Kalavati

Kalavati Raut

Retired Principal, Garmin Vidyalay Mire

सौ. हेमांगी व श्री. हेमंत गणपत राऊत

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे काही ना काही प्रसंग घडतात जे आपल्याला विचार करायला उद्युक्त करतात व त्यापासुन प्रेरणा घेऊन आपण काही तरी योग्य कृती करण्यासाठी प्रवृत्त होतो. असेच काहीसे सौ. हेमांगी व श्री. हेमंत गणपत राऊत (विरार-माहिम) यांच्या आयुष्यात घडले. सौ. हेमांगी राऊत ह्या विरार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षिका. त्यांच्या शिक्षण कार्यात घडलेल्या प्रसंगामुळे निराधार अशा तीन बालकांचा उद्धार होऊन ही तीनही बालके मोठी होऊन आज सुस्थितीत आपला जीवनक्रम आचरित आहेत. हे सर्व शक्य झाले ते हेमांगी राऊत व त्यांचे पती हेमंत राऊत यांच्या सेवाशील वृत्तीमुळे.

आपल्या शाळेतील गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थांच्या घरी जाऊन शाळेत न येण्याची कारणे शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न करणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे हेमांगी राऊत ह्यांचे नित्य काम. अशाच एकेवेळी गैरहजर विद्यार्थांचा शोध घेताना त्यांना ही तीन बालके सापडली. वडिलांचे निधन झालेले आणि आईही अंथरूणाला खिळलेली अशा परिस्थितीत भाड्याचे पैसे नसल्याने मालकाने घराबाहेर काढलेले. आजारी आई या तीन मुलांना झाडाखाली घेऊन राहत होती. ही सारी परिस्थिती पाहून त्यांचे मन गलबलले. घरी आल्यावर आपल्या यजमानांशी या गोष्टीवर चर्चा केली व यांच्यासाठी काही तरी करावे हे दोघांनीही ठरविले. त्यासाठी त्यांनी विरार मधील ॠषीतुल्य असे थोर समाजसेवक कै.मा. वामनराव सामंत उर्फ आप्पा सामंत यांची भेट घेतली व त्यांना सर्व परिस्थिती कथन केली. आप्पा सामंतानीही यावर तात्काळ कार्यवाही केली व त्या तीनही मुलांची सोय सफाळे येथे ते चालवीत असलेल्या आश्रमात केली. त्या वेळी ही तिन्ही मुले दोन मुली व एक मुलगा (अनुकमणे ८ वर्षे, ४ वर्षे व मुलगा ६ वर्ष वयाची होती.) आणि आईला संजीवनी हॉस्पिटल विरार मध्ये दाखल केले.

आईची परिस्थिती फारच गंभीर होती. तिच्या शेवटच्या क्षणी ती मुलांची वाट पाहत होती. त्यांचे कसे होईल ही एकच काळजी त्या माऊलीच्या डोळ्यात दिसत होती. अशा वेळी हेमांगी राऊत यांनी आम्ही दोघेही तुमच्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेऊ असे त्या माऊलीला वचन दिले आणि तात्काळ ती माऊली शांत झाली. तिला दिलेल्या वचना प्रमाणे दोघेही त्या मुलांची काळजी घेत आहेत.

दरम्यान सफाळे येथील आश्रम हा मुलांसाठीच होता पण आप्पा सामंतच्या ओळखीने अनुकंपातत्त्वावर त्यांना तिघांनाही तेथे ठेवले होते. पण आता त्यांना वेगळे होण्याची वेळ आली म्हणून दोन्ही मुलींची सोय मुलींसाठी असलेल्या आश्रमात करण्याचे ठरवले. लहान मुलीची सोय पुणे येथे एका आश्रमात झाली पण मोठ्या मुलींची सोय कुठे आणि कशी करायची हा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. येथेही मुलीच्या नशीबाने जोर धरला व मुलुंड येथील नामांकित उद्योगपतींनी तिला पुर्णपणे सांभाळायची जबाबदारी घेतली. या मुलीचे सर्व शिक्षण पूर्ण करून तिला स्वतःच्या पायावर उभे केले व २६ नोव्हेंबर २०१७ रोजी एका चांगल्या कुटुंबातील मुलाशी मोठ्या थाटामाटात विवाह करून दिला. आज ती त्या कुटुंबात सुखाने नांदत आहे, आनंदात आहे.

दुसरा मुलगा हाही हुशार आणि कष्टाळू. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून स्वः कष्टाने B.com पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला अभिनयाची फारच आवड असल्याने तो मराठी मालिका व व्यावसायिक नाटकामध्ये काम करीत आहे. यातच तो आपलं करीअर करण्याची आकांक्षा मनी ठेवून आहे.

तिसरी मुलीला पुणे येथील एका आश्रम मध्ये ठेवले होते. सध्या ती पुण्यातील नामांकित कॉलेज मधून B.B.A ची पदवी घेत आहे. तिचेही आयुष्य आता हळूहळू मार्गी लागतेय.

मधल्या कालावधी मध्ये हेमांगी व हेमंत राऊत हे मुलांच्या आईला दिलेल्या वचनाप्रमाणे अधुनमधून त्यांची भेट घेऊन विचारपूस करीत असत. त्यांच्या संपर्कात राहत. त्यांना आपल्या घरी घेऊन येत असत. त्याचे शिक्षण पूर्ण होईस्तोवर त्याची एकमेकांशी भेट घडवून दिली नाही. कारण एकच होते की त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे, व आत्मनिर्भर व्हावे आणि म्हणूनच जवळजवळ १४ वर्षांनी त्यांना एकत्र आणले. तो प्रसंग त्याच्यासाठी अविस्मरणीय होता. प्रथम तिघांनाही एकमेकांना ओळखले देखील नाही. त्यांची एकमेकांशी ओळख करून दिल्यावर त्यांनी एकमेकांना मिठी मारली व त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या पण हे अश्रू आनंदाचे होते. सन २००२ सारी वेगळी झालेली ही भावंडे २०१६ साली एकत्र आली. याचे सारे श्रेय हेमंत राऊत व हेमांगी राऊत यांना जाते. त्यांच्या या कार्याची दखल ABP माझा या मराठी वाहिनीनी घेऊन ९ डिसेंबर २०११ रोजी त्याची मुलाखत प्रक्षेपित केली होती (विरार येथील थोर समाजसेवक कै. आप्पा सामंत यांनी ह्या कार्या संबधी त्यांच्या स्मरणीकेत लेख लिहिला होता.). एखाद्या सिनेमाची कहाणी शोभून दिसेल अशा या घटना यांच्या जीवनात घडल्या. आजही ते गरजवंताना आपल्या परीने जमेल तशी मदत करीत आहेत. अगदी आर्थिक मदत सुध्दा.

असाच एक दुसरा प्रसंग म्हणजे त्यांच्या ओळखीच्या एक लघु उद्योजकाबाबत. त्यांना संतती नव्हती. याची खंत त्यांनी हेमांगी राऊत कडे व्यक्त केली होती. या उभयतांचे सदर तीन मुलांमुळे सफाळे येथील आश्रमाशी ऋणानुबंध जुळले होते. ते आपल्या मुलांच्या वाढदिवशी, सणासुदीच्या वेळी आश्रमात मुलांना खाऊ घेऊन जात असत. जेव्हा त्याचे स्नेही विरार यांनी त्यांची खंत बोलून दाखवली तेव्हा त्यांना एक कल्पना सुचली व त्यांनी एक मुलगा दत्तक घेण्या संबंधी सुचवले. त्याप्रमाणे आश्रमातील एक मुलगा दत्तक घेतला. आज तो मुलगा कारखान्याचा मालक झाला आहे.

HemangiRautHemantRautअसे अनेक दाखले त्यांच्या बाबतीत देता येतील. प्रसिद्धी पासून दूर राहून, दिनदुबळ्यांची सेवा हे दाम्पत्य करीत आहे. त्यांच्या या सेवावृत्तीला प्रणाम.

 

 

 

अशी ही सेवाभावी वृत्ती, गीतकार जगदिश खेबुडकरांच्या शब्दात........

रंजल्या जिवाची, गांजल्या जिवाची,

मनी धरी खंत ||१||

तोचि खरा साधू, तोचि खरा संत ||२||

 

*****************************************************************
* वरील लेखातील सर्व पाल्यांची नावे व फोटो गोपनीयतेच्या दृष्टीने उघड केलेली नाहीत हे वाचकांनी समजुन घ्यावे ही विनंती.

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Meenal
Meenal Patil
07-Aug-2018 03:51 AM

अंधारात चाचपडणाऱ्या अनाथ मुलांना काजवा होऊन जीवनाधार देणाऱ्या सौ.हेमांगी आणि श्री. हेमंत या उभयतास प्रणाम. आपल्या हे समाजकार्य भावी पिढीला स्फूर्तिदायक ठरेल. अनमोल सेवेस सलाम.

Rajendra
Rajendra Raut
07-Aug-2018 09:21 PM

. हेमांगी व श्री.हेमंत राउत(नाना मामा), प्रसिद्धि पासून दूर राहून निरपेक्ष,निस्वार्थी अशा तुमच्या ह्या मनोवृत्तीला आपल्या ह्या वेबसाइट तर्फे मानाचा मुजरा. आम्हास खात्री आहे की तुमच्या ह्या महान कार्या पासून माझ्या सारखे असंख्य लोक प्रेरणा घेऊन

Umed
Umed Patil
09-Aug-2018 04:23 AM

मावशी आणि नाना यांचे कौतुक करावे तेवढे कमी होईल, निस्वार्थ भावनेने केलेले हे काम माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. पदरी 2 मुलं असतानाही आणखी 3 मुलांचे पालकत्व स्वीकारणे हे सोपे नव्हते, त्यांच्या या सेवेस माझा नमस्कार. त्यासोबतच मला स्वतः ला ही शैक्षणिक

Bipinchandra
Bipinchandra Patil
10-Aug-2018 05:05 AM

आपण उभयतांनी निस्वार्थपणे केलेल्या महान कार्याला मनःपूर्वक सलाम आणि अभिनंदन... 💐💐💐 इतरांनीही प्रेरणा घ्यावी असे कार्य आपण केले आहे. आपले कार्य सर्वांसमोर आणल्याबद्दल सौ. कलावहिनींचेही आभार...🙏🏻

Balkrishna
Balkrishna Patil
10-Aug-2018 05:41 AM

सौ.कलावती राऊतने आपणा दोघांविषयी लिहलेला लेख वाचला.आपण केलेल्या या समाजसेवेविषयी माहिती होतीच पण आज सविस्तर वाचावयास मिळाली.या पुढेही आपल्या दोघांकडून अशीच निस्वार्थी समाजसेवा घडत राहो हीच सदिच्छा. आपल्या पावलावर पाऊल ठेवून इतर काही व्यक्ती असे समाजकार्य करावयास पुढे येतील अशी आशा करूया..आपण दोघांचे पुन्हा एकवार अभिनंदन....

Mangesh
Mangesh Patil
10-Aug-2018 07:34 PM

सौ.हेमांगी वश्री.हेमंत राऊत या उभयतांच्या अतुल सेवेला माझा सलाम. तसेच त्यांची अंधारात असलेली अमोल सेवा उजेडात आणल्याबद्दल सौ.कलाताईचे आभार,व ते लोकांसमोर येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल चौकळशी वाडवळ डाॅट काॅम टीमचे आभार व धन्यवाद.

Subodh
Subodh Patil
11-Aug-2018 01:16 AM

जे का रंजले गांजले , त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा , देव त्यासिच जाणावा ।। आपल्या कार्यास शतशः प्रणाम 🙏🌷🙏

Hemangi
Hemangi Raut
12-Aug-2018 02:08 AM

आपण आम्हा उभयतांचे कौतुक केले आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत.

Yashwant
Yashwant Patil
12-Aug-2018 04:42 AM

श्री.यशवन्त हरी पाटील, नरपड, डहाणू माझी बहीण व भावजी यांनी जे अनाथ तीन मुलांना, त्यांच्या चांगल्या आयुष्याच्या प्रगती करिता जे समाजकार्य केलेले आहे त्याला तोड नाही, कधीही प्रसिद्धीसाठी पुढेही आलेले नाहीत, समाजातील सर्वांनी कोणत्याही रूपांनी अशी कार्य करावीत व कार्यास प्रोत्साहन द्यावे, त्यांच्या कार्यास माझा सलाम.

Hemant
Hemant Raut
20-Aug-2018 02:32 AM

हेमांगी व हेमंत यांचे प्रथम अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा. या जमान्यात प्रसिद्धीपासुन दूर राहुन कार्य करणारे विरळाचं . त्यांनी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. या युगात अशा कामामुळे माणुसकी अजुनही शिल्लक आहे याची प्रचिती येते. ईश्वर उभतास अधिक उर्जा देवो हीच सदिच्छा . हे कार्य समोर आणल्याबद्दल कला वहिनींचे आभार.

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

0 + 2=    get new code
Post Comment