काव्य आणि साहित्य यांचा घनिष्ठ संबंध आहे. आधी काव्य झालेसृ मग साहित्याची मांदियाळी उभी राहिली. म्हणून काव्य ही साहित्याची जननी आहे. प्राकृत मराठीचा विचार करता ज्ञानेश्वर हे आद्य कवी आहेत आणि ज्ञानेश्वर रचित ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ओवी छंदात आहे. कारण जात्यावर दळण दळताना ओव्या गायचा प्रघात होता. लिखित स्वरूपात नसतानाही केवळ मौखिक रुपात एका पीढीकडून दुसऱ्या पीढीकडे हा वारसा स्रियांनी पुढे चालविला. महानुभव पंथाच्या उदयानंतर प्राकृतमराठीचे गद्य स्वरूप पहावयास मिळते ते चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रात. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस हे काव्यविधान सत्य आहे. संतकवी, पंतकवी, निसर्गकवी, प्रेमकवी, नवकवी अशी कवी परंपरा, अभंग-ओवी, वृत्त-छंद, मुक्तछंद अशा बहुविध काव्य प्रकारातून अखंड टिकून राहिली आहे.
सर्व भाषांची जननी संस्कृत ही प्राचीन भाषा. त्या भाषेतील वेदप्रणित वाङमय हे श्लोकबद्ध असल्याने संस्कृतोद्भव प्राकृत भाषेत व पर्यायाने मराठीत ते कवित्व आल्याचे उघड आहे. साधारणतः एकोणिसाव्या शतकात अर्वाचीन मराठी काव्याचे रणशिंग कवीवर्य केशवसुतांच्या गगनभेदी तुतारीने फुंकले.
एक तुतारी द्या मज आणूनि,
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदून टाकीन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने .
देव, धर्म ,ईश्वर अशा प्राचीन भक्तीपर काव्याच्या जागी निसर्ग हाच देव या विचारसरणीच्या निसर्ग कवींच्या कविता उदयाला आल्या. फुलराणी, चाफा अशा निसर्ग प्रतिकांतून बालकवींसारखे कवी प्रेमभावना व्यक्त करु लागले. तर भा. रा. तांबे सारखे कवी, सहज तुझी हालचाल मंत्रेजणु मोहिते किंवा माधव ज्युलियन लिहितात, डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नको तर हीच प्रेमभावना आईच्या संदर्भात, प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी, अशा विराणीतून व्यक्त करतात.रविकिरण मंडळाच्या कवीवर्यांनी ठिकठिकाणी कवितागायनाचे जलसे करुन कविता जनमानसात अजरामर केली.
मुक्तछंदाचे प्रवर्तक बा. सि. मर्ढेकरांनी पिपात मेल्या ओल्या उंदिर सारखी दुर्बोध प्रतिमानं वापरून गूढ कविता लिहिल्या. वसंत बापट यांनी देशभक्तीपर क्रांतीगीते रचली. कविवर्य विंदांच्या विविधढंगी कवितांनी रसिकमनावर गारुडं केलं. मंगेश पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकविले. नारायण सुर्वेंनी कामगार आहे मी तळपती तलवार आहे अशी आव्हानात्मक कविता लिहिली. आणि कुसुमाग्रजांनी तर काव्यमंदिरावर कळस चढविला. या आधुनिक काळातच नामदेव ढसाळ, दया पवार, केशव मेश्राम या सारख्या दलित कवींनी दलितांचे आक्रंदनपर कसदार काव्यलेखन करून दलितकाव्य प्रचलीत केले.
तत्कालीन समाजमन साहित्यात प्रतिबिंबीत झालेलं असते. साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो. त्यादृष्टिने पाहता १९९० ते आजतागायतचा कालखंड हा आधुनिक पीढीचा, संगणकाचा, उद्योजकांचा तसेच साहित्याच्या परिवर्तनाचा व पुनरुज्जीवनाचा आहे हे विचारात घ्यायला हवे. आजची शिक्षित नवी पीढी नोकरी व्यवसायानिमित्त शहराकडे येवून स्थिरावली. महानगरांची वस्ती वाढली पण खेडी ओस पडली. पूर्वी उत्तम शेती व कनिष्ठ नोकरी म्हटले जाई. आता समीकरण बदलले. ८०% शेती ५०% वर आली. शिकली सवरली पीढी मातीत हात घालायला तयार नाही. कधी सुका तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. या बदललेल्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात साहित्य व विशेष करून कवितेचा अर्थ लावावा लागतो. महानगरातील श्रमसंस्कृतीला साहित्यात स्थान मिळाले. जुने सांस्कृतिक संदर्भ मागे पडून नवी मूल्यव्यवस्था प्रस्थापित झाली. कंत्राटी कामगार, नोकऱ्यांचा अभाव, त्यामुळे सुशिक्षित बेकार निर्माण झाले. शहराकडे लोंढे वाढले. शहरातील फूटपाथ- रस्ते फेरीवाले व छोट्या धंदेवाल्यांनी- विक्रेत्यांनी व्यापून टाकले. हप्ते, लाचखोरी यांना आलेला ऊत, भोंगळ शिक्षणव्यवस्था, वृद्ध, महिला, भृण आदिंच्या समस्या या साहित्यातून मांडल्या जाव्यात आणि कवितांतून अधिक प्रभावीपणे हे कार्य घडू शकते.
रोजंदारीचे मजूर काम न मिळाल्याने देशोधडीस लागले याचे चित्रण भ्रमिष्टाच्या जाहीरनामा कवितेतून संतोष पवार, तसेच उस्मानमामा या कवितेत केशव खटिंग करतात. नोकरीनिमित्त कुणबिकीच्या जंजाळातून मुक्तीसाठी एक एकर जमीन विकू पाहणारा कल्पना दुधाळचा काव्यनायक, तर २१ व्या शतकातही प्राक्तनाच्या बंदी घरीदारी राबणाऱ्या बाया मात्र अव्याहत राबत राहिल्या. खरे पाहता बहिणांईंचा काव्यवसा त्यांनी पोचवायला पाहिजे होता कळसा; पण तसे काही फारसे घडलेले नाही. संसारातील कळशा वाहता-वाहता त्यांच्या जीवनातील काव्यच हरपले. प्रवीण बांदेकर, बालाजी इंगळे, रवी कोरडे, ऐश्वर्य पाटेकर इत्यादी अनेक कवी ग्रामीण मातीशी नाळ जोडून आहेत. जागतिकीकरणाच्या बदलाचा प्रभाव कवींच्या जाणिवांवर पडला आहे म्हणून आजची कविता ग्रामीणजीवनाच्या पडझडीवर, बदललेल्या पर्यावरणावर, आधुनिक खेड्यातल्या व्यवहारावर भाष्य करते. अरूण काळे, भुजंग मेश्राम, सायमन मार्टीस, वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर, गणेश वसईकर, सलील वाघ इत्यादी कवी या काळाचे चरित्र लिहिताहेत.
काव्यं रसात्मकं वाक्यं असे कवितेचे स्वरूप असल्याने आजही मराठी कविता मराठी मनावर भुरळ घालते. मराठी काळजावर कोरलेली ही काव्य-लावणी लाजरी-साजरी, लय-भारी, अक्षय ठरलेली आहे. काव्य ही साहित्याची गंगोत्री आहे. साहित्याची ही काव्यगंगा न आटता जशी संथ वाहते कृष्णा माई तशी अखंड वाहत राहील. काव्य ही हृदयाची भाषा आहे. मनात जेव्हा भावनांचा कल्लोळ उठतो तेव्हा तो उद्रेक काव्यरूपाने बाहेर पडतो. आजकाल फेसबुक हे कविंना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. विशेष म्हणजे युवावर्गाकडून कवितेला चांगला प्रतिसाद मिळतो. तसेच वेगवेगळ्या स्तरावर कविसंमेलनेही नियमित होत असतात त्यामुळे नवकविंना सादरीकरणालाही खूप वाव मिळतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकलेल्या मनाला थोडे मनोरंजन करून शीण घालविण्याचे काम हास्यकवी करीत असतात. कवीला थोडी गायनीकळा जर अवगत असेल तर एका दगडात दोन पक्षी मारता येतात. कविता श्रवणासोबतच सुश्राव्य गायनाचाही आनंद रसिकाना मिळतो. नारायण सुमंत, अशोक बागवेंसारखे गोड गळ्याचे कवी हा आनंद रसिकांना मिळवून देतात.
पूर्व पुण्य ज्याचे त्याचा रम्य भावीकाळ. या सूत्राप्रमाणे संतांचे अभंग, वेद, ञृचा, सूक्त आदी काव्यात्मक-पुण्य कविता नामक साहित्यप्रकाराच्या वाट्याला आलेले आहे, हे कवी मंडळींचे सद्भाग्य आहे. महाजनः गतः स पंथःl या उक्तीनुसार आधुनिक पीढीने जर कवितेची वाट चोखाळली तर साहित्याची सेवा तर होईलच पण काव्य निर्मितीच्या ब्रम्हानंदी टाळी लागेल व स्वानंद प्राप्त होईल. आता मुंबई विद्यापीठाने बायबोलीस अभ्यासक्रमात स्थान दिलेले आहे. बायबोली ही कविताधार्जिणी आहे. त्यामुळे मायेच्या दुधावर जशी बाळं बाळसे धरतात. तद्वत बायबोलीतून बालबोध कविताही मराठी मातीत फोफावेल यात शंका नाही.
आजकाल सर्वांच्या हाती स्मार्टफोन आलेला आहे. त्याचा विधायक उपयोग करून कविता श्रवणाचा लाभ घेता येतो. काव्यसंमेलन, साहित्य संमेलन आदी यू-ट्युबवर अनुभवता येते. व्हॉट्सअॕपवर स्वरचित कविता प्रसारित करू शकता. तसेच इतरांच्या कवितांचा आनंद घेणे शक्य झाले आहे. इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. त्यातल्या त्यात काव्य-लेखन वा काव्यवाचन कमी वेळखाऊ असल्याने काव्यछंद हा खऱ्या अर्थाने आनंदकंद आहे. प्रसिद्धीसाठी नको तरि आत्मानंदासाठी तरि जरूर कविता लेखन व्हावे. मात्र उपयुक्तता हा निकष आजची पीढी कवितेलाही लावू पहात असेल तर साहित्याला अच्छे दिन येणे भविष्यात तरि दुरापास्त आहे. सतत कानाला मोबाईल लावून फिरणाऱ्या, इंग्रजीत शिक्षण घेऊन आंग्राळलेल्या नव्या पीढीच्या शिलेदाराकडून काय आणि किती अपेक्षा बाळगावी हा एक अनुत्तरित प्रश्नच आहे. एकीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत आणि इंग्रजीतून पढीतपंडितांना धड इंग्रजी वा धड मायबोली कळत नाही तेथे सृजनत्वाची अपेक्षा ठेवणे गैर आहे. अर्थात यात त्यांचा दोष नाही. या विपरीत परिस्थितीतही मायबोली नव्या दमाने उभी राहील हा विश्वास आहे. कारण, कुसुमाग्रजांची स्पष्टोक्तीच अशी आहे.
काय हटवूनी हटतो सागर हटेल एकीकडे,
उफाळेल तो दुसरीकडूनी गिळून डोंगरकडे.
महाराष्ट्रात महानगरांतील मिश्रसंस्कृती जरि मराठी साहित्याला पोषक नसली तरि खेड्यापाड्यातील ग्रामीण मराठी संस्कृती मायबोलीचे गोडवे गात राहील. वारकरी संप्रदायांनी ज्ञानोबा-तुकयाची अभंग परंपरा सातशे वर्षाहून अधिक काळ टिकवून ठेवलेली आहे. मराठी साहित्यातील ही काव्यसंपदा इंग्रजी आक्रमणाने नष्ट होण्याइतपत माझी मायबोली दुबळी नक्कीच नाही. दोष आहे तो आमच्यातील तथाकथित इंग्रजी पोपटपंचीचा. पण आंग्राळलेले हे पिंजऱ्यातील पोपट मुक्तपणे विहार करणाऱ्या गरूडाची बरोबरी काय करणार. तेव्हा इंग्रजी जरूर शिका पण मायबोलीचा अव्हेर करू नका. कारण, आमच्या नसानसात वाहते मराठी असे खडे बोल बोलणारी थोर गझलकार दिलीप भट यांची अमर दिव्यवाणी लाखो मराठी बांधवाची आहे धमणी. आणि तीच अमृतवाणी झरते कवीवराची झरणी.
अंति समारोप करताना इतुकेच म्हणेन,
काव्य आणि साहित्य यात द्वंद्व मुळीच नाही ||
काव्यरुप साहित्य हे रुपक कविवर देतो ग्वाही ||
..........कविवर हेमंतराम पाटील. 9757340310
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.