History आपले आगमन
चौकळशी नामाभिधान पावलेले आपण सोमवंशी क्षत्रिय नेमे कोंकणातच वसाहत करून कसे केंव्हा राहीले ह्याबद्दल अनेकांचे अनेक तर्क आहेत. कोणी म्हणतात, फार पुरातन काळी मूळ क्षत्रियवर्णाचे लोक उत्तरेकडून येऊन, आनार्यांना जिंकून दक्षिणेंत कायम झाले. पुढे परचक्रे, राजक्रांत्या वगैरे कारणांमुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे मुलुखगिरीसाठी व शत्रूला पिटाळून लावण्यासाठी त्यांच्या पैकी काही लोक उत्तरेकडे गेले व काही येथेच वस्ती करून राहीले. अर्थात त्याकाळी आजच्या सारखी जातिवाचक नावे व तीव्रस्वरूपाचा जातिभेद नव्हताच. ह्यावरून व ऐतिहासिक स्परूपाच्या उपलब्ध माहितीवरून असे दिसते की शके १०६० त किंवा त्या सुमारास जे सो-सूर्यवंशी क्षत्रिय मुलूखगिरी व वसाहत करण्याच्या उद्देशाने कोंकणात उतरले, त्यांच्यापैकीच आपण असून आपणा सोमवंशी क्षत्रियांना तत्कालीन परिस्थितीप्रमाणे ठिकठिकाणाहून आलेले, सैन्यात किंवा राज्यकारभारात अमुक एका दर्जाला पाहोंचलेले, विशिष्ट ठिकाणी राहीलेले किंवा अमुक एक धंदा करणारे म्हणून ओळखण्यासाठी प्रसंगोपात निरनिराळी नावे प्राप्त होऊन ती प्रचारांत राहिली. कालांतराने अनेक राजकीय व सामाजिक घडामोडी झाल्या, मानापमानाचे प्रश्र उद्भवले, उच्चनीचत्वाची भावना वाढीस लागली, एके ठिकाणी स्थायिक झालेल्यांची दूर अंतरावर असलेल्या आपल्या भाऊबंदाबरोबरची दळणवळणे हळुहळु बंद झाली. क्षुल्ल्क कारणांमुळे वैमनस्यें वाढत गेली, मुसलमानाची सत्ता व फिरंग्यांची बाटवाबाटवी ह्या गोष्टींचा गैरपरिणाम झाला व गैरसमजामुळे आपापले वैशिष्ठ्य राखण्यासाठी विशिष्ठ सोमवंशी क्षत्रिय कुळं किंवा सो. क्षत्रिय समूह आपल्या प्रचलित नामाभिधापनाचा अभिमान मानू लागली व मी नावचे जातिवाचक बनली.
शके १०६० त चंपानेरच्या प्रताप बिंबाने उत्तर कोंकण जिंकून तेथे वसाहत करण्यासाठी जे लोक आणिविले त्यांत सत्तावीस सोमवंशी कुळे होती. त्यांनतर शके १२१६ त देवगिरीच्या बिंबदेवाकडे कोंकणाचे राज्य आले. त्यानेंहि सोमसूर्यवंशी सरदारांसह येथे कायम वस्ती केली. नंतर शके १२७० च्या सुमारास कोंकणात तुर्कांण झाले व पुढे शके १४२२ पासून पोर्तुगालहून येथे येत राहीलेल्या फिरंग्यांनी कोंकण किनारा आपल्या ताब्यात घेऊन इ.स. १५८० च्या सुमारास सक्तिने बाटवाबाटवी सुरू केली.
शके १०६० त व १२१६ प येथे आलेल्या क्षत्रियांत मानापमानाचे व उच्चनीचत्वाचे प्रश्र उपस्थित झाले. असल्यास नवल नाही. तशांत नागरशाची भेदनीति व फिरंग्यांची बाटवाबाटवी ह्याचा़ फायदा घेऊन काही स्वार्थसाधूंनी तत्कालीन रूढीप्रमाणे बहिष्कृतीच्या किंवा तत्सम अस्त्राचा उपयोग केला व एकाच सोमवंशांतील निरनिराळी कुलनामे किंवा समूहनामे जातिवाचक बनली. तशापैकीच सोमवंशीतील चौकळशी हे कुलनाम आपला सोवळेपणा राखण्यासाठी जातीवाचक बनलेले आहे. सरकारदत्परी पहावयास मिळत असलेल्या मुंबईतील जातींच्या मोजणीच्या एका जुन्या तक्त्यावरून असे दिसते की, इ.स. १७६१ ते १७८० दरम्यान चौकळशी हे नाव ठळकपणे प्रचारांत आले.