Suchita

Suchita Patil

सौ. सुचिता प्रवीण पाटील, पूर्वाश्रमीच्या सुचिता अनंत राऊत. सालवड येथील श्री अनंत देवजी राऊत यांच्या सुकन्या. लेखनाचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. लोखंडवाला ज्युनियर कॉलेजमध्ये, मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ सुचिता प्रवीण पाटील यांनी, MA, B Ed, M Phil या पदव्या संपादित केल्या आहेत. याचबरोबर वास्तूविशारद आणि पत्रकारितेतील पदविका अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या त्या P hd च्या अभ्यासक्रमात व्यस्त आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांनी लेखन, गायन, सूत्रसंचालन हे त्यांचे आवडीचे छंदही जोपासले आहेत. आतापर्यंत विविध मासिकांतून, त्यांच्या तीनशेच्या वर कविता, १६ कथा आणि अनेक ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत २५० पेक्षा जास्त कार्यक्रमात सूत्रसंचालन केले आहे. Disaster management, अर्थात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर त्यांनी आतापर्यंत १०० व्याख्याने दिली आहेत. आपत्ती व्यवस्थापन या विषयावर फक्त व्याख्यानेच न देता, गुजरात येथे झालेल्या भुकंपाच्या यावेळेस disaster management team सोबत प्रत्यक्ष कामही केले आहे. अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाकडून, लहान मुलांच्या बदलत चाललेल्या खेळांविषयीच्या आवडीनिवडी वर लिहिलेला हा लेख, खास आपणासाठी.

खेळ-कालचे नी आजचे

2571

      खेळ, शब्द  उच्चारताच मनमोर नाचू लागतो. आणि  थेट आपण भूतकाळाचे दार किलकिले करतो. दूर-दूर कुठे तरी डोकावल्यावर आपल्याला  आठवतात ते सारे बालपणीचे खेळ, जे केवळ आठवणीच्या कप्प्यापुरतीच उरले आहेत. खो-खो, भातुकली, गलोल, सुरपारंब्या, कबड्डी, लपाछपी, लगोरी, भोवरे, गोटया, सागरगोटया, विटीदांडू आणि  क्वचित क्रिकेट  या साऱ्या खेळांनी अंगण, गल्ल्या नुसत्या  गजबजून गेलेल्या  असायच्या. यासाठी फक्त  दिवाळी व वासंतिक सुट्टयांचीच गरज नसे.

      महाराष्ट्रात विविध  भागात  पारंपरिक  खेळ  खेळले जायचे व या खेळाच्या माध्यमातूनच त्या त्या  भागातील संस्कृती चे दर्शनही व्हायचे. खेळ  खेळताना वापरले गेलेले शब्द ही प्रमाणभाषेची शब्द संपदा वाढवणारी असे. हे खेळ त्या  काळात मुलांचे रंजन तर करायचेच पण निकोप स्पर्धा ,चढाओढी व जिंकण्याची उर्मी निर्माण  करणारे असायचे ही काही शतकापूर्वीची गोष्ट नाही. काहीच दशकांपूर्वी हे सारे खेळ  खेळले जायचे. या प्रत्येक  खेळाच्या माध्यमातून  खेळणाऱ्या प्रत्येक  बालकाच्या  मना-मनाचा धागा जणू एकमेकांत गुंफलेला असायचा.

      प्रत्येक  खेळ  मुलांवर नकळत  एक  संस्कार  करून  जायचा. भातुकलीचा खेळ  मुले-मुली एकत्रितपणे खेळत असत. हा खेळ भविष्यातील जबाबदारी ची जाणीव  करून देणारा व भागिदारी शिकवणारा असे. बाकी सर्वच खेळातून मुले हार- जित खेळाडूवृत्तीने स्विकारात. आपली  मते ते एकमेकांसमोर उघडपणे मांडत म्हणून  त्यावेळची मुले ही आपले मनही जणू स्वच्छ  करीत  असत. सुरपारंब्या सारखा खेळ वडाच्या  झाडावर खेळला जायचा व मुले पर्यावरणाचे  महत्त्व  आपसुकच जाणत. गोटया-सागरगोटया, लगोऱ्या, लपाछपी, भोवरे, विटीदांडू या खेळांचे गटच्या गट असत. जागाही भरपूर व सर्वांना  सामावून  घेण्याची  विश्वात्मक वृत्ती . प्रत्येक  घरात भरपूर  भावंडे, एकत्रित कुटूंबपध्दती व त्यामुळे  सख्खी-चुलत मिळून  एक  संघच तयार होई. मुले-मुली काही खेळ एकत्र  खेळत त्यामुळे  साहजिकच  स्त्री  पुरूष  समानतेचे व बहीणी-मैत्रीणींची काळजी घेण्याचे वेगळे धडेही दयावे लागत नसत. आपल्या  सोबत असणाऱ्या  साऱ्या मैत्रीणींची अनाहूतपणे.... नकळत... सहजगत्या  काळजी  घेतली  जाई, व त्यावेळचा प्रेमाचा  खरा अर्थ  व सुर स्नेहरूपाने त्यांच्या  मनात संस्कार रूपाने  रूजलेला असे. सकाळची शाळा  असो वा दुपार ची, शाळेतून आल्यावर  दप्तर कोपऱ्यात  विसावताच लागलीच खेळाला रंग चढत असे. भरपूर  खेळल्यावर शरीराचा व्यायाम  होत असे, व कडकडून भूकही लागत असे. जेवल्यावर शाळेचा अभ्यास  आणि  अभ्यास  करता-करताच मुले निद्रादेवीच्या अधीन कधी होत त्यांनाच  कळत नसे. नंतरच्या  काळात या जीवनात  दूरदर्शनचा प्रवेश  झाला आणि  खेळानंतर मालिकेच्या अर्ध्या  तासाची वर्णी लागली .पण त्या वेळी आजच्या  सारख्या  भरपूर  वाहिन्या नसल्याने  व "डेली सोप" प्रकार  प्रचलित  नसल्याने  श्वेतांबरा, गोटया, लाईफ मेंबर, अडोस-पडोस, चाळ नावाची वाचाळ वस्ती अशा आठवडयाने भेटीस येणाऱ्या  मालिका बघून घरा-घरात त्यावर सकस चर्चा होई. पण मालिका, त्यातील अभिनय, लेखकाच्या लेखणीचा विचार  केला  जात असे, व म्हणून  आजही स्मरणपटलावर त्या  तशाच टिकून  आहेत. खेळताना मोठ्या  माणसाचे नुकसान  झाले, धक्का  लागला तर लहानांकडून मनापासून  क्षमा मागितली  जाई. व त्यावेळचा मोठयांचा ओरडा, त्यांच्या  झोपेचा खेळाने केलेला विचका हे सारे हसत खेळत पचवले जाई. एकप्रकारचा धाकही होता. मोठ्या  माणसांच्या  रागावण्याने मुलांना कधीच राग येत नसे. मनसोक्त खेळ, मनमुराद हुंदडणं, होणारा  व्यायाम  यामुळे  शरीरासोबत मनालाही उभारी येई. संघवृत्ती, खेळाडू पणा, जय-विजय पचवण्याची क्षमता, मोठयांचा आदर, स्त्री-पुरूष समानता स्त्री दाक्षिण्य, सहज  विजय  मिळवण्याची वृत्ती, सहकार्य भाव व खेळाची मजा चाखण्याची आस्वादकता, अशा अनेकविध  गोष्टी  आपोआप  मिळत  व यातूनच  एका  पिढीची मानसिकता व संस्कारक्षमता ही तत्कालीन  खेळाने दिली  व सकस, बलवान वा सुसंस्कृत  पिढी आकाराला आली वा अभ्यासालाही त्यातून  कधी फाटा दिला  गेला  नाही.

     काळ बदलला... विज्ञान-तंत्रज्ञानाने झपाट्याने  प्रगती  केली. स्पर्धा  जीवघेणी झाली. गुणात्मक  विकासापेक्षा  गुणांवर बुध्दीमत्ता तोलली जाऊ लागली  आणि  सहा वर्षांनी शाळेत जाणारे मूल अडीच-तीन वर्षात शाळेत तर जाऊ लागलेच आणि फक्त  टयूशन्सच नाही तर अनेकविध  क्लासेसनी मुल खेळासाठी वेळच शिल्लक  ठेवू शकलं नाही. आणि  त्यांचे  खेळाचे दिवसच जणू हरपले... हरवले. अभ्यास, अभ्यास  आणि  अभ्यास हेच त्याचे जीवन  बनले आणि  मुलांच्या  हातात आले electronic  gazette, संगणक  व भ्रमणध्वनीवरचे अनेकविध  बैठे खेळ  मुले  घरातच खेळू लागली . घरांच्या भिंती  जास्त  मजबूत  बनल्या व मुलांचे  घराबाहेर  पडणे थांबले. बदलत्या  काळानुसार एक  भिंती सोबत भितीचेही सावट दाटले. शाळा, अभ्यास, बदलत्या  काळातील  इतर हौशी classes यामुळे  व घराघरात पडलेल्या  भिंतीमुळे मुलांची  संख्या ही घटली. वा अंगणही लहान झाले. जग जवळ  आल्याने फायद्याबरोबर तोटेही आले. वा दोन्ही  पालकांना  कामासाठी बाहेर पडणे क्रमप्राप्त  झाल्याने सांभाळण्याच्या सबबीवरून काळाची गरज म्हणून  भावंडांची संख्या  घटली वा मुले पाळणाघरात व नंतर  मोठी  झाल्यावर वेळ अभ्यास ,शाळा व क्लासेस सोबत वाटण्यात "खेळ "हा शब्दच त्यांच्या  शब्दकोशातून जणू हद्दपार झाला. आणि  मग मोकळा  वेळ मुले  संगणक  व मोबाईल मध्ये  घालवू लागली. व फास्टफूड व व्यायामाचा अभाव यामुळे  जिमची गरज  भासू लागली . काही  मुले क्रिकेट , व्हाॕलीबाॕल, जिमनॕस्टीक खेळू लागली. त्यात अचूकता असली तरी मातीचा वास, नैसर्गिक  थरार वा नैसर्गिक  क्षमता  नाही व म्हणूनच पिढीने तो आदर समूळच गमावला.पराभव  स्विकारण्याची क्षमताच हरवली. अल्प वयातच नैराश्य, औदासीन्य यांनी  या पिढीस घेरलं, नकारात्मकतेकडे वळत जीवनांताकडे मुले वळू लागल. मिळून  मिसळून  वागण्याची वृत्ती, एकमेकांना  सांभाळून -सामावून घेण्याचा स्वभाव, जिज्ञासू-खिलाडू वृत्ती  या साऱ्यांनाच या पिढीने अलविदा म्हटलं  व आपल्या  महाराष्ट्रीय  संस्कृतीचा लोप होतोय की काय अशी एक  भिती वाटू लागली. ईमारतीच्या प्रांगणात किंवा  घरासमोरील अंगणात  खेळले जाणारे खेळ  हरवले व शहरी व ग्रामीण भागात जरी थोड्या  प्रमाणात उरलाच तर तो क्रिकेट पण त्यात ती पूर्वीची गंमतच नाही. कमी वेळ देणाऱ्या  पालकांनी महागडया अनेकविध  खेळांचे कृत्रीम संच, मोबाईल, संगणक  यांची  जणू मुलांवर पखरणच केली व यातूनच त्यांचे  "बाल्य" निमाले. एक वेगळाच अकाली प्रौढपणा या मुलांच्या वागण्या-बोलण्यात जाणवू लागला, व संस्कृतीचा लोप होतोय, पिढी बिघडतेय असा एक दबका ओरडा ऐकू  येऊ लागला  काळाची गरज वा वास्तवता याचा विचार करता  कोणालाच दोष देता येणार  नाही.

    तरीही  शाळा-शाळातून हे खेळ  पुन्हा  एकदा  खेळवले गेले  तर पूर्वी च्या  साऱ्या खेळांना पुनरूज्जीवन लाभेल व नवपिढीलाही नवसंजीवनी! पालाकांनीही आपल्या  मुलांना  केवळ अभ्यास व गुणांसाठी कोंडून न ठेवता खेळण्यासाठी  थोडा वेळ व मोकळीक  दयायला हवी. तरच ही पिढीही तेच संस्कार  तेच गुण सहजपणे स्विकारेल व बंदिस्त पणाची कात टाकून नवी उभारी नवी उमेद घेऊन जग जिंकण्याची तयारी नक्कीच  ठेवेल....

हाच ठेवूया आशावाद...

नव्याने!!!


 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

3 + 8=    get new code
Post Comment