Community
संघाचा तिसरा व विद्यामान कालखंड (१९३७ ते अद्ययावत)
संघाचा पुनश्र पुनरूद्धार:
इतर लहान लहान संघाचे कार्य मंदावू लागले. होते. नरपड युवक संघातर्फे कै. चिंतामण रावजी राऊत कै. यशवंत रामचंद्र राऊत व कै. वामन जीवन पाटील यांनी 'क्षात्रसमाचार' या नावाचे हस्तलिखित त्रैमासिक सुरू केले होते. ते दोनतीन वर्षे चालून बंद झाले. कै. वामन जीवन पाटील व कै. अरविन्द हरि राऊत यांनी ते पुन:चालू केले. अंक लिहून काढण्याची कामगिरी कै. अरविन्द राऊत यांनी पत्करली. बंद पडलेल्या शिक्षणाला चालना द्यावी असे या दोघांनी ठरवून क्षात्रसमाचाराचा 'खास शिक्षणसंघाबद्दल' माहिती मिळविली. काही पुढाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या व जूनी कागदपत्रे मिळवून कै. अरविन्द राऊत यांनी 'शिक्षण संघाचे दप्तर संशोधन' या नावाचा एक लेख तयार केला. एवढ्या साहित्यानिशी सदर अंक प्रसिद्ध करून प्रमुख पुढाऱ्यांच्या निदर्शनास तो आणला.
त्यावेळी कै. अरविन्द राऊत हे केळव्यास राहत असल्यामुळे कै. रघुनाथ रामचंद्र राऊत, कै. जनार्दन पांडुरंग राऊत व कै. लक्ष्मण गोविंद राऊत या दुसऱ्या कालखंडातील प्रमुख पुढाऱ्यांशी त्यांना सतत विचारविनिमय करता आला. कै. वामन जीवन पाटील यांनी मुंबईस कै.भाऊराव दे. पाटील,कै. पांडुरंग का. राऊत् व कै. पांडुरंग रा. राऊत(नरपड) यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनीहि संघाचे कार्य पुन: सुरू व्हावयास पाहिजे होतेच. शेवटी प्राथमिक विचारविनिमयासाठी ता. २८-११-३६ रोजी समाजातील काही व्यक्तींची सभा के. माहीम येथे कै. ल.गो. राऊत यांच्या घरी घेतली. सभेत संघाचा पुनरूद्धार करण्याचे ठरले व त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा बालविण्यासाठी १५ सभादांची 'सभा कमिटी' निवडण्यात आली. कै. पांडूरंग काशिनाथ राऊत हे या कमिटीचे अध्यक्ष असून कै. अरविन्द राऊत हे चिटणीस होते. सभेच्या खर्चासाठी उपस्थित राऊत मंडळींनी सभाफंड जमवून दिला. सभाकमिटीची सभा ता. २-१-३७ रोजी माहिम येथे होऊन सर्वसाधारण सभेत मांडण्यसाठी संघाचे नियम ठरविले.
कोणताहि गाव सभा घेईना म्हणून केळवारोड स्टेशनवर कै. रामभाऊ गोविंद पाटील यांच्या बंगल्यात संघाची बारावी वार्षिक सभा ता. १२-१२-१९३७ रोजी भरविली. अध्यक्षस्थानी कै. पांडुरंग काशिनाथ राऊत हे होते. बहुतेक गावची जबाबदार मंडळी उपस्थित होती. कै. काशिनाथ पिलाजी राऊत यांनी मुंबईकरांना या सभेत भाग घ्यावयास लावला. या सभेत 'सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नति संघ' असे संघाचे नाव बदलण्यात आले. संघाच्या मागील फंडाबद्दल लोक साशंक होते परंतु कै. रघुनाथ रामचंद्र राऊत यांनी रक्कम देण्याचे आश्वासन दिल्यावर लोकांची शंका दूर झाली. पुढे व्याजासह १८०५ रू. ५ आ. रक्कम कै. रघुनाथ राऊत यांनी दिली. अशारीतीने बारा वर्ष बंद पडलेले संघाचे कार्य पुन: उत्साहाने सुरू झाले. मागील सर्व नियमांना व उद्देशांना फाटा देऊन नवे नियम पास केले व त्यांत शिक्षण प्रसाराला अग्रहक्क् देण्यात आला.