'चवीने खाणार त्याला देव देणार', अशी आपल्या मराठीत म्हण आहे. माणसाच्या आयुष्यातील एक
अविभाज्य अंग म्हणजे खाणं. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आपण वेगवेगळे मसाले, भाज्या किंवा इतर
जिन्नस एकत्र करून छान-छान चवीचे पदार्थ तयार करून खात असतो. अशी ही पाककला, समाजागणिक
बदलत गेलेली दिसते. वेगवेगळ्या देशात, देशातील वेगवेगळ्या भागात, शहरात, गावांत त्या त्या
विभागात पिकणाऱ्या पिकांप्रमाणे वेगवेगळे पदार्थ, त्यांची चव बदलत जाते. भारतीय संस्कृतीत
खाद्यपदार्थांच्या कृती मधिल फरकातुनही समाज विभक्त झालेल्याची नोंद आपणास पहावयास मिळते.
अर्थात जमिनीतील पिकही त्यास कारणीभुत ठरते. उदाहरणार्थ, कोकणातील दक्षिणे कडील भागात मासे
बनविण्यास ओला नारळ व कोकम वापरतात तर उत्तरे कडील भागात सुके खोबरं व चिंचेचा वापर जास्त
असतो. पण सर्वच ठिकाणी, या पाककलेवर जास्त हक्क सांगितला जातो तो महिलावर्गाकडून. आणि
म्हणूनच आपल्या समाजातील महिलावर्गाला खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या कृतींसाठी हक्काचं व्यासपीठ
आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत.
आपल्या 'चौकळशी वाडवळ' समाजातील, आगळी-वेगळी खासीयत असलेल्या पंचपक्वानांची ओळख
आपणास ह्या सदरा मधे करून देणार आहोत. आपले बरेचशे वाडवळी पदार्थ, भाज्या हल्लीच्या शहरी
संस्कृती मध्ये लोप पावत चाललेल्या आहेत. गावागावातही गॅस शेगड्या आणि इतर इलेक्ट्रिक आधुनिक
उपकरणांचा सर्रास वापर होत असल्यामुळे चूल आणि चुलीवरचे पदार्थ हळूहळू कमी होत चालले आहेत.
यात चुलीच्या विस्तवावर केळीच्या पानात तेल टाकून हिरव्या ठेच्यावर भाजलेलं सुकं खारं, सुके बोंबील.
टोपाला मातीचा लेप देऊन रटरटलेलं (स्मोकी) मटण, किंवा उपड्या मडक्यात शिजवलेलं चिकन, उकड
हंडी, वालाच्या शेंगा, चिम्बोऱ्याचा झणझणीत रस्सा, चिंचकढी. आहाहाहा... नुसती नावे काढली तरी
तोंडाला पाणी सुटलं. आपले असे हे आणि इतर बरेचसे पदार्थ पारंपारीक आहेत, जे बदलत्या ऋतु नुसार
शेतात पिकणाऱ्या, बाजारात मिळणाऱ्या भाज्यांपासून बनविले जातात. काही पदार्थ सणा-सुदीला लोकं
आप-आपल्या घरामधे पारंपारीक पद्धतीने बनवितात. विशिष्ट कार्यक्रमांसाठी, जसे की साखरपुडा, लग्न,
बाळंतपण, बारसं ई. वेळी बनविण्याचे पदार्थही वेगळे आहेत.
बरेचदा एखाद्या पदार्थाची चव ही गावा-गावां प्रमाणे बदलत असते. जमिनीतील पाणी हे त्याचे मुख्य
कारण होय. पण या सर्व चवीमध्ये एक समान दुवा आहे, तो म्हणजे 'वाडवळी मसाला'. थोड्याफार फरकाने
आपल्या सर्व गावांमध्ये वाडवळी मसाल्याची चव ही सारखीच आढळते. आपला हा पारंपारीक मसाला व
विविध प्रकारची लोणची बनविताना तयार केला जाणारा मसाला हा बाजारात मिळणाऱ्या ईतर
मसाल्यांपेक्षा उजवा ठरतो.
चला तर मग, आपणास माहीत असलेल्या खास पदार्थांना वाडवळीची झणझणीत फोडणी देऊन,
निरनिराळ्या चविष्ट पाककृती सगळ्यांसाठी सादर करा. या पाककृती लिहून, व्हिडिओ बनवून अपलोडही
करू शकता. अपलोड झालेले व्हिडिओ पाहून, आपण आपल्या घरी मस्त पदार्थ बनवून आपल्या
कुटुंबाबरोबर आनंदाने नक्कीच उपभोगु शकता. भविष्यात लोड होणारे व्हिडीयोज पहाण्यासाठी 'चौकळशी
वाडवळ' हे Youtube channel अवश्य subscribe करा. आपणास काही सुचना किंवा आपल्या बहुमुल्य
प्रतीक्रिया द्यायच्या असल्यास त्या व्हिडियो खालील Comment box मध्ये अवश्य नोंदवाव्यात.
Click on the below image and Subscribe the YouTube channel for regular updates.