मी सुहास काशिनाथ राऊत,वयाच्या पासष्टीत आहे.वरोर,तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर हे माझं गांव.वडील कै.श्री काशिनाथ केशव राऊत हे वरोरच्या वाडीआळीतील तर आई कै.सौ.शशिकला (पुर्वश्रमीची मनु पांडुरंग पाटील) ही पण वरोरच्याच पाटील आळीतील.०८ आक्टोबर १९५३ ला वरोरला आजोळी माझा जन्म झाला.आम्ही ३ भाऊ,३ बहिणी.माझा नंबर तिसरा.त्या वेळी "हम दो!हमारे दो!"चा नारा नव्हता.नाहीतर माझा तिसरा नंबर लागलाच नसता.
वडील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक,नोकरीच्या अखेरच्या कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले.आई गृहीणी.वडीलांना समाजसेवेचीही आवड होती.आम्ही सोमवंशी पाठारे क्षत्रिय ( वाडवळ) समाजातले.सदर समाजाचे अध्यक्षपदही वडीलांनी भुषविले.वडील अभ्यासात हुशार होते.पुर्वीच्या फायनल ( ईयत्ता ७ वीच्या) परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले होते,तर प्राथमिक शिक्षकांच्या पी.टी.सी.(आताच्या डी.एड.समकक्ष) परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले होते.त्यांना लेखनाची आवड होती.त्यांच्या २५० कथा,कविता,लेख,२५ नियतकालिकांतुन प्रसिध्द झालेल्या आहेत.
मला लेखनाचा वारसा त्यांच्या कडुनच लाभला.वडीलांच्या नोकरी निमित्त आम्ही वरोर,निर्मळ,सातपाटी,तलासरी,बोर्डी,चिंचणी येथे राहिलो.
माझे प्राथमिक शिक्षण वरोर व तलासरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत,तर माध्यमिक शिक्षण ठक्करबाप्पा हायस्कुल,तलासरी व के.डी.हायस्कुल,चिंचणी येथे झाले.खासदार कै.श्री चिंतामण वनगा हे माझे वर्गमित्र,आम्ही तलासरीला ईयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत एका वर्गात शिकलो.एफ.वाय. व इंटर आर्टसला मी मुंबईच्या पार्ले काॅलेजला होतो.
परिस्थितीवश नोकरी करणे भाग पडल्याने मी एप्रिल १९७४ ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मिळालेली निम्नस्तर लिपिकाची पहिलीच नोकरी पकडली.पुढील शिक्षण बाहेरुन करण्यासाठी पुणे विद्यापीठ तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रवेश घेतला पण संसार व नोकरी या मुळे बी.ए.होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पेण,डहाणु,तलासरी,पालघर,बोईसर,वसई येथे ३७ वर्षे नोकरी करुन आॅक्टोबर २०११ ला ऊच्चस्तर लिपिक पदावरून सेवा निवृत्त झालो.सेवानिवृत्ती नंतरही ५ वर्षे जानेवारी २०१६ पर्यंत विद्युत मंडळात बाह्यश्रोत पध्दतीने काम करीत राहिलो.जुलै २०१६ पासुन एका सुरक्षा एजन्सीत काम करीत आहे.सध्या डहाणु पुर्वेला कॅनरा बॅंकेत आहे.
वयाच्या बावीसाव्या वर्षी १४ आॅक्टोबर १९७५ ला नरपड, (दक्षिण आळी)तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर येथील कु.कल्पना अरूण पाटील,त्या वेळचे वय वर्षे १६ हिच्याशी प्रेमविवाह झाला.एक मुलगा वय वर्षे ४१ व एक मुलगी वय वर्षे ३८ आहेत.दोघां कडुन वय वर्षे १३ व वय वर्षे ३ चे नातु आहेत.
२५ वर्षे वाणगांवला वास्तव्य होते ११ वर्षांपासुन डहाणुला वास्तव्य आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिध्द झाली.आज पर्यंत २५ नियतकालिकांतुन १०० च्या वर कथा,कविता,लेख व स्फुट लेखन प्रसिध्द झाले आहे.
वाॅटसअप व फेसबुकवरही मराठी व बोलीभाषा वाडवळीत लेखन करतो.दिनांक २८ जानेवारी २०१८ ला सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ ट्रस्ट फंडाचा "सौ.जया लीलाधर चौधरी—पुरस्कृत लेखक/ कवी प्रोत्साहनपर गुणवंत गौरव पुरस्कार"मिळाला आहे.
—सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु,09923004895.