हा विधी झाल्याशिवाय साखरपुडा करता येत नाही)घरातील मोठ्या मुलाचं/मुलीचं लग्न होणार असेल तर त्या घरातील सर्व लहान भावंडांची लग्नसटी त्या दिवशी एकत्र केली जाते.(इतकेच नाही तर काही प्रसंगी घरातील एखाद्या लहान भावंडाचं त्याच्या जन्मानंतर बारसं काही कारणाने केले गेलं नसेल तर तो कार्यक्रमही या लग्नसटीत केला जातो.) लग्नसटीत त्या घरांतील सर्व भावंडांना म्हणजे चुलत भावंडांनाही बारश्याप्रमाणेच पाटावर बसवून पाटासमोर वडाची किंवा रुईची (ज्यांच्या कुटुंबात जी पाने वापरली जात असतील ती )पाने मांडून त्या प्रत्येक पानावर सुके वाल, चणे ,फुले आणि दुर्वा टाकून पानावर पीठाचा दिवा किंवा ज्योत पेटवतात आणि रीत केली जाते. यासाठी वड किंवा रुईची १२ पाने व एक खायचं पान अशी एकूण तेरा पाने घेतात. पाटाभोवती वाळू टाकून त्यावर रांगोळी टाकतात व त्या रांगोळीवर  समुद्रकिनारी मिळणारी मर्दावेल नावाची वेल टाकली जाते. पाटावर आईसुद्धा बसते. या सर्वांना आरती ओवाळली जाते. एक ज्येष्ठ महिला आपल्या हातात गडू किंवा तांब्या घेऊन त्यात पैसे टाकते आणि ते पैसे गडूत आपटून पैशाचा आवाज करीत भावंडांभोवती फिरते तेव्हा इतर सर्वजण त्या गडूत पैसे टाकतात. पाटावर बसलेल्या भावंडांच्या हातातही पैसे दिले जातात. लगीनसटी ही मामाकडून केली जाते. त्यासाठी मामाकडील मंडळी रवा, गुळ, नारळ आणि तूप घेऊन येतात. त्याचीच रवळी बनविली जाते. ही रवळी उकडलेल्या चण्या बरोबर वाटतात.

                हल्ली आपल्या समाजात लग्न सटीच्यावेळी आपल्या घरात असलेल्या वेगवेगळ्या भाज्यांचे दागिने बनवून भाचे लोकांना घालतात आणि गंमत करतात. उदाहरणार्थ वांग्याचे कानातील डुल, लसणाची गळ्यातीतल माळ, उकडलेल्या चण्याचा हार इ.प्रकार करतात व मजा करतात. ही लग्न सटी लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सोईनुसार करतात. किंवा साखरपुड्याच्या आधी करतात.

                

लग्न विधीची पूर्व तयारी

लग्न विधीच्या आदल्या रात्री आख्खी हळद फोडून भिजवतात व तीच हळद वाटून हळदीच्या वेळेला नवरा मुला-मुलीला लावतात.

वाजंत्री वाल्यांना मंडपासमोर सुवासिनी आरती ओवाळतात व त्यांना मंडपात घेतात.

मंडपाच्या समोर दर्शनी दाराला बांधण्यासाठी दोन घडावाल्या (लोंगर) केळी आणतात त्यावेळी सुहासिनी आरती ओवाळतात .सदरच्या केळी हवन झाल्यावर मंडपाच्या दाराला बांधतात.

घरातील कुलदैवताची पूजा करुन ओटी भरली जाते. तसेच गावातील मंदिरात नवरा मुलगा/नवरी मुलगी जाऊन देवाचे दर्शन घेतात.

झेंडूच्या   मुंडावळी तयार करून ठेवणे.

उखळ ,मुसळांना बांधण्यासाठी झेंडूची फुलं आंब्याच्या पानासह सुतळीत बांधून ठेवणे.

 

लग्न विधी

 

१) गणेशपूजन :

     कोणतेही मंगल कार्य करताना प्रथम श्रीगणेशाचे पूजन केले जाते. त्याप्रमाणे लग्न विधीतही प्रथम गणेश पूजन केले जाते. यावेळी मुला/मुलीचे आईवडील पाटावर बसून पूजा करतात. सोबत नवरा मुलगा/मुलीलाही पाटावर बसविले जाते. भटजीच्या मंत्रोच्यारात गणेश पूजन करतात.

 

२) कोहळे कापणे:

   याला मुहूर्त पाडणे असेही म्हणतात. यात नवऱ्या मुलाच्या/मुलीच्या सोबत कुटुंबातील जोडपे पाटावर बसवितात. पाटावर बसलेल्या मुलाला/मुलीला झेंडूची मुंडावळ बांधली जाते. जोडप्याच्या समोर ठेवलेल्या पाटावर कोहळे ठेवतात. त्याला एक झेंडूचे फूल आंब्याच्या पानासह बांधतात. सोबत एक सुकडी नारळ आणि  हिरव्या सालासकट एक नारळाचा जोड ठेवतात. यालाही झेंडूचे फुल आंब्याच्या पानासह बांधले जाते. भटजीने मंत्रासह पूजन केल्यावर( कोहळं कापण्यापूर्वी चार सुवासिनीना कोहळ्याला हळद लावण्यासाठी तयारीत ठेवतात)पाटावर बसलेली व्यक्ती आपल्या समोरच्या पाटावर ठेवलेल्या कोहळ्यावर कोयतीने जोरदार वार करून त्या कोहळ्याचे एका फटक्यात आधी दोन भाग करतात त्याला तयारीत असलेल्या सुहासिनी हळद लावतात. नंतर पुन्हा अर्ध्या भागाचे दोन भाग करुन त्याला सुहासिनी हळद लावतात. हळदीचं गाणं म्हणून कोहळ्याला तेलवण करतात, पोखतात व आरती ओवाळतात. त्याच सुवासिनी नवऱ्या मुलाला/मुलीला हळद लावतात , तेलवण करतात, पोखतात व आरती करतात.

 हळद लावण्याचा क्रम पायापासून डोक्यापर्यंत असा चढता क्रम असतो. हळद पूर्ण अंगाला लावली जाते. यावेळी नवरा मुलगा/मुलगी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतात.

 नवरा मुलगा पायजमा , कफनी घालतो व खांद्यावरुन अंगावर टाँवेल घेतो.

 नवरी मुलगी पांढरी साडी नेसते.

 या हळदीच्या वेळेला नवऱ्या मुला/मुलीला डोक्यावर बांधलेली झेंडूच्या फुलांची मुंडावळ लग्नातील पुढच्या विधीला वापरली जात नाही , ती बाजूला ठेवली जाते. कोहळ्याच्या वेळेला ज्या चार सुवासिनींनी कोहळ्याला हळद लावली असेल त्या सुहासिनी पुढील विधीत मुला/मुलीला हळद लावू शकत नाहीत. तसेच कोहळ्याच्या वेळी पाटावर बसलेल्या जोडप्यालाही पुढील विधीत भाग घेता येत नाही.

तसेच कोहळ्याच्या हळदी नंतरच्या हळदीला मुला/मुलीला नवीन मुंडावळ बांधली जाते ती शेवटपर्यंत वापरली जाते

काही गावात(भागात)कोहळे कापून झाल्यानंतर त्या कापलेल्या कोहळ्याच्या चार भागांना हळद लावून झाल्यावर त्या चार पैकी एका भागाचे आणखी चार भाग करून घरातील चार भागात ठेवतात. तर काही गावात या हळद लावलेल्या चार भागांपैकी एका भागाचे बारीक बारीक तुकडे करून त्या समिधा म्हणून हवनात अर्पण करतात. वरील दोन्ही पध्दती समाजातील सर्वच भागात केल्या जात नाहीत तर त्या काही ठराविक गावातच केल्या जातात.          


३) घाणा कुटणे :

                  या विधीपासून नवऱ्या मुलाला/मुलीला झेंडूच्या फुलांची नवीन मुंडावळ बांधली जाते. एका मोठ्या उखळीला सजवून त्या उखळीला आंब्याच्या पानासह झेंडूच्या फुलांचा हार बांधला जातो. चार कोऱ्या सुपात आतल्या बाजूने कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढतात व त्यात आख्खा भात (सालासहीत) घेऊन सोबत एक हळकुंड, सुपारी, फुलं आणि एक नाणं टाकतात. ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारानंतर एका हातात मुसळ व दुसऱ्या हातात सूप घेऊन उभ्या असलेल्या सुवासिनी आपल्या सुपातील नाणी, सुपारी, हळकुंड सुपातून बाहेर काढून ठेवतात .एका सुहासिनीने आपल्या सुपातील भात उखळीत टाकून झाल्यावर ती उखळीत मुसळाने कांडते मग तिच्या समोरील बाई आपल्या सुपातील भात उखळीत टाकून त्यावर मुसळाने कांडते. ही क्रिया झाल्यावर त्या आपल्या जवळील मुसळ एकमेकींकडे बदलतात. अशीच रीत दुसऱ्या दोघी सुवासिनीही करतात आणि उखळीत कांडतात. परत पहिल्या दोघीजणीही हीच क्रिया परत उखळीत थोडा भात टाकून करतात आणि बाकीच्याही करतात व सुपातील भात संपवितात.

 उखळीतील कांडणातून निघालेले तांदूळ अक्षता टाकण्यासाठी वापरतात. यावेळीही हळद लावून तेलवण, पोखण करतात व आरती ओवाळतात. घाण्याचे गीत गातात.

 

 ४) मेढीचा मुहूर्त :

           ही मेढ म्हणजे झाडांची छोटी फांदी(कांठी) . साग आणि उंबर (औदुंबर) या झाडांच्या  बेचकीसहीत असलेली थोडी जाड कांठी किंवा फांदी या साठी वापरतात. या मेढीनाही फुल पान बांधले जाते. यात घरातील किंवा कुटुंबातील जोडप्यासोबत नवरा मुलगा/मुलगी डोक्याला झेंडूची मुंडावळ बांधून पाटावर बसवून मंत्रासह पूजा करतात. या दोन मेढींपैकी एक मेढ घरात वाळूने भरलेल्या डब्यात ठेवतात आणि त्या मेढीच्या बेचकीमध्ये पाटावर पूजेसाठी ठेवलेला हिरव्या सालाचा नारळाचा जोड अडकवून ठेवतात.नंतर त्या मेढीला चार सुवासिनी हळद लावून तेलवण, पोखण व आरती असा क्रम करतात. दुसरी मेढ घराच्या बाहेर घातलेल्या मंडपातील डब्यात किंवा जमिनीत गाडतात. त्यालाही हळद लावून तेलवण, पोखण करुन आरती ओवाळतात व हळदीचे गीत गातात. यावेळी चार सुवासिनीं सोबत एक जोडपं आणि नवरा मुलगा/मुलगी मंडपात जातात. यावेळी वाजंत्री वाजविले जाते. या  नंतर त्याच सुवासिनी घरात येऊन नवऱ्या मुला/मुलीला हळद लावतात व तेलवण, पोखण करून आरती ओवाळतात.

(टीप - मुलाला हळद लावल्यानंतर त्याची उष्टी हळद नवऱ्या मुलीकडे घेऊन जातात.)

 

५) हळदी विषयी माहिती :

     कोहळे कापणे ,मेढीचा मुहूर्त, उखळी घाणा अशा मुहूर्ताच्यावेळी नवरा/नवरीला हळद लावली जाते. त्या व्यतिरिक्त होणाऱ्या पुढील लग्न विधीतही हळद लावली जाते. या उरलेल्या हळदीमध्ये एकदा नवरा/नवरीच्या चारीबाजूला कच्चे पापड ठेवले जातात त्यावर ज्योत ठेवून ती ज्योत पेटविली जाते व हळदीची रीत करतात. दुसऱ्या हळदीत तळलेले पापडही वापरतात. ही रीतही वरील प्रमाणे केली जाते. त्यानंतर मध्येच एकदा तांदळाचे लोण घेतले जाते. या लोणामध्ये तिथे हजर असलेल्या सर्वच बायका भाग घेतात. यावेळी नवरा/नवरीला पाटावर त्याच्या/तिच्या भोवती सर्व बायका आपल्या हातात तांदूळ घेऊन मध्यभागी बसलेल्या नवरा/नवरीच्या भोवती गोल फिरतात. फिरताना आपल्या हातातील  थोडे थोडे तांदूळ नवरा/नवरीच्या डोकीवर उडवतात. यावेळी बोलल्या जाणाऱ्या गाण्यात घरातील सर्व नातेवाईकांच्या नात्यांचा उल्लेख करून वाडवडीलांचे स्मरण करतात .यावेळी नवरा/नवरीचा चेहरा टाँवेलने किंवा पदराने झाकतात.

         लग्नविधीत एकंदर सात किंवा नऊ वेळेला हळद लावतात. सुरुवातीच्या हळदी लावण्याचा क्रम हा चढता क्रम असतो,परंतु शेवटची हळद ही उतरत्या क्रमाने असते. यासर्व विधीमध्ये नवरा/नवरीच्या कपाळावर बांधलेली मुंडावळ प्रत्येक रीत झाल्यावर थोडावेळ सोडली जाते,व परत पुढच्या रीतीला तिच मुंडावळ परत बांधली जाते. तसेच सर्व विधीमध्ये नवरा/नवरी पाटावर बसण्याआधी आणि विधी झाल्यानंतर उठताना एक सुवासिनी नवरा/नवरीच्या पाटाभोवती पाणी शिंपडते.

 

६) हवनाच्या आधीची हळद व मीठाचे लोण :

      हवनाच्या आधी शेवटची हळद लावली जाते तेव्हा मिठाचं लोण घेतात. या मिठाच्या लोणात तांदळाच्या लोणाप्रमाणे रीत केली जाते. फक्त यावेळेला आपल्या हातातील मीठ सुवासिनी नवरा/नवरीच्या डोक्यावर न टाकता टाकण्याची फक्त अँक्शन करतात व गाणी म्हणतात. शेवटी एका सुवासिनीच्या हातात ते मीठ गोळा केले जाते. नंतर त्या नवरा/नवरीची आई त्या मीठाने त्याची द्रुष्ट काढते.

 

७) हवनकरणे :

     हा विधी मंडपात केला जातो.यासाठी सालासहीत   चार छोटे नारळ (शहाळी ),सागाच्या समिधा,हवनपात्र,शेणाच्या गोवरी, नाचणी, फुले,तूप वापरतात. भटजींनी मंत्रोच्चारात सांगितलेली पूजा करून झाल्यावर आणलेल्या समिधा त्या होमात अर्पण केल्या जातात. सोबत थोडे थोडे तूप अग्नीला अर्पण केले जाते. या विधीत पाटावर बसताना नवरा/नवरीच्या कपाळावर मुंडावळ बांधली जाते.सोबत पाटावर आईवडील किंवा लग्न झालेली बहीण जोड्याने बसते तसेच करवलीही बसते.अग्नीला समिधा आणि तूप अर्पण केल्यानंतर यि हवनाच्या चौकटीभोवती मांडवात उपस्थित असलेली नवरा-बायको म्हणजे जोडपी सभोवताली फिरतात यावेळी भटजी दोघांच्या हातरुमालाचा जोडा मंत्रोच्यारात बांधतात व फिरून झाल्यावर भटजी प्रत्येकाचा जोडा सोडतात. हवन चालू असताना बायका हवनाची गाणी म्हणतात. या गाण्यातही वाडवडीलांची नावे घेऊन त्यांचे स्मरण करतात. होम झाल्यानंतर भात भाजीचा नैवेद्य पानात घेऊन मंडपाच्या बाहेर नेऊन ठेवतात याला बळीचा घास म्हणतात.

 

८) कांकण आणणे :

       मामा भाचा /भाची यांचा प्रेमबंध असलेला सगळ्यात मानाचा आणि प्रेमाचा विधी म्हणजे कांकण. यात मामाकडून मुला/मुलीला हातावर बांधावयाचे कांकण, बाशिंग ,फुलांची मुंडावळ, गळ्यातील फुलांचा हार व हातात पकडण्यासाठी नारळाचा सजवलेला तोटा यांचा समावेश असतो. तसेच मुला/मुलीसाठी कपडे तसेच त्यांच्या आईवडिलांसाठी कपडे घेतात. कांही गावात कांकण हवनाचा आधी मांडवात आणतात तर काही गावात हवन झाल्यानंतर आणतात.(पूर्वीच्या रिवाज असा होता की कांकणात बहीणीसाठी भावाने आणलेली साडी हवनात नेसून बहिणीने हवंनावर बसावं म्हणून ते हवनाच्या आधी आणण्याचा प्रघात होता.) कांकण मांडवात आणण्याआधी मामाकडील मंडळींनी हे कांकण शेजारच्या नातेवाईकांकडे ठेवलेले असते तिथून ते वाजंत्री सोबत वाजत गाजत एका मोठ्या थाळ्यात किंवा बास्केटमध्ये मांडवात आणतात. मांडवाच्या प्रवेशव्दारातच नवऱ्या मुलाची /मुलीची आई आपल्या भावाला, वहिनीला, भाच्याना तसेच कांकणासोबत आलेल्या नातेवाईकांची पायधुणी करुन त्यांना आरती ओवाळते व त्यांना मानपान देऊन गळाभेट घेते.भावाने आणलेले ताटातील कांकण तिला दिले जाते. ते कांकण डोक्यावर घेऊन सर्वांसोबत मांडवात नाचते, व नाचत नाचत घरात येतात. कांकणासोबत आलेल्या सर्व मामाकडील मंडळीचे आदरातिथ्य केले जाते.           

   

९) कोडे मोजणे :

                    नवऱ्या मुलाला/मुलीला घराच्या उंबरठ्यावर( उंतरात) बसवून दोन सुवासिनी समोरासमोर उभ्या राहून नवरा मुला / मुलीच्या डोक्यावरुन टाँवेल  पकडतात. त्या टाँवेलमध्ये हातातील सोन्याची अंगठी टाकून हाताने अंगठी मागेपुढे फिरवून  "कोडे मोजा " हे गाणं म्हणून रीत करतात.यावेळी मुला/ मुलीचे डोके टाँवेल किंवा पदराने झाकतात.(बोखाडा घेतात)

 

१०) शिडोल्या उडविणे :

    लग्न मंडपाच्या पहिल्या प्रवेश द्वारात केळीचा खांब आडवा टाकलेला असतो त्यावर पाट ठेवून नवरा/नवरीला बसवितात व हा विधी करतात. यात  तांदळा बरोबर काळेतीळ घेऊन ते मांडवाबाहेर हाताने वर उडवितात व गाणे म्हणतात. नंतर नवरा/नवरीला हळद लावून तेलवण, पोखण करतात व आरती ओवाळतात.

 

११) गौरेतणी जेवडणे :

      रात्री गौरेतणींना मानाने जेवण देतात. बारा सुवासिनी आणि एक कुमारिका अश्या तेरा जणींना जेवणानंतर हळदीकुंकू देऊन त्यांना एक वस्तू भेट म्हणून देतात. याला गौरेतणी पूजणे असे म्हणतात. मुलीचे लग्न असेल तर त्या मुलीच्या हातात गौरेतणी हिरवा चुडा घालतात. व गाणे म्हणून नाचतात. मुलांचे लग्न असेल तर नवऱ्या मुलाला काळ्या मण्यांच्या सरी मध्ये पाच मणी ओवण्यास सांगतात.

 

१२) पाटा पुजणे :

      आपण आपल्या घरात वाटण करण्यासाठी जो पाटा वापरतो त्या पाट्यावर एक मध्यम मडके ठेवून हे पूजन करतात. या मडक्यावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवतात.मडक्यामध्ये तांदूळ, पैसे, लाडू,सुपारी व ब्लाउज पीस घालतात.साधारणत: पाटा पूजनामध्ये पाट्यावर नऊ पापड,  नऊ तांदळाचे पापड(हाकोळ्या) ,नऊ तांदळाचेपेढे, नऊ हळकुंड, नऊ सुपाऱ्या या वस्तू ठेवतात.म्हणजे आधी पापड त्यावर तांदळाचा पापड त्यावर पेढे,हळकुंड, सुपारी असे एकत्रित करून नऊ ठिकाणी ठेवतात. पाट्याला कच्च्या दोऱ्याने चारही बाजूला बांधतात.नवरा/नवरी पाट्याची पूजा करून त्याला नमस्कार करतात. हे पाटापूजन स्वयंपाक घरात करतात.

     तांदळाच्या पीठाच्या पेढ्यांना तीळ लावतात. या पेढ्यांना कुरड्या असेही म्हणतात व तांदळाच्या लहान पापडाना हाकोळ्या म्हणतात. वाडवळ समाजातील लग्न कार्यात पाटा पूजन हे फार महत्त्वाचे मानतात. एखाद्याचं लग्न झालं नसेल तर त्याचा अद्याप पाटा फुटला नाही अशी बोली प्रचलित आहे.

 

१३) नवण्याचे पाणी आणणे :

  चार सुवासिनी आपल्या सोबत एक जोडपं आणि वाजंत्री घेऊन जवळच्या विहीरीवरुन किंवा इमारतीच्या बाहेर असलेल्या नळावरुन घरात आणलेल्या नवण्याने (मडक्याने) पाणी आणतात. आणि नवऱ्या मुलाची किंवा मुलीची आंघोळ घालतात. यापूर्वी त्यांना शेवटची हळद लावली जाते. ही उतरत्या क्रमाने लावली जाते.

 

१४) मयारं भरणे :

     मुलाची किंवा मुलीची आत्या रात्रीच्या वेळेत मयारं भरुन ठेवते.मयारात दोन मडकी असतात. पैकी एका मडक्यात तांदूळ तर दुसऱ्या मडक्यात तांदळाचे पीठ भरतात. तसेच कुरड्या, (तांदळाच्या पीठाचे पेढे. या पेढ्यांना तीळ लावतात)  हळकुंड, सुपारी, बदाम, अक्रोड,खारीक, लाडू, पापड व ब्लाउज पीस या वस्तू दोन्ही मडक्यात थोड्या थोड्या टाकून मयारं भरुन ठेवते व वरती कोडे ठेवून देते.

 

१५) मयारं चालविणे  व मयारं उठविणे :

          दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा/नवरीची आत्या मयारं चालविते. मयारं भरून ठेवलेली दोन्ही मडकी एकमेकांवर ठेवून वरच्या लहान मडक्यावर एक कोडे ठेवून त्यावर बोरुची काडी  ठेवतात या काडीला कच्चा दोरा बांधतात. नंतर हे मयारं आत्या घराच्या बाहेर  घेऊन जाते .त्यावेळी कोड्यावरची ज्योत पेटवतात. हे मयारं आत्या घराबाहेरुन चालवत आणते.त्यावेळी एका भांड्यात हळद घेऊन ती हळद हाताने जमिनीवर लावत मयारं चालविते.सोबत चार सुवासिनी त्याला हात लावतात. यावेळी एका जोडप्याचा जोडा लागतो व नवरा/नवरी लग्नाची तयारी करून सोबत असतो /असते. सुवासिनी गाणं म्हणतात मयारं चालवत चालवत पाटा पूजन केलेल्या ठिकाणी नेऊन ठेवतात.

          लग्नाच्या नंतर तिसऱ्या किंवा पाचव्या दिवशी ज्या ठिकाणी मयारं ठेवले असेल त्या ठिकाणाहून आत्या मयारं उचलते त्याला मयारं उठविणे असे म्हणतात. एखाद्या घरात दोन किंवा अधिक भावंडं असतील तर त्या लग्न कार्यातील मयारं आत्या आपल्या घरी घेऊन जाते; परंतु जर लग्न कार्य शेवटचं असेल तर मात्र ते मयारं त्या लग्न कार्य असलेल्या घरीच ठेवतात. मयारं चालविताना चार सुवासिनीं लागतात त्याच प्रमाणे मयारं उठवितानाही चार सुवासिनी लागतात. मात्र यावेळी हळद वापरली जात नाही. मयारं उठवून घराच्या बाहेर आल्यावर ते मयारं सुवासिनी आत्याच्या हातात/डोक्यावर देतात. दोन्ही वेळेला  "साली मयारं भरत्यावेळी " हे गाणं म्हणतात.

 

१६) मामाचा भाचा/भाचीला शिणगार करणे :

         आत्याने मयारं चालविल्यावर मामा आणि मामी आपल्या भाचा / भाचीचा शिणगार करतात. घरातील देवदेवतांना नमस्कार करून तसेच मोठ्यांना नमस्कार करून झाल्यावर मुला/मुलीला तसेच सोबत आईवडिलांना खुर्चीवर बसवितात. यावेळेला मामा मामीच्या प्रेमाची गाणी म्हटली जातात. मामा आपल्या भाचा/भाचीच्या पायाच्या वरच्या सभोवतालीच्या भागावर ओले कुंकू लावून पायाच्या मध्यभागी स्वस्तिक चिन्ह काढतो.तसेच दोन्ही गालावर कुंकू लावतात. त्यानंतर मुलाच्या डोकीवर टोपी घालतात.आधी कपाळावर बांशिंग बांधून मुंडावळ बांधली जाते. यावेळी नवरी साठी असलेले सरस्वतीचे बाशिंगही नवऱ्या मुलाच्या कपाळावर बांधले जाते. हाताला कांकण बांधले जाते. तसेच गळ्यात हार घालून हातात सजवलेला तोटा (लहान सजवलेला नारळ)देऊन मामा भाचा/भाचीचा श्रुंगार पूर्ण करतो.

नंतर लग्न सोहळ्यासाठी लग्न मंडपाकडे प्रयाण केले जाते.

 

१७) नवरा मुलगा लग्न मंडपाजवळ पोहचल्यावर :

                   ज्या ठिकाणी लग्नसोहळा होणार असेल त्या ठिकाणी नवरा मुलगा पोहचल्यावर नवऱ्या कडील चार सुवासिनी नवऱ्याच्या कपाळावर बांधलेले सरस्वतीचे बाशिंग काढून घेतात व सोबत नवरीसाठी आणलेली पायातील फेरवी ,फुलांची वेणी, पापड घेऊन नवरी ज्याठिकाणी बसली असेल त्याठिकाणी जातात.तेथे गेल्यावर नवरीच्या खुर्चीच्या बाजूला पापड ठेवून त्यावर एक ज्योत पेटवतात,व तिला केसात कंगवा फिरवून वेणी माळतात. नंतर कपाळावर बाशिंग बांधतात आणि नवरीच्या पायाच्या मधल्या बोटात फेरवी घालतात व मंडपाजवळ परत येतात.

                नवरा मुलगा मंडपाजवळ येताना तेथील काही अंतरावर बांधलेल्या आंब्याच्या पानांच्या तोरणातून एक पान तोडून तो मंडपाजवळ येतो.तेथे प्रवेशव्दारावर नवरीचे आईवडील उभे असतात. ते  नवऱ्या मुलाचे आईवडील व करवलीचे पायधुणी करून  स्वागत करतात. आई आरती ओवाळते. त्यांना योग्य तो मानपान देऊन झाल्यावर नवरीचा भाऊ नवऱ्याचा कान पिळतो.तदनंतर मुला/ मुलीचा मामा आपल्या भाचा/भाचीला हाताला पकडून लग्न सोहळ्याच्या स्टेजवर घेऊन जातो.

               लग्नविधी चालू होण्यापूर्वी स्टेजच्या मध्यभागी  ब्राम्हणाने एका पाट्यावर तांदूळ, चार कुंडल्या व इतर सामान ठेवलेले असते त्या पाट्याच्या दोन्ही बाजूला एकेक केळीचे पान ठेवून त्यावर तांदूळ ठेवलेले असतात त्यावर  नवरा -नवरीला लग्नासाठी उभे करतात. त्या दोघांच्या मध्यभागी अंतरपाट घेऊन दोन पुरुष उभे राहतात. दोघांच्या गळ्यात जान्हवं घालून एकमेकांच्या हातात हात देतात. यावेळी मामा आपल्या भाचा-भाचीच्या खांद्याला पकडून जवळ उभा राहतो. लग्न विधी सुरु होताच चार पुरुष आपल्या हातात  मडकी/कळशी व चार सुवासिनी आपल्या हातात लामणदिवे प्रज्वलित करून  एक पुरुष एक स्त्री अश्या क्रमांने उभ्या असतात. नवरीच्या पाठीमागे नवऱ्याकडील एक सुवासिनी आपल्या हातात नवऱ्याकडील दोऱ्यात ओवलेली काळ्या मण्यांची लांबलचक पोत(माळ) पकडून उभी असते व लग्न लागताच ती सुवासिनी त्याला गाठ मारते.त्यानंतर भटजीची मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर वाजंत्रीच्या /टाळ्यांच्या गजरात शुभमंगल होते. लगेच नवरा-नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. नवरी नवऱ्याला नमस्कार करते व एकमेकांचे स्थान बदलले जाते. त्याचवेळी हातात कळशी/मडके घेऊन उभे असलेले पुरुष व लामणदिवे घेऊन उभ्या असलेल्या सुवासिनी नवरा-नवरी भोवती पाच वेळा फिरतात. नंतर नवरीची आई व इतर सुवासिनी नवरा नवरीला आरती ओवाळतात व खेम घेऊन दोघांची डोकी एकमेकांना लावतात. नंतर भटजीचे कन्यादान, सप्तपदी, लज्जाहोम इत्यादी विधी झाल्यावर लग्न विधी संपतात.

 

** लग्न विधी संपल्यानंतर **

        लग्न विधी संपल्यानंतर वऱ्हाडी मंडळी, पाहुणे मंडळी आणि नवरा-नवरीने भोजनाचा आस्वाद घेऊन झाल्यावर नवरी नवऱ्याकडे सासरी यायला निघते. यालाच वरात (नावळ)निघणे असे म्हणतात. वरात निघण्यापूर्वी नवरीची आई नवरीची ओटी भरते आणि तिच्या हातातील एक बांगडी काढून आपल्या कडे आठवण म्हणून ठेवून देते. आई-बाबा तिची गळा भेट(खेम) घेतात. भाऊ बहिणही भेट घेतात. तसेच इतर नातेवाईकही तिची भेट घेतात. बायका पाठवणीची गीतं गातात. ही करुण रसातील गाणी ऐकून आई वडिलांसह इतरांच्याही डोळ्यात अश्रू तरळतात. शेवटी साखरपुड्याची ओटी सोबत घेऊन नवरी अश्रु भरल्या नयनाने माहेर सोडून तिच्या सासरी यायला निघते. तिच्या सोबत तिची पाठराखीणही(अणवारी)येते.

         नवरा-नवरी नवऱ्याच्या घरी येत असताना प्रथम तेथील जवळच असलेल्या देवळात जाऊन नवरा-नवरी देवाचं दर्शन घेतात व मंडपाकडे येतात. मंडपाच्या प्रवेशद्वारावरच मुसळ आडवे टाकून त्यांना अडविले जाते व दोघांना उखाणे घ्यायला सांगितले जाते. उखाणा घेऊन झाल्यावर घरात येताना घराच्या उंबरठ्यातही मुसळ आडवे पकडून त्यांना परत अडविले जाते व उखाणे घेण्यास सांगितले जाते  व गंमत म्हणून अणवारीला उखाणा घेण्यास सांगतात.त्यानंतर नवरीला उंबरठ्याची पूजा करण्यास सांगितले जाते. यावेळेला तिच्या सोबत आणलेल्या साखरपुड्याच्या ओटीच्या सामानातील एक सुपारी,तांदूळ ठेवून कुंकू वाहून उंबरठ्याची नवरी पूजा करते.उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर नवरी ग्रुह प्रवेश करण्याआधी   एक सुवसिनी सुपात तांदूळ, सुपारी व हळकुंड टाकून ते सुप नवरीच्या समोर पकडून उभी राहते त्यातील थोडेथोडे तांदूळ नवरी आपल्या दोन्ही हाताने जमीनीवर टाकत टाकत ग्रुह प्रवेश करते व पुढे पुढे त्याच पध्दतीने घरात जाते.यावेळी नवरा मुलगा तिच्या मागे तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवून तिच्या बरोबर चालतो. ग्रुहप्रवेश झाल्यावर नवरीला प्रथम चुलीची पूजा करण्यास सांगितले जाते. नंतर घरातींल मोठे पिंप किंवा मातीचे मडके बघण्यास सांगतात व सासू तिला ते मडके भरले आहे की रिकामे आहे हे विचारते. नंतर घरातील कुलदैवतास नमस्कार करून झाल्यावर घरातील सर्वांची ओळख करून दिली जाते.त्यानंतर नवरा -नवरीची बाशिंगे ,गळ्यातील हार,हातातील तोटा डब्यात वाळू भरून ठेवलेल्या मेढीजवळील पाटावर काढून ठेवले जातात.

         नवरी नवऱ्याकडे आल्यावर दुसऱ्या दिवशी नवरी कडील मंडळी तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी नवऱ्याकडे येतात त्याला नवरीला बोलावणे असे सांगतात. यावेळेला त्या मंडळीच्या हातात एक नारळाचा जोड आणि सुपं आणतात. याला अडलं पडलं म्हणतात. नवरीच्या घरी जाताना त्यांनी सोबत आणलेल्या नारळाच्या जोडाची अदलाबदल करतात व नवऱ्याकडील नारळाचा जोड ते घेऊन जातात. भोजन झाल्यावर सर्वजण आणि नवरा-नवरी परत नवरीच्या घरी जायला निघतात. निघण्याआधी घरात वाळूत भरुन ठेवलेल्या मेढीला नमस्कार करतात आणि आपल्या हातातील काकणं  आधी काढून ठेवलेल्या बाशिंगा जवळ ठेवतात.ही काढून ठेवलेली काकणं आणि बाशिंगं वर्षभर सांभाळून ठेवली जातात. पुढील काळात येणाऱ्या घरजत्रेच्या दिवशी कुलस्वामिनीची पूजा करताना पाटावर ठेवतात व त्याचीही पूजा करतात. पूजा करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करतात.लग्नाच्या वेळी घरात ठेवलेला सुकडी नारळही वर्षभर सांभाळतात व घरजत्रेच्या वेळी पूजा करून फोडून प्रसाद म्हणून वाटतात.

       नवरा मुलगा नवरीकडे जाताना आपल्या घरच्या केळींची गाठ सोडतो तसेच नवरीकडे गेल्यावर तेथील मंडपाच्या प्रवेशद्वारावर बांधलेल्या केळीचीही गाठ सोडतो.नवरा नवरीकडे जाताना सोबत अणवाऱ्याला (सोबत एक व्यक्ती) घेऊन जातो.

शेवटी नवरा-नवरीच्या घरातील मंडळीच्या सोयीनुसार दोघांच्या घरी सत्यनारायणाची पूजा घातली जाते व लग्नविधी संपतात.

--------------------------

भाग दुसरा    👈🏻(click here)

 

 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Kalavati
Kalavati Raut
29-Nov-2021 09:43 AM

शालीताई (मीनल पाटील), आपण या लेखाद्वारे माझ्यासारख्या अज्ञानी लोकांना समाजातील लग्नविधींबद्दल फार उपयुक्त माहिती आपण नेमक्या आणि नेटक्या शब्दात उपलब्ध करून दिली.त्याबद्दल खूपखूप धन्यवाद. असेच लिखाण आपल्या हातून सदोदित घडत राहो ही सदिच्छा.

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

4 + 2=    get new code
Post Comment