Kamalini

Kamalini Mulik

मी कमलिनी मधुकर मुळीक.पूर्वाश्रमीची माधुरी काशिनाथ राऊत.का.के.राऊत आणि शशिकला राऊत,वरोर यांची धाकटी कन्या.सद्या मी पालघर येथे रहाते. मी अर्थशास्र आणि राज्यशास्र या दोन्ही विषयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.व्यावसायीक अर्हता म्हणून बी.एड. केले आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाची शिक्षिका म्हणून मी सात वर्षे काम केले आहे.त्यानंतर माध्यमिक विद्यालय ,भगिनी समाज,पालघर येथे दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. सन२०११ ते सन २०१४या काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण राज्यमंडळ पुणे येथे इ.१०वी व १२वी साठी राज्यशास्र विषयाकरीता अभ्यास मंडळ व लेखक मंडळ सदस्या म्हणून माझी निवड झाली.या काळात ज्ञानरचनावादावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे व त्यानुसार पुस्तकांचे लेखन करण्याची संधी मला मिळाली.सद्या विद्यार्थी अभ्यासत असलेल्या नविन अभ्यासक्रमाच्या इ.१०वी व इ.१२वी च्या राज्यशास्र विषयाच्या पुस्तकांत माझे लेखन समाविष्ट आहे.आजतागायत विविध वृत्तपत्रात माझे लेखन प्रसिद्ध झाले आहे. माझे पती प्रा.मधुकर बाळकृष्ण मुळीक,सोनोपंत दांडेकर वरीष्ठ महाविद्यालयात अर्थशास्र विषयाचे प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते.सन २००९मध्ये ते निवृत्त झाले. आम्हाला दोन कन्या आहेत.मोठी मानसी विवाहीत आहे.तीला एक कन्या आहे.मानसी IdusInd Bank ltd मध्ये मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Government Banking Group)या पदावर कार्यरत आहे. धाकटी वैदेही शास्रीय संगीत गायिका आहे.मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन तीने गणित या विषयात पदवी संपादन केली आहे.ती गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद असून शास्रीय संगीतात एस.एन.डी.टी.विद्यापीठाची एम.ए. आहे.तीचे आजवर अनेक ठीकाणी शास्रीय,उपशास्रीय आणि सुगम गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.आजमितीला ३०विद्यार्थी तिच्याकडे शास्रीय,उपशास्रीय गायन आणि वादन शिकत आहेत.

माझ्या आठवणी-भाग-५

1905

माझ्या आठवणी ... (भाग५) 
कमलीनी मुळीक. (माधुरी राऊत) पालघर
दि. ४ आॅगस्ट २०१७.

१९६३ ते१९७६ या कालावधीत, तलासरीच्या जि. प. च्या शाळेतच बाबा मुख्याध्यापक आणि तालुका मास्तर म्हणुन काम पहात होते आणि आदिवासी मुलांचे वसतीगृहही सांभाळत होते. त्याच जि. प. च्या शाळेत आम्हा भावंडांचे प्राथमिक शिक्षणही झाले. मात्र तेथे आम्हाला बाबांकडून वा इतर कोणाकडूनही, 'स्पेशल ट्रिटमेंट' कधीच मिळाली नाही.

या शाळेशी माझे नाते माझ्या वयाच्या दुसर्‍या वर्षापासून जोडले गेले. त्या वेळी शासनाने सरकारी शिवणकामाचा वर्ग तेथील आदिवासी महिलांसाठी सुरु केला होता आणि त्यात पाच महिला बिगर आदिवासी होत्या. त्यातून आईचा नंबर लागला होता. माझ्या आईची शिवणकामाची जी वही मी अजूनही वापरते त्यात पहिल्या दिवसाची तारीख ९ मार्च १९६५ अशी आहे आणि शेवटच्या दिवशीची तारीख २९ जानेवारी १९६६ अशी आहे. त्यावर तपासणी अधिकार्‍याची सही आहे.
‌आईने शिवणक्लासला जायचे ठरविले तेव्हा विकास व अलका तीसरीत होते. मोठी ताई आठवीत ठक्करबाप्पा हायस्कूल मधे शिकत होती. शिवण क्लास बाबांच्याच शाळेत सुरु करण्यात आला होता. मी दोनच वर्षाची असल्याने मला सांभाळण्यासाठी बाबांनी त्यांच्या आईला म्हणजे माझ्या आजीला आणून ठेवले होते.(तीला आम्ही सर्वच नातवंडे  'आया ' म्हणत असू) ती तीन चार महिने राहिली पण नंतर तिला कंटाळा यायला लागला कारण सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत मला घेउन तीला एकटीलाच रहावे लागे. त्यामुळे मग बाबांनी तीला वरोरला आणून सोडले.

‌आईला तर शिवणक्लास बंद करायचा नव्हता, म्हणून मग शिवण क्लासच्या श्री. नाझरे गुरुजींना तिने परिस्थिती सांगीतली आणि मला घेऊन क्लासला येण्याची त्यांनी तीला परवानगी दिली. त्यामुळे आई, मी, अलका, विकास आणि बाबा असे सर्व जण एकाच वेळी शाळेत जात असू. श्री. नाझरे गुरुजी आईला म्हणाले की, 'बाई घरच सर्व करुन हे झेपेल का तुम्हाला?' पण आईने हे सर्व पेलले, एवढेच नाही तर शिवणकामाच्या परीक्षेत ती ठाणे जिल्ह्यात प्रथम आली. तिच्या हयातीत आम्हा मुलांचे आणि बाबांचे सर्व कपडे ती स्वतःच शिवत असे आणि बाहेरचेही अगदी गरजू असतील त्यांनाही ती कपडे शिवून देत असे.
आई शिवणकामाला बसली की मी तीच्या समोरच एक स्टूल घेऊन बसे. तिला कपडे शिवताना पाहणे मला खूप आवडे. अतिशय सुबक असे कपडे ती शिवत असे. आईने शिवलेलेच लेंगा शर्ट बाबांनीही आयुष्यभर वापरले.

जंगलपट्टीमुळे तलासरीला थंडी खूप असायची. पांघरायला आई गोधड्या शिवायची. पण स्वेटर्स ची चैन परवडणारी नव्हती. आमच्या आजूबाजूला रहाणार्‍या माझ्या सर्व मैत्रिणी थंडीत तर्‍हेतर्‍हेची स्वेटर्स/रंगीबेरंगी कोट वापरत. मी एकदा आईला म्हटल, 'मला पण असा कोट दे ना शिवून'. आई माझ्यासाठी जे जे शक्य ते सारे करीत असे. (मला नेहमी  असे वाटते की , प्रत्येकाची आई ही 'श्यामची आई'च असते माझीही आई तशीच होती.) मी संध्याकाळी शाळेतून घरी आले तेव्हा आईने खरच माझ्यासाठी कोट शिवला होता आणि त्या साठी तीने एक जुने, मोठ्या मोठ्या चौकड्यांचे ब्लॅंकेट वापरले होते. थंडीच्या दिवसांत मी ते स्वेटर दिवसभर वापरत असे.
ते स्वेटर मी दोन तीन वर्षे वापरले.

एकदा तीने माझ्यासाठी एक खूप सुंदर असा वनपीस शिवला. (चित्रपटात साधना  वापरायची ना तसा. तीला बहुतेक साधना आवडत असावी. कारण माझे केस विंचरल्यानंतर ती साधनासारखे माझ्या कपाळावर केस काढत असे.) शिवणकामाचे पहिले प्रयोग ती माझ्यावर करी. प्लेन केसरी रंगाचा वनपीस आणि त्यावर शो बटणे लावली होती. मला तो ड्रेस खूप आवडला.तेव्हा आमच्याकडे कोळशाची इस्री होती. मला म्हणाली, 'मी इस्री करुन देते नंतर घाल.' तीने इस्री करायला घेतली पण इस्री खूप तापली होती त्यामुळे शो बटणे जळाली मी खूप रडले आईलाही वाईट वाटले पण तीने लगेच दुसरी शो बटणे लाऊन मला माझा ड्रेस जसाच्या तसा करुन दिला.

आईच्या शिवणक्लासमुळे वयाच्या दुसर्‍या वर्षापासूनच मी शाळेची पायरी चढले. (अर्थात तेव्हा बालवाडी, अंगणवाडी असा प्रकार नव्हता.) आई म्हणायची की मी काहीवेळा अलका विकास बरोबर त्यांच्या वर्गात बसत असे, आईच्या वर्गात चिंध्या घेऊन खेळत असे किंवा शाळेच्या बाजूला एक कुंभाराचे घर होते त्यांच्याकडे माती घेउन खेळत असे. एकंदरीत सर्जनशील वातावरणात मी घडत होते. पण नंतर आईचा एक वर्षाचा शिवणकामाचा कोर्स पूर्ण झाला तरी मी, अलका विकास बरोबर शाळेत जाऊन त्यांच्याच वर्गात बसत असे. अशी तीन वर्षे गेली आणि माझा इयत्ता पहिलीत प्रवेशाचा क्षण आला. पण काही केल्या मी दुसर्‍या वर्गात बसायला तयार होईना. कदाचित शिक्षकांनी बाबांना सांगीतले असावे. त्यामुळे बाबा मला शोधत आले. बाबांना पहाताच मी खिडकीवर चढले त्यामुळे बाबांनी व्हरांड्यातुन दोन फेर्‍या मारुनही मी त्यांना दिसले नाही. पण अलका विकास पैकी कुणीतरी बाबांना जाऊन माझा ठावठिकाणा सांगीतला आणि एरव्ही कधी कुणावर हात ही न उगारणारे  बाबा हातात छडी घेऊन आले आणि स् sssपssकन छडी माझ्या पायावर बसली. त्यानंतर मात्र मी अलका विकास च्या वर्गाचे तोंडही पाहीले नाही. बाबांची छडी खाल्ली ती सुध्दा पहिली आणि शेवटचीच. अशारीतीने माझा शालेय जीवनाचा प्रारंभ झाला........!

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

8 + 4=    get new code
Post Comment