वाडवळी लघु कथा - पारू कोणशी...?

1058

   

विहऱ्या विरुला पावली पारु...

      विरु हकाळी आफिसला जाव्या निंगाला ते त्याई बायको रांनीसन अड्डाऊन हांगते पाणी येल अह वाटते, आबाळ भरून आलय, आत्तास आजारासन उठल्यात, हतरी घेऊन जा न परत न विहरता आणा. विरु आपल्या कामात एकदम हुशार माहणू पण एक नंबरसा विहराळू त्यामुळे त्याया बायकोन त्याला हतरी आठवणीन आणव्या हांगटली. आता अवडा दम दिल्यार विरुई का हिम्मत हतरी विहरव्याई. विरु बीसारा धावल्या धावल्यास रिक्षा पकडून कामार गेला.
       कामाया रामरगाड्यात हांशे सहा कवा वाजले त्याला कळलं नय. पटापट काम आटपून  विरु रिक्षा पकडव्या आफिस बायेर आला. बायेर रिमझिम पाणी सालु होथा. त्याया लक्षात आलं आपु हतरी विहरलो. हतरी घेव्या परत मागे फिरला, जाऊन पावते तो हतरी जागेवरसन गायब. हतरी तही जुनिस होथि त्यावर त्यानं ओळखव्याहाटी फुलाई खूण करून ठेवली होथि. विरून आफिसमन जकल्याना विसारून पावलं पण हतरीया काय पत्ता लागला नय. बायकोला का हांगव्या या विसारात तो घरा कवा पोसला त्याला कळलंस नय. दारा हमोरस बायकोला पाऊन त्यानं थाप मारली, "अग येताना एका दुकानार पाटी लिवलोई जुनी हतरी द्या न दोन नव्या हत्र्या दहा दिह्यानंतर घेऊन जा बघून मीन आपली हतरी तय दिली." विरून बायकोया गाळी वासवव्याहाटी थाप ते मारली पण थाप पसवव्याहाटी दोन नव्या हत्र्याया भुरदण्ड त्याला पडव्या होथा. 
     बिज्यां दिहा विरून जकल आफिस पालथं घाटलं पण त्याया हतरीया पत्ता काय लागला नय. अहेस आठ दीही गेले अजून दोन दीही बाकी होथे, विरुमेरे दहा दिहाई मुदत होथि. एक दीही अचानक आफिस हुटल्यार विरुला त्याया आफिसमनसी पोरी पारू दिक्षितश्या हाथात त्याई हतरी दिहते, हतरीवर त्यानं ओळखव्याहाटी फुलाई खूण केलती ती पावली. हतरी आपलीस हाय ये विरुला पटलं पण तियामेरे हतरी मागव्याई कही. पारू दीक्षित हिरोईनश्या वाणी दिहणारी गोरी गोमटी, घाऱ्या डोळ्याई, उंच सडपातळ स्वभावानं जरा शिष्टस होथि. आफिसमन तिया बरबर कोणशी बोलव्याई हिम्मत नय होय त्यामुळे विरून हतरीबद्दल विसारव्याय होडून दिल पण ती आपली हतरी वापरते यातस तो मनोमन सुखावला. हतरी कही मिळवव्याई या विसार करत तो घरा आला.
     घरा जेवण जाल्यार विरुला विसार करता करता एक आयडीया सुसली, त्यानं त्याया दोस्त  वासूला फोन लावला न हांगटल का मी आज आपल्या आफिसमनश्या पारू दीक्षित बरबर काफी पेव्या गेलतो. वासूया विरुया बोलण्यार विश्वास बहत नव्हता, कारण ती पारू आफिसमन कोणलाव भीक घालत नवती, वासून ते तिया बरबर बोलव्या हाटी जंग जंग पछाडलं होथ पण त्याला काय तीन दाद नय लागू दिली न विरु बरबर चक्क काफी पेली. ये काय वासू पटऊन घेव्या तयार नवता. विरून वासूला हांगटल माया बरबर 500 रुपयाई पैज लावते का बोल ? वासू विसारते तुन तिया बरबर काफी पिली या पुरावा काय ? विरून काणी हांगटली का आमी हाटलात गेलो, काफी पिली, निगव्या वक्ताला पाणी लागला ते मिन तिला घरा जाव्याला माई हतरी दिली. खोटं वाट्तेन ते तिया मेरे माई फुलाई खुण अहलेली हतरी हाय पाव. वासूला तरी पण खर वाटल नय त्यानं विरु बरबर पैज लावली. 
     बिज्यां दिह्या विरुला सायेब कामाहाटी त्याया केबिनमन बोलावतात तय त्याला कोणकोणला प्रमोशन मिळव्या हात त्याई नाव कळतात, त्यात पारू दिक्षितस नाव अहते. तिय नाव पाऊन विरु डोकं खाजवव्या लागला त्याया डोक्यात परत एक भन्नाट आयडीया आली. 
      हांशे आफिस हुटल्यार विरु धावत धडपडत पारू मंगारी गेला न तिला हांगते *मॅडम, तुंमश्या हाथात हतरी हाय ती माई हाय, ती घणी लकी हाय, त्याहाटी त्या हतरीवर मिन फुल काडून ठेवलंय. हतरी घेटली तवा ज्योतिषान मला हांगटलोव तुया मेरे जी हतरी हाय ती लकी हतरी हाय त्या हतरीमुळे तुला धनलाभ होईन. मॅडम खरस मला धनलाभ झाला. ज्योतिषानं अहव हांगटल का हतरी हरवल्यावर ज्याला हापडेन त्याला प्रमोशन मिळेन. त्यांनंतर ती हतरी तुया कामाई नय रेणार त्यामुळे ती हतरी आता माला नको, तुमीस ठेवा.* विरून जकल एका दमात हांगुन टाकलं न तयसन काडता पाय घेटला.
      बिज्यां दिहा विरु उठून जरा खुशीतस आफिसमन जाते. त्याया दोस्त वासू बेचैनीत बहलोवा कारण त्यान पारू दिक्षितश्या हाथात विरुई हतरी पावलोई. तवड्यात त्याया सायेब आफिसमन आला त्यानं आल्या आल्या पारू दीक्षितला त्याया केबिनमन बोलावल न तिया हाथात प्रमोशन लेटर दिल, तिय अबीनन्दन केलं. तिला काल विरून हांगटल त्याया लगेस अनुबव आला. तीन सायबाये आबार मानले न आनंदान केबिनश्या बायेर धावतस आली न विरुला मिठी मारली. आफिसशे जकले लोक त्या दोगाना पावतस रेले. विरुला आदी काय हमजलस नय मंग त्याया लक्षात आलं यी अवडी क्या खुश जाली. वासुला ते धक्का जहा बहला तो आ करून पावत रेला, त्याय डोकं साफ चक्रावून गेलत. विरु त्यामेरे रुबाबात गेला हळुस कानात हांगते माये 500 रुपये तयार ठेव . 
       विरून जिकलेल्या 500 रुप्यासन दोन भारीश्या हत्र्या घेटल्या, एक सोताहाटी न बिजी बायकोहाटी. बायकोला खुश करव्या मोगऱ्या गजरा घेतला न घरा जाऊन बायकोया केसात माळला. गालातल्या गालात खुश होत बायकोला हांगते आपल्या जुन्या हतरीमुळे कवडा फायदा झाला पाव न मनातल्या मनात विसार करते " विहराळूपणा घणास फायद्यात पडला"
       विरु खुश, त्याई बायको खुश, पारू दीक्षित खुश पण बिसाऱ्या वासुला कोड काय हुटलस नय ....... ?????

 

 

हत्रीया नावानं चांगभलं...

       दोन दीही जाले विरु जाम खुशीत होथा. आफिसमन काम करता करता त्या दीही कहा जाव्या त्याला कळव्या नय. आज अहास काम खपवून आफिस मनसन निंगताना त्याया दोस्त वासू त्याला हांगते, " आज माला सायबान काम खपवून जाव्या हांगटलय, माला घरा जाव्या ओखत होईन, मिन आज माया भाहाई स्कुटर आणलंय ती घेऊन जा, त्याला हांशी पायजे होथि, त्याला कय तरी जाव्या हाय". वासू न विरु एका गावात मेरे मेरेस रेतोये. विरु त्याला हांगते ये तू सावकाश मी स्कुटर घेऊन जात, काळजी नको करू. विरु वासू मेरशी स्कुटरशी सावी घेते न निंगते. गाडी सालू करून थोडा पुडे जाते तो त्याला रिक्षाई वाट पावत अहलेली पारू दीक्षित दिहते. तिला पाऊन तो विसार करते, आज बरी संदी हाय इला तिया घरा होडत. तो गाडी थांबवते न तिला हांगते " बहा मॅडम तुमाना होडत."

आजकाल विरुई भीड शेपल्यामुले तो पारू बरबर बिनधास्त बोलव्या लागलोवा. पारून विरुला पावलं न विसारलं  "अय्या, यी गाडी कोणशी, मी जाईन घरा, तुमि क्याला तसदी घेतात". तिय विरु बद्दल चांगलं मत जालत त्यामुळे तीय आजकाल विरु बरबर बोलणं वाडलोव.

विरून तिला गाडीवर बहव्या आग्रव केला न हांगटल "यी गाडी वासुई हाय, तो अजून काम करव्या थांबलय, त्यानंस हांगटल गाडी घेऊन जा." ती त्याया खांद्यावर हाथ ठेऊन गाडीवर बहली. विरु मनोमन सुखावला न गाडी सालु केली.

       विरु आफिसमनसन  त्याई हतरी विहरून निंगाला होथा. वासून विरुई हतरी त्याया टेबलामेरे पावली. वासून ती घेटली न धावतस त्याला देव्याहाटी आफिस बायेर आला न त्याला हाक मारव्या होथा तवड्यात पारू दिक्षितला विरुया मंगारी गाडीवर बहुन जाताना पावली. एका क्षणात वासुय डोकं भणभणल, रगत खवळल, जळफळाट जाला, त्याया जळून कोळसा होव्यास बाकी रेलता. वासू पुटपुटला साली माया बरबर बोलव्या तयार नय न विरु बरबर गुलुगुलु वार्ता काय करते, मिठ्या काय मारते. एक दि मिन गाडी थांबवली ते मा हमोर रिक्षात बहली न निंगुन गेली. आज ते चक्क मायास गाडीवर बहुन त्या बरबर.....च्यामारी ईया ते अह बडबडत हाथाशी हतरी जोरात आपटव्या होथा, तवड्यात त्याया लक्षात आलं यी हतरी विरुई हाय. त्याये डोळे समकले. त्या मनात विसार आला का आता ये जकल विरुया बायकोलास जाऊन हांगत. हतरिया निमित्तानं आत्तास घरा जाव्याय त्यानं ठरवलं. तो आफिसमन आला पटापट काम आटोपव्या लागला.

        विरु पारूला घेऊन साललोवा, गाडी जरा हळूहळूस सालवतोवा रस्त्यावर जरासा खड्डा दीहीला तरी ब्रेक मारतोवा. रस्त्यात भाजी मार्केट लागलं तय पारू त्याला हांगते "जरा थांबा अटे, थोडी भाजी घेत म्हणजे परत येव्या नको." विरून गाडी थांबवली, पारू भाजी घेव्या मार्केटमन गेली. थोडा वेळ गेला, विरु घड्याळ पावते. तो गाडीवरस बहलेला हाय तवड्यात हमोरून त्याला त्याई बायको येताना दिहली. विरुला ते घाम फुटला, आता का करव्या. त्याई बायको हातात भाजीयी पिशवी घेऊन त्यामेरेस येत होथि. विरुया विसार सालु होथा न ती त्याहमोर येऊन विसारते, " तुमि अटे का करतात". वेळ नय निबाऊन नेय तो विरु कयसा. "अग मी भाजी घेव्यास अटे आलतो, वासून आज कामार येताना स्कुटर आणलोई. त्याला सायबान थांबव्या हांगटल ते मला हांगते गाडी घेऊन जा, मिन विसार केला आता भाजी घेऊनस जाऊ." विरून पटापट थाप मारून वेळ निभावली. त्याई बायको विसारते "आज तुमाना कहक काय सुसल ? नय ते कवा कवा दा ओखत हांगटल तरी विहरव्या काम जोरात अहते तुमस." "तुन भाजी घेटली, का घेवयाई हाय, सल लवकर पाणी येन." विरून तयसन पळव्या हाटी तिला गाडीवर बहोडली. गाडी थोडी पुडे गेली न त्याई बायको त्याला थांबव्या हांगते. विरून गाडी थांबवली न विसारलं "का जाल ग ?" ती हांगते "अटेस थांबा त्या टेलरश्या दुकानात माय पोलक हिवव्या दिलय ते घेऊन येत." विरून पास मिनिट वाट पावली बायको काय येय नय. त्यानं विसार केला, गाडी सुरू केली न परत पारूला होडली तय आला.

        पारू त्याई वाट पावत होथि. ती विरुला कय गेलता अह विसारव्या लागली. "मी अटेस होथा बाजूया दुकानात, गर्दी हाय बघून गाडी तय लावलोई" अह हांगुन विरून मारली थाप न हांगव्या लागला "बहा लवकर नय ते पाणी येन, आबाळ भरलय." ती बहली तही विरून सुसाट गाडी मारली न तिया दारात नेऊन ऊबी केली. विरुय नशीब तिय घर भाजी मार्केटश्या मेरेस होथ. ती गाडीवरसन उतरून विरुला शा पेव्या वारव्या लागली. विरुया आनंद गगनात मावे नय. पण सोताला आवरलं न तिला हांगते "परत कवा तरी येन आता नको" न गाडी हुरू करून सुसाट बायकोला होडली तय आला.

      बायको कमरेर हाथ देऊन वाटस पावतोई. "कय गेलते " बायको जराशी डाफरलीस. विरुला वाटलंस होथ अहा प्रश्न हमोर येणार. तो तयारीतस होथा. "अग आफिस होडल न माया लक्षात आलं मी हतरी विहरला, त्याहाटी आफिसमन जाऊन आलो." "तुमस ये आता नेहमिय जालय, तुमाना बऱ्या डाक्टरला दावडव्या लागेन. कय हाय हतरी द्या माया मेरे, नय ते परत कटे विहरतीन." विरु परत गोत्यात. हतरी कयशी देऊ ईला, पण वेळ नय निबाऊन नेन ते विरु कयसा. "तू पयले गाडीवर बह, घरा जाऊ सल, नय ते पाणी येन. बायकोला गाडीवर बहोडली न विरून गाडी सालू केली. विरून गाडीवर बहल्या बहल्या डोख सालवल न बायकोला हांगते मी हतरी घेव्या गेलतो पण वासू तय नव्हता काम खपवून लवकर घरा गेलेन, त्यामुळे आफिस बंद होथ.

     वार्ता करत करत विरु बायकोला घेऊन घरा पोसला. त्याया दारा हमोरस वासू उबा होथा, त्याया हाथात विरून आपली हतरी पावली न बायकोला हांगते "पाव त्यानं आपली हतरी आणली, देव्या आलय." वासूया हाथात हतरी पाऊन विरुया बायकोला धीर आला. विरु धावतस वासू मेरे आला न त्याला हांगते "माला वाटलंस तू माई हतरी घेऊन येन, यी घे तुया गाडीई सावी. आज गाडी मिळली ते घणास फायदा जाला." वासू मनातस तडफडतोवा. त्यानं बोलव्या तोंड उगडल तवड्यात विरुई बायको बोलली, "भावजी खरस मी तुमशी आभारी हाय, तुमश्या गाडीमुळे मला बरस सामान आणता आलं, न विशेष मणजे तुमि आफिसमन होथे बघून हतरीव मिळली." विरुई बायको वासुला शा पेव्याय आमंत्रण देऊन घरात घुसली. आता वासुला विरुया बायकोला गराण करव्या जीवावर आलं. तो विसार करव्या लागला या बिसाऱ्या वैनीला हांगुन तीया मूड खराब करण्यात काय अर्थ नय.  त्यानं रागारागान विरुया हाथाशी गाडीई सावी घेटली न कायव न बोलता निंगाला. विरु मात्र डोकं खाजवत वासू जाते तय पावतस रेला. त्याला वासुय वागणं विचित्रस वाटलं....

     

                            

विरुया किस्सा न वासूया घुस्सा...

     आज रयवार त्यामुळे विरुया आफिसला हुट्टी. नेमी प्रमाणे वासू त्या बाहाई स्कुटर घेऊन विरु घरा आला. रयवार अहल का दोग मटण, कोंबडी आणव्या जोडीनं जातात. विरु तयारीतस होथा. बायकोला हांगुन घरा बायेर पडला. बायको रांनीसन विसारते पैशाय पाकीट, पिशवी घेटली का ? विरु गाडीवर बहता बहता बोलला, जकल घेटलं.

     कोंबडीया दुकानाहमोर वासून गाडी लावली. कोंबडीयी दुकानं भाजी मार्केटश्या बायेर होथी. त्यामुळे तय गाडी ठेवव्या घणी जागा होथी. दोगवाईन कोंबडीयी ऑर्डर दिली. तवड्यात वासुई नजर भाजी मार्केटश्या दारात खिरणार्या पारू दिक्षितवर गेली. वासून विसार केला, आज कायव करत न तिया बरबर बोलतस. वासू विरुई नजर सुकवून तिया मंगारी मार्केटमन खिरला. मार्केटमन घणी गर्दी होती. लोक एकमेकांना धक्के मारत मारत पुडे जातोये. तो हळूहळू तिया माग काडत जातोवा तवड्यात त्याहमोर बारीक पोर रडत आलं. ते पोर कोणस हाय, वासू अटे तटे पावते. मनातस पारूला पावते. कोणी पोरामेरे लक्ष देय नय. वासुला पोराई दया आली तो त्याला उसलव्या गेला तवड्यात एका बाईन पोराला उसलल, ते पोरव रडव्या बंद जाल. वासू पटकन मान फिरवून पारूला पावव्या लागला. पारू गायब. पारू वासूया नजरेसन हुटली. वासू पारूला खोळंत पुढे पुढे निंगाला, ती काय त्याला दीहली नय.

      विरून कोंबडीय मटण घेटलं न वासुला पावते. वासू कय दीहे नय. विरु गाडी मेरे आला. गाडीला सावी लावलेलीस होथी. वासू सावी काडव्या विहरून गेलता. विरु अटे तटे पावते वासू गेला कय. विरुई नजर मार्केटश्या दारावर गेली न त्याला पारू बायेर येताना दिहली. पारूनव विरुला गाडी बाजूला उबा पावला. दोगवाई नजरानजर जाली. दोगवाईन हाथ हलवून एकमेकांना इशारा केला. पारू विरु उबा होथा तय गाडी मेरे आली. पारून विरुला विसारलं "खरेदी काय केली?" विरु हांगते "आज आमसा रयवार तंगड्या शिवाय आमाना बीज काय साले नय." पारू बामणीन तीन ते पावलं न तोंड वाकड केलं. विरु हांगते, "मॅडम, तुमाना का तंगड्याई मजा कळणार." "मणजे" पारून जरा गोंधळून विसारलं. विरु सावधगिरीन बोलला, "नय मणजे अनुभव नय न तुमाना खाव्याया, बघून सव नय कळणार". पारून विरुय ऐकता ऐकता पिशव्या खाली ठेवल्या. पिशवीत घणस वजनी सामान होथ. विरुय लक्ष्य पारूया पिशव्या तय गेलं, तो लगेस बोलला "घणीस खरेदी केलेली दिहते, मार्केटमन काय शिल्लक ठेवलं का नय?" पारू आहव्या लागली. तिला घामाघूम जालेली पाऊन विरु बोलला, "सला मी तुमाना घरा होडून येत." पारूनवं पिशव्या वजनी होथ्या बघून जास्त आढेवेढे न घेता तयार जाली. सावी गाडीला होतीस. विरून तिया पिशव्या पायाहमोर ठेवल्या, पारू विरुया खांद्यावर हाथ ठेऊन बहली. विरून ऐटीत गाडी सालु केली, न निंगाला.

     पारूय घर मार्केटश्या मेरेस होथ. पारू गाडीवरसन उतरली, विरून पिशव्या घेतल्या न तिया घरा दरवाजापर्यंत आला. पारून लगेस त्याला हांगटल आता शा पेउन जा. विरु बळेबळेस नको बोलतोवा पण ती बोललीस, "मागे तुमि अहेस घाई घाईत गेलते, आज शा पिल्याशिवाय जाव्या नय". तिया तो लाडिक आवाज ऐकून, तिया आग्रव पाऊन विरुय मन भरून आलं. त्याये पाय आपोआप घरात घुसले. तीन पटकन गॅसवर शा ठेवला, न हांगव्या लागली, "आज रयवार, बाजूला गणपतीय मंदिर हाय तय दर रयवारी कीर्तन अहते, माये आय न बाबा तयस गेल्यात, आता येतीन." विरून विसार केला आता मस्तपैकी मनमोकळ्या गप्पा करव्या काय हरकत नय. पारू शा न बिस्कीट घेऊन आली. तीव त्याबरबर शा पेव्या बहली. विरुला तिया हाथसा शा घणास आवडला. पारूई तारीफ करता करता त्या लक्ष भीतीर घड्याळ होथ त्यावर गेलं न तो ताडकन उठला. तीन विसारल, "का जाल ?" " काय नय, घरा भाजी घेऊन जाव्या हाय, ओखत होईन, सला मी निंगत" बोलून विरु उठला. तीन त्याला थोडा वेळ थांबून तिया आय बाबाला भेटून जाव्या हांगटल पण विरुला लवकर पळव्या होथ कारण तो अटे आलय ये वासुला मायती नवतं. विरून पायताण घाटलं न निंगाला, पारून दारात येऊन निरोप दिला.

      अटे वासू मार्केटमन पारूला बरास वेळ खोळून खोळून दमला न घामाघूम होऊन बिज्यां दारासन बायेर निंगाला. एकदा अटे तटे नजर मारली न त्यानं तिला खोळव्या नाद होडून दिला. कोंबडीया दुकानात गेला आपली पिशवी घेटली न गाडी ठेवली तय आला, पावते तो गाडी जाग्यार मेळे नय, विरुव दिहे नय. विसार करते गाडी कय गेली? गाडीई सावी पावते खिशात, तीव नय खिशात हापडे. विरु गाडी घेऊन गेला अहेन का बरं? विरुला सावी कोणी दिली? वासुई परिस्तिथी वेड्यावाणी जालती, का करव काय सुसे नय, बरास वेळ गेला. सावी खोळव्याला तो परत मार्केटमन जाव्या विसार करतोवा तवड्यात विरु गाडी घेऊन त्या हमोर हजर. वासू आश्चर्यानं विरुया तोंडातय पावते न विसारते, "तुला गाडीई सावी कय हापडली? तू गाडी घेऊन कय गेलता?" विरु गाडीवरसन उतरून त्याला हांगते, "तू पयली गाडी घे सल, कवडा ओखत जाला पाव, अजून कोंबडी आपल्या हाथात हाय, जेवण कवा होव्या?". वासुला वाटलं ओखत आपल्यामुळेस जाला त्यामुळे त्यानंव निमूटपणे गाडी घेटली, विरु बहला न दोगव निंगाले. वासुला रेवे नय त्यानं पटकन विरुला विसारलस, " अर माला तू काय हांगते का नय, तुला सावी कय हापडली ? न गाडी घेऊन तू कय गेलता ?". विरुला आता हांगव्या शिवाय गत्यतर नवंत. शेवटी विरून त्याला हांगटल, " तुन गाडीई सावी गाडीलास ठेवलोई. मिन ती पावली, तुला हांगव्या ते तू गायब. तुला  अटे तटे पावत ते हमोरसन आपल्या आफिसमनशी पारू आली". पारूय नाव घेतास वासून ब्रेक मारला. बेसावध विरु गाडीवरसन पडतापडता रेला. वासूया मनात विसार आला का मिन तय मार्केटमन तिला खोळव्या घामाघूम होऊन आख्ख मार्केट पालथं घाटलं न यी भवानी अटे कडमडली. " का जाल ? ब्रेक क्या मारला ? माला पाडला अहंता न", विरु विसारते. वासू त्याला विसारते, " पारू तय आली, मंग का जाल ? ती कय गेली ? तू कय गेलता ? खर बोलते का माई खेसते ?" विरु हांगते, " अर घरा जाव्या का जकल अटे रस्त्यातस हांगु, वाजले कवडे पाव ?, तू पयली गाडी सालु कर, मी तुला जकल हांगत." वासून निमूटपणे गाडी सालु केली न उत्सुकतेनं कान टवकारले. विरु बोलव्या लागला. त्यानं पारू गाडीमेरे भेटली तवापासून ते ती खांद्यावर हाथ ठेऊन गाडीवर बहली, तिला तिया पिशव्या हगट घरा नेऊन ठेवली, तीन शा केला, बिस्कीट दिली, तिया बरबर वार्ता केल्या न दारात येऊन तीन निरोप दिला तवविरी जकली काणी मीठ मसाला लावून वासुला हांगटली. ती विरुई काणी ऐकता ऐकता वासूया आंगाया जो तिळपापड जाला, जळफळाट जाला न अवडा डोक्याया भुगा जाला का त्याला घर कवा आलं ते कळलंस नय. विरुन जवा त्याला हांगटल, "अर  खम, गाडी थांबव, आपलं घर आलं, कय सालला?" तवा त्यानं अवड्या जोरात ब्रेक मारला का बीसारा विरु गाडीवरसन पडता पडता रेला. विरु उतरला न त्याला काय विसारव्या आदिस वासू जोरात गाडी घेऊन निंगुन गेला. विरुला हमजलस नय नक्की वासुय का बिनसलं ?.....

 

 

वासू बिलंदर विरु सिकंदर...

      विरु न वासू एकदम जानी दोस्त. बारीक सारीक गोष्टीवरसन त्या दोगाये भांडण होव्या पण घडीबरा हाटीस. दिहभरात एकदा जरी बोललं नय तरी एकमेकाशिवाय दोगवाना करमव्या नय अहि त्याशी दोस्ती हाय. पण गेले पंदरा दीही जाले वासू विरुवर नाराज जहा होथा. त्याला कारण होथी पारू दीक्षित. आजकाल विरुई पारू दीक्षित सोबत घणी जवळीक जाली होथी न वासुला ते घणस खुपव्याय. कारण ती पारू दीक्षित वासुला बिलकुल भाव नय देव्याई. जवविरी विरु न पारू ये सम्बन्ध बिघडत नय तवविरी आपली पारू बरबर दोस्ती होणं मुश्किल हाय अह त्याला वाटव्या लागलं होथ. घरा बहून विसार करता करता त्याय ध्यान भीतिर अहलेल्या कॅलेंडर वर गेलं. दोन दिहात त्याया वाड दीही येव्या होथा. दर वहरी वाडदिहाला वासू न विरु हाटेलमन जाऊन त्याया वाडदीही साजरा करव्याये. वासून कॅलेंडर पावलं न आपल्या वाडदीही विरुला बोलव्या का नय अहा विसार करव्या लागला पण त्याला नय हांगव्या ते कोणला हांगव्या अहा विसार करता करता त्या हमोर पारू आली. पण पारू आपल्या बरबर कहीक येन न आली ते विरुव येन, विरुला बाजूला कह करव्या, वैनीला बोलवलं ते . वैनियी आठवण आली न वासू एकदम उठला. वैनी शिवाय विरु न पारुय प्रकरण मिटणार नय,  त्या डोख्याय विसारसक्र जोरात सालव्या लागलं, एक नवीन आयडिया त्याला सुसली त्याये डोळे समकले, तोंडावर आनन्द दिहव्या लागला.

    वासू आज खुशीतस होथा. वासू आफिसला गेल्यागेल्यास विरुला हांगते, "उद्या माया वाडदीही हाय." विरु लगेस बोलला, "मंग ते आपल्याला बहव्या लागेलस." "पण यंदा तुला माय एक काम करवं लागेल" वासू बोलला "कोणतं?" विरून विसारलं. "तूला त्या पारू ला घेऊन येव लागेल" वासून गळ घाटली. विरु हांगते, "अर अह का करते तिया हमोर आपु..." विरुला थांबवत वासू बोलते, "आपली पार्टी वायली मंग करू. पण वाड दिही हाय त्या दीही तिला आणव्या काम तुय." विरु हांगते "वाडदीही तुया न मी तिला आणू अह कह, मी आमंत्रण देव तिला." वासू विसार करून हांगते "मी तिला आमंत्रण देन पण तिया काय भरोसा नय, ती नय आली मंग, तिला पटवून घेऊन येव्या काम तुय." विरु त्या मेरे संशयाने पाऊन विसारते "अवड जकल करव्याय खास कारण काय?" वासू जरा सावधगिरीन हांगते "अर ती तुया बरबर नेहमी बोलते न मला ते ढुंकूनव पावव्या तयार नहते. बघून या वाडदिहा निमित्तान वळख वाडली ते मा बरबर बोलती तरी होईन." विरून विसार केला न हांगटल "ठीक हाय, पण तय काय सावटगिरी नय करव्याई, तुला आदिस हांगत." वासून आनंदान मान डोलावली.

     दुपारश्या जेवणा वखताला विरू वासुला घेऊन पारूला भेठव्या गेला. विरुला पाऊन पारू गोड आहली पण सोबत वासुला पाऊन सावध जाली विरून वासुला खुण केली,  तिला हांग अह. वासू घाबरत घाबरतस बोलला, "मॅडम उद्या माया वाडदिही हाय, दर वहरा आमी दोग एकत्र पार्टी करतात, या वहरा मी तुमानाव आमंत्रण देत, तुमीव या." पारू पटकन बोलली "नय मी कटे पार्टीला जय नय." वासू परत घायकुटीला येऊन बोलला "मॅडम प्लिज आपण एकत्र काम करतात त्यामुळे एकमेकाया आनंदात सामील होव्या, करून घेव्या याउद्देशन मी हांगत, गैरसमज नका करू प्लिज तुमि नय हांगु नका." पारू विसार करून हांगते "मी पावत नक्की नय हांगे." विरु न वासू तयसन निंगतात. वासू पुटपुटते "यी येन अह वाटे नय." विरु बोलते "तू काळजी करू नको तुन रीतसर हांगटल न आता मी तिला हमजवत."

       आफिस हुटव्या टायमाला विरु वासुला हांगते "मी पुडे निंगतं त्या पारू ला गाठत न हमजवत." रिक्षा स्टँडवर विरून पारू ला गाठली. विरुला पाऊन ती आहली, विरुव आहतस तिया मेरे गेला न हांगते "मॅडम थोडं बोलव्या हाय." पारू विसारते "का?" "दुपारी वासून तुमाना आमंत्रण दिल न तुमि चक्क नय हांगटल" विरून डायरेक्ट सुरवात केली. "मी कवा अहि पार्टीला गेली नय" पारू उत्तरली "नय तुमस बरबर हाय पण वासू माहनू बरा हाय वाटल्यास तुमि लवकर निंगा पण त्याला नाराज क्याला करतात त्याया वाडदीही हाय, मी हाय सोबत, माया वर भरोसा नय का?" वासून शेवटसा घाव घाटला. तही पारू थोडी तयारली न बोलली "विश्वासाया प्रश्न नय पण मी कवा पार्टीला बायर जाय नय बघून, पण मी जास्त वेळ रेणार नय." "सालेन, मंजूर, मी वासुला हांगेन तह". अह हांगुन विरु तयसन विजयी मुद्रेन निंगाला. घरा पोसल्या पोसल्या विरुन वासुला वारून पारू बरबर बोलणं होऊन ती येव्या तयारलय अह हांगटल.

       आज वासूया वाडदीही त्यात हांशे पार्टीला पारू येव्याय बघुन वासू घणास खुश होथा, एका दगडात दोन पाखर मारव्याय त्यानं ठरवलं होथ. एक ते पारू सोबत वळख वाडव्याई होथी न बिजी मणजे विरु न पारूये सम्बन्ध त्याला तोडव्याये होथे त्याहाटी त्यानं वासुयास वापर करून घेव्या लावलोवा. आदी त्यानं विरुया वळखिन पारूला पार्टीत येव्या राजी केली न आता विरुया सोरेस त्याया बायकोला तो पार्टीला बोलव्या होथा मणजे वैनीन  विरु बरबर पारूला पावली का वैनी विरुला काट्यार घेईन न त्याई पारू बरबरशी दोस्ती कमी होईन अहा त्याया प्लॅन होथा. वासू घरासन आफिसला निंगताना जरा ओखतान निंगाला. विरु त्या घरासन आफिसला गेला न यो विरुया बायकोला भेटव्या गेला. वासू विरुया बायकोला हाक मारून हांगते "वैनी आज हांशे जेवण करू नका मायातर्फे पार्टी." विरुई बायको विसरते "क्या भाराई?" वासू हांगते "आज माया वाढदिही हाय, पण एक गोष्ट लक्षात ठेवव्या विरुला हांगु नका" विरुई बायको कपाळावर आठ्या आणून विसारते "मणजे याना नय बोलव्या ? मंग मी नय येय" वासू आहव्या लागला न बोलला "अग वैनी विरुला बोलव्यास हाय फक्त तुमि पार्टीला येव्याय ये त्याला मायती नय मिळे. त्याला आपु सरप्राईज देऊ."  विरुया बायकोला आयडिया आवडली ती हांगते "सालेन पण याना नक्की बोलावव्या ह, नय ते मी नय येणार"  वासू हांगते "वैनी मावर विश्वास ठेवा, मी न विरु आमी दोगव आफिस हुटल्यार तयसन डायरेक्ट हाटेलात येऊ, तुमि अटलन आपल्या मार्केटश्या बाजूला हाटेल हाय, तय सात ते साडेसातश्या दरम्यान या, आमी सहा वाजता आफिस हुटल्यार हाटेलात जाऊन खाव्या पेव्हाई आर्डर देऊन ठेवतात." विरुया बायकोनं मान डोलावली न वासून सुस्कारा होडला. तो लगेस आफिसला निंगाला. जकल्या गोष्टी जुळुन येव्या लागल्यात बघून वासू मनातल्या मनात खुश. कवा एकदा हांज होथे अह वासुला जालत.

        आफिसमन काम करता करता विरून वासुला हळुस विसारल " तुन पारूला वारून पार्टी देव्हाय ठरवलंय खर पण अवड जकल करव्या ते तुया बजेटमन हाय न, त्या विसार केला का?" वासू कायव ऐकव्या पलीकडे गेलता तो हांगते विरुला "तू त्याया विसार नको करू, बिनदास्त रे, जो खर्स होईन तो होईन."  यान बरीस तयारी केलेली दिहते, काय घोळ नय केला मणजे कमावली अह विसार करून विरु आपल्या कामाला लागला. हांज जाली साहा वाजले, आफिस हुटव्याई वेळ जाली, विरुया टेबलार आज घण काम होथ विरु वासुला हांगते "तू जा पुढे मी ये काम खपवून येत"  वासू विरुला हांगते "ठीक हाय पण जास्त वेळ नको करू सात वाजेया आत ये." वासून पारूला निंगव्या का विसारलं. तीन त्याला हांगटल "मी येत विरु बरबर माय काम खपवून." वासू तिला गाळी मारतस निंगाला.

      वासू हाटेलमन आला त्यानं एक टेबल अडवून ठेवलं न मॅनेजरला हांगटल "आमशे पावणे येव्या हाथ त्यांना काय लागेल ते देव्या बिल मी देन काळजी नय करव्या." पावणे सात जाले विरु न पारू दोग आले. वासून त्या दोगवाय स्वागत केलं त्यांना टेबलावर घेऊन गेला न त्या दोगवाना अहया प्रकारे बहोडल का विरुई बायको हाटेलमन आली का हमोर दोगव दिहतीन. विरु पटकन वाशरूमला जाऊन आला. त्या दोगवाईन वासुय वाडदिहाय अबीनन्दन केलं. पारून ग्रीटिंग कार्ड आणलोव ते त्याला दिल, वासू खुश, जकल त्याया मनाहरक होत होथ. त्यानं दोगवाया हाथात मेनू कार्ड दिल न काय पायजे ते मागवा अह हांगटल . दोगव मेनू कार्ड वासतात अह पाऊन वासू उठला न हाटेलश्या दारामेरे आला. आता तो विरुया बायकोई वाट पावतोवा , विसार करतोवा जर का ती आली ते त्या दोगाना पाऊन वैनी नक्किस विरुवर भडकेन न पारू विरुई दोस्ती तुटेन . सात वाजले घड्याळात सातशे ठोके पडले न वासून विरुया बायकोला येताना पावलं.

        विरुया बायकोला येताना पाऊन वासू हळुस दारा आड लपला. अटे टेबलार विरु न पारू गप्पा मारत बहलोये. अचानक विरुला आठवण आली का त्यानं हतरी आणलोई, कय विहरला तो आठवतोवा, तो पारूला हांगुन वाशरुममन गेला हतरी पावव्याला. विरुई बायको आली हाटेलमन खिरली हाटेलमन जास्त गर्दी नव्हती. जकले पुरुषस दिहतोय तिला हमोर टेबलार एक पोरी बहलेली दिहली तिया बाजूया टेबलार विरुई बायको बहली न विसार करते वासू भावजीन माला फसवलं ते नय. का मी लवकर आली. वासू दारा आडून पावते तो विरु दिहे नय, पारू एखलीस, वैनी बाजूया टेबलार जाऊन बहली यो काय घोळ जाला वासू विसारात पडला. विरुई बायको अटे तटे पावते घड्याळात पावते थोड्यावेळाने ती उठव्या लागते. तवड्यात वासू तियामेरे गेला, कारण वासून तिला वारटल होथ, ती गेली अहती ते वासू खोट्यात पडला अहता, वैनीयी बेइज्जती जाली अहती, त्याये सम्बन्ध बिघडले अहते, वासू विश्वास घालवून बहला अहता, वासुला ते नको होथ . वासून वैनीयी विसारपूस केली न पारू हमोर बहोडल, पारूई ओळख करून दिली. पारूला विरुया बायकोई ओळख करून दिली.

        वाशरूममन्सन विरु निंगताना त्याय ध्यान हमोर टेबलार गेलं तय त्याला त्याई बायको दिहली, तो पटकन बाजूला लपला, हळुस पावते नक्की बायकोस हाय का ? त्याई खात्री पटली ती त्याईस बायको हाय. विसार करते यी अटे कही आली? वासू तिया बरबर बोलते, ती पारू बरबर बोलते. या दोगव्या एकमेकींना वळखतात का काय? यो घोळ काय हाय? विरुला हमजे नय. तो विसार करते बर जाल मी पारू बरबर बहलेला नवता नय आता माई नावळ निंगती, हळुस हतरिया मुका घेऊन बोलते, बर जाल हतरी विहारलोवा. आपल्या विहराळूपणाया आबार मानत तो हळुस लपतछपत होटेल श्या दारा मेरे गेला त्याला काय सुसतोव नय, विसार करत करत त्यांश्या बोलण्याया कानोसा घेतोवा. त्याला अंदाज आला का त्याया बायकोला बोलावंव्याई आयडिया वासुईस हाय, तो तयारीतस तय गेला  गेल्या गेल्या विरु आश्चर्यानं बायकोला विसारते "तू कही काय अटे? मला नय तुन हांगटल ते, तुला यी पार्टी ठेवलीय ती मायती होथी का?" ती पटकन बोलली, "सरप्राईज"  विरु विसारते "मणजे का ?" विरुया बायकोनं नवऱ्याला जकली कानी हांगटली. विरुला मंग वासूया सरप्राईजसा अंदाज आला. त्यानं वासुमेरे पावलं वासुय तोंड बारीक जालत. विरून बायकोई पारूला वळख करून दिली. त्या दोगव्या आहव्या लागल्या न बोलल्या आमशी जाली वळखपरेड. विरून वासूया वसपा काडव्या ठरवलं न पटापट वेटरला आर्डरी दिल्या न त्या दोगविना हांगते बिनधास्त मजा करा आज माया दोस्ताया जलमदिहाई पार्टी हाय न वासुमेरे पाऊन आहव्या लागला. विरुई बायकोव पारू न वासू मेरे पाऊन बोलली "भावजी पण काय अहो तुमस सरप्राईज घणस भारी आपल्याला आवडलं." वासू बीसारा बळेबळेस गोड आहला. जकल्याय खाणं आटपल न विरून आईस्क्रीमशी आठवण काडली वासू हांगते हा हा क्या नय? आईस्क्रीम ते होव्यास पायजे. आईस्क्रीम खाऊन जकले उठले न वासुला परत सुबेस्या देऊन बायेर पडले. वासू मॅनेजरश्या मेरे आला, त्यानं वासूया हाथात बिल ठेवलं, बिल पाऊन वासूये डोळे पांढरे होव्या पाळी आली.मॅनेजर गालातस आहतोवा. वासू विसार करव्या लागला 'मी एका दगडात दोन पाखर माराव्या निंगालो, अटे पाखरु ते एकव नय मेल न दगडव फुकट गेला.' तवड्यात हाटेलश्या बायेर पडलेली पारू वळून आली न वासुला पार्टीला वारटल्या बद्दल थँक्स हांगुन गेली. वासून ती तय पावत खिश्यात हाथ घाटला न पटकन खिश्यासे पैसे काडून बिल भरलं न वरती मॅनेजरला टिपव दिली. मॅनेजर त्या मेरे पावतस रेला.

 

                           

वासुला संदी पारू जायबंदी...

      वासूया वाडदिहायी पार्टी वासून ठरवलोई तही नय जाली पण पार्टीया थोडा फायदा जाला ये त्याया ध्यानात आलं. पार्टीला येणार नय अह ठाम पणे हांगणारी पारू पार्टीला आली न पार्टी खपे पर्यंत रेलि न जाताना वासुला थँक्स हांगुन गेली. मनाश्या मनातस मांडे खात वासू निजला.

     कालश्या पार्टीया घोळ वासूया मनात घोळत होथा, तवड्यात कोणी तरी आफिसमन बातमी आणली का पारू दीक्षित आज कामावर येव्या नय मिळे. वासुला ये कळतास त्यानं चौकशी केली तवा त्याला कळलं का तिया बाबाला हास्पिटलात ऍडमिट केलंय. वासून विरुला काय हांगटल नय. आफिसमन रजा टाकली न बायेर पडला. विरुला जवा कळलं पारू आफिसला आली नय न तिया बाबा ऍडमिट हाय तवा तो वासुला खोळव्या लागला. वासू रजा टाकून गेला अह त्याला कळलं न तो विसार करव्या लागला यो कय गेला.

      वासून रजा टाकली न बायेर येऊन पारूया बाबाला पावव्या निंगाला. कोणत हास्पिटल हाय यायी चौकशी करत करत तो हास्पिटलात पोसला, तय त्याला ICU रुमश्या बायेर पारू  बहलेली दिहली. तो तिया मेरे गेला, तिया चेहरा रडून लाल जालता. त्यानं हिम्मत करून तिला हाक मारली न तिया बाबाई विसारपुस केली. तीन त्याला पावलं न रडव्या लागली, रडतस बोलली, "हकाळी शा पिताना बाबांना छातीत कळ आली न खुर्शीतस पडले , आईनं न मिन त्यांना रिक्षासन अटे आणलं." वासून धीर देत हांगटल "घाबरू नका होहेंन जकल बर." वासून परत तिला विसारलं "डाक्टर का हांगतात" ती बोलली "डाक्टरजून जकल्या टेस्ट करव्या लावल्यात कदाचित हार्टस आप्रेशन करव्या लागेल अह हांगतात" अवड बोलून ती परत रडव्या लागली वासू ती मेरे बहत बोलला "तुमि अजिबात काळजी करू नका जकल ठीक होईन".

     वासु रजा टाकून कय गेला विसार करत विरुनवं रजा टाकली न घरा गेला. विरुला लवकर घरा आलेला पाऊन त्याई बायको विसारव्या लागली "का जाल? आज लवकर आले ते, तब्येत बरी हाय न?" विरून तिला थांबवत हांगटल "अग ती पारू दीक्षित हाय न तिया बाबाला हास्पिटलात ऍडमिट केलय, तिला धीर देव्याहाटी जाव्या निंगालो, विसार केला तुलाव घेऊन जाऊ, दोन दिहाआदीस तुई वळख जालती बघून तुला घेव्या आलो, सल तयारी कर आपु जाऊ." विरुया बायकोनं पटापट तयारी केली न दोगव निंगाले.

     विरु न विरुई बायको हास्पिटलात खिरल्यार हमोरस पारू न तिया आयला बाकार बहलेली पावली. दोगविये चेहरे रडून मलूल जालते विरु न विरुया बायकोला पाऊन पारू रडव्यास लागली. विरुया बायकोनं तिला मेरे घेटली. विरून विसारलं "तब्बेत कही हाय? नक्की का जाल? डाक्टर का हांगतात?" पारून जकल सविस्तर हांगटल न डाक्टर हार्ट अटॅक आल्यामुळे हार्टस आपरेशन करव्या हांगतात विरु बोलला "डाक्टर आपरेशन करव्या हांगत अहतील ते करू दे, वेळ नय घालव्याई" विरुय बोलणं ऐकून त्या दोगी रडव्या लागल्या विरून त्या दोगवियी हमजूत काढली न हांगटल "घाबरव्या काय कारण? आजकाल सायन्स घण पुढे गेलंय आपरेशन यवस्थित होईन." पारून रडत रडत हांगटल "आदी एक लाख रुपये एडवांस भरा मंग आपरेशन होईन अह हांगतात." विरु न विरुई बायको विसार करव्या लागले. ये जकल बोलणं सालु अहताना वासू त्यांश्या मंगारिस येऊन उबा होथा. वासुमेरे कोणसस ध्यान नवत, त्यानं एडवांसशी वार्ता ऐकली न तयसन मागे फिरला. विरुन विसार करून पारू ला तिया मेरे कवडे पैसे हाथ अह विसारलं. पारून घरा काय नय पण बँकेत पन्नास साठ हजार अहतीन अह हांगटल. विरु विसार करव्या लागला बीजे पैसे कहे उबे करव्याये तवड्यात हास्पिटलशी नर्स आली न पारूला हांगव्या लागली का आप्रेशनश्या आदी फार्म भराव्या हाथ ते भरून घ्या. पारू फार्म भरव्या गेली.

       विरु बायकोला हांगव्या लागला, काय तरी करून पैसे उबे करव्या लागतील नय ते ईया बाबाय आप्रेशन कहक होईल? पारू फार्म भरून आली, तिया मागोमाग डाक्टर आला न तिला हांगते काळजी करू नका, जकल ठीक होईन, देवावर विश्वास ठेवा. पारू रडकुंडीला येऊन डाक्टरला हांगते "कायव करून वेळ घालवू नका न आप्रेशन थांबवू नका मी पैशाइ सोय करत." डाक्टरजून विसारलं "पैश्याची सोय मणजे?, तुमशे पैसे ते जमा जाले." अह हांगुन डाक्टर आप्रेशन थेटरमन गेला. पारू, विरु न त्याई बायको डाक्टरश्या तय पावतस रेले. "पैसे कोणीन भरले?" पारू विरुला विसारते. विरु पारू तय पावते न बोलते "मला नय मायती". तिगवाना प्रश्न पडला पैसे कोणी भरले? तिगव विसार करतोय, तवड्यात वासू शा वाल्याला घेऊन आला तिगवाना शा देत हांगते "अटे बहा न शा प्या, हकाळदखी कोणी पाणीव नय पिलेन. वासू विरुला विसारते "डाक्टर का हांगुन गेला?" विरु वासुला अड्डाऊन विसारते "तूया पत्ता कटे हाय?, हकाळदखी आफिसमन्सन गायब हाय, हुटी टाकून कय गेलता? जवा काम अहते तवा गायब न नय तवा नुस्तास मागे पुढे करत अहते." वासू काय बोलला नय. तवड्यात तयसन नर्स जातोई, पारून तिला थांबवून विसारलं "सिस्टर तुमि मायामेरसन  फार्म भरून माई सई घेटली पण ऍडव्हान्स पैसे कोणी भरले ते मला नय कळलं" सिस्टर विसार करून नाव आठवतोई पण तिला नाव नय आठवलं पण हमोर वासूला पाऊन "याईनस ते पैसे भरले" अह बोलली न ती निंगून गेली. तिगवे वासू मेरे पावव्या लागले वासून तिगवा मेरे पावलं न पटकन बोलला "सला टेन्शन मिटल न ? आता बिनधास्त ऱ्या, आप्रेशनव यवस्थित होईन, काळजी करू नका." पारू वासू मेरे पावत होथी. तिला त्यावेळी वासू देवाहरका वाटला, तिया मनात त्याया बद्दल आदर निर्माण जाला. तीन हाथ जोडून रडत रडत वासुये आबार मानले. वासून घाबरतस तिया हाथ हाथात पकडून हांगटल "आपण एकास ठिकाणी काम करतात, त्यामुळे एकमेकाया आनन्द जहा आपण साजरा करतात तहास एकमेकाया दुःखात सुदा आपण सहभागी होव्या पायजे, नय ते माहणु अहून माहणाहरक न वागण्यात काय अर्थ हाय? मिन यापेक्षा काय वायल नय केलं." बाजूला उबा अहलेला विरु वासुमेरे आला न त्याला मिठी मारून बोलला "मीव तुला निष्कारण अड्डावला. मला काय मायती, काल परवा पर्यंत बारक्या पोरावाणी वागणारा माया दोस्त आज एकदम डाय जाला? खरस वासू मला तुया मैत्रिया अबीमान वाटते, तून अडचणीत अहताना आपल्या एका सहकाऱ्याला मदत केली." तिगवाय बोलणं सालु अहताना आप्रेशन थेटरमनसन डाक्टर निंगाला न येऊन हांगव्या लागला "आप्रेशन यशस्वी झालंय, काळजी करव्या कारण नय." जकल्याये चेहरे आंनदी जाले. पारू आनंदात धावत वासू मेरे येऊन त्याया हाथ हाथात घेऊन बोलली "तुमश्या मुळे जकल यवस्थित जाल, मी तुमशे कहे आबार मानू काय सुसे नय." विरु न विरुई बायको वासू न पारू मेरे पाऊन मिश्कीलपणे आहत होथे. वासूला लाजल्याहरक जाल. पारू, विरु न विरुया बायको मेरे आली न बोलली "आज तुमि जकले घरश्या माहणावाणी माया मदतीला धावले. खरस मी तुमशे आबार कहे मानू मला काय कळे नय ?" विरुई बायको बोलली "ये जकल मंग बोलू, जा पयले बाबांना भेटून घे." पारू तिया बाबाला भेटव्या गेली तही विरुई बायको वासुमेरे येऊन बोलव्या लागली "भावजी, कमाल हाय तुमशी, ये तुमाना कहक काय सुसल ? नय मणजे आमाना कायस न हांगता एखल्यानस निर्णय घेटला तो, मानलं तुमाना , संधीय होन कह करव्या ते तुमाना बरबर मायती हाय. तुमि एकदा ठरवली का ती गोष्ट पुरी करतातस न." वासून गोंधळून विसारलं "मणजे का?" विरुई बायको विरु मेरे पाऊन वासुला हांगते "मणजे ये, की तुमस काय करव्या, कह करव्या ते जकल यवस्थित ठरवलेलं अहते, विहरत नय, नय ते आमशे यांस ठरवतीन काय न करतीन काय." अह बोलून विरुई बायको न विरु जोरात आहव्या लागले.

 

                             

लपंडाव...

      आज रयवार विरु तयारी करून वासूई वाट पावत बहला होथा. नेमी परमाणे दर रयवारी ते भाजी आणव्याला बाजारात जातात. आज अजून वासू नय आला बघून विरु त्या घरा गेला. त्या बायला विसारल्यार कळलं का तो बाजारात जाव्याला दा मिनटापूर्वीस घरसन निंगाला. विरु विसार करते यो माला न घेता कहा काय गेला. विसार करतस घरा आला. बायकोला बोलला वासू आदिस बाजारात गेलय मी जाऊन येत. विरुची बायको आश्चर्यानं बोलली "आज भावजी एखलेस कहे गेले, खम मीव येत बरबर. मलाव बाजारात काम हाय." विरु हांगते "माला हांग तुला का पाहिजे मी आणत." "मला घणा बाजार करव्या हाय तुमश्या ध्यानात रेल का? त्यापेक्षा मीस येत, तुमाला काय तरास हाय का मी बरबर अहली ते ?" विरुई बायको फोडणीर टाकेल्या रायवाणी तडतडली. विरु जरा नरमाईनस पुटपुटला,"तुला येव्या अहेन ते ये बाजारासन आल्यार तुलास जेवण बनव्या हाय. जेवण बनव्या ओखत होईन बघून हांगटल मी आणत अह. ठीक हाय तयारी कर पटपट." विरु बोलत होथा तवड्यात त्याई बायको तयारी करून त्या हमोर उभी रेली. दोघव आहातस बायेर पडले.

     विरु न त्याई बायको मार्केटमेरे आले . मार्केटश्या बाजूलास अहलेल्या सिनेमा थेटरमेरे बरीस गर्दी होथी. विरुया बायकोय ध्यान तय  गेलं. थेटर बायेर सिनेमाय बोठं पोश्टर लावलं होथ लपंडाव. तिकिटाहाटी लोकाई झुंबड पडली होथी. विरुया बायकोया चेहरा खुलला. तिला यो सिनेमा पावव्या होथा, तीला सिनेमा पावव्याई इच्छा जाली. ती विरुला बोलली "आता आपु सिनेमा पाउनस जाऊ." विरु बोलला "अग आता नऊ वाजव्या आले, हकाळसा शो पावव्या न जेवण कवा करव्या?" "आताया शोसी तिकीट मिळतात का पाउ न शो हूटला का हाटेलमन जेउनस घरा जाऊ. तिकीट नय मिळली ते हांश्या शोसी तिकीट काडून घरा जाऊ." विरुया बायकोय उत्तर तयारस होथ. विरुया नाईलाज जाला. त्याला तीय मन मोडवेना, ते दोघेव तिकीट काडव्या गेले. काळाबाजारात तिकीट विकणाऱ्या पोरानं त्याला तिकीट पायज्यात का विसारलं. तो त्याला विसारव्या होथा तवड्यात बायकोनं नको अहि खूण केली. तिकिटाया लायनीत ऊब रेव्या त्याला जीवावर आलत.

     वासू आज हकाळी लवकरस उठला न विरुला न घेतास बाजारात गेला. कारणव तहस होथ. पारूया बाबा हास्पिटलमन अहताना वासून केलेल्या मदतीमुळे पारुय वासूबद्दल मत बर जालत. वासून ये ओळखून तिया बरबर बोलणं वाडवलोव. कायव कारण काडुन तो पारू बरबर बोलत होथा. पारूला मदत करत होथा त्यामुळे पारू न त्यामन एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होऊन जवळीक वाडली होथी. वासून त्याया फायदा घेव्या ठरवलोव. पारूया समतीनस त्यानं आजश्या हकाळश्या शोसी सिनेमाई दोन तिकिट कालस काडलोई. त्यामुळे आज विरुला टांग मारून वासू घरासन लवकर निंगाला होथा.

       थेटरश्या आवारात तिकीट खिडकीया हमोर रसवंती गृहात पारू वासूई वाट पावत होथी. याठिकाणी भेठव्या ठरवलोव त्याप्रमाणे वासू नऊ वाजव्या आत पोसला. पारून दोन गलास उहाया रसाई आर्डर आधीस दिलती. वासू आल्या आल्या त्या हाथात पारून गलास दिला. वासू मनात आंनदाया उकळ्या फुटतोया. उहाया रस पिताना पारूय ध्यान तिकीट खिडकीर रांगेवर गेलं न पारू पावतस रेली. रांगेमन विरु उबा होथा. तिन हळूस वासुला खूण करून विरु तय बोट दावडलं. वासून बारीक डोळे करून रांगेत पावलं त्याला विरु दीहीला. तो विरुस होथा त्याई खात्री पटली कारण बाजूलास विरुई बायको उभी अहलेली त्यान पावली. आता काय करव्या वासू न पारू दोगव विसारात पडले. अचानक रांगेत गोंदळ सुरू जाला. वासून पावल तिकीट खिडकी बंद जाली होथी. हाऊस फुलसा बोर्ड लागला होथा. हळूहळू रांगेमनसी माहण निंगुन गेली. विरु न त्याया बायकोलाव  वासून थेटरश्या आवारा बायेर पडताना पावल. वासुला एकदम हायस वाटल. पारूव टेन्शन गेल्याहरकी होऊन कपाळारसा घाम पुहत होथी. विरुला तिकीट नय मिळल्यामुळे वासू घणा खुश होथा. दोगव गलासासा रस खपवून थेटरमन जाव्या निंगाले.

      सिनेमा नुकतास सुरू जालता. वासू न पारू थेटरात खिरले थेटरमन अंदार होथा. डोर किपरजून वासुला त्याई जागा बॅटरी पाडून दावडली. वासू न पारू दावडलेल्या जागेर जाऊन बहले. थोड्यास वेळात पडद्यार हिरो न हिरोईनसा लपंडाव सुरू जाला. पारू अवघडल्याहरखी बहली होथी. वासू मजेत बहला होथा न मनातस घणा खुश होथा. पडद्यार मुजिक सुरू जाल न पारूय ध्यान दरवाज्यामेरे गेलं. तिन दरवाज्यात विरुहरखा माहणू पावला. तो डोअर किपरला तिकीट दावडत होथा. डोअर किपरजुन त्याला वासू न पारूया मंगारी बॅटरी पाडून जागा दावडली. पारून वासुला दरवाज्यामेरे पावव्या हांगटल. वासू पावते तो हमोरस विरु न त्याई बायको येत होथी. ते दोगव त्याया जागेर बहव्या येत होथे. वासू पारू बेचैन. वासू बहल्या बहल्यास खाली वाकला. वासुला पाऊन पारूव खाली वाकली  न तिन डोक्यार ओढणी घेटली. पारूई ओढणी वासून थोडी ओडली न सोताया डोक्यार घेटली. पडद्यार सिनेमास गाण लागल. 'तुझ्यात जीव गुंतला, कळेल का कधी तुला ....' वासू पारूला न पारू वासूला पावत होथे, एकमेकात गुंतत अहताना दोगवाया लपंडाव सुरू जाला होथा विरु न त्याया बायको सोबत.

      विरु न त्याई बायको त्याया जागेर येऊन बहले. अगदी वासू न पारूया एक लाईन होडून मागे. आता का करव्या या टेन्शनमन वासू न पारू होथे. तह्यास परीस्थितीत ते दोगवे हळूहळू सरळ बहले. दोगव सिनेमा पावत होथे पण सिनेमात दोगवाय ध्यान नवत. सोताया अवघडलेल्या पण ओढ अहलेल्या स्थितीत गुंतले होथे. एकूणस परिस्थितीया लपंडाव सालू जालता. मंगारी विरु न त्याई बायको सिनेमा मजेत पावत होथे. विरु हमोरश्या खुर्शीत डोक्यार ओढणी घेउन बहलेल्या जोडप्यातय पाउन बायकोला हांगते "ते पाव कहे दोगव लपंडाव खेळत लपंडाव सिनेमा पावतात." विरु न त्याई बायको दोगव आहतात. त्याई बायको हांगते "अवो तो लग्नाआदीया लपंडाव अहवा" दोगव परत आहतात.

      वासून घड्याळ पावलं मध्यंतर होव्याई  वेळ आली. वासून पारूला उठव्याई  खुण केली. दोगव अंदारातस बायेर पडले. बायेर पडताना वासून पावल दरवाज्यामेरे दोन तीन खुरश्या रिकामी होथ्या. जास्त गरम होत नहताना सुदा ते दोगव घामाघूम जालते. बायेर येऊन थंड लस्सी घेटली न का करव्या त्याया विसार करत होथे. पारू हांगव्या लागली घरा जाव्या, वासूला घरा जाव्या इच्छा नवती. वासू विसार करतोवा, त्याया ध्यानात होथ तय दरवाज्यामेरे खुरश्या रिकाम्या होथ्या त्यान तह पारूला हांगटल. मध्यन्तर खपल न पटापट लस्सी पिऊन अंदारात वासू न पारू दरवाज्यामेरश्या खुरश्यात बहले.

      मध्यन्तर जाले तवा विरुव कायतरी खाव्या आणव्याहाठी बायेर आला. सणे हेंगदाण्याया दोन पुड्या घेऊन निघताना त्याय ध्यान लस्सी सेंटरवर गेलं. त्यान वासू न पारूला लस्सी पेताना पावलं. त्या दोगवाय विरुतय ध्यान नवतं. विरु वासुला हाक मारव्या होथा पण थांबला. त्याया ध्यानात आलं काय तरी गडबड हाय, जकला उलगडा जाला. थेटराया दारासन मनत येऊन तो त्या दोगवा तय पावत उभा रेला. मध्यतर खपतास ते दोगव येताना पाउन विरु आपल्या जागेर आला. वासू न पारूला दरवाज्यामेरश्या खुरश्यार बहताना त्यान पावल. बायकोया हाथात सण्याची पुडी देत विरु बोलला "सिनेमा कहा वाटते तुला" ती बोलली "मस्त हाय." विरु हांगते "अजून खरा लपंडाव तुला मायती नय मिळे." "मणजे तुमि यो सिनेमा आदी पावलय का ?" त्याई बायको उत्सुकतेन विसारते. विरु हांगते "अग तो नय मी या लपंडाव बद्दल बोलत" अह हांगून त्यान वासू न पारू बहले होथे तय बोट दावडल. तिला काय अंदारात नीट दिहलं नय. "तुमि का दावडतात?, माला नीट दिहे नय." विरून तिला त्या दोगवाबद्दल जकल हांगटल. त्याई बायको बोलली "मणजे अटे ओढणी डोख्यार घेऊन बहलेली कबुतराई जोडी तेस होथे. आपल्याला पाऊनस त्यांईन जागा बदलली अहवी." विरु बोलला "अगदी बरबर , तुला मी हांगत या दोघात नक्की काय तरी गुटरगू साललंय." विरुई बायको लगेस बोलली "होऊन दे वासू भावजी मार्गाला तरी लागतीन. त्यांया पारू बरबरसा लपंडाव मिन कवास वळखलय." विरु बोलला "तह जालं ते ठीकस हाय."

      सिनेमा हुटेपर्यंत विरुय ध्यान काय त्या दोगवावरसन हुटल नय. त्यानं सिनेमाव नीट पावला नय. सिनेमा हूटला न लोक उठली. वासू न पारू सिनेमा हूटतास बायेर निंगाले न गर्दीत मिसळले. विरु बायकोला बोलला "मी पुडे जात, फाटकामेरे थांबत, तू ये  सावकाश." विरु फाटकामेरे येऊन त्या दोगवाई वाट पावत होथा. गर्दीया लोंढा एकदम फाटकासन निंगत होथा. वासू न पारू गर्दीया फायदा घेत फाटकासन निहटले. विरुई बायको विरुमेरे आली. तिन विसारल "काय वो का जाल अवडे घाईत क्या आले?" "अग मी त्या दोगवाना फाटकात गाठव्या आलतो, पण निहटले वाटते." विरुई बायको बोलली "तुमशे दिही गेले, आता त्यांशे दिही हात. तुमाना नय झेपणार यो लपंडाव, सला भूक लागली, हाटेलात जाऊ." विरून वासू न पारूया नाद होडला.

      विरु न त्याई बायको दोगव मेरेस अहलेल्या हाटेलात खिरले. हमोर पावतात ते टेबलावर वासू न पारू बहलेले दिहले. विरुन खुणेनस बायकोला दावडले. वासू न पारू मेनू कार्ड पावण्यात दंग होथे. विरु न त्याई बायको हळूस त्यांश्या मेरश्यास टेबलार जाऊन बहले. वासून मेनू कार्ड बाजूला ठेवून क्याई आर्डर देव्या विसारव्याहाटी पारू तय पावल न त्याय ध्यान मेरश्यास टेबलार बहलेल्या विरुवर गेलं. विरु न त्याई बायको वासुमेरे निर्विकारपणे एकटक पावत होथे. विरुला पाहून वासू परत घामाघूम,अपराधी, लाजल्याहरका जाला. मनातस विसार करव्या लागला, यो काय माया पिच्छा होडे नय. वासून हळुस पारूला खूण केली न बळेबळेस आहत विरुला विसारते, "अरे तुमी कवा आले?" विरु न त्याया बायकोन काय घडलस नय अह्या थाटात हांगटल तुमसा लपंडाव सालू जाला होथा तवास न जोरजोरात आहव्या लागले. वासू न पारू बीसारे लाजेन भिजून गेले  .......

 

 श्री चारुशील पाटील, वरोर (बोईसर)

हिंड्याफोन – ९४२०६०७८९६

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

0 + 3=    get new code
Post Comment