*माझी कविता*
"कविता म्हणजे काय ?"
अर्थपुर्ण शब्दांना
सुबकतेने मांडण्याची
दैवदत्त कला
म्हणजे कविता !
ह्रदयाच्या पुस्तकातील
मनाच्या नजरेनं
वाचता येणारी भाषा
म्हणजे कविता !
अस्फुट कलिकेतुन
सुगंध चोरण्याचे
चलाख कसब
म्हणजे कविता !
तारुण्यातील लावण्य
मनमंदिरात पुजण्याची
निस्वार्थ भक्ती
म्हणजे कविता !
अबोल मनाच्या दगडातुन
सुंदर शिल्प कोरणारी
कणखर छिन्नी
म्हणजे कविता !
हास्याच्या डोंबात
मिसळुन जाण्याची
सहज सुलभ वृत्ती
म्हणजे कविता !
कफल्लक खिशात
सुखस्वप्नांची माया
जमविण्याची आस
म्हणजे कविता !
अक्षर अक्षर जुळवुन
अवाक्षरही न बोलण्याची
दयनीय स्थिती
म्हणजे कविता !
भावनेच्या पुराला
कांठावर बसुन
कोरड्या कडांनी पाहण्याची
सहनशक्ती
म्हणजे कविता !
अश्रुंच्या थेंबात
विरघळुन जाण्याची
शाश्वत प्रेरणा
म्हणजे कविता !
कष्टाच्या भाकरीला
घामाच्या वासात
शोधण्याची धडपड
म्हणजे कविता !
थकल्या पायांची
पर्वा न करता
विठूचे पाय धरण्याची
अमोघ शक्ति
म्हणजे कविता !
मरणाच्या दारात
जगण्याची आसक्ती
दाखविणारी प्रवृत्ती
म्हणजे कविता !
सरणाच्या शय्येवर
मृत्युला जीवनाचे
दान देणारी दानत
म्हणजे कविता !
कवि—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर,डहाणु रोड(पुर्व).०९९२३००४८९५,
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.