Trust Editorial भावपूर्ण श्रद्धांजली - सौ. राखी रविंद्र पाटील
24-Apr-2021

- संगणकीकृत समिती 1082

भावपूर्ण श्रद्धांजली...!!!


आपल्या समाजाच्या विद्यमान खजिनदार सौ. राखी रविंद्र पाटील यांचे १९/०४/२०२१ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आकस्मिक निधन झाल्याची वाईट बातमी घेऊनच २० एप्रिलची सकाळ उजाडली. प्रत्येक सहृदय व्यक्तीला निःशब्द करणारी हि घटना. प्रेमळ, मितभाषी, सुस्वभावी, सामाजीक बांधिलकी जपणारं, सर्वांना दिलासा देणारं आणि आपलंसं करणारं  राखीताईचं व्यक्तिमत्व. अत्यंत शिस्तबद्ध, प्रसंगी म्रुदू, अडचणीत असलेल्यांना मदत करण्यासाठी तत्पर, कामाप्रती निष्ठा, सचोटीने काम,  अशा बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे त्यांनी जनमानसांत स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं होतं. भाभा अणुसंशोधन केंद्रातून उच्च पदावरून निवृत्त झाल्यावर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन, त्यांनी महिला विकास समितीचे निमंत्रक पद स्विकारुन आपल्या कामगिरीने कार्याची छाप पाडली. त्यानंतर जेव्हा संघाला गरज होती तेव्हा, खजिनदारपदाचा काटेरी मुकुट परिधान केला आणि तितक्याच जबाबदारीने तो दोन वर्षे हसतमुखाने सांभाळला. हुशार व अभ्यासू वृत्ती, संघाप्रती निष्ठा असलेल्या राखीताईंनी वेळोवेळी पदाधिकार्यांच्या सभेमध्ये आपल्या कामाविषयी जाणून घेऊन त्या पदाची शान राखली. फारसा अनुभव नसतानाही, जमाखर्च, ताळेबंद यांचा अभ्यास करुन, हे पद त्यांनी जबाबदारीने सांभाळलं.

 
दोन वर्षांपूर्वी आपल्या समाजाची वेबसाईट बनविण्याकरिता संगणकीकृत समिती बनविण्यात आली, त्यावेळी या नवीन समितीत समाजाच्या खजिनदार म्हणून त्यांचा समावेश झाला. वेबसाईटचे काम कसे चालणार आहे, त्यात येणाऱ्या अडचणी, कामासाठी लागणारा फंड अशा विविध विषयांवर चौफेर चर्चा करून त्यांनी समितीच्या पहिल्याच गुगल ड्यूओ मार्फत घेतलेल्या सभेत आम्हा सर्वच ध्येयवेड्या समितीसदस्यांची मनं जिंकली. आम्हाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, वेबसाईट मार्फत समाजाच्या कामाचं संगणकीकरण हि काळाची गरज असून, भविष्यातील समितीच्या सर्व उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वस्त केलं. त्यांनी सुचविलेल्या, समाजाला गरजेच्या असणाऱ्या काही उपक्रमांचा समावेश याआधीच वेबसाईट वर केला आहे. भविष्यात, सो प क्ष स संघाच्या नियमित कामातील ताण कमी करण्याच्या दृष्टीने संगणकीकृत सिस्टम तयार करून घेण्याचा त्यांचा मानस होता. संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धडपडणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे नजीकच्या काळात ही पोकळी भरून निघणे कठीण आहे. राखीताईंच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाचं, समाजाचं आणि त्यांचा भक्कम पाठींबा असणाऱ्या सो पा क्ष स समाजाच्या संगणकीकृत समितीचं न भरून येणारं नुकसान झालं आहे. आपल्या समाजाची हि वेबसाईट भविष्यात जास्तीत जास्त परिपूर्ण करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 


राखीताई गेल्यानंतर चारच दिवसांनी, दि २३/०४/२०२१ रोजी रात्री त्यांचा मुलगा कपिल, यास कोरोनामुळेच देवाज्ञा झाली. काळाचा हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 

कै. राखीताईं आणि कै. कपिल यांना संपूर्ण संगणकीकृत समितीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...!!!