"वरोर गांवासं माय बालपण— वय वर्ष—६"
"रगडा प्याटीस"
रगडा प्याटीस यो अहा खाव्याया समसमीत पदार्थ हाय जो बवुत करून बायेर गाड्यारं नयते हाटेलातस खाला जातो.
पण कायी सुगरण बायका मात्र हौशेन अहे पदार्थ करुन घरशाना खाव्या घालतात.
घरा केलेले पदार्थ सस्त पडतात, शुध्द अहतात, बक्कळ खाव्या मिळतात. पण कामाया घणा रगडा पडते, पण कुटुंबवत्सल बायका जकलं हौशेन करतात. घरशा माहणायीनव अह्या सुगरणीयं वेळोवेळी कौतुक करवं. पण कायी खोडशाळ नवरे हांगतात,
"तुनं केलेलं बरं हाय, पण आगरारशा गाडीयी सव नय!"
मंग तहीस धीट बायको अहेन ते हांगते,
"तुमशा मुहीला सवस घणी, तुमाला बायेरसंस बरं लागणार"
अह्या संबाषणानंतर नवरा शाणपणानं ओगा रेला ते ठीकस नयते घरात रगडा पडलास अहं हमजा.
कायी गोवव मस्तपैकी सयपाक करतात, बाईला आपण सुगरण हांगतात पण गोवाहाटी तहा यर्यायी शब्द नय हापडे. याया अर्थ सयपाका हरक्या गोष्टी बायकायस काम अहा घ्यावा का? पण मला वाटते सयपाकात तरबेज अहलेले गो मणजे "सुगरणे" जाणत्यायीन पर्यायी वाडवळ शब्द सुसववा.
गावोगांव कायी खोडशाळ माहणं अहतातस. ती काम ते कायव नय करत, ऐदी अहतात, घरशाया जीवावर जगतात पण त्यांशा आंगात घणी कुरखी भरलेली अहते. त्याना कोणी तवडा भावव नय देत पण त्याना बिज्या लोकायं लक्ष आपल्यामेरे वेधुन घेव्यायी हवय अहते. ते कोणी हम्मोर दिखला का त्याला आयकव्या जाईल अवड्या भोट्टया आवाजात बोलतात,
"माला जे कोणी आडवा आलानं ते मी रगडा पाडल्याशिवाय रेणार नय.
एका वाडवळाया गांवात मीन अहा माहणु पावेला हाय. कोणी पावेला अहेन ते गावायं नांव हांगा.
बर्यास वहरांपुर्वी मीन आमशा आईया वयायी एक बाईव पावलोयी, सौसारी पण समादानी नय. तियी शार पोरं न दोन पोर्या.जकल्यायं वय वहरं दा परयंत, जकलेस आमश्यास वयाया जवळपास. ते आमशे मित्र, सवंगडी. नवरा बिसारा भोळा सांब! (नवरे ज्यास्त करुन अहेस अहतात), यी एकुलती पोरी, घणी लाडा कोडात वाडेली पण घणीस तरकटी. जकलादी तणतणतस अहव्यायी. कोणत्याव गोष्टीत समादानी नय. कोणसं बरं पावलंका जळणारी. नवर्याला सतत दुषण देणारी.कोणी घरात खिरले का तीला थयथयाट करव्यायी आयती संदीस मिळव्यायी. दिहीभर बडबडत रेव्यायी. ऐकणार्याये कान किटत, भगुन जकलेस नाईलाजानं भेटव्या येत न लवकरस सटकत. तिया घरशा लोकाया कानात कव्वास कापसाये बोळे घालेले पावले नय, कहे आयकत रेत अहतील कोण जाणे!ती जकलादी नवर्याला, पोरांना हांगव्यायी,
"माया मेरे ओगेस र्या."
"जकलादी टाय करु नका."
"नयते मी रगडा करीन.”
रगडा यो शब्द मीन तवा पयला आयकोटलोया.
एक दीही मीन आईला हांगटलोयंव,
"आई ती परेनशी आई नेहमी बडबडत अहते,
"मी रगडा करीन."
"मी रगडा करीन."
"पण मीन त्यांशा घरात तिनं कवा रगडा केलेला पावला नय. तुव कर न आपल्या घरात आमशाहाटी रगडा"
तवा मायी आई बोलली,
"पोरा, रगडा मणजे काय खाव्यायी वस्तु नय. रगडा मणजे भांडण, बडबड. ती दिहीभर जे करत रेतेनं? तोस रगडा. "
पास सहा वहराया अहताना एकदा मी हट्टानं माया बाबाया मंगराई लागुन शिसणी गेलता. तवा सालतस शिसणी जाव्याये. साडे तीन मैल सालुन आमी शिसणीला मारकिटामेरे पोसले. मी ते सालुन मरतुकडा झालंता. कय बाबाया मंगराणी लागला न शिसणी आला अहं माला झालंत.
"दमला कांर सुहास?"
बाबांनं माला विसारंल.
"नय."
मी खोटास बोलला.
"सल आदी आपण हाटेलात काय तरी खाऊ."
बाबा बोलले.
मायी कळी खुलली.मायं शिसणीला येव्यायं सार्थक झालंतं.
हाटेलशा पायर्या सडता सडता मीन तयशा कासबंद कपाटात काय काय जिन्नस हात ये पाऊन घेतलं.
"काय खाणार तु?"
हाटेलातल्या बाकड्यावर बहल्यावर बाबानं माला विसारलं.
"माला तो भोट्टा बुंदीया लाडु द्या. माला गोड ज्याम आवडते."
मीन हाटेलातल्या काशेया कपाटाकडे बोट करुन हांगटलं.
"तुमी काय खाणार?"
मीन बाबांना विसारलं.
"मी बटाटा वडा खातं. माला तिखट आवडते."
बाबा बोलले.
"माला पण साखडवतील लगरसा?"
मीन बाबांना विसारलं.
"हो, देइन."
बाबा बोलले.
बाबानं वेटरला बुंदीया लाडायी न बटाटे वड्यायी आरडर दिली.
लगेसस त्यानं दोनव्या जिन्नसा आमशा पुड्यात आणुन ठेवल्या.
मीन बुंदीया लाडुवर ताव मारव्या सुरवात केली. बाबा बटाटावडा खाव्या लागले.
मीन बाबांना हांगटलं,
"बाबा, तुमीव साका न लाडु."
बाबानं दोन बुंदीया कळ्या तोडल्या न तोंडात टाकल्या.
"आता मालाव बटाटावडा खाव्या द्या." मीन बाबांना हांगटलं.
बाबानं त्यांशा पुडशा बशीतला एक बटाटावडा हुसलला न माया पुडशा बशीत ठेवला. मीन तो फस्त केला.
बाबानं वेटरला एक स्पेशल शा शी आरडर दिली.
"बाबा, मालाव पायजे शा."
मीन बाबांना हांगटलं.
"देईन न लगरसा त्या मनसा."
बाबा बोलले.
"माला लगरसा नय आख्खा कोपभर पायजे शा."मी बोलला.
बाबानं दोन कोप शा आणव्या वेटरला हांगटलं.
अवड्यात एक माहणु हाटेलात आला न त्यानं आमशा बाजुया बाकड्यार बहता बहता आरडर दिली.
"ए पोर्या एक रगडा प्याटीस लाव."
"बाबा त्यानं काय मांगटलं?"
मीन बाबांना विसारलं.
"हळु बोल, कोणी आयकतील. त्यानं रगडा प्याटीस मांगवलाय."
बाबा बोलले.
"पण रगडा ते खाव्यायी वस्तु नहते न?" मीन विसारलं.
"कोणी हांगटलं तुला?"
माला बाबानं विसारलं.
"आईनं."
मी उत्तरला. न मीन मायं न आईयं संबाषण बाबांना हांगटलं.
बाबा नुसते हाअले.
क्या ते माला हमजलं नय.
अवड्यात त्या माहणामेरे वेटरजुन एक डीश आणुन ठेवली.त्या माहणानं दोनव्या हातात दोन सशमे घेतले न त्यात खुपसले. मी त्याया तटेस पावत होता. तवड्यात आमसा शा आला.
"सल शा पे."
बाबा माला बोलले.तवा मी बोलला,
"बाबा पुडशा फेरी आपणव खाव्या अथीस रगडा प्याटीस."
"अरे आपण परत कवा येऊ तवा येऊ, पण तुला खाव्यास हाय नं रगडा प्याटीस? मंग अाजस खाऊन घे."
अहं हांगुन बाबानं वेटरला एक रगडा प्याटीस आणव्या हांगटलं न बशीमनशे दोनवे शासे कोप दोनव्या हातानं हुसलुन त्यावर बशा उपड्या ठेवल्या.
थोड्यास वेळानं वेटरजुन आमशापुड्यात एक डीश आणुन ठेवली. ती पाऊन मीन बाबांना हांगटलं,
"बाबा यी ते वटाण्यायी ऊसळ जही दिखते?"
"हो त्यालास हांगतात रगडा."
बाबानं हांगटलं.
मीन समसा हुसलला न प्याटीसशा पोटात खुपसुन त्यायं पोट फाडुन पावलं.मनत नुसती बाफेली बटाटीस दिखली.
"बाबा यी ते नुसती बाफेली बटाटीस हात."
मीन हांगटलं.
"हो प्याटीस बटाटी बाफुन, कुस्करुन, मीठ मसाला लाऊनस करतात." बाबा बोलले.
"बाबा तुमीव खा नं प्याटीस."
मी बोलला.
बाबानं वेटरशामेरे दोन बिजे समशे मांगवले. त्यानं ते आणुन दिले. आमी रगडा प्याटीस खाव्या सुरुवात केली. ते घणंस सव लागलं.
बाबानं शाशा दोनव्या कोपावरशा बशा हुसलल्या. न माला हांगटल,
"आता निवलेन शा, कोपानस पे."
बाबानं एक कोप हुसलला न तोंडाला लावला. मीनव दोनव्या हातानं बिजा कोप हुसलला न ओठाला लावला.न फुरक्यामारुन शा पेव्या लागलो.
माये बाबा माया तटे कौतुकानं पावत होते. आमीन शा खपवला न ऊठले.
"बाबा हाटेलसा शा मस्त अहते न? घरसा शा नय अहा लागे." मी बोलला.
"तो पेशल शा होता. त्यात दुद न भुकीव घणी टाकतात भगुन."
बाबा बोलले.
बाबा पैशे देव्याहाटी काऊंटरमेरे ऊबे रेले. त्यायीन अर्दा किलो भजी भावंडाहाटी घेतली. मीनं तवड्यात हाटेलमनसं क्या क्या खाव्यायं रेलं ते पाऊन घेतलं. बाबानं पैशे दिले. आमी हाटेलशा डेवण्या उतरव्या सुरुवात केली.
आमी मारकिटात घुसले. बाबायीन खरेदी केली. आमी मारकिटाबायेर आले.
मायं लक्ष ऊहाया घाणीवर पडलं.
"बाबा आपल्या वरोरात ऊहाया रस नय मिळे. जत्रा येव्यायी वाट पावव्या लागते." मी बोललो.
बाबानं माला रसाया दुकानात नेलं.
"बाबा, दोन भोटी गलासं घ्या न पक्का बरफव टाकुन मांगा. घणंस बोफारते." मी बोलला.
बाबानं दोन रसायी आरडर दिली.
"बाबा आज आपण ज्याम खाल्लं, मी घरा कोणाला हांगणार नय." मी बोलला.
"सुहास कव्वाव खोटं बोलव्यायं नय, मीन त्यांशाहाटीव खाव्या घेतलंय."
बाबा बोलले.
"बाबा तुमी आईला रगडा प्याटीसव करव्या हांगा न."
मी बोलला.
"तिला कवडं काम अहते.तुमशा स भावंडायं करता करतास तिये नाकी नव येतात. कामाया रगड्यात कवा करत बहेन ती रगडा प्याटीस?"
बाबा बोलले.
ऊहाया रसाये दोन भोटे गलास आमशा पुड्यात ठेवले गेले. आमी एक एक हुसलला. मी साकत साकत, ऊहाया रसायी बाबाया ओठावर कही पांडरी मिशी फुटते ते पावत, हाअत गलास रीकामा केला. बाबानं रसाये पैशे दिले.
आमी दुकानासन डेवले. मारकिटमेरे उबे रेले.
अवड्यात आमशामेरे ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत एक सायकल ऊबी रेली. वरोरशे मागेलवाडीशे वासु मास्तर होते ते.
"काय का.के.राऊत अवड्या निंबरात पोराला घेऊन कय हिंडतात?"
"मी आलता सामान खरीदव्या यो पोर लागला मंगारी."
बाबा बोलले.
"काय रे सुहास, अवड्या निंबरात हिंडुन तु काळा पडेल तुया बाबां हरका. गोरा नय रेणार तुया आई हरका."
वासु मास्तर माला बोलले.
"अरे वासु मी काळा नय मेळे तुया हरका. सावळा हाय."
माये बाबा त्यांना बोलले.
"अरे गोर्या बायकोया संगतीन ऊजळलाय तु नयते काळास अहता."
वासु मास्तर परत बोलले. हाअले न त्यायीन त्यांशा खिशासन पार्ले मिंटशा पिपरमिठ्यायं पाकिट काडलं न माया हातारं ठेवलं. मीन ते लग्गेस फोडुन दोन पिपरमिठ्या तोंडात टाकल्या न सोकुन तोंडात हेळा वारा घेव्या सुरवात केली.
"सल मी या पोराला सायकलवर डबलशीट बहडवुन वरोरा पोसवतो तुमशा घरा."
वासु मास्तर बोलले.
"नोको गुरुजी, तुमशा सायकलला बारकी शीट नय मेळे. दांड्यावर बहुन अवड्या दुर जाव्या कुले दुखतिल माये."
मी बोलला.
"मणजे तुला बाबा बोरबरस जाव्या हाय अहस हांग न."
वासुमास्तर बोलले.न सायकलवर टांग मारुन निंगुन गेले.
ते अनकळ होत नय तवविरी मी त्यांना पावतस होता.
अवड्यात
"ह्याॅट! ह्याॅट!!"
करत एक बैलगाडी आमशामेरे उबी रेली. पावतात ये वरोरशा हरिजन वाड्यासा गोकुळ्या खेड्या न बैलगाडी आमसा सुलत काका अंतानानायी.
"काय नाना मास्तर येव्याय न वरोरला? सुहास सड गाडीत." गोकुळ्या बोलला.
मीन बाबांया तोंडातटे पावलं.
"गोकुळ्या येव्या ते हायस, तु ते देवा हरका भेटला, पण आदी गाडी बाजुला ने न ऊबी कर."
बाबा बोलले.
गोकुळ्यानं गाडी रस्त्याया बाजुला नेली, उबी केली, खाली उतरला, बैलाये पागे हाटीला गश्श बांदले न तो आमशामेरे आला.
बाबानं त्याया हातार एक रुपया ठेवला (सन १९५९) न हांगटलं
"जा आदी भजे खा न शा पेवुन ये हाॅटेलासन."
"सल सुहास आपण जीलबी खाऊन येवु."
अहं हांगत गोकुळ्यानं माया हात धरला न माला ताणव्या लागला.
"मी नय येय.आमीन खालंय भरपुर."
हांगत मीन माया हात होडवुन घेतला.
गोकुळ्या नाश्ता करून आला.तवड्यात बाबानं माला बैलगाडीत हुसलुन ठेवलोयं. न ते सोता मायामेरे बहलोये.
गोकुळ्या गाडीमेरे आला. वरलेले पैशै माया बाबांना देत बोलला,
"नाना ६० पैशायी भजी न ३० पैशाया शा. ये १० पैशै वरले ते घ्या."
"अरे ठेव तुला ते वावळी हाटी."
बाबा बोलले.
गोकुळ्यानं माया हातार एक भोटी पिपरमिठी ठेवली, हाटीला बांदेले पागे होडले न तो गाडीत सडला.
"गोकुळ्या काका माला गाडी हाकव्या दे."
मीनं गोकुळ्या काकाला हांगटलं.
त्यानं माया बाबातय पावलं. माया बाबानं मान हालवली. गोकुळ्या काकानं माला पुड्यात बहडवला. न पागे सैल होडत तोंडानं,
"क्याक!"
अहं केलं. बैल वरोरशा रस्त्याला लागले.
गाडी धमाळ्याया टेपावर आली तहे मला ते शारवे भाहा दिखले. आमाला पाऊन ते गाडी मेरे धांवले. गोकुळ्या काकानं पागे ताणुन बैलगाडी ऊबी केली. जकले गाडीमन सडले. मीव पुडसा उठुन मंगारी हाटीमन बहला.
"तु तुया बाबाया मंगारी लागुन शिसणीला गेला ते तुया आईनं हांगटलं माला."
भोटा परेन बोलला.
"भगुन आमी तुला घेव्या स्टॅंडवर आले."
दुहरा सुरेन बोलला.
"आमी येवुन एक तास झाला."
तिहरा हरेन बोलला.
"तवड्यात आमी येश्टीयी तिकिटं गोळा केली."
जकल्यात बारका शिरीन बोलला.
तवड्यात आमी हरीजन वाडा ओलांडुन कोंडवार्या मेरे पोसले. भैय्याया दुकानामेरे पागा ताणुन गोकुळ्या त्या पोरांना बोलला,
"ऊतरा पोरांदो तुमसं घर आलं."
माया बाबानं त्याना एक एक केळ काडुन दिलं. पण ती पोरं काय उतरव्या तयार नय.
"आमी सुहासशा बोरबरस येणार."
ते शारवे बोलले.
गोकुळ्यानं गाडी हेपाटली.
जरा पुडे माया मामाया तय गाडी पोसली ते आमशी आई मामाया आंगणात उबी. मायी पासवी भावंड तिया भोवताली. गोकुळ्यानं बैलगाडी उबी केली.
आई बोलली,
"उतरा अथीस. बायजुन जेवण केलंय जकल्यायं"
बाबा उतरले. आमी जकल्यायीन बैलगाडीसन खाली उड्या मारल्या.
"सामायेण उतरवा."
मायी आई माया बाबांना बोलली. बाबायीन एक एक पिवशी हुसलली. एक एक भावंडान ती तुकली न मामाया घरात नेली.
"सला हात पाय धवा जकल्यायीन. जेवण तयार हाय."
मायी ठमा/विठा आजी बोलली.
"बाय यी संतुयी शारवी पोरंव हात सुहासशा बोरबर."
माया आईनं आमशा आजीला हांगटलं.
"बहडव त्यानावं नयतरी तिनं काय फोडलंव नहेन अजुन सुलीवर. मी वयरते साऊळ जराशे, भाज्या हात दोन दोन पुरतील." आजी बोलली.
गोवायी न बारक्या पोरं पोरीयी पंगत बहली. जकले पोटभर जेवले. बायकायीन पण ताटं घेतली.
दुफारसं जरा आंग टाकुन आई न बाबा मामाया घरसन वाणसामायणाया पिवशा घेऊन वाडी आळीत आमशा घरा गेले.
आमी पोरं मामायी झोडणी न मळणी साललोयी तय पात पावव्या झिण्याबाबाया वाड्यात गेलो.
अस्तमान पडता आमी मामाया ओट्यारशा बाकड्यार येवुन बहले.
हमोरशा बाकड्यार सुलत आज्या गोविंद कण्हत बहलोये. सुलत आजी दारात उबी होती. आज्या आजीला बोलले,
"झोडणी न मळणी करून न पात हेपाटुन माया पाठीत विळी जही भरलीय. जरा बाम लाऊन रगडुन दे नं."
आजी बोलली,
"माला सुलीर फोडव्या हाय. तुमी अहं करानं अथी मांद्र्यारं पालथे निजा."
आजीनं मांदरा आणुन ओट्यावर आथरला. आज्या मांदर्यावर पालथा निजला. आजीनं आमा पोरांना मेरे वारटलं न हांगटल,
"तुमी जकल्या पोरायीन अटे रांगेत उबे र्या न एकेकायीन हळुहळु आज्याया पाठीवर ऊबे रेवुन पायानं हळुहळु रगडा. जकले एकदम सडुन खोंदु नका. नयते मायी पंशायीत!"
आमाला सुसना देउन आजी घरात रांदव्या निंगुन गेली. पयला मी भितीला दोनवे हात धरुन आज्याया पाठीवर ऊबा रेला. हळुहळु एकपाय हुसलत बिजा ठेवत गेला.
मायी पासवी भावंड न ते शारवे मित्र एका सुरात माला संगीत देतोये
रगडा!
रगड!!
रगडा!!!
रगड!!!!
————— समाप्त —————
लेखक:—
सुहास काशिनाथ राऊत/वरोरकर
डहाणु रोड (पुर्व),
मो.९९२३००४८९५.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.