आज निवृत्त होतांना शुभा जड अंतःकरणाने शाळेची एक एक पायरी उतरत होती आणि सगळ्या आवठवणीचा मागोवा घेत होती. ही शाळा तिची शाळा. इथेच शिकली; फक्त चार वर्षे काॅलेजची आणि एक वर्ष शैक्षणिक पदवीचे. एवढीच वर्षे शाळेबाहेर. त्यानंतर पुन्हा शाळेतच शिक्षिका म्हणून पाऊल टाकतांना ती खूपच आनंदली होती. शिक्षणमहर्षी दादांच्या व शिक्षणतज्ज्ञ बापूसाहेबांच्या हाताखाली धडे गिरवता येणार. उत्तम शिक्षक होण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे माझी शाळा.
बालमोहनमध्ये कोणालाही नापास केले जात नसे. इ. चौथीत सर्व विषयात मागे पडलेली मुले एक वर्गात करुन तो वर्ग, नव्याने आलेल्या अवघ्या २३-२४ वर्षाच्या शुभाच्या हातात दिला गेला; इ. ५वी ते ९वी चा एक-एक वर्ग गणित, विज्ञानासाठी होताच. तिच्या इंग्लीशच्या बाई मुख्याध्यापिका होत्या. ती पळतच त्यांच्याकडे गेली. आता कसं शिकवू ह्यांना?
रडवेल्या शुभाला बाईंनी हसत उत्तर दिले, ही तुझी परीक्षा आहे. सगळे कौशल्य पणाला लाव आणि त्यांच्यात शिकायची आवड व आत्मविश्वास निर्माण कर. तरच जिंकलीस; आणि वर्षाच्या शेवटी शुभा जिंकली.
दादांच्या तालमीत तयार झालेली शुभा एक दिवशी दादांना म्हणाली, ”दादा, काही मोठ्या शाळात विज्ञान, रसायन व जीवशास्त्राची तीन वगेळी पुस्तके पाचवीपासून अभ्यासक्रमात लावली आहेत. मुले प्रयोगशाळेत प्रयोग करतात, आपल्या शाळेत मात्र सामान्यविज्ञानाचे एकच बाळबोध पुस्तक असे का? आपणही त्या शाळांप्रमाणे का नाही करत?“
दादा उत्तरले, ”बाळा, नऊ-दहा वर्षांच्या मुलांंना मजेत शिकू दे. त्यांच्यावर अभ्यासाचा ताण नको. ती अभ्यासाला कंटाळतील, शिकण्याचा राग-राग करतील असे काही नको. त्यांचे खेळण्याचे वय आहे. खेळू दे त्यांना. जसजसे मोठे होतील, त्यांची आकलन शक्ती वाढेल. मग ते सारे कठीण आपोआप स्वीकारतील. आपले कितीतरी विदयार्थी जगभरात त्यांच्या कर्तृत्वावर नाव मिळवताहेत. कुठे मागे पडले ते?“
शुभाला पटले सारे. नंतर सगळे सोपेच झाले. प्रत्येकात त्या त्या विषयाची गोडी कशी निर्माण करावी? मन शांत ठेऊन पेपर कसा लिहावा? गणिताची भिती कशी घालवावी? वातावरण निर्मिती, भिती घालवण्यासाठी केलेला खडीसाखरेचा वापर तर पालकांनाही भावला. परीक्षार्थी नाही, विद्यार्थी निर्माण झाले; जे आजही तिला विसरले नाहीत. प्रश्नांची उकल कशी साधावी? तो कसा मुद्देसूद लिहावा? वगे वेगळया गोष्टींची रचना/मांडणी कशी सुसंगत करावी? सारे छान जुळत गेले. शिकवण्यातला आनंद गवसला.
तिचा मुलगा आता अडिच वर्षांचा झाला होता, त्याला इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. एक आठवडाभर दोन तास उशिरा येण्याची परवानगी घेण्यासाठी शुभा मुख्याध्यापिके कडे गेली. बाई म्हणाल्या, ”वेडी आहेस का तू? आपली शाळा सोडून इंग्रजी शाळा का? अग, आपला इतिहास आपला भूगोल त्याला कसा कळावा? आपल्या भाषेत तो जे शिकेल ते त्या परक्या भाषेत कसे शिकेल? अगं गणित तर त्या मुलांचे आपल्या मुलांइतके चांगले नसतचे“.
शुभा म्हणाली, ”सारे मान्य, पण घर लांब-मुलगा लहान आणि घरच्या मंडळींचा मराठी माध्यमाला विरोध. मी काय करु?“
आपला निर्णय स्वतः घ्यायला शिक. योग्य-अयोग्याची निवड तुला करता आलीच पाहिजे. बाईंनी खडसावले. मुल मराठी माध्यमात आली. खूप शिकली. उत्तम इंग्रजीही बोलू लागली. मोठा शिष्यवृत्या मिळवणारा, गुणवंत यादीत चमकलेला. तर धाकटा - खऱ्या अर्थाने विदयार्थी, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा. आणि स्वकष्टावर विश्वास ठेऊन आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणारा. मराठी माध्यमात शिकूनही त्यांचे कुठेही कधीही अडले नाही.
आज आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. अभ्यासाचा बागुल बुआ त्यांची पाठ सोडत नाही. त्यांना आपला इतिहास कधी कळत नाही. त्यांना जगाचा भूगोल जिवापलिकडे शिकावा लागतोय पण आपल्या भूगोलाचे आकलन होतच नाही. आपले संस्कार, संस्कृती, भाषा, देशप्रेम सारे फडताळात बंंद होत आहे. मराठी साहित्य, काव्य सारे विस्मृतीत जाऊ लागलय.
कळतय् पण वळत नाही. इंग्रजीचा पगडा भूत बनून मनावर अधिराज्य करतो आहे. आय्.सी.एस्.सी., सी.बी.एस्.सी, आय्.बी. इ. भिन्न अभ्यासक्रमांच्या ओझ्याखाली बिचाऱ्या लहानग्यांचे बालपण हरवले आहे. जीवघेण्या स्पर्धा परीक्षांच्या गोंधळात ही बाळे फसली आहेत. शुभाच्या डोळयातून अश्रू ओघळले. आज निवृत्त होताना फक्त जुन्या आठवणीसोबत घेऊन ती जातेय्. पण समोरचे वास्तव तिला अस्वस्थ मात्र करतेय. मन आक्रंदून म्हणतय् कल्मषपादाप्रमाणे शापाचे उदक आम्हीच आमच्या पायावर तर सोडत नाही ना?
(लेखातील दोन मुले ही आत्ताच्या ४०-५० वर्षांच्या वयातील मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांचे व शाळा मराठी माध्यमाच्या शाळेचे प्रतिनिधित्व करणारी आहेत.)
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.