लग्न म्हटलं की पंधरा दिवस ते महिनाभर आधी धावपळ असायची. आत्ताच्या काळात मंडप दोन-तीन दिवसात सजवून दिले जातात. अगदी स्टेज पासून यजमान सांगतील तिथंपर्यंत लांब आणि मोठा. तसाच जेवणाचा मंडप .मग त्याप्रमाणे लाइटिंग फुलांची सजावट आणि त्यासाठी लागणारे लाखो रुपये.
पूर्वीच्या काळी अगदी साधे दोन मांडव घालायचे एक अंगणात आणि दुसरा जेवणाचा. एका मांडवासाठी आठ ते दहा वासे (भेंडीचे किंवा बांबूचे) जमिनीत रोवून त्यावर ताडाची वाळलेली झावळी सावलीसाठी. ही झावळी ताडावरून तोडून त्याचे थोपे (झावळीचे देठ )काढून त्या झावळ्या शेतात सुकवायच्या. त्या झावळ्या सुकवण्याची पद्धत अशी एक झावळी त्याच्या अर्ध्या भागावर दुसरी झावळी त्याच्या अर्ध्या भागावर तिसरी झावळी. अशी रचना करून त्या उडू नयेत म्हणून त्यावर थोपे किंवा मोठे दगड ठेवून त्या पंधरा दिवस वाळवत मग तयारी वासे गोळा करण्याची ही कामं पुरुष मंडळींची. हे वासे प्रत्येक घरी जाऊन आणायचे. ज्या घरून वासे आणले त्यांनी रंग लावून खुणा कलेली असायची. कारण हरवले जाऊ नयेत म्हणून. अशीच लगबग बायकांची म्हणजे शेताच्या बांधावर पिकलेला उडीद जात्यावर दळून डाळ काढत. ह्या डाळीपासून पुन्हा त्यावर दळून पीठ तयार करून उडदाचे पापड तयार करत. ते पापड करण्यासाठी आदल्या दिवशी आळीतल्या सर्व बायकांना पापड लाटायला आमंत्रण द्यायचं. आणि रात्री हे पीठ पापड खार , मीठ घालून घट्ट गोळा बांधायचा. आणि दुसऱ्या दिवशी पाट्यावर मुसळ घेऊन तो गोळा चांगला अर्धा तास कुटून घ्यायचा. त्यापासून पापड बनवत. सर्व बायका पापड लाटण्यासाठी येत असत. एका दिवसात पापड लाटून सुकवून घ्यायचे. नंतर तांदूळ निवडण्यासाठी पुन्हा आळीतल्या सर्व बायका गोळा व्हायच्या. लग्नाला आठ दिवस बाकी असतील तेव्हा आलं आणि आख्ख्या मिरच्यांचं लोणचं तेही कमी तेल घातलेलं लोणचं चिनी मातीच्या मोठ्या बरणीत भरलं जायचं . त्या लोणच्याची चव म्हणजे एकदम भारी.
कपडे खरेदी म्हणजे मुलाचे लग्न असेल तर नवरीला साड्या देतात. नवरी साठी हळदीची साडी, साखरपुड्याची आणि एक शालू. दागिने मध्ये फक्त काळ्या मण्यांची गरसोळी. त्यात सोन्याचा वर्ख असलेले दोन मणी आणि एक वाटी. अगदी ऐपत असेल तर सोन्याची वाटी आणि मणी. आणि मुलीचे लग्न असेल तर नवरदेवाला शर्ट पॅन्ट आणि ऐपत असेल तर अंगठी. लग्नाच्या आदल्या दिवशी मंडप घालायचे. लग्नाचा दिवस उजाडला की आंब्याच्या पानांचे तोरण मंडपाला चारी बाजूने लावून घेत. आणि दाराला केळीचे खांब.पाहुणे किती पाच-पन्नास असायचे.आणि जेवण फक्त शाकाहारी असायचं. त्या भाज्या सुद्धा वाडीतले भोपळा ,गवार, कोबी याची भाजी. गवार बटाटा , कोबी चणाडाळ, भोपळा आणि चवळी. भोपळा फोडायचा. त्याची पण पद्धत असायची. भोपळा सुरुवातीला जमिनीवर दोन तीन वेळा आपटायचा . त्याला कोयत्याने कापत नसत. नंतर त्याच्या विळीवरती फोडी करून भाजी केली जायची . दोन दिवस लग्न म्हणजे चार जेवणं . एक जेवणाला एक भाजी ,वरण ,भात ,लोणचं ,पापड आणि पत्रावळीत जेवायला. भात मोठया तांब्याच्या तपेल्यात शिजवायचा. आणि त्या तपेल्याला तोंडाला कंताण बांधून ते वाळणीवर वाळून त्यातली पेज काढून घ्यायचे. त्यासाठी मोठा जमिनीत खड्डा खणून त्यावर एक लाकूड किंवा जाड काठी आडवी ठेवून त्यावर तपेलं वाळून पेज काढायची.. कुटुंबातील दोघी-तिघी मिळून जेवण चुलीवर बनवायच्या . पूर्वी जेवणात खडा मीठ वापरायचे . चुलीवर शिजवलेल्या भाज्या अप्रतिम लागायच्या . जेवायला पत्रावळी असायच्या. जेवायला पंगत जमिनीवरच साध्या गोणीची घडी घालून बसायचे. जमिनीच्या ढिपळावर पत्रावळी व्यवस्थित राहायची नाही. भातावर घातलेलं वरण पत्रावळीतून वाहून जायचं . आणि ते वरण अडवण्याचा प्रत्येकाचा खटाटोप असायचा.
काही वर्षांनी थोडीफार आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्याच्या लग्नात वांगी , वालाचे गोळे शेगवाच्या शेंगाची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी हे दोन भाज्यांचे प्रकार वाढले . आणि लाडू , सरबत मेनू वाढले. दुसऱ्या दिवशी मुलीचं लग्न असेल तर वरात यायची. पूर्वी गोरज मुहूर्तावर सर्व लग्न व्हायची. रात्री साडेदहा अकरा वाजता नावळ निघायची. पूर्वी वरात ही ट्रकमधून येत असे. मग एस.टी बस मध्ये वरात येऊ लागली. लग्नानंतर पूजा. आणि तिसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्वांना बोलावून मटणाचे जेवण दिले जाई .
साधे लग्न , दिखावा नव्हता स्पर्धा नव्हती , चढाओढ नव्हती, राग मानपान नसायचा. लग्न पत्रिका पण नसायच्या. जसा बदल होत गेला तसं मंगळसूत्र सोन्यात बनवू लागले. मांडवाला सफेद आणि रंगीत कापड झावळ्याच्या खाली बांधले जाई. पत्रिका छापू लागले आणि टाशा आणि ढुमकं आणलं जाऊ लागलं आणि तो टाशा जोरात सुरात वाजावा म्हणून शेकोटी पेटवून गरम करायचे . तीन चार दिवस लग्न असायचे आणि पाहुण्यांनी घर भरलेलं असायचं .
विनिता अजय राऊत
भास्कर वाडी
पालघर
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.