मायं मायेर
मायं मायेर पसाळसं. पालघर, उमरोळी तहस बोईसर या तीनव्या टेसनारसन पसाळ्या गावात जाता येते. 'पसाळे' गाव पालघर बोईसर रस्त्यावर हाय. सडकेया दोनव्या बाजूला आपल्या समाजायी तहेस बीज्या समाजायी घरं हात.
अहं हांगतात का, पांडवायी बायको "पांचाली" ईया नावारसन या गावाला "पंचाळी" ये नांव पडलं. तहस न्याय निवाडा करतात त्या पंन्साया आळीवरसन पंच + आळी = पंचाळी अहं नांव पडलं अहेन अहव हांगतात. पण आपल्या वाडवळीत या गावाला "पसाळे" अहं हांगतात.
पसाळे गावार आजपावेतो निसर्गान कवास संकट आणलं नय मेळे. आमशा बारक्या पणात आमी बारकी पोरं एक गाणं बोलव्या "बेटेगांव एटे, उमरोळी पेटे न पसाळे वासे" त्याय कारण मन्जे पसाळे ये गांव देवान सुरक्षित जागेवर ठेवलय. गावाया बाजूला खाडी हाय पण तिया पाण्याया प्रवाह गावापासून दूर हाय. एका बाजूला मिठागर हाय. सब्बन गावायं पावसायं पाणी खाडीत निगून जाते.
पसाळ्या गावात आपले वाडवळ लोक कमीस हात. पंधरा- वीस घरस हात. तहीस बिज्या समाजायी लोकव अठी रेतात. त्यामन लवार हात, वैती हात, कोळी-वारली हात. गावामन ग्रामपंसायत हाय पण ती जांभूळ पाडा, आगवनपाडा तहस पसाळे गाव अही तीन मिळून एकस ग्रामपंसायत हाय. जांबुळपाड्यावर बीज्या समाजायी लोकं रेतात, तहस आगवनावर माच्छी समाजायी लोकं रेतात.
साधारण पन्नासक वहरापयले पसाळे गावाशा बावीयं पाणी घणं गोड ओथं, गावात दोनस बावी ओथ्या, एक गोडी बाव न बीजी खारी बाव. गोडी बाव ओंडी ओथी पण जवा या गावात मिठागर आलं तवापासून या गावश्या बावी तहस वाडीमनशा बावीवं खाऱ्यास जाल्या. माहणाला पाणी पेव्यालाव गोडं पाणी नय मिळतवं. बाजूला जे उमरोळी गाव हाय न त्या गावारसन पाणी डोक्यारसन हांडा न कळशी घेऊन आणव्या लागतोवं, पण आता आमश्या गावाला बरे दिह आलेत. गावाया बाजूला जो जांबुळपाडा नावाया पाडा हाय तयसन बोरींग करुन पाणी पसाळे गावात आणलय, बघून गावकऱ्यांना पेव्याला पाणी मिळव्या लागलं.
बोयसर एम्.आय.डी.सी.सालू होव्या पयले पसाळ्या गावात घणं मावरं मिळव्या. बोठं बोठं बोय मावरं, खरब्या(मोड्या), नावेरी, शिंबोरी, खाजऱ्या, कोलबी अहं खाडीयं मावरं अगदी ताजं ताजं खाव्याला मिळतोवं. पण एम्.आय.डी.सी.ला सुरुवात झाली नं कंपनीसन होडलेलं पाणी खाडीत येव्या लागलं, न सब्बन खाड्या काळ्या पाण्याया जाल्या. ताजं ताजं मावरं मिळव्या ते कमीस जालं. या गावात जे वैती लोकं रेतात ते खाडीत घोलवं घेऊन जाव्या न ताजं मावरं आणून वाडवळ पखाडीत विकव्याला येव्या. बोठ्या बोठ्या मावऱ्याया वाटा वायला केल्यावर त्यासन जे वरलेलं बारकं बारकं मावरं रेव्या ते मंजे खरब्या, बारकी शिंबोरी, कोलबट, बारकं बोय मावरं या हरकं मावरं एकास वाट्यात विकव्या, त्याला "केजं" हांगतहत. या केजाया मावऱ्यात वांग, मुळा घालून केलेली भाजी घणी सव लागव्यायी. माला त्या भाजीया सवीयी अजून आठोण येते. पण त्या केजायी मजा आता नयं मेळे, मंग कां करव्या? गेले ते दिही, बस.
पसाळ्या गावात झाडं, झुडंपं बो हात. पयल्या वाड्या ओथ्या. वाडीत काम करव्याला माहणं मिळव्यायी पण आता नय मेळत, बगून लोकायीन वाड्या करव्या होडून दिल्या. पसाळ्या गावात नारळायी हालं पाण्यात भिजवून त्याया काथा कुटून लोळ्या तयार करून, त्याया गुंड्या हाथानस करुन बेटेगांवश्या बाजारात विकव्याला नेत. आता यो धंदा कोण नय करे.
गावात ग्रामपंसायतमन रेडीओया भोंगा ओथा. हकाळश्यापारा सहा वाजता रेडीओ वरसन "मंगल प्रभात" या कार्यक्रमामन देवायी गाणी आयकव्या मिळव्यायी. कामगार सभा, वनिता मंडळ अहे कार्यक्रम आयकव्या मिळव्याहे. आमश्या बारके पणी आमी सब्बनजण मिळून एकदम खेळ खेळव्या. हकाळश्यापारा लवकर उठून गोड्या बावीवरसन पाणी आणून जालं का अभ्यास करव्या न मंग थोड्यावेळ खेळव्या. मे मयन्याया हुटीत ते झाडावरसा सुरकाठी, सुरपारंब्या अहे खेळ खेळव्याला जामस मजा येव्यायी. नाना काकाया वाड्यात उंड्याया झाडार, शिशिया झाडार सडून सुरकाठी, सुरपारंब्या अहे खेळ आमी बो खेळल्यात. अभ्यास करव्याला घरात कवास नय रेव्या. गावश्या बाजूला नंबर (गवती जागा) हाय, तीयं नाव खापरं न बीज्या बाजूला हेत हाय त्यायं नाव वाळी. तय जाव्या न अभ्यास करव्या. तवा काय आजशा हरकी कोणलास कोणशी भिती नय वाटव्यायी. पोरं न पोरी एकदमस अब्यास करव्या पण आय बाबांना काय काळजी नय वाटव्या. विश्वास अहव्या पोरानवर.
पसाळ्या गावात सार्वजनिक गणपती बहवडतात. गोकूळ अष्टमी, दिवाळी, होळी सबन गावायी लोकं एकास मेरे येऊन करतात. पयलेते गणपती वेळेला गावशी पोरं पोरी नाटक बहडव्यायी. पोरी नासकाम करव्या, फुगड्या खेळव्या पण या सब्बनात घणी मजा येव्यायी ती गोकुळ अष्टमीला. अष्टमीया दिह्या रातसे बारावाजे पावेतो पोथी पुराण, तहस टाळ, मुरदुंगावर भजनं सालव्यायी. बारा वासता कृष्णाया जल्म जाल्यावर अष्टमीया उपास होडून गरबे, भजनं सालू होवयायी. आमशे मामा कै. चंद्रसेन देवजी मन्जे सद्र्यामामा पोथी वासव्या तवा सब्बन लोकं त्यात गुंगुनस जाव्या. ते मुरदुंग मस्तस वाज्जव्याये. बिज्या दिह्या दहीकाला करव्या. दहीहंडी खाली जाम बोठा गरबा घालव्या न पुरुष लोक जाम जोरात नासव्या. त्यामन पांडूकाकायी आठोण येते. मला ते आजव पसाळशा गोकुळ अष्टमीयी घणी आठोण येते.
आज पसाळ्या गावात मराठी शाळेबरबर इंग्लीश मिडीयमशीव शाळा हाय. पोरंपोरी कालेजात जाऊन बुकं शिकल्यात. नोकरी करतात. गावात डायमेकरसा धंदा सालते. कोणी कोणी विटाया, खडीया, बांधकामाया कामाला लागणाऱ्या सामानाया धंदा करतात. कोणी सरकारी नोकरी करतात. या गावात काम्पुटरसं शिक्षण देव्यायीपण सोय हाय. गावशी पोरं खेळात हुषार हात. हाँलीबाँल, क्रिकेट अहे खेळ पोरं खेळतात. आपल्या वाडवळ समाजामन दर वहरा पसाळ्या गावाशी पोरं बक्षीस मिळवतात. पोरी कब्बडी, क्रिकेट खेळून बक्षीस कमावतात.
अह्या माया मायेरायी आठोण काडताना आपल्या वाडवळी भाषेमनस एक गाणं माला अजून आठवते:
आडवा डोंगर नय दिखे मायेर
बाबा माया विठोबा कवा रं भेटेलं
आडवा डोंगर नय दिखे मायेर
आई मायी रुख्मीण कवा ग भेटेलं
आडवा डोंगर नय दिखे मायेर
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.