Trust Editorial

माझ्या प्रिय समाज बंधु-भगिनिंनो,

देशा-परदेशात विखुरलेल्या आपल्या समाजातील व्यक्तींना एका मंचावर एकत्रीत करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यास आम्ही सुसज्ज होत आहोत. निमित्त आहे ते आपल्या समाजाच्या वार्षिक क्रिडा स्पर्धेचे. ही स्पर्धा म्हणजे आपल्या समाजाचा कुंभमेळाच जणु. लहान-थोर, चिल्ली-पिल्ली तसेच वडिलधारी मंडळी विविध स्पर्धांमधे उत्साहाने सहभागी होत असतात. आपल्या नोकरी-व्यवसायातुन रजा घेऊन स्पर्धे दरम्यान जीवाचे रान करणारी काही मंडळी आहेत. तसेच, दुरदेशी वास्तव्यास असलेली काही कुटुंबे विशेष सुट्टी काढुन स्पर्धेला उपस्थित राहातात. तरी यंदाच्या वर्षी होऊ घातलेल्या ह्या स्पर्धेसाठी आम्ही आपणास, स्पर्धा आयोजकांच्या वतीने, आग्रहाचे निमंत्रण देत आहोत. आपली उपस्थिती स्पर्धकांचा उत्साहा द्विगुणीत करेल हे निश्चित व पुढील वर्षी तुम्हास सहभागी होण्यास साद घालेल.

मागच्या वर्षी स्पर्धेचे आयोजन प्रायोगिक तत्वावर, पारंपारिक पद्दतीने न करता काळानुरूप व्यावसायिक स्वरूपात केले गेले. संघाच्या माजी अध्यक्षा सौ. प्रणिता पंकज ठाकुर ह्यांच्या संकल्पनेतुन ह्या कार्यप्रणालीचा जन्म झाला. विविध सांघिक स्पर्धा ह्या IPL व Pro Kabbadi League प्रमाणे खेळाडुंना अनेक संघामधे विभागुन त्यांच्या मध्ये सामने घऊन करण्यात आल्या. काही शाखा ह्या पद्धतीबाबत शाशंक होत्या. पण चर्चेअंती सर्वच शाखांनी आमच्या सुचनेची अंमलबजावणी करत नवीन प्रकारे स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच, ह्या पुढे ह्याच नवीन प्रणालीचा अवलंब व्हावा हा अट्टाहास केला. समाजातील लोकांची वैचारीक प्रगल्भता ह्यातुन सिद्ध होते!

२१, २२ व २३ डिसेंबर ह्या तिन दिवसांमधे विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. गतवर्षी प्रमाणे, यंदाही उमरोळी ह्या शाखेने पुढाकार घेऊन ह्या स्पर्धेच्या आयोजनाचा महामेरू हाती घेतला आहे. संघाच्या वतीने आम्ही त्यांना सर्वतोरीने मदत करू. तसेच स्पर्धेमधील खेळाडुंना आव्हान करितो की, प्रत्येक खेळ हा जोमाने खेळावा व खिलाडुवृत्तीचे प्रात्यक्षिक वेळो-वेळी दाखवावे. प्रेक्षक वर्गातील मंडळींनी सर्वच खेळांचा मन-मुराद आनंद घ्यावा व संघव्यवस्थापक मंडळाला मदतीचा हात पुढे करावा. आपणा सर्वांच्या सहकार्याने स्पर्धेचा दर्जा उंचावण्यात मोलाचा वाटा असेल ह्यात शंका नाही. आपल्या समाजाच्या स्पर्धा ह्या ईतर समाजांसाठी आदर्श घेण्याजोग्या होवोत हीच सदिच्छा.

यंदाच्या वर्षी आपण आपल्या समाजाच्या www.ChaukalshiVadval.com ह्या वेबसाईट वर सर्वच स्पर्धांचे निकाल Real Time Updates ने देणार आहोत. भारतामधे होऊ घातलेल्या डिजीटल क्रांतीवर आरूढ होऊन आपण ह्या द्वारे समाजाची पातळी उंचावणार आहोत हे नक्की. ह्या वेबसाईट वर आपणास सर्वच स्पर्धांचे तख्ते व त्यांचे निकाल दिसणार असल्यामुळे आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातुन ह्या स्पर्धांना Follow करू शकाल. तसेच, काही विशेष स्पर्धांचे प्रक्षेपण YouTube Live वर करण्यात येणार आहे. तत् संबंधी माहीती आपल्या पर्यंत आम्ही पोहोचवु. ही माहिती WhatsApp द्वारे तुम्ही सहभागी असलेल्या विवीध ग्रुपस् मधे शेयर करून आपल्या समाजाची प्रसिद्धीही करू शकाल.

चला तर मग... आप-आपल्या परीने ह्या ऐतिहासीक सोहळ्याला मदतीचा हातभार लाऊन आपले सामाजिक कर्तृत्व पार पाडण्याच्या संधीचा लाभ घेऊया.

आपले विनम्र,
दिपेश पाटील,
(क्रिडा समिती कार्याध्यक्ष).

उत्पल पाटील,
(युवा विकास कार्याध्यक्ष व क्रिडा समिती सदस्य).

कांचन राऊत,
(निमंत्रक)