Trust Editorial कै. रामचंद्र बाळकृष्ण पाटील - एक बहुआयामी व्यक्तिमत्व
01-Nov-2019

संकलक - श्री. अ.दा. राऊत, नरपड 1101

मृत्यू हा मानवी जीवनाचा अनंतकाल आहे; परंतु काही माणसे अशी असतात की ती त्यांच्या मृत्यूने अमर होतात. ठाई ठाई त्यांच्या कार्याच्या उमटलेल्या पाऊलखुणा त्यांच्या आठवणीला उजाळा देतात. हेच त्याला मिळालेले अमरत्व. कै. रामचंद्र बाळकृष्ण पाटील म्हणजेच ‘भाई’ यांचा मृत्यू त्यांना असेच अमरत्व देऊन गेला.

९० वर्षांपूर्वीचा तो काळ. पोथी-पुराण समाजात शिक्षणाचे प्रमाण अल्प. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन. अशा नरपड येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात २९.०५.१९३१ रोजी भाईंचा जन्म झाला. आई व्यवहारदक्ष व वडील निमशिक्षित शेतकरी. अशा दांपत्यापोटी भाईंचा जन्म म्हणजे एका स्फुल्लिंगाचा जन्म. याच स्फुल्लिंगाने सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वणवा पेटवून गाव, समाज व पंचक्रोशीचा उद्धार केला असे म्हणणे वावगे नाही. हा तल्लख बुद्धीचा एकपाठी विद्यार्थी वर्नाकूल फायनल नंतर माध्यमिक विद्यालयात दाखल झाला. मॅट्रिकला असताना डहाणू येथील पोंदा हायस्कूलचे त्यावेळी असलेले प्रिन्सिपल कै. कर्णिक यांनी त्यांना डहाणू येथेच शिक्षकांच्या सानिध्यात ठेवून मार्गदर्शन केले; परिणामी तेथील पांढरपेशा समाजातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये भाई प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गणित विषयात त्यांचा हातखंड होता. पुढे त्यांनी या विद्यार्थ्याला मुंबईत नेऊन त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था केली. बी.ए. ला गणित हा स्पेशल विषय घेऊन ते उत्तीर्ण झाले. बी.कॉम एल.एल.बी नंतर आय.सी.डब्लु.ए. ह्या चार्टर अकाउंटन्सी परीक्षेत देखील ते उच्च अंकाने उत्तीर्ण झाले.

प्रथम एस.टी. नंतर एम.एस.ई.बी महामंडळात आस्थापना उच्च अधिकारी पदावर काम करीत असताना अनेक समाज बांधवांना नोकरी देण्यात प्राधान्य दिले. मुंबईला नोकरीच्या निमित्ताने राहणारा माणूस गावाकडे सहसा वळत नाही. तो शहरी भागातच रुळतो. का कुणास ठाऊक भाईंच्या मनात गावाची ओढ होती. मुंबईची सुसंस्कृत, सहजीवनाची, सौहार्दाची, प्रेमळ संस्काराची, विद्याविभूषित, उत्सवप्रिय मराठमोळी संस्कृती ग्रामीण भागातील म्हणजे गावाकडील भोळ्याभाबड्या लोकात यायला पाहिजे याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला. या साठी आपल्या या विचाराशी जुळणारे गावाकडून मुंबईत स्थायिक झालेले ग्रामस्थ मित्र परिवार एकत्र करून त्यांच्या भेटी-गाठी घेऊन प्रथम हा विचार त्यांच्या पुढे रुजविण्यात आणि नंतर हाच विचार गावाकडील मंडळीत रुजविण्यात यशस्वी झाल्या नंतर या संस्कृतीचे नियंत्रण करण्यासाठी त्यांनी स्नेहवर्धक मंडळ नरपड या संस्थेची १९५४ साली स्थापना केली. सुरुवातीला क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली गणपती उत्सव, स्नेहसंमेलन असे मर्यादित कार्य मंडळ करू लागले. मंडळाची वार्षिक सभा व इतर विचारमंथनासाठी सार्वजनिक सभागृहाची आवश्यकता भासू लागली. स्नेहवर्धक मंडळाच्या व्यासपीठावरून हा विचार त्यांनी रुजवला. गावाच्या मध्यभागी पावसाळ्यात पाणी साचणारी बोडण या नावाची टाकाऊ जागा सभागृहासाठी निश्चित झाली. यावेळी मंडळाकडे काहीही निधी शिल्लक नव्हता. गावातील मारुती मंदिराचे लहानसे सभागृह होते तेथून तेथे भजन पुजन किर्तनाधी कार्यक्रम होत असत. त्याच हनुमंताला साक्षीला ठेवून सार्वजनिक सभागृहाची योजना आखली गेली. गावात नोकरदार वर्ग कमी होता. धनदांडग्यांची संस्था नव्हतीच. रोजी रोटी मिळवणारा मजूर व शेतकरीवर्ग. म्हणून श्रमदान आणि अल्पदान यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी एका रात्री सभाग्रुहाचा पाया खणला. गाडीवाल्यांनी रेती आणून दिली पण पैसा कोण देणार? हा निधी शक्य तितका गावातून जमा झाला पाहिजे म्हणून स्वल्पदानाची कल्पना पुढे आली. ग्रामस्थांनी प्रत्येकी ५० पैसे द्यावेत अशी हास्यास्पद कल्पना रूजवली गेली. ५० पैशातून हॉल कसा होणार? पण यामध्ये लोकसहभाग आणि आत्मियता बळावेल हा विचार रुजवला गेला. सभागृहासाठी वातावरण निर्मिती झाली व काही रक्कम जमा झाली. परिचित मंडळींनी सहकार्याचा हात दिला. याच वेळी ग्रामपंचायतीतील अस्पृश्य निवारण्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ग्रामपंचायतिने ते मंडळाला दिले. नोकरवर्गांनी मदतीचा हात दिला. यामागे त्यांच्या सर्व सहकारी मंडळीचे अथक प्रयत्न, निस्पृह असलेला विश्वास यातून सत्य शिव आणि सुंदर असे छोटे खानी वाचनालय सुरू झाले. पुढे गावाच्या उद्धाराची, विकासाचे आणि ऐक्याचे प्रतीक बनले. श्रमदान, दान आणि सहकार्यांच्या पायावर उभा असलेल्या या सभागृहातून उत्सव प्रबोधन सार्वजनिक कार्यक्रम मंथन सुरू होत राहिले. सारा जन एकवटला गेला. आम्ही गरीब आहोत पण ईतरांनपेक्षा वेगळे आहोत याचा हुरूप व नवनिर्मितीचा आनंद लोकांना झाला. कर्मयोगात आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश होत नाही, इतकेच नव्हे तर कर्मयोगरुपी धर्माचे थोडेसेही साधन जन्म-मृत्यूच्या भयापासून रक्षण करते, हे कर्मयोगी चे लक्षण आहे याची प्रचिती येथे आली.

कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाने वातावरण तापलेले होते. फायदा घेतला पाहिजे हा विचार भाईंच्या मनात डोकावू लागला. या गावातील शेतकरी कुटुंबातला विद्यार्थीवर्ग दोन मैल अंतरावरील के. एल. पोंदा हायस्कूल मध्ये चालत जाऊन येऊन माध्यमिक शिक्षण घेत असत, त्यांची दमछाक होत होती. काबाड-कष्टाचीही त्यात भर पडे. याकरता माध्यमिक शिक्षणाची सोय गावात आली पाहिजे तरच आपल्या गावातील विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहिल व त्याची क्षमता वाढेल यावर आता विचारमंथन सुरू झाले. बोर्डी येथे राहणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कै. ठाकोरभाई शहा यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांचे सहकार्य मिळाले. पण अट अशी होती की एकदा शाळेला मंजुरी मिळाल्यानंतर शाळा विनाअनुदानित दोन वर्ष चालवावी लागेल. जर शाळा बंद पडली तर पुन्हा शाळेला मंजुरी मिळणार नाही. शाळेला लागणारी भौतिक साधन संपत्ती आणि शिक्षकांचा पगार यासाठी लागणारा निधी कसा उभारावा हा मोठा प्रश्न होता. पाण्यात ढकलून द्यायचे म्हणजे हात-पाय त्याला हलवावेच लागतात. हा भाईंचा खाक्या व इतर सहकाऱ्यांचे तसेच एकमत. यातून दोन वर्ष आधी एक योजना तयार करण्यात आली. गावातील नोकरदार वर्ग व इतर इच्छुक वर्ग यांनी शाळा सुरू होताच दरमहा रुपये दहा वर्गणी द्यावी. शाळेचे अनुदान आल्यावर ती परत देण्यात येईल. अशा दात्यांची यादी करून प्रथम त्यांच्याशी व्यक्तिगत संपर्क साधण्यात आला. या योजनेचा भार कै. माधवराव पाटील यांच्यावर ठेवला. माध्यमिक विद्ययालयाची व शिक्षकांची गावाला गरज होती. मी या योजनेतील एक कार्यकर्ता. ९० देणगी दारांची यादी तयार झाली. त्यांच्याकडून प्रतिमाहा ९०० रुपये जमा होतील याचा अंदाज बांधण्यात आला. यात नोकरदार, दुकानदार, टांगेवाले, भाजीपाला विक्रेता महिला, वाडीवाले, कारखान्यात काम करणारे कामगार यांचा समावेश होता. देणगी दारात मुंबईचे रहिवासी व गावाचे रहिवासी असे दोन विभाग होते. शाळेला चांगला मुख्याध्यापक पाहिजे म्हणून पोंदा हायस्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. गो. द. आपटे यांची नेमणूक झाली. सभागृहात आठवी आणि नववीचे वर्ग जून १९६९ पासून सुरू झाले. गावाचा व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा माध्यमिक शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला. विना अनुदानित तत्वावर शाळा सुरू झाली. दुसऱ्या वर्षी शाळेली अनुदान मिळाले. ईमारतीचे भाडे मिळू लागले. मात्र देणगीदारांनी प्रतिमहा दिलेली रक्कम त्यांनी परत घेतली नाही. याशिवाय या धडपडीने इतर दात्यांचे दान पात्रात पडू लागले. या सर्वातून शिक्षकांचे पूर्वीपासूनच प्रतिमहा नियमित दिले जाणारे वेतन व भौतिक साधनसामुग्रीचा काटकसरीने विनयोग होऊ लागला. शाळेचा विस्तार होऊ लागला. कमी पडू लागल्या. गावातील ख्रिश्चन समाजाचे नागरिक ख्रिस्तवासी फ्रान्सिस डिसोजा यांनी शाळेला आठ गुंठे जागा दान दिली. याच जागेवर कौलारू इमारत बांधून वर्गखोल्यांची व पटांगणाची गरज पूर्ण झाली. ही सारी धडपड मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष कै. पुष्पकांत मात्रे यांचा भाईंशी व कै. हरिश्चंद्र पाटील यांच्याशी संबंध होता त्यांनी पाहिली, आणि त्यांच्या वडिलांचे नाव शाळेला द्यावे या अटीवर शाळेला एक लाखाची देणगी दिली. समोर असलेली जागा विकत घेऊन शाळेच्या पटांगणाला जोडली गेली. त्याचप्रमाणे पुष्पकांत म्हात्रेंचा राजाश्रय शाळेला लाभला. त्यांनी सुचविलेल्या अनेक उपक्रमांतून व शिक्षण कार्यातून प्रभावित झालेले दाते व संस्था यातून शाळेच्या इमारती व भौतिक गरजांची पूर्तता झाली.

बदलत्या काळाप्रमाणे समाजाचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढू लागला. इंग्रजी - मराठी माध्यमांच्या शाळांत स्पर्धा सुरू झाली. टिकून राहण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या स्मरणार्थ शालिनी पाटील इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. शाळेची उभारणी करताना अनेक प्रसंग आणि यातनांना भाई समोरे गेले. लोकसहभागा सह स्वतः असलेली सारी संपत्ती त्यांनी शाळा उभारणीसाठी खर्च केली. भाईंचे स्वतःचे जुने घर मोडकळीस ठेवले पण शाळेची इमारत मात्र अद्ययावत केली. शिक्षकांना भौतिक साधने आणि समाधानकारक वेतन देऊन आपला कार्यभार पूर्णत्वास ते नेऊ लागले. यात त्यांची पुरती दमछाक झाली. आज या शाळेत दोनशेच्या वर विद्यार्थी आहेत. स्नेहवर्धक मंडळाचे शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक कार्य यातून या गावाला एक वेगळी बैठक प्राप्त झाली. उद्योग, शेती, क्रीडा यात हा गाव अग्रेसर आहे तो स्नेहवर्धक मंडळाच्या संस्कारामुळे. भावी पिढीनेही हा वारसा पुढे चालविला आहे. त्यांच्या हाती संस्था दिल्यानंतर त्यांनी ही एक पाऊल पुढे टाकून ज्युनियर कॉलेज स्थापन करून आधुनिक भौतिक साधनांची तेथे पूर्तता केल्याचे दिसून येत आहे.

मुंबई प्रकाशगढ येथे एम.एस.ई.बी. मध्ये उच्चपदावर आस्थापना अधिकारी पदावर असताना अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांचे विद्युत पुरवठाचे प्रश्न त्यांनी सोडविले. अनेकांनी आपल्या उद्योगांमध्ये आस्थापना अधिकारी पदावर नियुक्ती करिता त्यांना बोलविले, पैकी विठ्ठलवाडी येथे अपार प्रा.लि. मध्ये त्यांनी नोकरी स्वीकारली. जनरल मॅनेजर या पदावरून कंपनीच्या प्रगतीत व भरभराटी त्यांचा हातभार लागत काही वर्षे गेली. पुढे वेतनवाढीची कामगारांची अभिलाषा वाढली. कंपनीत संप झाला. भाईंवर गुंडांकरवी जीवघेणा हल्ला झाला. सुदैवाने धारदार शस्त्रांनी त्यांच्या त्वचेलाही स्पर्श केला नाही. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी हाय खाल्ली. त्यांना नोकरी सोडण्याचा आग्रह धरला. पुढे मालकांनी कंपनी बंद केली. त्यांची नेमणूक गुजरात मधील नदीयाद येथील कंपनीत त्याच पदावर झाली. तेथे जाण्यास त्यांनी नकार दिला व नोकरी सोडून उद्योजकांना सल्ला देणाऱ्या आस्थापनांची त्यांनी स्थापना केली. यातून आपण स्वतः उद्योगाची सुरुवात करावी अशी त्यांची इच्छा बळावली आणि तारापूर एम.आय.डी.सी. मध्ये एक छोटेखानी उद्योग त्यांनी उभारला. कारखानदारीच्या स्पर्धेत ते टिकू शकले नाहीत आणि हा कारखाना बंद पडला. त्या नंतर मात्र ते गावी परतले आणि शाळेची व्यवस्था पाहू लागले.

भाई शेतकरी कुटुंबात जन्मलेले. लहानपणी शेतीत राबण्याची हौस. शेतीची त्यांना खूप आवडत होती. शेती हा आपल्या देशातील फार मोठा उद्योग आहे तो मागे पडला तर आपण परावलंबी होऊ. म्हणून शेतीला उद्योगाची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे व त्यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे. म्हणून स्नेहवर्धक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी कृषी विकास मंडळ स्थापन केले. आणि लहान मोठ्या शेतकऱ्यांना एकत्र करून आपली २०/३० गुंठे जरी जमीन असली तरी उपजीविकेचे साधन म्हणून ती उत्पादित करता येते ही कल्पना त्यांनी पटवून दिली. अशा जमीनीत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रथम शास्त्रीय पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेतला. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांनी बोअर कूपनलिका, मोटार पंप, विज पुरवठा, पाईप लाईन घेतल्यामुळे खर्चात सूट मिळाली. कमी जास्त प्रमाणात पाणी मिळाले. त्यातून भाजीपाला शेती फुलू लागली . एकुण ३२ शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन मिळाले. या शेतकऱ्यांच्या वाडीतून निघणारा चिकू ऑक्शन पद्धतीने खरेदी होत आहे. या शेतकऱ्यांपैकी देवेंद्र राऊत यांना महाराष्ट्र राज्याचा कृषी पुरस्कार मिळाला. तो दूरचित्रवाणी वरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. पाण्याची बचत करून तंत्रशुद्ध नैसर्गिक शेतीचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इस्त्रायलला पाठवण्यासाठी त्याची निवड केली. प्रवाह पथित न राहता प्रवाहाच्या विरुद्धही प्रसंगी पोहता आले पाहिजे आणि यासाठी आपले जे जे आहे ते पणाला लावले पाहिजे ही त्यांची प्रवृत्ती होती.

सोमवंशी पाठारे समाजोन्नती संघ ही समस्त वाडवळ लोकांची १९१० साली स्थापन होऊन आज तगायत समाजकार्य करणारी संस्था. जुन्या कार्यकर्त्यांच्या ध्येय धोरणाप्रमाणे साचेबंद कार्य या संस्थेचे सुरू होते. आधुनिक काळाची पावले ओळखून त्याला पुरोगामी स्वरूप देण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. म्हणुन त्या कार्याची त्यांनी पुनर्रचना केली. साचेबंद कार्य कायम ठेवून उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग समिती, उद्योग पुरस्कार, प्रदर्शने, सहली, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विकास समिती, क्रीडा स्पर्धा समिती, शिक्षण व आरोग्य समिती, महिला सक्षमी करण्यासाठी महिला विकास समिती, महिला मेळावे प्रबोधने, वधुवर सूचक मंडळ, महिला पुरस्कार, दीर्घकाळ समाजसेवा करून दिवंगत झालेल्या समाजसेवकांच्या विधवांचा गौरव, शिक्षकांचा गौरव, वैद्यकीय सेवा, राजकारण शिक्षण, सैन्य, साहित्य, विधिज्ञ व आस्थापना या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा गौरव. आणि या बाबतीत समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रबोधन. अशा प्रकारचे कार्यक्रम आखून एकूण समाजाला एकवटण्याचे मोलाचे कार्य साधण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी अथक प्रयत्न केले.