तेजसस्पर्शाने दूर होई अंधार,
जैसा मुळांचा वृक्षास होई आधार,
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार,
मना घडवी संस्कार, मना उध्दरी संस्कार,
मना आकारी संस्कार, मना बुध्दि दे संस्कार, मना शक्ती दे संस्कार.
खरच, मानवाच्या आयुष्यावर बरे वाईट परिणाम करणारे संस्कार हे किती महत्त्वाचे असतात ते प्रत्येकाच्या वागण्यातून प्रत्ययास येतात. मूळ संस्कार हे घरातच शिकविले जातात. शाळेत त्याला आकार दिला जातो. संस्कारी मन अधिक सुंदर घडविण्यासाठी गुरूजन शिकवण देतात. साने गुरुजींच्या घरातूनच त्यांना संस्कार घडविले गेले. "शामची आई" या पुस्तकात श्याम स्वत:च्या पायाला माती लागू नये म्हणून जपत असतो, तेव्हा त्याला त्याची आई उद्देश करते कि ‘जसा तू स्वत:च्या पायाला माती लागू नये म्हणून जपतोस तसाच तू स्वत:च्या मनाला जप. त्याला अपवित्र होऊ देऊ नकोस’. हिंदवी स्वराज्य संस्थापक व गो-ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या आईने संस्कार दिले. स्वत:चे वडील शहाजीराजे हे निजामाच्या दरबारी नोकरीत होते. परंतु मुसलमानानी जनतेवर चालू केलेले अत्याचार पाहून आपण आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करावे व आपल्या मर्द मराठी मावळ्याचे रक्षण करावे हा विचार शिवाजी महाराजांच्या मनी आला तो जिजाऊ मातेच्या शिकवणीमुळेच. त्यांनी शिवाजी महाराजांना लढाऊपणाच्या शिकवणीबरोबरच स्त्रियांना मानाने कसे वागवावे, त्यांचा सन्मान कसा करावा या विषयी संस्कार घडविले. परस्त्री मातेसमान मानावी हे बिंबविले. कल्याणच्या सुभेदाराची सून रायगडावर आणली असता शिवाजी महाराजांनी तिला पाहिले आणि त्यांच्या मुखातून शब्द उमटले "अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती तर आम्ही ही सुंदर झालो असतो" आणि शिवाजी महाराजांचे हे शब्द ऐकताच ती सुंदर स्त्री हरणी सारखी चकित झाली, भयकंपीतही झाली कारण यवनांच्या नजरेस जर एखादी सुंदर स्त्री पडली तरी तिला ते बळजबरीने पळवून नेत असत म्हणून शिवाजी महाराजांना समोर बघून ती घाबरली; परंतु शिवाजी महाराजांनी तिचा गैरफायदा न घेता त्या व सौंदर्याच्या प्रतिमेला माता मानून तिला अंलकार तसेच वस्त्रभुषणे देऊन सन्मानाने परत तिच्या सासरी म्हणजेच कल्याणच्या सुभेदाराकडे परत पाठवले असं हे संस्कारी मन.
एका लहान मुलाने अगदी लहानपणी एक वस्तू चोरली आणि घरी नेली. आईने ते पाहिले परंतु त्याला तिने ही वस्तू आपली नाही, ही तू कुठून आणली असशील तिथे परत कर म्हणून सांगितले नाही. असा क्रम पुढे चालू राहीला. मुलगा अट्टल चोर बनला. एका मोठ्या चोरीमध्ये तो पकडला गेला, त्याला शिक्षा झाली. न्यायाधिशाने त्याला विचारले, तुझी शेवटची इच्छा काय आहे सांग. त्यावर त्या मुलाने सांगितले की मी माझ्या आईला कानात काहीतरी सांगू इच्छितो. त्याला परवानगी मिळाली. आई जवळ येताच त्या मुलाने आईच्या कानाचा चावा घेतला आणि म्हटले जर सुरूवातीलाच तू मला चोरी करण्यास अडविले असतेस, तर मी आज अट्टल चोर झालो नसतो. इथे परत एका मातेनेच आपल्या मुलाला वाईट संस्कार दिले, त्याप्रमाणे मुलाचे मन वाईट संस्काराने घडले.
वेगवेगळ्या कुटुंबात तसेच वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे संस्कार बघावयास मिळतात. त्याचे उत्तम उदाहरण दाखवावयाचे झाले म्हणजे दोन पाळीव पोपटांची गोष्ट आठवते. एकाच माणसाकडील एकत्र राहत असलेल्या दोन पोपटांपैकी एक पोपट एका साधूने घेतला व दुसरा गुंडाकडे गेला. साधूकडील पोपट साधूच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या कडून होणारे बोलणे ऐकून आदर व स्वागत करू लागला, परंतु गुंडाकडील पोपटाच्या तोडून शिव्या, मारामारी ची भाषा बोलू लागला. म्हणजेच संस्कार हे प्रत्येक व्यक्तीच्या तसेच कुटुंबातील वातावरणाशी निगडीत आहेत. सकाळी स्नान केल्यावर आई-वडिलांना नमस्कार केला जातो. देवाच्या चरणी लीन व्हावे, नतमस्तक व्हावे हा हेतू त्यामागे असला तरी त्यामागे शास्त्रीय दृष्टिकोनही आहे. संध्याकाळी शुभंकरोती म्हणताना 'कल्याण व्हावे सर्वाचे, कोणी दु:खी असू नये' ही प्रार्थना म्हणणे म्हणजेच कोणाचेही वाईट चिंतू नये, हा संस्कार त्यातून शिकविला जातो. दाराशी रांगोळी घालणे हा संस्कार असला तरी वाईट वृत्ती, विचार दारातच थांबावेत, घरात येऊ नयेत हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. म्हणजे चांगले संस्कार हे शास्त्राशी निगडित आहेत. वडिल मंडळींना उध्दट बोलू नये, त्यांचा अपमान करू नये, त्याच्याशी नम्रपणे बोलावे हा संस्कार घरातूनच शिकविला जातो.
आज रेल्वेमध्ये तसेच बसमध्ये भयंकर गर्दी असते. वयस्कर, वृध्दजन यांना कधी कधी उभे रहायलाही जागा नसते. तरुणाई नोकरी साठी दूरवर जात असते, त्यांनाही उभे राहणे शक्य नसते. तरीही काहीं प्रमाणात का होईना काही संस्कारी तरूण-तरूणी वृध्द जनांना बसायला जागा देतात, तर काही कुसंस्कारी त्यांना शिव्या घालतात. कारण ज्या प्रमाणे संस्काराची घडण, त्याप्रमाणे वर्तन घडत असते. बाहेरून आल्यानंतर पायात असलेल्या वहाणा घरात आणू नयेत, तसेच स्वयंपाक घरात चप्पल घालून फिरू नयेत हा नियम म्हणजेच एक प्रकारचा सुसंस्कारच आहे. त्यामागे स्वच्छता हा हेतू आहे. बाहेरील घाण घरात येऊ नये हा हेतू आहे. जेवणाच्यावेळी आपण प्रार्थना म्हणतो "वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते, नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पुर्ण ब्रम्ह. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म”. म्हणजे ताटात जे अन्न असेल, या अन्नाला नांव न ठेवता जेवणे म्हणजे यज्ञ कर्म करणे होय. हा संस्कार या प्रार्थनेतून मिळतो.
हल्लीच्या तरूण स्त्रिया आपणास गर्भधारणा झाल्यावर आपल्या बाळावर चांगले संस्कार व्हावे, बाळ संस्कारी निघावे, आरोग्यदायी व्हावे म्हणून गर्भ संस्कार केंद्रावर जातात. तिथे श्र्लोक, मंत्र पठण करून, ऐकूण गर्भातील बाळावर चांगले संस्कार घडवितात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबा सोबत काका-काकी आणि इतर भावंडं गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असत. घरातील लहान मुलांवर त्यांच्या कडून चांगले संस्कार घडत असत. एखाद मुल जर चुकत असेल तर "तुझे हे वागणे योग्य नाही, असं करू नये" हा उपदेश त्यांना कोणाकडून तरी योग्य वेळी मिळत असे. एखादं खेळणे किंवा खाऊ सर्वांमिळून वाटून घ्यावा, आपलपोटीपणा करू नये, एकमेकास सहाय्य करावे, ही शिकवण त्यांना घरातच मिळत असे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि छोट्या कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील कामावर गेल्यावर मुले घरात एकटीच असतात. म्हणून त्यांना पाळणागृहात ठेवले जाते किंवा त्याचा सांभाळ करायला कोणी तरी बाहेरची व्यक्ती नेमली जाते. पाळणागृहात इतर मुले ज्या प्रमाणे वागतात, त्याप्रमाणे आपले मुल संस्कारीत किंवा कुसंस्कारीत बनते. पाळणागृहात ज्या प्रमाणे इतर मुलांच्या घरातील संस्कार असतील त्याच प्रमाणे आपल्या मुलांवर संस्कार होऊ शकतात. ते आपल्या संस्कारा पेक्षा वेगळेही असू शकतात. तसेच, एकत्र कुटुंब पद्धतीत कधी कधी फाजील लाड ही पुरविले जातात. आता प्रश्न उरतो तो या बऱ्या वाईट संस्काराबद्दल आई-वडीलांनी काय करावे? त्यांच्याशी कसे वागावे?
आई-वडिलांनी आपल्या पाल्याला पाळणागृहातून आपल्या घरी आणल्यानंतर थोडासा मोकळा वेळ काढून आपल्या पाल्याशी शांतपणे बोलावे. आज पाळणागृहात मुले काय काय खेळ खेळले? आपण दिलेला डबा त्यांनी खाल्लेला कि नाही? डबा खायच्या वेळेला इतर मुले सुध्दा त्यांचा डबा खातात कि नाही, की मस्तीचं करतात? तिथली स्वच्छता कशी आहे? इतर मुलांचं संभाषण आपल्या पाल्याशी कसे आहे? त्यांची भाषा कशी आहे? शिवाय आपल्या पाल्याच्या बॅगेत आपण दिलेल्या वस्तूशिवाय इतर मुलांच्या वस्तू आपला पाल्य आपल्या बॅगेत आणीत नाही ना? याकडे लक्ष द्यावे. तसेच आपण बॅगेत दिलेल्या वस्तू परत आणतो कि नाही या कडे लक्ष द्यावे.
तसेच, एकत्र कुटुंब पद्धतीत असलेल्या पाल्यांचे लाड होणारच. कारण दूधापेक्षा दूधावरच्या सायीला जास्त जपलं जातं. अशा वेळी नातवंडांचे लाड होतात, त्याचा हट्टही पुरविला जातो. त्या हट्टाचं गांभिर्य लहान मुलांना कळत नसते. मागितलं कि आपणास मिळतं हा आनंद त्यांना मिळतो. अश्यावेळी नोकरी करणा-या आई-वडिलांनी घरातील वडीलधारी मंडळींशी एकत्र बसून शांतपणे चर्चा करावी. आपल्याला मुलाला कां ओरडावे लागते ते सांगावं; परंतु ही चर्चा मुलांच्या अपरोक्ष व्हावी. कारण जनरेशन गॅप मुळे आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्या विचारात तफावत असते. एकाच वाक्यांचे वयानुसार निरनिराळे अर्थ होऊ शकतात. त्यांच्या भावना दुखावल्या जातात. मुलांसोबत सुसंवाद व्हावा, मुलांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा अर्थ समजावून सांगावा. गरज असेल त्यावेळी धाकही द्यावा. त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडतील याची काळजी घ्यावी. त्यासाठी आपले म्हणजेच पाल्यांच्या आई-वडीलांचे वर्तनही घरातील मंडळींशी चांगले असावे. कारण मुले ही अनुकरण प्रिय असतात. बाबा किंवा आई आजी-आजोबांना ओरडले मग मी त्यांना, म्हणजे माझ्या आईवडिलांना ओरडले म्हणून काय झाले? हा विचार त्यांच्या मनात यायला वेळ लागत नाही.
म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटले आहे “सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो”.
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.