Trust Editorial रोहन पराग राऊत याची ‘ड्रोन’भरारी
07-Jul-2020

- by Kunal Raut 1767

करोना हया महामारीने जगभर हौदोस घातला. त्यावर मात करण्याकरीता अनेक करोनायोद्धे पुढे सरसावले. संकटावर मात करणे सुरू झाले. पण त्याकरिता अनेक आयुधांची गरज पडली. त्यातील एका आयुधाचा जनक आपल्यापैकीच आहे. संघाचे माजी अध्यक्ष श्री. पराग राऊत व उद्योजिका सौ. संगिता ह्य़ांचा पुत्र, तसेच सौ. सुलोचना व श्री. परशुराम ह्य़ांचा नातू, कु. रोहनने संपुर्णपणे भारतीय बनावटीचा ड्रोन बनविला असून त्याचा वापर मुंबई पोलिस व मुंबई महानगर पालिका करत आहेत. करोनासंक्रमीत परीसरात ड्रोनवरील स्पिकरचा वापर करून आवाहन करणारे पोलिस आपण टिव्ही व इतर दृष्यमाध्यमांवर पाहीले असतीलच.

 

आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात रोहनने जगातील पहिला IP Controlled ड्रोन बनविला. त्याला त्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसे मिळाली. आपल्या ईलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमानंतर बंगलोर येथे विकी लॅब येथे वर्षभर काम करून रोहन मुंबईत परतला. त्यानंतर आईच्या व्यवसायातील वेबसाईट व अन्य आधुनिकीकरणास मदत करून मेमसिस ह्या उद्योगामधे चित्रिकरणाकरीता आधुनिक उपकरणे बनवू लागला. फोटोग्राफीची मुळातच आवड असल्याने तेथे उपकरणे बनविण्याबरोबरच  चित्रीकरणही करु लागला. अमीरखानच्या दंगल ह्या चित्रपटाच्या निर्मितीला त्याने बनविलेली उपकरणे तर वापरली आहेतच पण Making of Movie चे चित्रीकरणही त्यानेच केले आहे. त्याने Virtual Realty (3D) चे चित्रीकरणही केले. दोन वर्षांच्या अल्पवधीत त्याची Virtual Cinematographer  म्हणून आंतरराष्ट्रिय स्तरावर ओळख झाली. जगप्रसिद्ध BBC  व प्रतिवर्षी केवळ दहा VR (3D) चित्रफिती बनविणाऱ्या Occulus ह्या VR च्या जनक उद्योगांकरीता त्रिमीतीय (3 dimensional) चित्रफिती बनविल्या. पण नंतर आपला स्वतःचा उद्योग कर, ह्या आई-वडीलांच्या सल्ल्याप्रमाणे मनुष्यविरहीत वाहानांच्या निर्मितीकडे वळला. 

 

मेमसीसमधे त्याने मनुष्यरहीत डॉली (छोटे वहान) बनविले होते. त्याची निर्मिती सर्वप्रथम केली. त्याचाच वापर दिल्ली येथिल IPL मधे सीमेवरुन जमिनीच्या स्तरावरील चित्रीकरणाकरीता केला गेला. अशा प्रकारच्या डॉलीचा वापर केला गेलेला हा पहिला सामना होता. त्यानंतर शेतीकरिता उपयोगात येऊ शकेल अशा फवारणीसाठीच्या ड्रोनची निर्मिती केली. त्याचा वापर इतर फवारण्यांसाठीही केला जाऊ शकतो. जगात इतरांच्या स्पर्धेत येण्यासाठी व्यावसायिकता असावी म्ह्णून त्याने ड्रोन स्टॉर्क ह्या कंपनीची स्थापना केली. त्याचबरोबर विविधोपोयोगी ड्रोनची निर्मिती केली. आणि ती होण्यापूर्वीच आलेल्या महामारीने अशा ड्रोनची किती गरज आहे ते सिद्ध केले.

 

ड्रोनचा वापर अधिकाधिक व्हावा व त्याच्या किंमतीचा भार केवळ एकावरच पडू नये ह्याकरीता त्याने ड्रोनच्या वापराने सेवा भाड्याने देणे सुरू केले. महानगरपालिकेकरीता फवारणी ही अशाच सेवेचा भाग आहे.

 

रोहनने निर्मित केलेले ड्रोन संपूर्णपणे देशीबनावटीचे तर आहेच पण जवळजवळ ५० किलो क्षमतेचे आहे. ड्रोन स्टॉर्क व्यतिरीक्‍त अशा प्रकारचे ड्रोन बनविणारी भारत फोर्ज ही एकमेव कंपनी आहे. त्याद्वारे ३० किलो वजन सेवेकरिता उचलले जाऊ शकते तर हे वजन १२ ते १५ मिनिटे वाहू शकते. एका दिवसात जवळपास २० एकर शेतावर फवारणी केली जाऊ शकते. दिर्घकालीन वापरात हा खर्च रू. ५०० प्रति एकर इतका येऊ शकतो.

 

हॉस्पिटलमधे सेवा देणारी सद्ध्या डॉली तयार होत आहे. अग्निशमनाकरिता वापरणारे ड्रोन व डॉली ह्य़ांचे आराखडे तयार होत आहेत. लहान विविधोपयगी परवडणारे ड्रोन बनविणे व सैन्याकरिता उपयोगात येणारे ड्रोन बनविणे हे त्याचे पुढील उद्दीष्ट आहे. वयोवृद्धांना गोळ्या-औषधे देणारे व त्यांचेकडे हरप्रकारे लक्ष ठेवून ती माहिती त्यांच्या सगे-सोयऱ्यांना देणारी डॉली परवडणाऱ्या दरात बनवायची आहे.  ह्या सर्व उपकरणांचे संशोधन, डिझाईन व निर्मिती हे रोहनचे स्वतःचे शोधकार्य आहे. ह्यासर्वांची अधिक माहिती वेबसाईटवर तसेच खालील लिंकवर पाहू शकता.

 

ड्रोनद्वारे फवारणी http://youtu.be/0xtWYbYBheY
ड्रोनद्वारे फवारणी https://www.youtube.com/watch?v=S_bKU_8Yhk0
ड्रोनचा आवाहनाकरीता वापर https://www.youtube.com/watch?v=EUUZ2U1LEh0
बीबीसी https://www.youtube.com/watch?v=Xpq5kBcSYCI
ऑक्युलस https://www.with.in/watch/the-hidden

 

- श्री पराग राऊत.

 

--------------------------------

 

कोणत्याही पित्याला अभिमानास्पद वाटावी अशी कामगिरी रोहन याने केली आहे, त्यामुळे श्री पराग राऊत, यांच्या वरील लेखात, आपल्या मुलाबद्दलचे कौतुक ओसंडून वाहत आहे. आपल्या चौकळशी वाडवळ समाजाच्या एका होतकरू युवा रत्नाची आज आपणास नव्याने ओळख होत आहे. आपल्या समाजातील युवा पिढी वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करीत असताना, रोहन याने वेगळी वाट चोखंदळून समाजाच्या युवा पिढीसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.  संघाचे माजी अध्यक्ष श्री. पराग राऊत व सौ. संगिता राऊत ह्यांचा पुत्र कु. रोहन; याने वयाच्या अगदी कुमारवयात तांत्रिक शिक्षणाच्या आधारे समाज-उपयोगी तसेच पर्यावरणास साजेसे, अनेक असे विविध प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. क्रीडा, आरोग्य, संरक्षण, शेती, सिनेमा अशा सर्वच क्षेत्रामध्ये त्यांने त्याच्या कार्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे व करत आहे. सध्याच्या महामारीच्या या बिकट प्रसंगात कोविड योध्यांच्या खांद्याला खांदा लावून, आपल्या आजोबांचा आणि वडिलांचा समाजसेवेचा वसा पुढे चालवत आहे.  अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून चारचौघांप्रमाणे मार्ग न चोखळता रोहनचा 'प्रवाहा विरुद्धचा प्रवास' हा नक्कीच प्रेरणादायी आहे. रोहनच्या वडिलांकडून मिळालेल्या वरील माहितीपर लेखातून त्याच्या कार्याचा चढता आलेख आणि अचूक आखणी अधोरेखित होतात. 

 

रोहनच्या कार्याची योग्य दखल आपण या अग्रलेखाद्वारे घेत आहोत जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांना यामधून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या ज्ञानाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा समाजाला व देशाला व्हावा हाच एकमेव मानस. कारण हेच तरुण देशाला आत्म-निर्भरतेकडे नेऊन पुढील काही वर्षात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करतील यात काहीच शंका नाही. तंत्रज्ञान व कलेचा योग्य समतोल साधून रोहनने बनविलेले विविध उपक्रम हे कौतुकास्पद असून त्यामागे त्याच्या आई-वडिलांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. 

 

संघाच्या डिजिटल व्यासपीठावरून या कार्याची दखल घेऊन ती सर्वांपर्यंत पोहचविणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. आपणही रोहनचे हे प्रेरणादायी काम आपल्या इतर आप्तेष्टांपर्यंत नक्की फॉरवर्ड करावे. रोहनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, समाजातील इतर युवावर्गाने प्रेरित होऊन, आपले असामान्यत्व सिद्ध करावे व आम्हास या सदरात त्यांची दखल घेण्यास भाग पाडावे ही अपेक्षा व्यक्त करतो.

 

धन्यवाद.

 

आपला,

कुणाल राऊत

संकेतस्थळ व्यवस्थापन समिती

सो.पा.क्ष.स. संघ ट्रस्ट फंड