Community
संघाचा दुसरा कालखंड (१९२० ते १९२५)
संघाचा पुनरूद्धार:
पहिले महायुद्ध संपले हेाते. देशांत पुन:राजकीय आंदोलने सुरू झाली. राजकीय आंदोलनाबरोबर सामाजिक चळवळीसही जोर चढला. जे ते समाज संघटित होऊ लागली. स्वराज्याच्या चतु:सूत्रींत राष्ट्रीय शिक्षणाचा समावेश होता. या सर्व चळवळींचा परिणाम आपल्या समाजातील तरूणांवर झाला. आपण संघटित झाले पाहिजे., समाजांत शिक्षण प्रसार झाला पाहिजे व त्यासाठी संघाचे बंद पडलेले कार्य सुरू केले पाहिजे असे त्यांना वाटले. महायुद्धातील तेजीमुळे केळवे, माहीमच्या पानवेलीस व केळ्यांस चांगला भाव येत होता. त्यामुळे समाजांत या दोन गावांची आर्थिक स्थिती फार चांगली होती. तेथील श्री. जर्नादन पांडुरंग राऊत, श्री. लक्ष्मण गोविंद राऊत्, कै. गणपत मुकुंद राऊत, व कै. रघुनाथ रामचंद्र राऊत या सुशिक्षित तरूणांनी याकामी पुढाकार घेतला. पहिल्या कालखंडातील पुढारी कै. गोविंद लक्ष्मण पाटील (पोफरण), कै. नाना विठू राऊत (वरोर), कै. त्र्यंबक पांडुरंग राऊत व कै. भास्कर वामन राऊत (के. माहिम), यांचे त्यांना सहाय्य होतेच शिवाय गांवोगांवच्या नव्याजुन्या पुढाऱ्यांनी सहकार्य केले. आणि ता. १६ व १७ मे १९२० रोजी के. माहीम येथे कै. गोविंद जीवन राऊत यांच्या घरी कै. त्र्यंबक पांडुंरंग राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संघाची सहावी वार्षिक सभा झाली. या सभेत मागील कार्याचा आढावा घेऊन संस्थेने शिक्षण प्रसाराकडे लक्ष दिले पाहिजे असे ठरविले. जुन्या मताच्या पुढाऱ्यांचा विशेष जोर असल्यामुळे पूर्वीची 'शुचिता व न्याय' ही ध्येये मागे पडली नव्हती. शुचिता काळाच्या ओघानेच वाढत होती. परंतु न्यायप्रकरणे मात्र ५/६ वर्षांत तुंबुन राहिल होती ती पूढे आली. या सभेत संस्थेचे नाव बदलून 'सोमवंशी क्षत्रिय चौकळशी ज्ञाति शिक्षण संघ' असे ठेवण्यात आले व 'शिक्षण फंड' सुरू केला. पूर्वीच्या पुढाऱ्यांना ओढा न्यायप्ररकणे मिटवण्याकडे होता, तर तरूण पुढाऱ्याचा ओढा शिक्षण प्रसाराकडे होता. जुन्या पुढाऱ्यांना दुखवूं नये म्हणून त्यांची बाजू सभेंत आधी ऐकली जात असे व त्यांतच सभांचा सर्व वेळ जाई. यामुळे शिक्षण प्रसाराच्या कामाकडे पाहिजे तितके लक्ष गेले नाही.
नव्याजुन्यांचा संघर्ष:
त्यावेळच्या तरूण पुढाऱ्यांची स्थिती कशी झाली होती याचे निदर्शक म्हणून जुहू येथील पुढारी कै. विठोबा दामोदर पाटील यांनी ता. २-१०-२१ रोजी लिहिलेल्या पत्रास संघाच्या चिटणासांनी ता.१०-११-१९२१ रोजी लिहिलेले उत्तर दाखवितां येईल. त्या पत्रांत ते लिहितात.
"आपले पत्र पोहोचले. आपण लिहिता की "वार्षिक सभेत एकमेकांचे व्यंग काढून रक्कम जमविणे आम्हांस पसंत नाही व शिक्षण प्रसाराकडे लक्ष देत नाहीत". असे व्यंग काढू नये असे आमचेहि मत आहे. हा ठराव घिवली अधिवेशनात आला होता. परंतु माहीम खेरीज करून कोणीहि मत दिले नाही. इतर गांवचे म्हणणे असे की, "आम्ही एकमेकांची गाऱ्हांणी जातींत सांगून जर निर्णय लावून घेतला नाही, तर कोणी कोणास ऐकणार नाही व घोटाळा माजेल व हे आमचे म्हणणे कबूल करावयाचे नसेल तर तुमचा शिक्षण फंड व ते नियम नको." तेव्हा त्यांचे म्हणणे आम्ही कबूल केले व शिक्षण फंडाचे नियम पास केले व संघ पुर्ववत चालला.
आमचेही मत असे आहे की, हल्लीच्या काळात लवाद कोर्ट स्थापणे व त्या मार्फत न्याय देणे इष्ट आहे. करिता आपल्या जातीत तंटेबखेडे असल्या जातीय कोर्टातच मिटले पाहीजेत. कोर्टात नेऊन आपल्या जातीची विटबंना करणे बरोबर नाही. तरी आपण सभेत हजर राहून आपल्या मताचा प्रसार करण्याचा प्रयत्न करावा.
शैक्षणिक व सामाजिक कार्य:
सभा पूर्वीच्या पद्धतीने चालत असत. या कालखंडात बरीच न्याय प्रकरणे निष्कालांत निघाली. न्याय १४ नियमांच्या आधारनेंच होत असे. दंड व बहिष्कार हे उपाय वापरले जात असत. 'दंड' या शब्दाऐवजी 'धर्म फंड' हा शब्द वापरण्यात आला. शिक्षण फंड वाढविण्यात आला. या फंडातून समाजातील मुलांना प्रत्यक्ष मदत दिली गेली नाही. परंतु दहिसर (मधुकरनगर) येथे संघाने एक शाळा चालविली. या शाळेत श्री. भिकू रामा पाटील (चिंचणी) हे आपले ज्ञातिबंधू शिक्षक होते. त्यांनी ज्ञातिकार्य म्हणून आस्थेने काम केले. याबाबतीत संघाने ११२ रू. खर्च केले. संघाची मदत बंद होताच शाळाही बंद झाली. अशाच तऱ्हेच्या निरनिराळ्या ठिकाणी शाळा काढण्याचा संघाचा मानस होता. शिक्षणफंडासाठी काही नियम केले होते. पण ते आज उपलब्ध नाहीत. संघाने एक 'सेवादल' तयार केले होते. त्यांनी दौरा काढून संघाचा प्रचार केला. संघाचे कायम सभासद करून व देणग्या मिळवून शिक्षण फंडात भर टाकली होती.
संघावर पुन:संकट व संघाचे कार्य पुन्हा बंद:
संघाच्या दहिसर येथील ९ व्या वार्षिक सभेत मुंबईकर मंडळीस हिशेब न दाखविल्यामुळे त्यांनी सहकार्य करण्याचे नाकारले. १० व्या वार्षिक सभेपर्यंत संघाचे कार्य मोठ्या उत्साहाने चालले होते. परंतु माहीम येथील प्रमुख पुढाऱ्यांत वैयक्तिक मतभेद निर्माण झाले. व त्याचा परिणाम संघाच्या कार्यावर झाला. शिरगावच्या तिमाही सभेत दोन पक्ष पडले. लोकांना फंडाविषयी संशय येऊ लागला. ता. १७-५-१९२५ रोजी उमरोळी येथे संघाची ११ वी वार्षिक सभा झाली या सभेतील ठरावाप्रमाणे कै. त्र्यंबक पांडुरंग राऊत यांच्याकडून फंड सामोपचाराने न मिळाल्यामुळे संघास कोर्टाचा आश्रय घ्यावा लागला. डहाणू कोर्टात संघाच्या बाजूचा निकाल होऊन सर्व रक्कम चालकांच्या हातात पडली. नंतर ती संघाचे खनिजदार कै. रघुनाथ रामचंद्र राऊत यांच्या नावाने बँकेत ठेवण्यात आली. हे कोर्ट प्रकरण व पुढाऱ्यांची दुही यामुळे कार्यकर्त्यांत उदासिनता आली व संघाचे कार्य बंद पडले. पंचाळी येथे वार्षिक सभा घ्यावी म्हणून कार्यकर्त्यांनी मधून मधून १०२९ सालापर्यंत प्रयत्न केलेला दिसतो. परंतु त्यांत यश आले नाही.
या कालखंडातील संघाचे दप्तरही कुणी व्यवस्थित राखून ठेवले नाही. ११ व्या वार्षिक सभेत अहवाल छापण्याबद्दलचा आलेला ठराव नापास झाला.
संघाचे कार्य बंद झाले:
संघाचे कार्य बंद झाल्यानंतर समाजाच्या निरनिराळ्या गांवी असणाऱ्या काही स्थानिक संघानीच आपापले सामाजिक कार्य चालू ठेवले. नरपड येथे 'सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघ' या नावाचा स्थानिक संघ होता. त्याने नरपड गावासाठी सुमारे १००० रू. फंड व १०० खंडी भात जमविले होते. अल्प व्याजाने पैसे व सवाईच्या दराने खावटी भात समाजांतील गरजूला पुरविले जाई. त्यामुळे सावकारी पाशांतून नरपड येथील समाजाची बरीशची सुटका झाली होती. हा उपक्रम पुष्कळ वर्षे टिकला परंतु शेवटी तो यशस्वी झाला नाही. वरोर येथेहि एक स्थानिक फंड होता, तो गावांतील गरजू ज्ञातिबांधवांना कर्जाऊ पैसे देई. इतर गावांतहि असे फंड होते असे म्हणतात. परंतु ते पुढे चालले नाहीत. मुंबईस ता. ९ सष्टेंबर १९२८ रोजी 'पाठोर क्षत्रिय शिक्षणोत्तेजक संघ' या नावाचा एक संघ स्थापन झाला. कै. काशिनाथ दादाजी रावत या संघाचे अध्यक्ष होते. कै. चिंतामण रावजी राऊत, कै. वासुदेव पांडुरंग पाटील व कै. केशव नारायण पाटील यांनी मुंबई बाहेरील गावात संघाचा प्रचार केला. परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्या समाजांतील मुलांस पुस्तके व मुलीस कापड बक्षीस म्हणून या संघाकडून काही वर्षे मिळत असे. या संघाचे सुरळीत चाललेले कार्यहि कारणपरत्वे बंद झाले. इ.स. १९२८ साली नरपड येथे 'सो.क्ष. युवक संघ' स्थापन करण्यात आला. या संघाच्या शाखा सर्व समाजभर काढण्याचा हेतु होता. त्याप्रमाणे या संघाचे संस्थापक कै. चिंतामण रावजी राऊत, कै. आत्माराम नानजी राऊत व कै. वसंत पांडुरंग पाटील यांनी चांगल्या तऱ्हेने चालविला. या युवक संघातर्फे वरोर येथे एक वाचनालय व एक वक्तृत्वोत्तेजक सभा बरेच वर्षे चालविण्या आली. समाजातील काही अनिष्ट रूढींना वरोर येथे या संघाने यशस्वीरीतीने आळा घातला. नरपड येथेहि एक 'सो.क्ष. वाचनालय' होते. त्यांत सुमारे हजार दीड हजार रूपयांची दुर्मिळ पुस्तके होती. काही युवकांनी ज्ञानार्जनासाठी या वाचनालयाचा चांगला फायदा घेतला. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी त्याची वाट लावली. मुंबईच्या पाठोर क्ष. शि. संघाने आपले कार्य बंद केल्यावर उरलेली रक्क्म नरपडच्या युवक संघास दिली व संघाने समाजातील गरीब विद्यार्थ्यास मदत रूपाने ती वाटली. याशिवाय इ.स. १९३७ पर्यंत समाजातील गरीब व होतकरू मुलांस समाजांतून कोठूनही सहाय्य मिळण्याची आशा नव्हती.
समाज एकत्र यायला काही साधन नव्हते. परंतु पूर्वापार चालत आलेली एक रूढी होती तिचा फायदा समाजाने घेतला. लग्न झाल्यांनतर वधूपक्षाकडे पहिले ज्ञातिभोजन(ऐरणीचा जेवा) होई. या ठिकाणी 'टिळाविडा' देण्याची पद्धत झाली. ज्या गावाचा पुकार होईल त्या गावाच्या कुणीहि उपस्थित पाहुण्याने पुढे यावयाचे. दुसऱ्याने त्यास चंदनाचा टिळा लावावयाचा व पांच सुपाऱ्या द्यायच्या. याप्रमाणे समाजातील सर्व गावाच्या नावाचा पुकार करून उपस्थितांपैकी कोणाहि एका व्यक्तिस हा टिळ्याविड्याचा मान दिला जाई. उपस्थित व्यक्ति अगदी लहान मूल अगर स्त्री असली तरी त्यांस तो मान मिळे. सुपाऱ्या वधूच्या पालकांनी द्यावयाच्या असत. या ठिकाणी अनायासेंच सर्व गावातील लोक उपस्थित असत. त्यामुळे टिळाविडा देण्याच्या आधी त्या गावातील अगर समाजातील न्यायप्रकरणे तेथे निघू लागली व त्यांचा फैसला होता होता रात्री दोन चारहि वाजत. भांडणेहि होत. त्यानंतर जेवण. पण पुढे ही पद्धती आपोआपच बंद झाली. ह्या काळातील पूर्वापार चालत आलेल्या पद्धती प्रमाणे सिंहासनातून वरात निघत असे. हे सिंहासन चंदनी असून झेंडुच्या फुलांनी ते घुमटाकार सुंदर सजवून चार कोपऱ्यावर कळसा ऐवजी एकेक नारळ ठेवीत. वर या सिंहासनांतून वधुगृही जाई व लग्न लागल्यावर वधुसह त्याच सिंहासनातून स्वगृही परत येई. ही सिंहासने आता दुर्मिळ झाली आहेत.