Achievers Achievers Politics

Pravina Thakur
प्रथम महिला महापौर सौ. प्रवीणा हितेंद्र ठाकूर

आपल्या समाजभगिनी सौ. प्रविणा हितेंद्र ठाकूर ह्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौरपदी विराजमान झाल्या ही सर्व समाजबांधवांसाठी अभिमानास्पद घटना होय. त्यांच्या यशप्राप्ती प्रित्यर्थ उचित गौरव व्हावा, ही समाजाची मनीषा आणि म्हणून नांदगाव येथील ८९ व्या वार्षिक अधिवेशनाचे औचित्य साधून सन्माननीय महापौर सौ.प्रवीणा ठाकूर यांना समस्त समाजबांधवांच्यावतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


पती श्री. हितेंद्र विष्णू ठाकूर हे राजकारणात सक्रीय होत असताना, कौटुंबीक जबाबदारी सोबत त्या महिला विकास मंडळामध्ये कार्यप्रणव झाल्या. बहुजन विकास आघाडीची स्थापना झाल्यावर त्यांनी महिला सबलीकरण व संघटन यासाठी मेहनत घेतली. वसई तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ नये म्हणून पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याचे कार्यही सौ. ठाकूर यांनी केले आहे. महिला संघटना व महिला मंडळामध्ये कार्य करीत असताना एक मार्गदर्शक, एक चांगली मैत्रिण म्हणून त्या महिलांच्या दीपस्तंभ बनल्या. शैक्षणिक क्षेत्रातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शाखांमध्ये त्या कार्यरत आहेत. सुपूत्र श्री. क्षितिज ठाकूर यांचा विवाह सामुदायिक विवाहमध्ये करण्याच्या पतीच्या कार्यात मोलाचा सहभाग देऊन, त्यांनी सामाजिक कार्याचा परमोच्च बिंदू गाठला. सार्थ ग्रुपच्या संस्थापक व अध्यक्ष म्हणून कार्य करताना, अर्धग्रामीण विद्यार्थी गटासाठी त्यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नृत्य, इंग्रजी संभाषण इत्यादीचे पुनुरज्जीवन केले.


त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आपली चतुरस्त्र छाप उमटवून कार्यसम्राज्ञी म्हणून नावलौकीक प्राप्त केला आणि त्याचीच परिणती म्हणून त्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौरपदी विराजमान झाल्या. सो.पा.क्ष.स संघातर्फे त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी त्यांना शुभेच्छा.