"येवोत किती द्रोणाचार्य – काळ आता उरणार नाही
नवा एकलव्य येतो आहे – दान अंगठ्याचे होणार नाही"
या स्वरचित काव्यपंक्तींनी शैक्षणिक व सामाजिक चळवळीत क्रांती घडवू पाहणारे 'कपिल पाटील' हे 'वरोर' गावचे सुपुत्र. त्यांच्या सामाजिक कार्याची सुरूवात सेवा दलातून झाली. 'छात्रभारती' या व़िद्यार्थी चळवळीचे, कपिल पाटील संस्थापक असून या चळवळीद्वारे त्यांनी गरीब व कष्टकरी विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले.
थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात कपिल ह्यांचा क्रियाशील सहभाग असून, आरक्षण समर्थन परिषद, अंधश्रद्धा निर्मुलन यात्रा संयोजनामध्येही त्यांचा क्रियाशील सहभाग आहे. महात्मा फुले विचार संवर्धन समिती स्थापन करण्यात कपिल यांचा पुढाकार असून फुलेंचे कार्य 'अखंड' कॅसेट रूपाने आणण्याची संकल्पना त्यांचीच. भूपेगाव येथील महात्मा दिलीप शेंडगे स्मारक, शिखर शिंगणापूरची सामाजिक न्याय व बंधुभाव परिषद, सानेगुरूजी चित्रपट संकल्पना, देहूची समतावादी बहुजन परिषद, गांधी आंबेडकर फाऊंडेशन स्थापना, विकासभारती, नवनिर्माण शिक्षण भारती, लोकभारती पक्षाची निर्मिती ही अपत्ये कपिल पाटलांचीच. रात्रशाळांना जी संजिवनी मिळाली तीही कपिल ह्यांच्या मुळेच.
पत्रकारिता ही त्यांची खरी ओळख. अनेक दैनिक व साप्ताहिकांतून त्यानी स्वैर लेखन केले आहे. शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील कळीच्या प्रश्नांना त्यांनी विधान परिषदेत अभ्यासुपणे वाचा फोडली. सरकारने आमदांराना मोठी घरं दिली पण ते घर नाकारणारे एकमेव आमदार म्हणजे कपिल पाटील होत.
इन्स्पेक्टर झेंडे यांच्यावर काढलेले कॉमिक्स, तसेच मंडल आयोगावरील त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. याचबरोबर रागदरबारी, पडघम, अबिरगुलाल हे राजकीय लेखनसंग्रह तसेच देशमुखी, या सत्तेत जीव रमत नाही, आदोर, गेटवे, आचरेकर सर ही पुस्तके आणि पु.ल. देशपांडे मराठी-इंग्रजीचावाद, खाजगी क्षेत्रातील आरक्षण असे अनेक विशेषांक वाचनीय व संग्राह्य आहेत.
शिक्षण या विषयी काही तरी आपले योगदान असावे ही त्यांची उत्कट ईच्छा, यामुळेच त्यांनी २००६ मध्ये बृहन्मुंबई शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेसाठी निवडणुक लढविली आणि ते आमदार झाले. पुन्हा २०१२ मध्ये त्यांनी त्याच मतदार संघातून प्रचंड मतांनी विजयश्री खेचून आणली. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी अनाठायी धोरण राबवून विद्यार्थी पालक व शिक्षक यांना मानसिक तणावाखाली आणले होते. सदर गुणवत्तावाढ चाचण्या रद्द करण्यात कपिल पाटील ह्यांचा सिंहाचा वाटा आहे.
शिक्षकांचा पगार १ तारखेलाच व ईसीजी पद्धतीने व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले. विद्यार्थ्यांवरील १४ घटक चाचण्यांचे ओझे भिरकावण्यास शासनाला भाग पाडले. उल्हासनगर महापालिकेत लोकभारतीची सत्ता येताच त्यांनी शिक्षकांना बोनस व मेडिक्लेम, शिक्षकांच्या कुटुंबियांना तीन लाखापर्यंत खर्च मंजूर करून घेतला. मुंबईतील अनुदानित शाळांतील वाढीव तुकड्यांना मान्यता मिळवून दिली. शिक्षकांवर लादलेली शाळाबाह्य कामे, शिक्षणबाह्य आचारसंहिता रद्द करून घेतली. कपिल पाटील ह्यांची जिद्द आणि निर्धार मोठा होता. पत्रकारिता व संसदीय आयुधांचा योग्यवेळी वापर, उत्कृष्ट भाषण शैली यामुळेच त्यांना सन २००७-०८ साली राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या सौजन्याने 'उत्कृष्ट संसदपटू' किताब देऊन राष्ट्रपतींनी गौरविले आहे. माईर्स एमआयटी तर्फे दिला जाणारा २०१६ चा, "आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य लोक प्रतिनिधी पुरस्कार" त्यांना मिळाला आहे. शिक्षकांना वेठीस धरून त्यांचे पगार मुंबै बँकेतुनच घ्यायची सक्ती करणाऱ्या विद्यमान सरकार विरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन श्री कपिल पाटील आणि त्यांच्या संघटनेने शिक्षकांना न्याय मिळवून दिला.
आमदार कपिल पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यसंपन्नतेसाठी लाख लाख शुभेच्छा व शुभकामना!