Meenal

Meenal Patil

सौ. मीनल मंगेश पाटील ह्यांचे मूळ गाव घिवली. त्या पूर्वाश्रमीच्या कु. शालीनी वामन पाटील, पंचाळी येथील श्री वामन रामजी पाटील यांच्या कन्या. लग्नानंतर पती श्री. मंगेश गणपत पाटील यांचे बरोबर नोकरीनिमित्त पालघर येथे रहावयास आल्या, आणि कायमस्वरूपी पालघरवासीय झाल्या. सुरुवातीच्या खडतर काळात पतीच्या मागे खंबीरपणे उभे रहात, भारतीय पोस्ट खात्यात 32 वर्षे नोकरी करून, त्यांनी संसाराला मोलाचा हातभार लावला. दोनही मुलींना उच्चशिक्षित करून त्यांचे संसार मार्गी लावले. दोन विवाहीत मुली, जावई तसेच नातवंड असा त्यांचा समाधानी परीवार आहे. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचे छंद , अवांतर वाचन,लेखन आणि गायन हे छंद त्यांनी जोपासले आहेत. त्यांना सामाजीक कार्याची आवड आहे. निरनिराळे पौष्टीक खाद्य पदार्थ बनविण्यात त्यांना विषेश आनंद मिळतो. भ्रमंती करून अनेक अनुभव गाठीशी बांधण्यात त्या सदैव उत्सुक असतात. त्यांना गायनाची आवड असल्यामुळे घरगुती मैफलीत मराठी चित्रपट संगितातील बहुतेक नावाजलेल्या गाण्यांचा आस्वाद त्यांच्या निकटवर्तीयांना नेहमीच घेता येतो. गाण्यांचा आस्वाद जरी आपणा सर्वांना नाही घेता आला, तरी त्यांच्या लेखणीचा आस्वाद आपणास या इथे नक्कीच घेता येईल.

थरारक तथा मनमोहक व्याघ्र दर्शन

बांधवगड - मध्यप्रदेश

 

मी आणि माझ्या यजमानांनी म्हणजे श्री आणि सौ. मीनल मंगेश पाटील उभयतांनी संपूर्ण मध्यप्रदेश बघण्याचे ठरविले.आम्ही दोघचं असल्याने "वीणा वर्ल्ड" या टुरिस्ट कंपनीमार्फत प्रवासास जाण्याचा पर्याय निवडला.कारण प्रवासात आपल्याला घरची आठवण येऊ नये अशी सुंदर सेवा देणारी ही पर्यटन कंपनी आहे शिवाय या पूर्वीचा वीणा वर्ल्ड मधून केलेल्या प्रवासाचा चांगला अनुभव होता. संपूर्ण मध्यप्रदेशाची १५ दिवसाची टूर ठरविण्याचे कारण म्हणजे तेथील सुंदर मंदिरे, १२ ज्योर्तिलिंगा पैकी दोन ज्योर्तिलिंगे, खजूराहो येथील जगप्रसिद्ध असलेली वास्तुकला, शिल्पकला तसेच कामसूत्रकला यांचे सुंदर दर्शन देणारी भव्य मंदिरे, ऐतिहासिक राजवाडे, अहिल्याबाई होळकराचा राजवाडा तसेच त्यांनी हातमाग कामगारांना लघुउद्योग मिळावा म्हणून निर्माण केलेल्या हातमागावरील महेश्र्वरी साड्या, चंदेरी गावातील चंदेरी साड्या, आणि सोबत मध्यप्रदेशातील अभयारण्यात असलेले दोन व्याघ्र प्रकल्प. त्यापैकी एकाचं नांव "कान्हा नॅशनल पार्क" आणि "बांधवगड नॅशनल पार्क". आमच्या टूर मध्ये बांधवगड नॅशनल पार्क चा समावेश होता.


आमचा ग्रुप १४ जणांचा होता. आम्ही सर्व जण ३ डिसेंबर रोजी मुंबई-भोपाळ विमानाने सकाळी भोपाळला पोहचलो. वीणा वर्ल्डच्या गाडीने टीम मॅनेजर सोबत पुढील प्रवासासाठी निघालो. दरम्यान एकमेकांच्या ओळखी झाल्या. प्रथम भोपाळ जवळील भिमबेटका बघून पंचमढीला निघालो. पंचमढी हे हिल स्टेशन आहे. तेथील पांडवगुंफा, गुप्तमहादेव, बडामहादेव, जटाशंकर ही मंदिरे पाहिली. दुसऱ्या दिवशी भेडाघाट पाहिला. इथे नर्मदा नदीच्या पाण्याच्या दोन्ही बाजूला मार्बलचे मोठ-मोठे उंच डोंगर आहेत. दोन्ही बाजूला मार्बलचे डोंगर आणि त्या मधून वाहणारे पाणी असं मनमोहक नेत्रसुख देणारे असे हे खुप सुंदर ठिकाण आहे. इथे बऱ्याच सिनेमाच्या शुटिंग होतात. अश्या मनमोहक ठिकाणी बोटींग करताना मन तृप्त झाले. प्रसिध्द धुवांधार धबधबा पाहिला. दुसऱ्या दिवशी अमरकंटकला श्रीयंत्र मंदिर बघून नर्मदेचे उगमस्थान पाहून संध्याकाळी नर्मदेची ग्रुप आरती केली व दुसऱ्या दिवशी बांधवगडकडे प्रयाण केले.

 

बांधवगड हे मध्यप्रदेशातील विंध्य पर्वतमाले मध्ये आहे. त्याचे क्षेत्रफळ ४४८ चौ.किमी आहे. तो २००० वर्षांपूर्वीचा जुना किल्लासुध्दा आहे. बांधवगडच्या जंगलात अनेक छोट्या छोट्या डोंगराचा ही समावेश आहे. येथे २२ प्रकारचे वन्यप्राणी, २५० प्रकारचे पक्षी आढळतात. तसेच वाघ, कोल्हा, नीलगाय, अस्वल, हरिणी, जंगली मांजर, डुक्कर, चितळ, सांबर, चारशिंगी सांबर तसेच पक्षांमध्ये बगळा, सारस, क्रौंच, मोर, शिटी वाजविणारा चैत्री, जंगली कोंबडी, प़ोपट, निळकंठ पक्षी, तसेच जमिनीवरील सरपटणारे प्राणीही आहेत. अशा या बांधवगडच्या अभयारण्यात आम्ही प़ोह़ोचलो. आमच्या मुक्कामाच्या रिस़ोर्टचे नांव होते Tiger Trayal Resort. साधारणतः दुपारच्या वेळेस आम्ही तिथे प़ोह़ोचल़ो. आमच्या स्वागतास रिस़ोर्टच्या गेटमध्ये चार-पाच व्यक्ती आपल्या हातातील ताटात ओले नॅपकिन घेऊन उभे होते. सोबत लिंबू सरबताची ग्लासे होती. पाहुणचार घेऊन मध्ये प्रवेश केला. राहण्याची सोय म्हणजे निसर्ग हवेलीच ह़ोती. वातावरण नितांत सुंदर आणि शांत होते. घराची रचनाही नैसर्गिकच होती. जेवणही सुंदर होते. अशा या शांत जागेत माणसाचा वास घेऊन जर वाघ आपण राहत असलेल्या भागात आला तर काय होईल याचा विचारही मनाला स्पर्शिला नाही इतके ते वातावरण सुंदर होते.

 

बांधवगड येण्यापूर्वी पाहिलेली सुंदर स्थळे, किल्ले बघून सुध्दा त्यात तृप्तता न मानता गृपमधील साऱ्या जणांचे लक्ष लागून राहिलं होत ते आपण बांधवगडच्या अभयारण्यात फिरताना आपणास वाघाचे दर्शन होईल कि नाही याकडे. साऱ्यांची एकच चर्चा होती. आपण इतका चढ-उताराचा प्रवास केला, मोठ मोठ्या पायऱ्या चढून किल्ले चढलो, भुयारातूनही गेलो तसेच उंच मंदिराच्या पायऱ्याही चढलो-उतरलो आणि वयानुसार दमलोही, पण हा आपणास आलेला शीण एका वाघाच्या दर्शनाने क्षणात निघून जाणार. देवा एकदा आम्हाला वाघाचे दर्शन होऊ दे अशी प्रार्थना सर्व करीत होते.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताआमच्या टीम मॅनेजरानी सांगितले प्रमाणे आंघोळ न करताच छोट्या उघड्या जिप्सी गाडीमधून वाघ बघण्यासाठी जंगल सफारीला निघालो. एका जिप्सी गाडीमध्ये फक्त सहा जण या प्रमाणे तीन जिप्सी गाड्या एकत्र निघाल्या. भयंकर थंडी होती. मध्यप्रदेशातील थंडीची कल्पना नसल्यामुळे आम्ही सर्वांनी फक्त स्वेटर व स्कार्फ व पुरूषांनी स्वेटर व माकडटोपी घातले होते, परंतु ते त्या थंडीत पुरेसे नव्हते. आम्ही सर्व जण थंडीने कुडकुडू लागलो. जिप्सी ड्रायव्हरच्या ते लक्षात येताच त्यांनी आपल्या जवळील एकेक ब्ल्यांकेट सगळ्यांना दिले‌. अश्या प्रकारे संपूर्ण शरीर ब्लॅंकेटने गुंडाळलेल्या अवस्थेत आम्ही जंगलात फिरलो. जंगल खूप मोठे आहे. आम्ही जात असलेल्या जंगलातील रस्त्यावरील बाजूच्या धुळीवर वाघाच्या पायाचे ठसे दिसत होते, परंतु वाघ जंगलाच्या कोणत्यातरी भागात लपलेला होता. त्याने आम्हाला काही दर्शन दिले नाही. आम्ही निराश मनाने राहत असलेल्या रिर्सोट मध्ये परतलो.

 

दुपारी आराम करून तीन वाजता जिप्सी गाडीमधून गॉगल, टोपी घालून पुन्हा जंगल सफारीस निघालो. आता थंडी नव्हती ऊन होते. सकाळच्या सफारीला आलेला गाईड आता आमच्या बरोबर नव्हता. आताच्या सफारीला नवीन गाईड होता. सकाळच्या सफारीला आलेल्या गाईडने भरपूर ठिकाणी फिरवूनही वाघाचे दर्शन झाले नव्हतं, शिवाय त्याने आम्हाला जंगलाच्या कोणत्या भागातून फिरविले होते ते आम्ही विसरलो होतो कारण या अभयारण्यात वेगवेगळे गेट नंबर आहेत. मात्र मेनगेट म्हणजे आपले ओळखपत्र जिथे चेक केले जाते ते गेट एकच आहे. म्हणूनच आताच्या गाईडने आम्हाला तुम्ही सकाळी कोणत्या गेटमधून फिरलात हे विचारल्यावर आम्ही अंदाजे नंबर सांगितला त्याप्रमाणे त्याने गाडी घेतली.

 

सकाळच्या गाईडला जरा जास्तच माहिती होती आणि आताचा गाईड बिचारा साधा होता, परंतु मनाने निर्मळ होता. त्याने आमच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेऊन आम्ही सकाळी गेलेल्या गेटमधून गाडी घेतली. आम्ही सर्व जण वाघाच्या दर्शनाला आतूर होतो. एखादे ठिकाण कमी बघितले तरी चालेल परंतु वाघ दिसला पाहिजे अशी चर्चा करीत होती आणि ही आमची चर्चा ऐकून त्या साध्या सरळ दिसणाऱ्या गाईडला मनापासूनच वाटत होतं कि आपण काहीही करून या लोकांना वाघाचं दर्शन घडवावं. त्यांने ड्रायव्हरला तशा सूचना दिल्या आणि गाडी जोरात घ्यायला लावली. लगेचच "देखो जानवर अभी, अभी कुछ देर पहिले निकल चुका है! गाडीके टायरके निशानोपर बहुत बडे शेर के निशान लगे हैं!" असं गाईडने म्हणताच आम्हाला खूप आनंद झाला. त्या गाईडलाही खूप समाधान वाटले. आलेली ही संधी हातची निसटून जाऊ नये म्हणून गाईडने गाडी दुसऱ्या जवळच्या रस्त्याने घ्यायला लावली. गाईडचे जल्दी चलो, जल्दी चलो और गाडी दौडो हे ड्रायव्हरला सांगतानाचे बोलणे ऐकून आम्हाला समाधान वाटत होते. गाडी जोरात पळत होती आणि तेव्हढ्यात एका झाडीच्या भागातून वाघ चालत असलेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याने आम्हाला शांत राहण्यास सांगितले व गाडी थांबवली. पण झाडी जरा जास्तच असल्याने आम्हाला वाघ चालताना थोडा थोडा दिसत होता, पूर्ण वाघ दिसत नव्हता. म्हणून गाईडने गाडी दुसऱ्या मोकळ्या भागात घेण्यास सांगितले. ड्रायव्हरने हुशारीने जोरात गाडी पळवून मोकळ्या भागात वाघाचे दर्शन समोरुन होईल अशा ठिकाणी गाडी उभी केली. गाडीत चिडीचूप शांतता होती आणि काय आश्चर्य? बांधवगड अभयारण्याचा सर्वात मोठा वाघ, ज्याचं नांव "बांधवगडचा राजा-भिम" आहे असा तो देखणा, रूबाबदार आणि ऐटबाज असा वाघ अगदी आमच्या समोरुन म्हणजे अगदी पांच-सहा फूटावरून चालत जाणाऱ्या वाघास बघण्याचे भाग्य आम्हास मिळाले.

 

Tiger

तो बांधवगडचा भिम नावाचा राजा अगदी रूबाबदारपणे ऐटीत पावले टाकीत आमच्या समोरुन पुढे चालत आला. चालताना मध्येच दोन पायांवर उभा राहून वर केलेल्या पायात झाडांची फांदी पकडून पर्यटकांना जणू काही सलामीच दिली आणि फांदी खाली टाकून ‌दिली. नंतर ऐटबाज चालीत, आपल्या आजूबाजूला असलेल्या पर्यटकांकडे ढुंकूनही न बघता समोरच्या झाडीत शांतपणे रूबाबात निघून गेला. "मी या जंगलांचा राजा आहे. तुम्हा माणसाना मी कस्पटासमान मानतो" या आविर्भावात तो समोरच्या झाडीत दिसेनासा झाला. काय अवर्णर्निय क्षण होता तो! तितकाच भितीदायकही होता. भल्यामोठ्या वाघाला समोर बघून आमची बोबडीचं वळाली. सर्वजण एकमेकांना चिकटून बसलो. क्षणभर सुन्न झालो, फोटोग्राफी करायचेही विसरलो.फोटोग्राफी करावीशी वाटत होती परंतु कॅमेराचा लाईट वाघाच्या डोळ्यावर गेल्यावर वाघ आपल्या अंगावर धावत आला तर? या विचाराने क्षणभर शांत राहिलो परंतु लगेचच त्यांची व्हिडीयो शुटिंग करुन फोटोग्राफी ही केली आणि तो व्हिडीयो पाहून अत्यानंद झाला. असा हा बांधवगडचा भिम राजा रूबाबात आला त्यांनी पाहिले सर्वांना जिंकले व नेत्रसुख देऊन राजा सारखा निघून गेला. ज्या ड्रायव्हर व हुशार गाईडने वाघ्र दर्शन घडविले त्या दोघांचे आभार मानले व त्यांना बक्षिसही दिले.

 

असं हे बांधवगडावर बघण्यास मिळालेले थरारक परंतु मनमोहक व्याघ्र दर्शन.

 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Kalavati
Kalavati Raut
23-Apr-2018 04:27 AM

खूपच सुंदर मिनलताई. आपण आम्हांस थेट बांधवगड नॅशनल पार्कमध्ये घेऊन गेलात.

Surendra
Surendra Thakur
22-May-2018 08:43 AM

मिनलताई, मध्यप्रदेशस्या पिकनिकशी मायती घणी मस्त.वाघाया दर्शनायं वरणन अह मस्त केलय ते दाट जंगल जीपमनसन साललेले तुमी,तुमसा जीपडायवर न त्याला घाई करव्या हांगणारा गाईड न तुमाला दरशन दिलेला वाघ जकलं शित्र डोळ्याहमोर उब रेलं.धन्यवाद.

Charushil
Charushil Patil
22-May-2018 09:30 AM

सुंदर प्रवासवर्णन...... व्याघ्रदर्शन उतकंठावर्धक 👌

Meenal
Meenal Patil
29-May-2018 10:33 AM

कलाताई ,. सुरेंद्र आणि चारुशील यांना मन:पूर्वक धन्यवाद

Kunal
Kunal Raut
21-Jul-2018 11:29 PM

खरचं, चित्तथरारक होते!

Meenal
Meenal Patil
06-Aug-2018 11:15 AM

धन्यवाद,

Jayprakash
Jayprakash Raut
15-Aug-2018 06:53 AM

खुप छान वर्णन जंगलात आहोत असे वाटले जयप्रकाश वा. राऊत, दहिसर मुंबई /नरपड

Meenal
Meenal Patil
18-Aug-2018 09:10 PM

धन्यवाद, जयप्रकाश भाऊ.

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

3 + 6=    get new code
Post Comment