Trust Editorial पालघर एक्सप्रेस - 'शार्दूल नरेंद्र ठाकूर'
23-Jan-2021

संकलन – श्री बिपीनचंद्र यशवंत पाटील 1751

'शार्दूल नरेंद्र ठाकूर', भारतीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध करत असलेला, 'पालघर एक्सप्रेस' या टोपणनावाने ओळखला जाणारा आपला समाजबंधु. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर कौतुकास्पद कामगिरी करून आल्यानंतर, त्याच्या कर्तृत्वाची दखल संपूर्ण जगाने घेतलीय. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या मातीत चारही मुंड्या चित करणाऱ्या भारतीय संघाचा भाग असणाऱ्या, शेवटच्या कसोटीत खेळायची संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करत, या कसोटीत सर्व आघाड्यांवर यशस्वीपणे लढून, 'कसोटी'ला उतरलेला आमचा, 'शार्दूल.'

 

ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारतीय चमूत निवड झाल्यानंतर, आयुष्यातील आपल्या दुसऱ्या कसोटीत, पहिल्या कसोटीचा अवघ्या दहा चेंडूंचा अनुभव गाठीशी घेऊन उतरलेल्या शार्दूलने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखविले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात गोलंदाजी करताना तीन विकेट घेऊन शार्दूलने त्याची जबाबदारी यथोचित पार पाडली होती. त्यावेळीच शार्दूलच्या कामगिरीने आम्हा सर्व समाजबंधुभागिनींचा उर अभिमानाने भरून आला होता. त्यानंतर जेव्हा भारताच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजी कोलमडली, तेव्हा हा आपला समाजवीर ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्याला साथीदार वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने निडरपणे सामोरा गेला. आग ओकणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर दबून न जाता, त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून आपल्या कृतीने, अरे ला का रे म्हणत, आपल्या बॅट ने प्रत्युत्तर देणाऱ्या शार्दूलला पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली. एकमेकांच्या साथीत, एकमेकांना आधार देत शार्दूल आणि वॉशिंग्टनने भारताला नुसते अडचणीतून बाहेरच काढले नाही, तर सुस्थितीत आणून ठेवले. दीड दोनशे धावांच्या आघाडीची स्वप्न पाहणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची आघाडी या दोन्ही विरांच्या कामगिरीने नाममात्र तेहतीस धावांवर आणून ठेवली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांची पुन्हा एकदा कसोटी लागली ती ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात. पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी करत आगेकूच करणाऱ्या ऑस्ट्रेलियन जोडीतील हॅरिसला पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडुन शार्दूलने भारतीय विजयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या साथीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जास्त स्थिराऊ न देता त्यांचा दुसरा डाव २९४ धावांवर रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियाची शेवटची जोडी खेळत असताना सिराज आणि शार्दूल प्रत्येकी चार विकेट घेऊन टेस्ट क्रिकेटच्या एका डावात वैयक्तिक पाचव्या विकेटच्या प्रतीक्षेत होते, आणि हा विक्रम शार्दूलने हेजलवूडचा झेल घेत हसत हसत आपल्या जोडीदाराच्या नावे केला. हा झेल घेतल्यानंतरच्या शार्दूलच्या कृतीचे कौतुक आज जगभरात होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पहिली विकेट घेऊन श्रीगणेशा करणाऱ्या शार्दूलने शेवटच्या विकेटचा झेल घेऊन ऑस्ट्रेलियन डावाची इतिश्री केली. या कसोटीत सात विकेट आणि पहिल्या डावात ६७ धावा करत शार्दूलने आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलं आहे.

 

शार्दूलच्या या अष्टपैलू खेळीच्या दरम्यान दिग्गज समालोचकांनी त्यांच्याबद्दलची नोंदवलेली मतेही खूप काही सांगून जातात. ऑस्ट्रेलिया चे माजी खेळाडू आणि समालोचक श्री मार्क वॉ म्हणताहेत, 'रहाणेने जेव्हा जेव्हा शार्दूलला गोलंदाजी दिली, तेव्हा तेव्हा त्याने विकेट मिळविण्यासाठी गोलंदाजी केलीय. आउटस्विंग, इनस्विंग, बाऊन्सर, यॉर्कर चा मारा करत, फलंदाजाला पेचात टाकलं.' दुसऱ्या डावात ग्रीनची विकेट घेणारा शार्दूलचा आउटस्विंग चेंडू, 'क्लासिक आउटस्विंगर' हे बिरुद मिळवून गेला. भारतीय समालोचक श्री हर्षा भोगले यांनी शार्दूलच्या मानसिक कणखरतेचे गुपित सांगताना, त्याने लहानपणापासून घेतलेली मेहनत विषद करतात. पालघरहून मुंबई हे जवळ जवळ ७० किलोमीटरचं अंतर मुंबईच्या लोकलमधून रोजच्या प्रॅक्टिससाठी पार केल्यामुळेच शार्दूल मानसिकरित्या कणखर बनला, आणि त्याचा उपयोग त्याला गोलंदाजी करताना होतो, असे मत व्यक्त केले आहे. माजी यष्टीरक्षक फलंदाज श्री पार्थिव पटेल यांनी शार्दूल आणि वॉशिंग्टनने केलेल्या भागीदारीचे वर्णन 'एका डावासाठी किंवा एका कसोटीसाठीची भागीदारी' असे न करता, 'Partnership of the series' असे केले आहे. ऑस्ट्रेलियन समालोचकांनी तर त्याच्या एका अफलातून 'बॅकफूट कव्हर ड्राईव्ह' ची तुलना थेट सर विवियन रिचर्ड्स ह्यांच्याशी केली. तसेच डावाची सुरुवात करताना त्यांने खेचलेला पुलचा षटकार डोळ्यांचे पारणे फिटवून गेला. आणि म्हणूनच ज्यावेळी भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली, ट्विट करून म्हणतो, 'तुला पुन्हा एकदा मानलं रे ठाकूर', तेव्हा आश्चर्य वाटत नाही तर त्यामुळे शार्दूलंचं कर्तृत्व आणि भारतीय टीम मधील स्थान अधोरेखित होतं.

 

या संपूर्ण सिरीज दरम्यान घडलेला आणि अश्विनने त्याच्या यु ट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेला एक मजेशीर किस्सा, तिसरी कसोटी वाचवण्यासाठी आश्विन आणि विहारी खेळत होते, ग्राऊंडवर जाऊन निरोप देण्यासाठी रवी शास्त्री ने शर्दुलला बोलावले, शार्दूल जाऊन त्यांचा निरोप ऐकून घेतला आणि ग्राउंड वर जाऊन आश्विन आणि विहारी ला सांगीतलं मला बऱ्याच जणांनी बरच काही तुम्हाला सांगायला सांगितले आहे पण ते मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही छान खेळत आहात असेच खेळत रहा. पुढे या दोघांच्या खेळीने तो सामना अनिर्णित झाला. हा किस्सा वरवर मजेशीर वाटला तरी शार्दूलच्या या कृतीने त्यांच्यातील समयसूचकता दिसून आली. ज्यावेळी तुम्ही १३५ करोड जनतेचं प्रतिनिधित्व करता, तेव्हा तुमच्यात मानसिक कणखरता, समय सुचकता हे गुण असणं आवश्यकच असतात. शार्दूलमधील हे गुण वेळोवेळी दिसून आले आहेत, या गुणांबरोबरच त्याचं मैदानावरील औदार्यपूर्ण वागणं हे त्याच्यावर झालेले आई वडिलांचे संस्कार दाखवून देतात. आपल्या समाजात, पालघर जिल्ह्यात असे अनेक शार्दूल आहेत, जे संधीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वांना एकच सांगेन, शार्दूलसारखी मेहनत घ्यायची तयारी ठेवा, शार्दूलचे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा, तुम्हालाही यश नक्की मिळेल.

 

मागील ३२ वर्षे गॅबाच्या खेळपट्टीवर, 'अजिंक्य' असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची नांगी ठेचून, अजिंक्य रहाणे च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या, स्वतःची जबाबदारी ओळखून खारीचा वाटा उचलणाऱ्या 'अजिंक्य' भारतीय संघाचे खूप खूप कौतुक.  या विजयात खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शार्दूलचा आम्हा संपूर्ण समाजाला आणि पालघरवासीयांना अभिमान आहे. भारताची, महाराष्ट्राची, पालघरची आणि आपल्या समाजाची मान उंचावणाऱ्या, अटकेपार झेंडा रोवणाऱ्या शार्दूलचे खूप खूप कौतुक, अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

 

आपला,

श्री बिपीनचंद्र यशवंत पाटील

संकेतस्थळ व्यवस्थापन समिती,

सो.पा.क्ष.स. संघ ट्रस्ट फंड