प्रस्तावना
पूर्वी बालविवाह पध्दत होती. मुलगा आणि मुलगी यांचे वय साधारणत: ९ व्या १० व्या वर्षांचे असताना, म्हणजे या खेळण्याच्या वयातच त्यांचा विवाह होत असे. मुलगी आपलं माहेर सोडून सासरी आली कि तिला आपला भातुकलीचा खेळ आणि इतर खेळ खेळायला मिळत नसत. ती घरकामातच रमली जाई. सर्व स्त्रिया घरातच असत. स्त्रियांनी घरात राहून घरकाम करावे, स्वयंपाक करावा, मुलांचे संगोपन करावे हा त्यावेळच्या कुटुंब व्यवस्थेचा नियम होता. पुरूष मात्र कामासाठी घराबाहेर पडत असत. सहाजिकचं त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध येत असे. स्त्रियांना मात्र घराबाहेर पडता येत नसे. अश्यावेळी त्यांना थोडसा विरंगुळा मिळावी, व त्यांना माहेरची आठवण येऊ नये म्हणून सणवार निर्माण झाले. त्यात सणाप्रमाणे खेळ तयार झाले. त्यांतील मंगळागौरीच्या सणातील एक खेळ म्हणजे "फुगडी" हा प्रकार होय. देशावर फुगडी सोबत भोंडला खेळला जातो. फुगडी हा प्रकार खेळात मोडत असला तरी त्यातून स्त्रियांना सर्वांगसुंदर व्यायाम मिळत असे.
काळानुरूप स्त्रिया शिकल्या, घराबाहेर पडू लागल्या, अर्थांजन करू लागल्या. आज घरकाम, कुटुंब आणि नोकरी सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. स्वत:च्या तब्येंतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने जीम सारख्या ठिकाणी व्यायामासाठी जावे लागत आहे. म्हणून संस्कृती आणि सण सांभाळणारा फुगड्याचा खेळ आजच्या संगणक युगातील मुलींनी खेळावा म्हणून हा फुगड्याच्या गाण्यांचा संग्रह संग्रहित करण्याचा प्रयत्न केला आहे.
एका हाताची फुगडी
कृती - दोघीनीं एकमेकीचा डावा हात पकडून दुसरा हात कमरेवर ठेवून गोल फिरून फुगडी घालणे.
एका हाताची फुगडी,
मामा देतो लुगडी.
मामा माझा गोरा गोरा,
मामी माझी काळी सावळी,
जणू आहे शेवंतीची जाळी.
जाळीला ग खिडक्या खिडक्या,
आम्ही लेकी लाडक्या लाडक्या.
मामी गेली दळायला दळायला,
मुली आल्या खेळायला.
नखांची फुगडी
कृती - समोरासमोर उभे राहून हाताच्या पंजात बोटे अडकवून समोरुन हात पुढे-मागे करणे.
नखोल्या बाई नखोल्या,
चंदनाच्या टिकल्या.
एक टिकली उडाली,
गंगेत जाऊन बुडाली.
गंगेला आला लोंढा,
भिजला माझा गोंडा.
गोंड्यात होता विंचू,
तो चावला मामीला.
मामीला आली ओकारी,
देरे मामा सुपारी.
सुपारी गेली गडगडत,
मामी बसली बडबडत.
दंड फुगडी
१) कृती - दोघींनी एकमेकीचे दंड पकडून फुगडी खेळणे.
दण दण दणके, खाली पाय सरके.
वर राघू बोलतो, खाली पाय सरतो.
दसऱ्याला बोली केली, दिवाळीला येतो.
दिवाळीच्या दिवशी आला आला,
गोड-गोड गाणे बोलून गेला, बोलून गेला.
२) कृती – वरील दंड फुगडी प्रमाणे.
सडू बाई सडू तांदूळ सडू,
एवढे तांदूळ कशाला?
भाऊ यायचाय जेवायला,
भाजी करायची अळवाची,
कुणाला नाही कळवायची.
भाऊ माझा मानाचा,
विडा देतो पानाचा.
बस फुगडी
कृती - सर्व मुली उकिडव्या बसतात आणि गाणं म्हणत डावा पाय डाव्या बाजूला व उजवा पाय उजव्या बाजूला व हात त्याच प्रमाणे हलवत फुगडी खेळतात.
बस फुगडी पाय लंगडी,
पायाची माती दळली.
दळता दळता काटा रूतला,
भावोजी भावोजी काटा काढा.
भावोजी गेले फिरायला,
मुली आल्या खेळायला.
जात्याची फुगडी
कृती - चार मुली उभ्या, चार मुली बसलेल्या. बसलेल्या मुलींनी पायाला पाय लावणे आणि उभ्या असलेल्या मुलींनी हात पकडून त्यांना गोल फिरविणे.
पातं बाई पातं, गवताचं पातं.
मी देते ओढ, तू घाल जातं.
कोंबडा
कृती - डावा पाय उजव्या पायावर ठेवून एका ओळीत खाली बसणे व गाणे म्हणणे. गाणे संपताच त्याच स्थितीत फुगडी घालत पुढे जाणे.
आक्का बाईचा कोंबडा, शेजीबाईचा कोंबडा.
आला माझ्या दारी, पाजीन त्याला पाणी.
घालीन त्याला चारा, पाजीन त्याला पाणी.
कोंबडा गेला उडून, शेजीबाई बसली रुसून.
कुऽकुऽकुच बाई कुऽकुऽकुच.
पिंगा
कृती - मुलींनी कमरेवर हात ठेवून कमरेत वाकून मान गोल फिरविणे व समोरासमोर उभे राहून गाण्यांतून एकमेकांना चिडविणे.
पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
लेक माझा गं जावई तुझा गं डॉक्टर आहे गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा
लेक माझी गं सून तुझी गं इंजिनिअर आहे गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा
लेक माझा गं जावई तुझा गं देखणा आहे गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा
लेक माझी गं सून तुझी गं अप्सरा आहे गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा
लेक तुझी गं सून माझी गं भारी भांडखोर गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा
लेक तुझा गं जावई माझा गं भारी चक्रम गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा
तुझ्या भावाचं नाक नकटं ग तोंड चपटं गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंग
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा
तुझ्या बहिणींचं जसं नरडं गं कावळा वरडं गं पोरी पिंगा
पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा
(असेच एकमेकींना चिडवत, चिडवत गाणे वाढविणे)
झिम्मा
कृती - चार किंवा सहापेक्षा जास्त मुलींनी गोल उभे राहून एकमेकींचे हात हातात पकडून नंतर हाताने टाळी वाजविणे. त्यानंतर डाव्या बाजूला वळून बाजूच्या मुलीला टाळी देणे.
१) आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळीतो
झिम्म पोरी झिम्म कपाळाचा भिंग
भिंग गेले फूटून पोरी आल्या उठून
नदीच्या कडेला पाया पडेला
पायाचा दोर ग चवथी बोल गं
चवथी काही बोलत नाही
दुसरा पाटा सोन्याचा
भाऊ माझा वाण्याचा
हळद लावून पिवळा केला
बाशिंग बांधून नवरा केला
मारुतीच्या देवळात नेला
मारूतीची बायको कुंजती
जाईच्या कळ्या मागती
जाईच्या कळ्या दहा गं
आमची फुगडी पहा गं
२) सरसर गोविंदा येतो
मजवरी गुलाल फेकितो
या, या गुलालाने झाला लाल
आमच्या वेण्या झाल्या लाल
एक वेणी मोकळी सोनाराची साखळी
घडव घडव रे सोनारा
माणिक मोत्यांचा डोल्लारा
डोल्लाराला खिडक्या आम्ही लेकी लाडक्या
लाड सांगू बापाला पैसे मागू काकाला
गौर बसली न्हायला शंकर आले पहायला
शंकर आमुचे मेहुणे दिड दिवसाचे पाहुणे
लाट्या बाई लाट्या
कृती - दोघींनी हातात लाटणं.घेऊन झिम्मासारखे खेळणे
लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या
मामाने दिल्या मला सारंगी पेटया
साजणी शू साजणी शू
बेलाच्या झाडाखाली महादेवा तू
कृष्ण गुजरी राधा गुजरी
गळयातला हार माझा सात पदरी
काय करू बाई काय करू बाई
गळ्यातला हार माझा दिसत नाही
काय करू बाई काय करू बाई
गळयातला हार् कुणी चोरला की काय?
लाट्या बाई चंदनी लाट्या
खीसबाई कीस
कृती - दोघींनी एकमेकींकडे हात करून नाचणे.
खिसबाई किस दोडका किस
दोडक्याची फोड लागते गोड
आणिक तोड बाई आणिक तोड
माझ्याने दोडका खिसवेना
मामाला बायको करवेना
केली होती ती लुळीपांगळी
तिचं न माझं पटेना
हरभऱ्याच्या गोणीवर पाय कसा देऊ
मामाला मुलगा झाला नांव काय ठेऊ
साखर वाटून गोपाळ ठेऊ.
साळुंकी साळुंकी
कृती - समोरासमोर उभे राहून गोल फिरणे.
साळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी
पगडा फू बाई पगडा फू
गेले होते घाटा विसरले पाटा
पगडा फू बाई पगडा फू
गेले होते शेता विसरले कोयता
पगडा फू बाई पगडा फू
गेले होते माडी विसरले साडी
पगडा फू बाई पगडा फू
गोफ विणू का गोफीण विणू
कृती - ह्यामध्ये चौघीजणी समोरासमोर उभे राहून एकीने दुसरीला प्रदक्षिणा घालून आपल्या जागेवर येणे.
गोफ विणू का गोफीण विणू
आजच्या रात्री गोफ विणू
गरे घ्या गरे पोटाला बरे
न खाईल त्याची म्हातारी मरे
मेली तर मेली कटकट गेली
केळीच्या पानात गुंडाळून ठेवली
केळीचं पान फाटलं म्हातारीचं डोक फुटलं.
हटुश्य पान बाई पटुश्य
कृती - गोलावर उभे राहून एकीने दुसरीच्या जागेवर उडी मारून परत आपल्या जागेवर येणे, उडीच्यावेळी टाळी वाजविणे व जागेवर येताना कमरेवर हात ठेवणे.
हृटुश्य पान बाई पटुश्य
गोट तोडे घालू आम्ही नटुश्य
हृटुश्य पान बाई पटुश्य
सरी वाकी घालू आम्ही नटुश्य
(असेच पुढे दागिन्याच्या जोड्या म्हणून नाचणे)
सासू सुनेच्या खेळ - खुर्ची का मिरची
कृती - समोरा समोर उभे राहून सासू सुनेने त्यांच्या मधून पळून एकमेकींना पकडणे.
खुर्ची का मिरची जाशील कैशी?
आई बोलावते, बरं करीते
खुर्ची का मिरची जाशील कैशी?
(घरातल्या प्रत्येकांची नावं घेऊन गाणे वाढविणे.)
घागर घुमू दे
घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
रूणू झुणूत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंबोलण करा
गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
फुऽफुऽफुऽफु
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
फुऽफुऽफुऽफु
घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे
फुऽफुऽफुऽफु॥धृ॥
माझ्या माहेरा सावली उभी दारात माऊली
तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा
रूणूझुणूत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंबोलण करा
गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे
फुऽफुऽफुऽफु॥१॥
मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा
रुणूझुणूत्या पाखरा जारे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंबोलण करा
गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझी नाचू दे
घागर घुमे दे घुमू दे रामा पावा वाजू दे
फुऽफुऽफुऽफु ॥२॥
मला पुसते माऊली आली क़ोणत्या पावली
माझ्या गौराईचं पाय माझ्या सोन्याचा उंबरा
रूणू झुणूत्या पाखरा जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंबोलण करा
गवर गौरी ग गौरी ग झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात गवर माझीर नाचू दे
घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे
फुऽफुऽफुऽफु॥३॥
फुगड्यांची उखाणे
१) सोन्याचा सारा मोत्यांनी भरा
फुगड्या खेळायला प्रारंभ करा
२) मामाने दिली सोन्याची बुगडी
तुझी न माझी पहिलीच फुगडी
३) आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या
हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या
४) अंबाडीची भाजी आंबली कशी आंबली कशी
माझी मैत्रीण दमली कशी दमली कशी
५) खार बाई खार लोणच्याचा खार
माझ्याशी फुगडी खेळणे नाजुक नार.
६) अरंडयावर करंडा करंडयावर मोर
माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर
७) माडीवर माडी तीन मजली माडी
माझ्याशी फुगडी खेळते माझ्याहून जाडी
८) चांदीच्या ताटात ठेवला सोन्याचा गोफ
माझ्याशी फुगडी खेळते कोल्हापूरी तोफ
९) खुर्चीत खुर्ची वेताची खुर्ची
माझ्याशी फुगडी खेळते लवंगी मिरची
१०) फू बाई फू फुगडी फू
अगं अगं सूनबाई माझी लुगडी धू
११) साता समुद्राच्या पलिकडे रामाने घातली अळी
माझी धाकटी बहीण आहे गुलाबाची कळी
१२) समुद्राची वाळू चाळणीने चाळू, चाळणीने चाळू
आम्ही दोघी मैत्रिणी फुगडी खेळु, फुगडी खेळू
१३) आटयावरून गेले पाटयावरून गेले
काचेचे कप फुटून गेले
काचेच्या कपात अत्तराचा बोळा
_ _ _ चा नवरा शंभर रुपये तोळा
१४) माझ्या चुलीवर पापड, पापड
_ _ _ चा नवरा माकड माकड
१५) माझ्या पलंगावर ठेवली उशी, ठेवली उशी
_ _ _ च्या नवऱ्याची जळली मिशी, जळली मिशी
--------------------------------------------------------------------
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.