श्रावणगंध
निघालो रानोमाळ भटकण्या
आवरू ना शकलो स्वतःला
धुंद निसर्गानुभव घेण्या
पाऊले वळती गावाला
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी मुग्धावलो
पाऊलांपुढे मन धाव घेई
साद घाली काळी माती
तन मन मोहरुन जाई
पाहुनी हिरवी शेती भाती
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी हरकलो
बांधावरती पाय घसरूनी
तोल जाउनी 'धपाक' पडती
हळूच उठुन नजर चुकवुनी
हसून 'स्व'चीच मजा घेती
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी धडपडलो
गावतलाव ओसंडून वाहती
मन आवरे ना स्वतःशी
जलतरणाचा आनंद घेण्या
पाण्यात स्वतःला झोकून देशी
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी जलतरलो
साक्षीने त्या इंद्रधनूच्या
पक्षी मधुर गुंजन करती
इंद्रधनुचे रंग लेऊनी
हळूच मंजुळ शीळ घालती
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी मोहरलो
रानभाजीला बहर येई
रसनेचे चोचले पुरवती
प्राजक्त, निशिगंध, जाई, जुई
झाडे पाने फुले बहरती
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी बहरलो
क्षणात मन हे धावत जाई
सह्याद्रीच्या शिखरावरती
धुंद मोकळा श्वास घेई
दऱ्या खोरे साद घालती
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी हुंदडलो
लेऊनी हिरवा शालू धरती
अवखळ चंचल ती फुलराणी
भासे मज वात्सल्याची मूर्ती
खट्याळ बालक गाई गाणी
स्वच्छंद मी, मनमोहक तू
श्रावणगंधात मी सुखावलो
.....बिपीन पाटील-वरोर विरार
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.