Kamalini

Kamalini Mulik

मी कमलिनी मधुकर मुळीक.पूर्वाश्रमीची माधुरी काशिनाथ राऊत.का.के.राऊत आणि शशिकला राऊत,वरोर यांची धाकटी कन्या.सद्या मी पालघर येथे रहाते. मी अर्थशास्र आणि राज्यशास्र या दोन्ही विषयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.व्यावसायीक अर्हता म्हणून बी.एड. केले आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाची शिक्षिका म्हणून मी सात वर्षे काम केले आहे.त्यानंतर माध्यमिक विद्यालय ,भगिनी समाज,पालघर येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन२०११ ते सन २०१४या काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राज्यमंडळ पुणे येथे इ.१०वी व १२वी साठी राज्यशास्र विषयाकरीता अभ्यास मंडळ व लेखक मंडळ सदस्या म्हणून माझी निवड झाली.या काळात ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे व त्यानुसार पुस्तकांचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.सद्या विद्यार्थी अभ्यासत असलेल्या नविन अभ्यासक्रमाच्या इ.१०वी व इ.१२वी च्या राज्यशास्र विषयाच्या पुस्तकांत माझे लेखन समाविष्ट आहे.आजतागायत विविध वृत्तपत्रात माझे लेखन प्रसिद्ध झाले आहे. माझे पती प्रा.मधुकर बाळकृष्ण मुळीक,सोनोपंत दांडेकर वरीष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते.सन २००९मध्ये ते निवृत्त झाले. आम्हाला दोन कन्या आहेत.मोठी मानसी विवाहीत आहे.तीला एक कन्या आहे.मानसी IdusInd Bank ltd मध्ये मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Government Banking Group)या पदावर कार्यरत आहे. धाकटी वैदेही शास्रीय संगीत गायिका आहे.मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन तीने गणित या विषयात पदवी संपादन केली आहे.ती गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद असून शास्रीय संगीतात एस.एन.डी.टी.विद्यापीठाची एम.ए. आहे.तीचे आजवर अनेक ठीकाणी शास्रीय,उपशास्रीय आणि सुगम गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.आजमितीला ३०विद्यार्थी तिच्याकडे शास्रीय,उपशास्रीय गायन आणि वादन शिकत आहेत.

माझ्या आठवणी-भाग ९

1492

माझ्या आठवणी -(भाग९)
कमलिनी मुळीक.पालघर.दि.८सप्टेंबर२०१७.

माझा भाउ विकास हे माझ्या आई बाबांचे चौथे अपत्य.आज तो वयाची बासष्ट वर्षे पूर्ण करतोय.त्यानिमित्त  माझी आजची आठवण त्याच्याविषयी.
तसा विकास मला नेहमीच गुढ वाटत आलाय.माझी आई म्हणायची जन्मापासून वयाच्या आठ वर्षापर्यंत विकास एकही शब्द बोलला नाही.तो प्रयत्न करीत असे पण त्याला बोलता येत नसे. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण उशीराने सुरु झाले.त्यामुळे त्याच्या पेक्षा वयाने दोन वर्षाने लहान असलेली अलका आणि विकास दोघे एकाच वेळी पहिलीत आले आणि दोघांचे पुढील शिक्षणही एकत्रच झाले.(दुर्दैेव असे की आमची बहिण अलका हिला गतवर्षी आजच्याच दिवशी काळाने आमच्यातून हिराऊन नेले.त्यामुळे विकासचा आजचा वाढदिवस आमच्या साठी  आज अलकाचा स्मृतिदिनही आहे.)

लहानपणी एकदा बैलगाडीतुन सर्व मुलांबरोबर शेतावर जात असताना विकास  बैलगाडीतून पडला .पण त्याला बोलता येत नसल्याने तो तसाच पडून राहिला.थोडे पुढे गेल्यावर हा गाडीत नाही हे लक्षात आले तर तो रस्त्यावर पडलेला.

मी म्हटले त्याप्रमाणे विकास मला नेहमीच गुढ वाटत आला आहे.त्याचा स्वभाव मूलतः अतिशय अबोल.कधी त्याला कुणाशी फार मनमोकळे पणाने बोलताना मी पाहिले नाही.त्याच्या मनाविरुद्ध काही घडले तर तो न बोलणे किंवा अबोला धरणे पसंत करतो.माझ्याशी त्याने अबोला धरण्याचे प्रसंग मी फार अनुभवले आहेत.मी आईचा दूत आहे असे अलका विकास दोघांनाही वाटे याचा उल्लेख मी माझ्या आठव्या लेखात केला आहे.माझा स्वभाव असा की मी आईबाबांपासून कधी काहीच लपवू शकत नसे.काहीही घडले तरी ते आईबाबांना जाउन कधी एकदा सांगते असे मला होउन जाई.त्यामुळे विकास अलकाचा बहुतेक माझ्यावर राग असेल.
सायकल शिकताना त्याचा हात मोडल्याचा जो प्रसंग मागच्या लेखात मी सांगीतलाय त्या वेळीही तो महिना दिड महिना माझ्याशी बोलला नव्हता.

रुढ अर्थाने ज्याला आपण शिक्षण म्हणतो तसे त्याने घेतले नाही.तो अकरावीपर्यंत शिकला.पण विकासची हुशारी ही खूप वेगळ्या प्रकारची होती.तो सतत काही तरी मोड तोड करत पुन्हा जोडत बसलेला दिसायचा.त्यावेळी आमच्याकडे बुश कंपनीचा रेडिओ होता.रेडिओ स्टेशन बदलण्यासाठी एक आडवे चक्र असे.ते फिरवले की एक काटा नंबरवर फिरायचा.मग आपल्याला हवे ते रेडिओ स्टेशन लावता यायचे.आई जरा कुठे बाहेर गेली की हा रेडिओ पळवायचा आणि सर्व उघडून बसायचा.आणि आई येईपर्यंत पुन्हा पूर्व स्थितीत ठेवायचा.त्यामुळे ते कोणाच्या लक्षात येत नसे.आई एकदा कोणाकडे तरी दुःखाच्या प्रसंगाला गेली होती त्यामुळे तिने मला सोबत नेले नव्हते.विकासने अंदाज घेतला.साधारण दोन तीन तास त्याला मिळणार होते.त्याने रेडिओ उघडला.सर्व पार्ट सुटे केले.परत एकेक पार्ट जोडला.इकडून तिकडून व्यवस्थित न्याहाळला.आणि आईने जसा ठेवला होता तसा ठेउन दिला.थोड्यावेळाने आई आली आणि आल्याबरोबर तिने रेडिओ लावला तर काटा विरुध्द दिशेने फिरु लागला.मग मी आईला भडाभडा सगळे सांगून टाकले.आईने विकासला बोलावले.तो माझ्याकडे रागाने बघत होता.आई त्याला ओरडली म्हणाली काय घोळ घातलाय तो बघ आणि ,'जसा होता तसा करुन दे'.विकासला तर अधिकृत परवानाच मिळाला.त्याने तो रेडिओ उघडला आणि बर्‍याच खटपटीनंतर तो पूर्ववत केला.पण त्यानंतर आमच्या रेडिओ दुरुस्तीचे काम विकासच करु लागला.
 मोठा भाऊ सुहास एम .एस.ई.बी.त नोकरीला लागल्यानंतर आमच्याकडे १९७६ साली लाईट आली.तेव्हा लाकडाच्या पातळ पट्टीवर क्लिप लाउन पांढर्‍या रंगाच्या वायरींचे फिटिंग केले जाई.खूप वेळखाउ काम.पण आमचे घर ,वसतीगृह याचे फिटिंग चे काम होईपर्यंत विकास ते फिटींग करणार्‍यांच्या मागे मागे फिरत असे.त्यांना काय काय विचारत असे.आणि संध्याकाळी ते कामगार गेल्यावर याचे प्रयोग सुरु होत.त्यातुनच तो स्वतः लाईटचीसर्व कामे करु लागला.
लहानपणी माझ्यावर एव्हढ्यातेव्हढ्या कारणावरुन रागावणर्‍या विकासला मी माझ्या लग्नानंतर खूप बदललेले पाहिले.माझ्या विवाहानंतर आम्ही पालघरला रहायला आलो.विकास आणि आम्ही घोलविर्‍यात रहात होतो. तेव्हा आमच्याकडे कोणतेही वाहन नव्हते.पण विकासकडे सायकल होती.त्यामुळे अगदी गॅसचे सिलेंडर आणणे,चक्कीवरुन दळण आणणे या कामात त्याने मला खूप मदत केली.
 
विकासनेही  सुहास सारखीच एम. एस .ई .बी.त नोकरी केली. आता तो निवृत्त आहे.पण शांत बसणार्‍यातला नाही.त्याला लहानपणापासून जादूचे प्रयोग करण्याचा नाद होता.तलासरीत रघुविर जादुगार यांचे प्रयोग नेहमी होत.ते कुठेतरी असेल त्याच्या मनात.निवृत्त झाल्यावर त्याने त्यांचा पत्ता शोधला.जादुगार रघुविर हयात नाहित पण त्यांच्या मुलाकडे जाउन तो काही प्रयोग शिकला.काही साहित्य आणले  आणि आता तो स्वतः काही ठिकाणी जाउन ते प्रयोग करु लागलाय.  

विकासला त्याच्या बासष्टाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!आणि अलकाच्या स्मृतीस वंदन!

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

0 + 1=    get new code
Post Comment