माझी आई ! (भाग २)
माझ्या आईबरोबरचा असाच एक प्रसंग माझ्या मनावर कोरला गेलाय.
तलासरीला असताना आम्ही कधीकाळी कापडांची खरेदी करायची असली तर डहाणूला किशोर भाईंच्या दुकानात जात असू.माझे आजोबा(आईचे वडील) पूर्वी त्यांच्याकडे काम करीत त्यामुळे तेथे आम्हाला कपडा चांगला ,योग्य भावात आणि मुख्य म्हणजे उधारीवरही मिळत असे.तसच वर्षाचे काही साठवायचे असेल तर उंबरगावला जायचो. डहाणू,उंबरगाव आणि संजाण वरुन तलासरीसाठी एस.टी.च्या बसेस सुटायच्या,पण अगदी मोजक्याच.
असेच एकदा आम्ही दिवाळीच्या सुमारास खरेदीसाठी डहाणूला गेलो होतो.माझा मोठा भाऊ, आई आणि मी. (माझ्या आठवणीप्रमाणे नोव्हेंबर १९७१ मधला हा प्रसंग आहे).माझे बाबा सतत शाळेच्या कामात गढून गेलेले असायचे.एकतर तालुका स्कूल असल्याने कामही खूप असे.शिवाय आदिवासी मुलांचे वसतीगृहही बाबांनाच सांभाळावे लागे. त्यामुळे कामाचा व्यापच इतका असे की खरेदीला वगैरे आमच्या बरोबर येणे त्यांना शक्य होत नसे.
डहाणूहून तलासरीला येणारी शेवटची बस रात्री ८-८.३० ला सुटायची.त्या दिवशी आम्ही डहाणूला जातानाच जरा उशिरा गेलो होतो आणि खरेदीकरुन बस स्टॅंडवर येइपर्यंत ८.३॰ होऊन गेले होते. शेवटची बस सुटली होती.
तेव्हा आजच्यासारखी त्वरीत संपर्काची साधने नसल्याने घरी बाबांना काहीच कळवता येणे शक्य नव्हते.रात्र डहाणू स्टेशनवर काढावी लागणार असे वाटत होते.पण स्टेशनवर चिटपाखरुही नव्हते. आईच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते. मी ७-८ वर्षाची आणि मोठा भाऊ १८-१९ वर्षाचा यांना घेऊन एका तरुण बाईने ऊघड्यावर रात्र काढायची हे सोपे नव्हते.तेवढ्यात तेथे कोणीतरी आले आणि म्हणाले रेल्वे ओलांडून पलिकडे जा तेथे एखादा ट्रक मिळेल तुम्हाला.रात्रीच्या वेळी ट्रक ने जायच्या कल्पनेने तर आईच्या पोटात गोळाच आला .पण पर्याय फक्त दोनच,स्टेशनवर रात्र काढणे किंवा ट्रकने जाणे.एकाची निवड करणे भागच होते.
त्या वेळी मुंबई अहमदाबाद हायवे बहुतेक नुकताच तयार झाला होता. त्यामुळे रात्रभर ट्रकची तुरळक वाहतूक सुरु असायची असायची.डहाणू हून चारोटी मार्गे हायवेने तलासरीला जाता येत असे. एक दिड तासाचा प्रवास.थंडी खूप होती.आम्ही रेल्वे ट्रॅक ओलांडून पूर्वेला आलो.माझा भाऊ दिसेल त्या ट्रकला हात दाखवत होता.तास दिड तासाच्या प्रयत्नानंतर शेवटी रात्री११च्या सुमारास एक ट्रक थांबला.तो सेल्व्हासला जाणारा ट्रक होता त्यामुळे आमच्या घराजवळूनच जाणारा होता.ट्रक मोठा होता .समोर ड्रायव्हर क्लिनर आणि त्यांच्या मागे एक सीट .ड्रायव्हर क्लिनर आणि सामानाची चढ उतार करणारी आणखी दोन माणसे होती ट्रक मधे.
त्या ड्रायव्हरने मागच्या दोघांना टपावर बसायला सांगीतले आणि आम्हाला ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर आम्ही जीव मुठीत घेउन मागच्या सीट वर बसलो.ट्रक निघाला. सामानाच्या दोन तीन पिशव्या असल्याने आम्ही तिघे जेमतेमच बसलो होतो.आईने खांद्यावरून पदर घट्ट आवळून घेतला.त्या वेळी तिच्या मनात कोणकोणते विचार आले असतील हे आज आठवले तरी कापरे भरते.कारण प्रसार माध्यमांमुळे किंवा Crime Patrol सारख्या मालिकांमुळे आज समाजात काय काय घडत हे आपल्याला कळत.पण त्या वेळीही अशा घटना घडत नव्हत्या असे नाही.
सगळीकडे गुडुप अंधार.डहाणू चारोटीपर्यतचा त्यावेळचा रस्ताही तसा निर्मनुष्यच...रातकिड्यांचा किsर्र र्रssर्रs आवाज आणि रोरावत चाललेला आमचा ट्रक...मधेच आम्हाला ओव्हरटेक करणार्या एखाद्या वाहनाचा उजेड.. असाच काही वेळ निघुन गेला .मी बहुतेक डुलक्या काढु लागले होते आणि आई मला सारखी हलवून जागे करीत होती. इतक्यात मधेच ड्रायव्हरने ट्रक थांबवला...काय झाले कळेना .तो खाली उतरला आणि माझ्या भावालाही खाली उतरवले.आई म्हणाली काय झाले ?..तो काही बोलला नाही. पण त्याने माझ्या भावाला दुसर्या दोघांबरोबर टपावर बसायला सांगितले.भाऊ म्हणाला हरकत नाही मी बसतो टपावर.आई तर थरथरायला लागली. तिचा तो भयकंप आजही मला जाणवतो.कुठे अवदसा आठवली आणि ट्रक मधे बसलो असे तिला झाले असावे.पण आता ती काहीच करु शकत नव्हती. आई त्या ड्रायव्हरला म्हणाली,अहो त्याला वर नका पाठवू पडेल तो.त्याला आतच बसू दे.' तर ड्रायव्हर म्हणाला ,'नाही पडणार ,तो बसेल वर दोघांबरोबर, तुम्ही मोकळेपणाने बसा पोरगीला झोपायच असल तर झोपू द्या.' खरतर आईच्या दृष्टीने मी जागी राहणे सुरक्षित होते.
भाऊ वर बसला.पुन्हा ट्रक निघाला.आता आईने अंगाभोवती पदर आणखी घट्ट आवळून घेतला. त्या नंतर मी जागीच होते पण तरी मधुन मधुन मला ती सारखे हलवून मी जागी असल्याची ती खात्री करुन घेत होती.आता त्याक्षणी तीला फक्त माझाच आधार होता.तिने मला घट्ट आवळून धरले होते.
थोड्यावेळाने ट्रक चालवता चालवता तो ड्रायव्हर इकडे तिकडे काहितरी शोधू लागला. अंधारात आम्हाला फक्त त्याची हालचाल कळत होती .तो अस्वस्थ असावा.त्याने परत ट्रक थांबवला आणि सीटच्या मागून काहितरी काढले.तो खाली ऊतरला. आईने मनात विठ्ठलाचा धावा सुरु केला.तिचे पुरते अवसान गळाले होते.पण घडले वेगळेच.त्याने एक ब्लॅंकेट काढले आणि टपावरच्या माणसाला हाक मारली.'अरे, त्या मुलाला थंडी वाजत असेल त्याला हे ब्लॅंकेट दे'.थंडीने कुडकुडु नये म्हणून त्याने भावाला ब्लॅंकेट दिले होते.आता आई हळू हळू सावरायला लागली.पण आईच्या मनातल्या त्याच्या बद्दलच्या शंका कुशंका त्याने बरोबर हेरल्या होत्याआणि आता तो आईच्या मनातील भिती घालवण्यासाठी सतत काही ना काही सांगू लागला बोलू लागला.आई मात्र मधे मधे फक्त हं हं च करीत होती.
चारोटीनंतर गाडी हायवेला लागली. महालक्ष्मी,दापचरी ही ठीकाणे गेली.वडवली आले(येथे नव्याने बांधलेले मिशन हाॅस्पिटल होते) आता अचानक तो भुताखेतांंच्या गोष्टी सांगू लागला. तो म्हणाला ,'ताई,येथे कोपर्यावर रात्री बरोबर बारा वाजता एक पांढरी साडी नेसलेली खूप सुंदर बाई उभी असते खूप जणांना दिसते, दागीने वगैरे घालून उभी असते ट्रकवाल्यांना हाका मारत असते.' मी म्हटले कुठे आहे?तो म्हणाला' बेटा आता साडेबारा वाजून गेलेआता नाही दिसणार.' आईच्या मनातील भिती आता थोडी कमी झाली असली तरी पूर्ण गेली नव्हती.पण आमचे जे पुरते बारा वाजणार होते तसे मात्र काही घडले नव्हते. त्या चौघांपैकी एकाच्याही मनात त्या वेळी काही वाईट आले असते तर ती रात्र आमच्यासाठी काळरात्र ठरली असती....
आता घर जवळ आले होते ..दहापंधरा मिनीटांनी हायवे सोडून उधवा रोडवर आमच्या घरापाशी ट्रक थांबला . रात्रीचा पाउण वाजलेला.मिट्ट काळोखात त्या ड्रायव्हरने आमचे सामान हातात घेतले आणि आम्हाला तो घरापर्यंत सोडायला आला.भितीची अनेक प्रश्नचिन्हे चेहर्यावर घेउन बाबांनी हातात कंदिल घेऊन दार उघडल. ड्रायव्हरने आमच्या कडून एकही पैसा घेतला नाही.चहाही नको म्हणाला.मग बाबांनी आमच्या घरची एक पपई त्याला दिली.पण जाता जाता आईकडे पाहत तो म्हणाला,ताई सर्वच ट्रकवाले वाईट नसतात.तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता. पण आम्हीही बायका पोरंवाली माणस आहोत.आई तर काही बोलूच शकली नाही कारण तिला सैतान वाटलेला तो ट्रक ड्रायव्हर चक्क देवमाणूस निघाला.तो निघून गेल्यावर मात्र ती तिच्या पांडूरंगासमोर हात जोडून उभी राहिली.... तो देव माणूस आता कुठे असेल ,कसा असेल माहित नाही पण तो जेथे कोठे असेल तेथे त्याला माझे कोटी कोटी प्रणाम....!!!
-कमलिनी मुळीक.(माधुरी काशिनाथ राऊत.)
पालघर
दि. १४ जुलै २॰१७
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
जवळ जवळ ५० वर्षा पुर्विचा प्रसंग तुम्ही अगदी काल परवा घडला असावा अश्या पद्दतिने वर्णिला आहे,खुप सुंदर....जो पर्यन्त अशे लोक(ड्रायवर)ह्या भूतलावर आहेत तो वर आपल्या ह्या धरणी मातेच रक्षण होनार ह्या बाबत खात्री आहे.धन्य तो देवमाणूस.