माझ्या आठवणी-भाग ८
कमलिनी मुळीक. पालघर. दि.२५आॅगस्ट२०१७.
तलासरीला अखिल भारतीय महिला परिषदेचा एक दवाखाना होता.तिथे डाॅ.व्यास पती पत्नी काम करीत. डाॅ.व्यास नेहमी पांढरे शुभ्र धोतर आणि बंडी असा वेश परिधान करीत.डाॅक्टर सडपातळ,मध्यम उंची आणि अतिशय मित भाषी होते.तुलनेन व्यास बाई मध्यम उंची ,थोड्याशा स्थूल ,आणि खूपच बोलक्या. पांढरे शुभ्र नऊवारी पातळ, कमरेपर्यंत उंचीचे पांढरे ब्लाउज,कपाळावर मोठे कुंकू,केसही पूर्ण पांढरे . दोघेही अतीशय प्रेमळ.लहान मुल तर त्यांना खूप आवडायची.त्यांनी रुग्णसेवेबरोबरच समाजसेवेचेही व्रत घेतले होते. खेड्यापाड्यात वेगवेगळे आरोग्यविषयक व जनजागृतीचे उपक्रम तेथल्या आदिवासी महिला मुलांसाठी त्या करीत. सरकारी दवाखान्याची एक मोठी रुग्णवाहिका होती. खेडोपाडच्या भेटीच्या प्रत्येक वेळी आम्हा सर्वांना त्या रुग्णवाहिकेतून घेउन जात.व्यास बाई एकट्या आणि आम्ही सात आठ मुल. तिथल्या आदिवासींमध्ये व्यास बाई अगदी मिळून मिसळून जात .व्यासबाई गाडीतून उतरल्या की त्यांच्याभोवती पाड्यावरची सर्व लोक जमत बाई सर्वांना, सोबत नेलेला भरपूर खाउ वाटत. .मग दिवसभर गाणी ,गप्पागोष्टी ,विविध खेळ ... अशी खूप मजा येई.संपूर्ण तलासरी तालुक्यात त्यांनी आम्हाला फिरविले आहे.
व्यास बाईंना झाडापानांची खूप आवड.त्यांनी परसदारी खूप फुलझाडे लावली होती. पारिजात,मधुमालती,तगर,अनंत,जाईजुई, मोगरा ,बटमोगरा,मदणबाण अशी एक ना अनेक फुलझाडे.फुलांनी डवरलेली. माझे तर भान हरपून जात असे.संपूर्ण कुंपणाला पारिजात लावला होता.मागीलदारी मदणबाण होता.श्रावणात पारिजाताचा सडा पडे आणि मदनबाण तर इतका फुले की पान दिसत नसे. सर्व परिसरात सुगंध दरवळत असे .आम्ही मुल सकाळी फुल वेचायला जात असू.आम्हाला हवी तेवढी फुले त्या वेचू देत ,तोडू देत.तलासरीच्या वास्तव्यात असा एकही दिवस गेला नाही की आम्ही व्यासबाईंकडून फुले आणली नाहीत.कधीही त्या आमच्यावर रागावत नसत.सर्वात जास्त फुले मी आणी. मी त्यांना हार गजरेही करुन देई त्यामुळे त्यांना माझे खूप कौतुक होते.मला तर त्या 'फुलराणीच' म्हणत.त्यांना पुजेला हवी असलेली फुले त्या घेत बाकी सारी आमच्यासाठी.
तलासरीतील आम्हा सर्वांसाठी हे डाॅक्टर दांपत्य देवासारखे होते.कधीही, केव्हाही, कोणाच्याही मदतीला हे दांपत्य हजर.मला आठवत माझे दोन भाऊ मुदतीच्या तापाने (Typhoid)आजारी होते .तब्बल बेचाळीस दिवस.विकास तर तापात खूप बडबड करायचा,रात्रीचा दार उघडून बाहेर जायला बघायचा.पण त्या अवस्थेतुन त्यांनी दोघांनाही वाचवले.माझ्या ताईला पहिल्या बाळंतपणानंतर जळवात झाला होता तीला सहन होत नसे .हात पाय आपटत असे तिलाही त्या अवस्थेतुन त्यांनी बरे केले.
एकदा आईच्या नकळत, विकास सायकल शिकण्यासाठी कुठुनतरी सायकल भाड्याने घेउन आला.तिथे बाजुच्या कंपाउंडमधे गुरांचा दवाखाना होता आणि तेथील कर्मचार्यांची वसाहत होती.सिमेंटची घरे.सुट्टीत बरेच जण गावी जात .त्यामुळे दोन घरामधली जागा मुले खेळासाठी वापरत.घरच्यांनाही कळत नसे.विकास आणि माझी बहीण अलका दोघांची जोडी होती आणि मी म्हणजे त्यांना 'आईचा दूत(हेर)' वाटत असे.त्यामुळे मला ते त्यांच्या 'प्लॅन्सचा' पत्ता लागू देत नसत.
पण त्या दिवशी मी त्यांच्या मागोमाग गेले आणि भिंतीच्या आडून दोघांचे सायकल शिकणे पाहू लागले.विकासने दोन तीन फेर्या मारल्या असतील आणि एकदम तो तोल जाऊन जोरात भिंतीवर आपटला.त्याचा हात पूर्ण वाकडा झाला होता.पण तो हूं की चूं करत नव्हता.मी धावत जवळ गेले तर माझ्यावर खेकसून म्हणाला,'तु कशाला आली इकडे,आता आईला काही सांगू नको' .तरी मी तेथून धूम ठोकली आणि आईला घडला प्रकार सांगीतला.आई तर हातातले काम टाकून धावत आली .त्याला घेउन दवाखान्यात जायला निघाली तर हा दवाखान्यात पण यायला तयार नाही. आईने कसेबसे त्याला व्यास बाईंच्या दवाखान्यापर्यंत आणले.व्यास बाईंनी तर पाहिल्या बरोबर सांगीतले की याचा हात मोडला आहे.पण तरीही विकास एकदम शांत.बाईंनी आईला सांगीतले आपल्याकडे उपचाराची सोय नाही मी तात्पुरते बॅंडेज करते ,आपण याला डहाणूला नेउया.आईचा तर धीरच सुटला.कारण येथे उपचार होऊ शकत नाही म्हणजे काहीतरी गंभीर असणार असे तीला वाटले.
व्यास बाईंनी लगेच अॅंब्युलन्स काढली आणि आई,मी, विकास आणि त्या स्वतः असे डहाणूला मिशन हाॅस्पिटल मधे गेलो.त्यांनी लगेच त्याचे screening करायला सांगीतले .(पूर्वी आता सारखी एक्स रे ची सोय नव्हती एका पडद्यामागे पेशंटला उभे केले जाई आणि मशीन चालू केले की समोरच्या बाजुला रुग्णाच्या हाडांची छबी दिसे.) विकासला screening च्या पडद्यामागे उभे केले आणि पाहिले तर त्याच्या कोपर्यापासूनच्या हाडाचा चक्क ' झाडू ' झालेला.तेथे त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली विकासच्या हाताला व्यवस्थीत प्लास्टर केले आणि आम्ही घरी आलो.रात्र झाली होती.एवढा वेळ व्यासबाई आमच्या सोबत राहिल्या.एवढेच नाही तर ४० -४२ दिवसांनी हाताचे प्लास्टर काढायलाही त्या आमच्या बरोबर डहाणूला आल्या. तलासरीच्या प्रत्येक कुटुंबात अगदी घरातल्या व्यक्तीसारखे स्थान व्यास बाईंना होते.सर्वांना सर्व प्रकारच्या सेवा त्या विनामूल्य पुरवित.
तलासरीला एक मांगेला कुटुंब होते.दमणकर आडनावाचे.आदिवासी सोसायटीच्या जीप वर ते ड्रायव्हर होते.सर्वजण त्यांना 'ड्रायव्हर काका' आणि त्यांच्या पत्नीला 'ड्रायव्हर काकू' म्हणायचे.ड्रायव्हर काकू तलासरीच्या नाक्यावरील 'मासे बाजारात' मासे विकायच्या.(नाक्यापासून आमचे घर पंधरा मिनीटावर होते.मी अगदी दुसरी तीसरीत असल्यापासून आई मला त्यांच्याकडे बाजारात मासे आणायला पाठवी .फक्त पिशवी आणि पैसे घेऊन जायचे .जे काय चांगले, ताजे असेल ते त्या पिशवीत भरुन देत.ताजे मासे,खराब मासे कसे ओळखायचे , माशांचे वेगवेगळे प्रकार कोणते हे सर्व मी तेव्हाच शिकले .)ड्रायव्हर काकूंची सून होती गीता आणि नात प्रतिमा ,तीला खेळवायला आम्ही त्यांच्याघरी जायचो.हे संपूर्ण कुटुंब अतिशय प्रेमळ.मला मासे साफ कसे करतात ते बघायला खूप आवडायचे त्यामुळे मासे साफ करायला घेतले की गीता वहीनी मला हाक मारुन बोलवायच्या.
एकदा त्यांनी खूप मोठी भिंगी आणली .(एक खूप काटेरी पण चविष्ट मासा) .साफ करायला घेण्यापूर्वी त्यांनी मला बोलावले.मी आईला सांगून तेथे गेले.त्यांनी मागच्या दारी पडवीत विळीवर मासे साफ करायला घेतले.मी समोरच उभे राहून ते बघत होते. बाजुलाच परसबाग होती नुकतेच त्यांनी करवंदांच्या फांद्यांनी कुंपण बांधुन घेतले होते.(पूर्वी परसबागेला असे काट्याकुट्यांचे कुंपण करीत पण ते दरवर्षी करावे लागे.)गीता वहिनीने सकाळीच पापड करुन कुंपणाच्या आत खाटेवर (काथ्याच्या दोरांनी विणलेली चारपायी)वाळत घातले होते. मी मासे कापणे पहात असताना मला अचानक गरगरायला लागले म्हणून मी त्या कुंपणाच्या आत पापडाच्या खाटेवर बसता येईल म्हणून वळले पण त्या आधीच कुंपणाच्या दरवाज्याकडे असलेल्या विटांवर धाडकन खाली कोसळले.तोंडावरच पडल्याने माझ्या नाकाला जखम झाली आणि रक्त यायला लागले, करवंदाचे काटे चेहर्यावर जिकडे तीकडे घुसले .गीता वहिनी खूप घाबरल्या. त्यांचे हात माशाच्या रक्ताने माखले होते त्यांनी धावत पुढे जाउन व्यासबाईंना मोठमोठ्याने हाका मारल्या.व्यासबाई पण धावतच आल्या त्यांनी काटे बाजुला करुन मला उचलले आणि दोन्ही हाताने छातीशी पकडून मला दवाखान्यात आणले .जखम धुतली बॅंडेज केले इंजेक्शन दिले. तोपर्यंत गीतावहिनीने आईला बोलाउन आणले. त्यानंतर जवळजवळ तासभर व्यास पतीपत्नी माझ्याजवळ बसून होत्या.
प्राणीमात्रांवरही त्यांचे खूप प्रेम.एकदा आमच्याच परिसरात कसलेसे शिबीर होते आणि संपेपर्यंत अंधार झाला होता.आम्हाला घेउन व्यासबाई निघाल्या तर कुठुनतरी कुत्र्याच्या पिल्लाचे विव्हळणे ऐकू आले. तशाच अंधारात चाचपडत आम्ही त्या पिल्लाचे ठिकाण शोधले .बाईंनी अंधारात चाचपडून पाहिले तर पिल्लू कशात तरी अडकलेले.मला त्यांनी बॅटरी आणायला सांगीतले .मी धावत जाउन बॅटरी आणली.त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले तर त्या कोवळ्या पिल्लाचा पाय तारेच्या कुंपणात अडकलेला आणि बाहेर निघण्याच्या झटापटीत त्याच्या पायाची त्वच्या तारेत अडकलेली .त्यांनी मला पुन्हा घरी पाठवून एक नविन ब्लेड मागवले आणि त्या पिल्लाची अडकलेली त्वचा कापून त्याला मोकळे केले एवढेच नाही जसे मला छातीशी पकडून दवाखान्यात नेले तसेच त्या पिल्लालाही छातीशी पकडले आणि दवाखान्यात नेउन त्याच्यावर उपचारही केले.ते पिल्लू नंतर त्यांच्याच कडे वाढले.
डाॅ .व्यास पतीपत्नी आता नाहीत .काही वर्षापूर्वी मी, सुहास, वहिनी,माझे पती आणि मुलींना घेउन तलासरीला गेले तेव्हा व्यास बाईंना भेटले होते .मला त्यांनी अगदी प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाल्या , ' माझी फुलराणी ... !!!'
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.