Achievers Achievers Politics

Rajiv Patil

वसई-विरार ते अगदी डहाणू परिक्षेत्रामध्ये सर्वांनाच आपला वाटणारा उद्योन्मुख तरूण व तडफदार नेता म्हणजे श्री.राजीव यशंवत पाटील अर्थात राजूनाना होय. मुंबई-विरार-वसई येथे प्राथमिक ते उच्च महाव़िद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी उद्योग व बांधकाम क्षेत्रात प्रवेश करून आपला वेगळा ठसा उमटवून अल्पावधीत दैदिप्यमान यश संपादन केले. यावेळी आपला उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील कामगारांशी त्यांच्या समस्या, दु:खे, गरजा यांचा जवळून अनुभव घेतल्याने त्यांनी त्यांचे नेतृत्व स्विकारले व यशस्वी कामगार नेता म्हणून स्थान निर्माण केले.


याचवेळी त्यांचे दिवंगत मामा हरिश्चंद्र व भास्कर ठाकूर तसेच श्री. हितेंद्र आप्पा यांचा निकटच्या संपर्क व सहावासामुळे त्यांना विरार-वसई परिक्षेत्रामध्ये दूरवर लोकजीवन, सामाजिक जीवन, सांस्कृतिक, चालीरिती समस्या यांचा अनुभव मिळाला. लोकसेवा वसा स्विकारून त्यांनी विरारच्या ठाकूर परिवरातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. त्यात ते यशस्वी ठरले. तत्कालीन विरार नगरपरिषदेच्या नगरसेवक ते नगराध्यक्ष पदाची धुरा लीलया पेलली. पुढे त्यांची शासन निेकषानुसार स्थापन झालेल्या विरार-वसई शहर महानगरपालिकेचे प्रथम 'महापौरपदी' निवड झाली. त्यांच्या कार्याचा आलेख अधिक उंचावला.


फर्डे वक्तृत्व, हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची जीद्द, माणसे जोडण्याचे चातुर्य, आपलेपणाची वर्तन साधून लोकांची मने जिंकण्याचे कसब, सहकार्यांचे सहकार्य घेऊन लोकोपयोगी कामे करण्याची हातोटी, विरोधकांशीही आपुलकीने वागणारे, आपल्या समस्या कामे घेऊन येणाऱ्यांना विन्मुख न पाठविण्याची वृत्ती, नम्र व विनयशील अशा त्यांच्या समस्या बहुआयामी व्यक्तीत्वामुळेच कामगार क्षेत्रात व विरार-वसईच्या राजकारणात कामे करीत असतानाच ते आपल्या समाजाला वा डहाणू-पालघर क्षेत्रातील ग्रामीण विभागाला विसरले नाहीत.


सन १९९९ साली संघाच्या युवा समितीशी निगडीत त्यांनी 'अल्याळी' शाखेमध्ये 'क्रीडासंकुल' उभारण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. सन २०००-२००१ मध्ये नरपड शाखेत घेतलेला युवा मेळावा व उद्योग शिबीरात शिक्षणतज्ञ रामभाऊ मोहोडीकरांचे मार्गदर्शन मिळवून अनेक तरूणांना त्यांनी उद्योगासाठी दिशा व स्फुर्ती दिली. सो.पा.क्ष. संघाच्या अमृतमहोत्सवी अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा मान संघाने त्यांना दिला तो त्यांनी समर्थपणे भूषवून समाजाला स्फुर्तीदायक मार्गदर्शन केले.


राजीव पाटील यांचे माता-पिता हे त्यांचे आराध्य दैवत त्यांच्या नावे अनेक शिष्यवृत्या स्थापन करून त्याद्धारे ते आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थ्याना सहकार्य करतात. शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक संस्थान सढळ हातोने मदतीचा हात पुढे करतात. वसई कलाक्रीडा महोत्सव, साहित्य संम्मेलने, जागतिक मराठी परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद, विज्ञान व उद्योग प्रदर्शने आपल्या भागात यशस्वी करून दाखविण्याचे त्यांचे कौशल्य वाखणण्याजोगे आहे.


तीन वर्षाचा महापौरपदाचा काल यशस्वीपणे संपन्न केल्यावर विविध संस्थावर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. जीवदानी देवी मंदीर, संजिवनी हॉस्पीटल, दीन दलित सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट, कोकण भूमी प्रतिष्ठान अशा अनेक लोकोपयोगी संस्थांच्या माध्यामातून आम जनतेला त्यांनी संजिवनी दिलेली आहे. आता ते मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणावर नियुक्त सभासद आहेत. त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी सो.पा.क्ष.स. संघाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांना धन्यवाद!