आमची कौटुंबिक सहल - शिर्डी, औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, लोणार आणि इगतपुरी
भाग – १
नोव्हेंबर २०१८ मध्ये आमच्या पाटील आणि राऊत कुटुंबाची कौटुंबिक सहल शिर्डी, औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, लोणार आणि इगतपुरी येथे जाऊन आली. स्वतःच्या वाहनातून प्रवास केल्याने आमचा प्रवास मजेत झाला. सहलीत ज्युनिअर आणि सिनियर अशी दोन्ही मंडळी होती. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता आम्ही विरार आणि भांडुप वरून सहलीस सुरुवात करुन आसनगांव येथे दोन्ही कुटुंब एकत्र जमलो. तेथेच एका हॉटेल मध्ये नास्ता करून पुढच्या प्रवासास निघालो. पाच-सहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही शिर्डीला पोहोचलो. शिर्डीत पोहोचतास शिर्डीच्या रस्त्यांवर साईबाबांची पालखी घेऊन निघालेल्या साईभक्तांच्या मुखातून साईबाबांच्या भक्तीचा गजर ऐकू येऊ लागला. सारा रस्ता साईबाबांच्या भक्तांनीच भरुन गेला होता. महाराष्ट्रा प्रमाणेच गुजरात राज्यातूनही बरेच साईभक्त पालखी घेऊन दर्शनास आले होते. सारे वातावरणच साईमय होऊन गेले होते.
शिर्डीला आमचा एका दिवसाचा मुक्काम ठरलेला असल्याने आम्ही प्रथम ज्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती त्या "साई पालखी निवारा" या हॉटेल मध्ये आलो. गाडीतील आमचे सर्व सामान हॉटेलमध्ये ठेवून ताजेतवाने झालो. नंतर हॉटेल मध्येच दुपारचे जेवण घेऊन थोड्या वेळाने साईबाबांच्या दर्शनासाठी साईमंदिराकडे निघालो. अपेक्षेप्रमाणे मंदिरात खूपच गर्दी होती; परंतु वयोवृद्ध जनांसाठी मोफत पासची सोय असल्यामुळे दर्शनासाठी त्यांची वेगळी रांग होती म्हणून अगदी साईबाबांच्या समाधीजवळून समाधीचे निवांतपणे दर्शन घेण्यास मिळाले. मंदिरात खूपच प्रसन्न वाटले. या वर्षी साईबाबांच्या समाधीला १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत म्हणूनही गर्दी जास्त असावी. तरीही निवांत दर्शन घेऊन आजूबाजूच्या परिसरात असलेला साईबाबांचा म्युझीयम, द्वारकामाई मंदिर इत्यादी स्थळेही निवांतपणे बघता आली. नंतर हॉटेलमध्ये परत आल्यावर हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर बघितला. साई पालखी निवारा ह्या हॉटेलच्या सुंदर परिसरात म्युझीयम व प्राणिसंग्राहालय बघण्यास मिळाले. इथे मोफत धर्मशाळेची सोय केलेली आहे. त्या दिवशी साधारणतः दोन हजाराच्या आसपास भाविक या हॉटेलच्या धर्मशाळेत वस्तीला होते. त्यांचा साईबांबांच्या नामाचा गजर रात्रभर सुरू होता. "सबका मालिक एक" असलेल्या साईबाबांच्या दर्शनानंतर दुस-या दिवशी सकाळी औरंगाबाद येथे जाण्यास निघालो.
भाग – २
औरंगाबादच्या प्रवासा दरम्यान एका हॉटेलमध्ये जेवण आटोपून जगप्रसिद्ध असलेली कोरीवलेणी बघण्यासाठी वेरुळ येथे निघालो. वेरुळ लेणी ही औरंगाबाद पासून साधारण ३१ किलोमीटर अंतरावर आहेत. वेरुळला पोहोचल्यावर एक गाईड सोबत घेऊन वेरुळची कोरीव लेणी बघितली. वेरुळ येथे जैनलेणी, बौध्दलेणी आणि हिंदूलेणी अश्या तिनही धर्मातील लेणी कोरलेली आहेत. आम्ही प्रथम गाईडच्या मदतीने कैलासलेणे म्हणजे कैलास मंदिर बघितले. या मंदिराचा विशेष म्हणजे हे मंदिर डोंगर पोखरुन आधी कळस तयार करून त्यांत कोरीव काम करून कोरीव लेणी तयार केली आहेत. कळसाकडून खाली कोरीवलेण्याचे काम करीत करीत मंदिराच्या पायथ्यापर्यंतचे काम शेवटी केलेले आहे. म्हणजे उलट्या क्रमाने "आधी कळस मग पाया" प्रमाणे डोंगर आखीव प्रमाणात पोखरुन अतिशय सुंदर आणि प्रमाणबध्द कोरीव काम करून लेणी तयार केलेली आहेत. ज्याचा दर्जा आजही जागतिक दर्जाचा आहे. भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम देखावा म्हणून या स्थळाचा जगात वरचा क्रमांक आहे. यात महाभारतकालीनही चित्रे आहेत. पूर्ण मंदिरात हत्तीची लेणी आहेत. काही हत्ती अर्ध्या स्थितीत आहेत. मंदिराचे खांब एका प्रमाणबध्द साच्यात आहेत. मंदिरात लहान लहान नक्षी असलेलीही कोरीवलेणी आहेत. मंदिराला एकूण दोन टप्पे आहेत. वरच्या टप्पात शंकराची पिंडं असून भाविक येथे पूजेस येतात. काही भागात गौतमबुध्दाची लेणी आहेत. बुध्दांच्या ध्यानस्थ मूर्ती समोर प्रार्थना केली असता त्यांचा प्रतिध्वनी पूर्ण गर्भगृहात उमटला जातो.
त्याचदिवशी संध्याकाळी दौलताबादचा किल्ला पाहिला. हा किल्ला पूर्वी देवगिरी या नावाने ओळखला जात असे. तो यादवांची राजधानी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. याची रचना भारतीय नृपाळानी केलेली आहे. देवगिरीवर यादव कुळ नांदत असताना त्यांनी मुख्य दुर्गाभोवती प्रचंड आणि मजबूत असा भूईकोट बांधला व त्याचे नांव देवगिरीनगर असे ठेवले होते. या कुळात भिल्लम, सिंधण, कृष्णमहादेवराय या सारखे प्रबळ आणि नितिमंत राजे नांदून गेले. पुढे अल्लाउद्दीनने आक्रमण करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. हा किल्ला उंच असून त्याच्या पाय-या थोड्या थोड्या अंतरावरुन वरवर जाणा-या आहेत. मध्येच भुयारही आहे. शेवटच्या उंचावरील पाय-या खूपच लहान आणि कमी अंतरावर आहेत. किल्ल्याच्या चोहोबाजुंस एक खाई आहे ज्यास शत्रूंना ओलांडणे कठीण काम आहे. तसेच किल्ल्याच्या आत दोन विशेष बुरुज बनविलेले आहेत त्यावर तोफा ठेवलेल्या आहेत. या किल्ल्यांची दक्षिणेकडील एक वेगळी ओळ आहे तेथे एक मंदिर आहे त्यांस भारतमाता मंदिर म्हणतात. डावीकडे चांदमिनार महाल आहे. याच्या भिंती चीनीमातीच्या टाईल्स पासून बनवलेल्या आहेत. चीनीमहाल हा एक कारागृहच होता. त्याठिकाणी तानाशाह व त्यानंतर संभाजीस कैदेत ठेवले होते. या किल्ल्यावर पुष्कळ महाल आहेत. कांही पाय-या वर चढून गेल्यावर आपण एका गोलाकार ओट्यावर जाऊन पोहचतो. तिथे एक मोठी तोफ ठेवलेली आहे.
असा हा किल्ला बघून झाल्यावर चहा नास्ता घेऊन ताजेतवाने झालो व मुक्कामासाठी औरंगाबाद येथील 7 Apples या नांवाच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आलो. येथे आम्ही तीन रात्री मुक्कामास होतो. त्या दरम्यान आम्ही औरंगाबाद येथील बिबीका मकबरा ही पाहिला. हा बिबीका मकबरा म्हणजे आग्रा येथील ताजमहालाची प्रतिकृती आहे. या महालात औरंगजेबाची बायको मलिका हीची कबर आहे. मलिकाचा मुलगा शहजादा आजम यांने आईच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. मकबरातील भिंतीला एक भव्य दरवाजा आहे त्यांवर पितळी पत्र्यांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. कबरेच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसविलेल्या आहेत. या कबरेवर दिवसा सूर्यकिरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. या ठिकाणी शहनशहा औरंगजेब व त्यांची बेगम याच्या वापरात येणा-या काही वस्तू ठेवलेल्या आहेत.
भाग – ३
तिस-या दिवशी हॉटेल मधून ताजेतवाने होऊन खा-या पाण्याचे निसर्गनिर्मित सरोवर बघण्यासाठी लोणार येथे गेलो. लोणार हे बुलढाणा जिल्ह्यात असून त्यांचे औरंगाबाद पासून अंतर १७० किलोमीटर आहे. साधारण ४-५ तासांचा प्रवास आहे. 'लोणार हे पृथ्वीवरील अग्निजन्य खडकातील खा-या पाण्याचे एकमेव विवर आहे' जून २००० पासून ते अभयारण्यही घोषित झालेले आहे. लोणार सरोवर हे अंदाजे १०,००० वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले आहे. हे सरोवर जवळ जवळ ५५० फूट खोल असून ते खाऱ्या पाण्याने बनलेले आहे. या पाण्यामध्ये कोणतेही जीवजंतू किंवा वनस्पती जगू शकत नाही; परंतु थंडीच्या मोसमात साधारणतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यात परदेशी पक्षी मात्र या सरोवरात मिळणा-या विशिष्ट प्रकारच्या शेवाळाचं सेवन करण्यासाठी येथे येतात.
सन १९७२ च्या भयाण दुष्काळात हे सरोवर संपूर्ण कोरडे झाले होते. त्यावेळेस त्या पाण्याच्या उत्सर्जनामुळे तेथे तयार झालेल्या घट्ट थराचा तेथील लोकांनी पापडखार म्हणून वापर केला असे म्हणतात. त्या नंतर सुध्दा त्यात जमा झालेले पावसाचे पाणी आजही खारटच आहे कारण उल्कासोबत जमिनीवर आलेल्या गंधक आणि सल्फर यामुळे खारटपणा पाण्यात आजही टिकून राहिला आहे. म्हणून विशिष्ट प्रकारचे शेवाळ सोडून कोणतेही जीवजंतू पाण्यात जगू शकत नाहीत. आम्ही भेट दिली त्यावेळेस सरोवरात ५० फूट खोल पाणी होते. या सरोवराच्या बाजूला काही फूटावर असलेली विहीर मात्र गोड पाण्याची आहे. असा हा निसर्गाचा चमत्कार बघावयास मिळाला. तसेच उल्कापात होण्यापुर्वी या सरोवराच्या जागेवर लोक शेती करीत होते अशी गाईड कडून माहिती मिळाली. हे सरोवर खोलगट भागात आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी जमिनीवर पाय-या बांधलेल्या आहेत. सुरुवातीला छोट्या पाय-या असून पुढे पुढे अरुंद खडकाळ व झुडपाचा रस्ता आहे. त्यात सापासारखे सरपटणारे प्राणी असून इतर हिंस्त्र श्वापदं असल्यामुळे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सरोवराच्या भागांत जाण्यास बंदी आहे. पर्यावरणप्रेमी आणि परदेशी पर्यटक आजही या भागाला भेट देतात.
सरोवर बघितल्यानंतर दुपारचं जेवण लोणार येथेच घेऊन 'सिंदखेडराजा' येथे राजमाता 'जिजाऊ' यांचे जन्मस्थळ बघण्यासाठी निघालो. जिजाऊ या सिंदखेडचे राजा लखुजी जाधव व माळसाबाई यांच्या कन्या. त्यांचा जन्म याच राजवाड्यात १५ जानेवारी १५९८ मध्ये झाला. या किल्ल्याचा परिसर स्वच्छ व शांत आहे. तसेच बरेचसे बांधकाम चांगल्या स्थितीत आहे. जिजाऊचा विवाह इ.स. १६१० मध्ये वेरुळचे पाटील मालोजीराजे भोसले यांचे पूत्र शहाजीराजे यांच्याशी झाला. जिजाऊ व शहाजी यांना एकूण सहा अपत्ये होती. पैकी संभाजी व शिवाजी हे दोघेच जगू शकले. बालशिवबास सर्व प्रकारची शस्त्र विद्या, राजनिती ही जिजाऊनी स्वत: शिकविली. अशी ही थोर वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता आणि प्रशासक दिनांक १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाडच्या राजवाड्यात मरण पावली. म्हणूनच जिजामातेच्या कर्तव्याने, कर्तुत्वाने सिंदखेड राजाचे नांव जगामध्ये "मातृतिर्थ" म्हणून ओळखले जाते. अशा या थोर राजमातेस व शिवरायांच्या गुरुस माझे वंदन. सिंदखेड राजा बघून परत हॉटेलवर आलो आणि रात्रीचा मुक्काम करून पुढच्या प्रवासाची तयारी केली.
भाग – ४
चौथ्या दिवशी अजिंठा येथे जाण्यास निघालो. औरंगाबाद पासून अजिंठा हे १०२ किलोमीटर अंतरावर आहे. अजिंठा येथे एकूण २६ गुफा आहेत पैकी कांही रिकाम्या आहेत. पूर्वी अजिंठा येथे घनदाट जंगल होते. एक इंग्रज अधिकारी शिकारी साठी जंगलात आले असताना त्या अधिका-याला उंच डोंगरावरुन तेथे काहीतरी दिसले म्हणून शोध घेत अनेक गुंफांचा शोध लागला. अजिंठा येथे लेणी बघण्यास जाण्यासाठी डोंगराच्यावर पायथ्याशी असलेल्या गेटपर्यत बसने जावं लागते. या बस आरामदायी व चांगल्या स्थितीत आहेत.
अजिंठा येथील कोरीव लेण्यात भिंतीवर तसेच छतावर चित्रकामाचा जागतिक दर्जाचा नमुना आहे. छतावर केलेले काही चित्रकाम हे वा-यावर हलणा-या मंडपातील कापडाप्रमाणे हलणारे वाटते. तसेच त्या काळातील स्त्रियांनी अंगावर घातलेली वस्त्रे आजच्या जमान्याप्रमाणे आहेत. कांही चित्रे तर आपल्या दिशेने फिरणारी म्हणजे आजच्या युगातील 3D प्रमाणे आहेत. काही चित्रे लोकांनी खराब केलेली आहेत. कांही चित्रे बघताना तर भिंतीवर किंवा छतावर कपडा अंथरुण त्यांवर चित्रे काढली आहेत अशीच भासतात. वेरुळ प्रमाणे येथेही लेणी बघण्यासाठी पाय-या असल्याने थोडे चढउतार करून चालावे लागते. काही गुंफेमध्ये दरवाज्याच्या चौकटीवर उत्कृष्ट प्रतिची कलाकुसर असून सुरूवातीच्या काही गुंफांमध्ये प्रत्येक भागात चित्रशिल्प कोरलेली आहेत. तसेच प्रत्येक खांबावर निरनिराळ्या मुद्रेच्या मूर्ती रेखाटलेल्या आहेत. त्यांत फुले तसेच प्राण्यांची चित्र रचना आहेत. त्यात आजही आपणास हुबेहुब चित्रांतील प्राण्यांचा आभास होतो. तसेच जातक कथा आणि भगवान बुद्धांचा जीवनपट भिंतीवर आणि खांबावर दाखविलेला आहे. त्यावरील रेखाटलेली चित्रे ही जागतिक दर्जा लाभलेली आहेत. चित्रांतील रंगसंगती ही एका विशिष्ट्य पद्धतीची नसून जेथे आवश्यक आहे तेथेच व तेवढेच रंग वापरलेले आहेत. काही अर्पूण राहिलेल्या लेण्यातही चांगल्या कलेचे प्रदर्शन आहे.
चित्रामधील चित्रकलेचे दर्शन घडविताना मूर्तीचा विशिष्ट प्रकाराचा पोशाख, चेह-यावरील हावभाव, अलंकार हे पाहण्यासारखे दाखवले आहेत. लेणी क्रमांक एक, दोन, सोळा आणि सतरा या लेण्यातील चित्रकारी ही अगदी उच्च प्रतिची आहे. छतावर पेंटिंग कलेतील वेगवेगळ्या छटा अगदी बारकाईने दाखविलेल्या आहेत. त्यात फुले, फळे, झाडे, पक्षी, जनावरे, मानव व अर्धमानव इत्यादी चित्रे आहेत. लेणी क्रमांक २६ मध्ये भगवान बुध्दांच्या महानिर्वाणाचे भव्य शिल्प आहे. दोन शलवृक्षाच्या मध्ये लोडावर मस्तक टेकून भगवान बुद्ध उजव्या हाताच्या तळव्यावर उजवा गाल ठेवून शांत चिरनिद्रेत आहेत. खाली शिष्य दु:ख करीत आहेत; तर वरच्या भागाला भगवान बुद्ध स्वर्गात परत आले म्हणून आनंदीत होणारे देव आहेत.
भाग – ५
औरंगाबादच्या तीन दिवसांच्या मुक्कामा नंतर आम्ही नाशिक मार्गे इगतपुरीला निघालो. इगतपुरीच्या प्रवासा दरम्यान पैठणी साठी प्रसिद्ध असलेले येवला शहर बघायला मिळाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पैठणीच्या दुकानाकडे बघूनच मनाला तृप्ती मिळाली. आणि पैठणीची खरेदी केली. संध्याकाळी चार वाजता इगतपुरी येथे पोहोचलो. नाशिक जवळील इगतपुरी येथे VALLONNE VINEYARDS नावाच्या निसर्गरम्य वातावरणातील वाईन यार्ड मध्ये प्रवेश केला. तेथे थोडा वेळ आराम करून त्या कंपनीच्या कर्मचा-याने आम्हांस एकत्र बोलावून द्राक्षापासून वाईन कशी बनविली जाते या विषयी माहिती सांगितली. प्रथम द्राक्ष मळ्यातून काढून यार्डमध्ये आणल्यानंतर त्याची कशी स्वच्छता करतात, त्याचा रस कसा काढला जातो, तो फिल्टर होऊन पुढच्या मशीनमध्ये गेल्यावर त्यात तो कसा साठविला जातो या विषयी माहिती सांगितली. ही प्रक्रिया करताना त्याला द्यावे लागणा-या तापमानाची माहिती सांगितली. वाईनचे प्रकार किती? तसेच स्वयंपाकात लागणारी वाईन कोणती? वाईन बाटली एकदा ओपन केल्यावर किती दिवसांत संपवावी? वाईनची बाटली कश्याप्रकारे ठेवावी? काळ्या, हिरव्या व लाल द्राक्षापासून कोणकोणती वाईन तयार करतात? वाईन मध्ये अल्कोहलचे प्रमाण किती असते? इत्यादी विषयी माहिती दिली आणि उपलब्ध असलेल्या नमुन्यातील वाईनची चव घेण्यास आम्हाला दिली.
इगतपुरी येथील द्राक्षमळा हा डोंगराच्या उतारावर व नदीच्या किनारी आहे. मळ्यात झाडांची लागवड केल्यानंतर साधारणतः वीस वर्षे कंपनीला फायदा अपेक्षित नसतो असे तेथील कर्मचा-यानी सांगितले. कारण वाईन बनविण्यासाठी लागणारी मोठ मोठी मशनरी, साठविण्यासाठी लागणारी यंत्रणा हे सर्व फार खर्चिक आहे. मळ्यात सुरवातीला झाडांची लागवड केल्यानंतर नियमीत फवारणी केली जाते. खताचा वापर योग्य प्रमाणात केला जातो. झाडाची निगा खास देख-रेखीखाली राखली जाते. झाडांना फुलांचा बहर आल्यापासून ते त्यांवर द्राक्ष जीवधरेपर्यत विशेष प्रकारची काळजी घेतली जाते. झाडाची लागवड एकाच ओळीमध्ये पांच फूटांच्या अंतराने केली जाते. तसेच रोपांच्या दोन ओळीमधून फवारणी आणि निगराणीसाठी ट्रॅक्टर फिरु शकेल एवढे अंतर मध्ये सोडले जाते. या मधल्या भागातून दोन्ही बाजूला एकाच वेळी ट्रॅक्टर मधून फवारणी केली जाते.
आम्ही तेथे गेलो तेव्हा मळ्यात झाडांवर छोटी छोटी द्राक्षे घडा-घडानी लागलेली होती. काही सोबत फुलेही होती. आम्ही वस्तीस राहिले ते मळ्यातील घर खूपच सुंदर होते. बाहेर मोकळा परिसरही भरपूर आणि सुंदर होता. सकाळच्या सूर्योदयाचे मनोहारी दर्शन बघायला मिळाले. रात्रीचा मुक्काम तेथेच करून दुस-या दिवशी सकाळी मुंबईकडे प्रयाणास सुरुवात केली. परतीचा प्रवासीही सुंदर झाला.
अशी ही आमची कौटुंबिक सहल आनंदात आणि उत्साहात संपली.
- सौ.मीनल मंगेश पाटील
(पालघर - घिवली)
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.