Trust Editorial आपल्या समाजाचा इतिहास
24-Apr-2018

Rajendra Laxman Raut 1601


३ एप्रिल १९१०, आपल्या समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहला गेलेला हा दिवस. या दिवशी नरपड येथे, मा. श्री. बाळा केशव राऊत ह्यांच्या घरी, मुंबईचे मा.श्री. काशीनाथ वालजी राऊत, यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या समाजाच्या पहिल्या सभेस उपस्थित राहिलेल्या सर्व समाज धुरीणांपासून आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी समाजाची निस्वार्थ, मनोभावे सेवा केली त्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार.

१०७ वर्षांचा इतिहास असलेल्या आपल्या समाजाने अनेक चढउतार पाहिले. मधे काही काळ समाजकार्य बंद पडल्यानंतर, फिनिक्स पक्षाप्रमाणे उसळून समाजकार्य पुन्हा जोमाने सुरू झाले ते आजतागायत व्यवस्थित सुरू आहे. मधल्या काळात, आपल्या सो.पा.क्ष. समाजाचे क्रियाशील युवक मंडळ म्हणून ज्याचा उल्लेख होतो (१९८४-१९९२) त्या युवक मंडळात काम करण्याचे भाग्य लाभले ह्याचा मला अभिमान आहे. मात्र तदनंतर वैयक्तिक कारणामुळे समाजासाठी मी जास्त काम करू शकलो नाही ह्याची खंतही मनाला लागून राहिली होती. ज्या समाजाने मला नाव दिले, मला ओळख दिली त्या माझ्या समाजासाठी माझ्याकडून काही तरी योगदान देऊन समाजाचं ऋण फेडावसं वाटत होतं आणि ही इच्छा स्वस्थ बसु देत नव्हती. समाजासाठी काय करता येईल याबाबत माझा पुतण्या कुणालशी चर्चा करत असताना जाणवलं की आजच्या इंटरनेटच्या युगात, जिथे एका क्लिकवर आपणाला हवी ती माहिती एका क्षणात मिळत होती, तिथे आपला समाज कुठेच दिसत नव्हता. आपल्या समाजाची एकूण लोकसंख्या किती आहे, शिक्षणाचं प्रमाण किती आहे, नोकरी-व्यवसायाची परिस्थिती काय आहे, किती लोकांनी विविध क्षेत्रात काय प्रगती केली आहे, अशा अनेक प्रश्नांनी आम्ही अस्वस्थ झालो. याचबरोबर आपल्या समाजाचा इतिहास, मूळ गावांची माहिती, आपले रीतिरिवाज, आपली बोलीभाषा, आपली खाद्य संस्कृती, अशा अनेक गोष्टी काळाबरोबर लोप पावू पहात होत्या. या गोष्टी जतन करणं खूप गरजेचं होतं. देशा-विदेशात विखुरलेल्या नवीन पिढीसाठी आणि भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी हे करणं आवश्यक होतं. या पिढ्यांना आपली वंशावळ (आजोबा-पणजोबा) समजू शकेल अशी कुठलीच व्यवस्था आजदिवशी आपल्या कडे ऊपलब्ध नाही. हे जेव्हा लक्षात आले तेव्हा आधुनिक जमान्याची कास पकडत आपण आपली स्वत:ची, सर्व समावेशक, परिपूर्ण अशी एक वेबसाइट निर्माण करण्याचे ठरविले. परंतु यासाठी समाजबंधु आणि भगिनींची सविस्तर माहिती एकत्रित करणे गरजेचे होते, तरच आपण योग्य दिशेने काम करु शकतो, हे लक्षात आल्यावर आम्ही समाजाचा सविस्तर सर्वे करण्याचे निश्चित केले.

सध्याची परिस्थिती पाहता, येणाऱ्या काही वर्षा मध्ये जाती व्यवस्था टिकणे खुप कठीण होणार आहे, कारण लोकांचं जीवन खुप गतिमान झालं आहे, प्रत्येक माणूस खुप व्यस्त झाला आहे, त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क तूटत चालला आहे. समाज जर टिकवायचा असेल तर आपल्या लोकांना संगठित करून संपर्कात ठेवावे लागेल, यासाठीही या वेबसाईटचा उपयोग होणार आहे.

बंधूनो आणि भगिनींनो, कोणीही कुठलेही काम १००% अचूक करु शकत नाही. आम्ही ही वेबसाइट जास्तीत जास्त परिपूर्ण बनविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आम्हाला ह्याची जाण आहे की आमच्याही काही चुका झाल्या असण्याची शक्यता आहे, किंबहुना त्या झाल्याच असतील, पण जो काम करतो तोच चुकतो ना. म्हणून आपणा सर्वांस विनंती की आमच्या कडून झालेल्या चुका तुम्ही आमच्या निदर्शनास आणून दिल्यास, व शक्य असल्यास त्या आम्ही निश्चितच सुधारू. या वेबसाइटवर आम्ही विविध विषयांनुसार वेगवेगळ्या मथळ्यांखाली (हेड) माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ही तर फक्त सुरुवात आहे, येणाऱ्या काळात या प्रत्येक मथळ्यांमध्ये (हेड) तुमच्या कडून येणाऱ्या योग्य सूचना व माहितीचा अंतर्भाव आपण करणार आहोत ह्याची कृपया नोंद घ्यावी. फक्त या सूचना व माहिती अशी असावी की त्यातून समाजासाठी काही तरी सकारात्मक निर्माण व्हावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. ही वेबसाइट बनविण्याचा आमचा मूळ हेतूच हा आहे की आपल्या लोकांना या वेबसाइटची मदत होऊन समाजाची प्रगती झाली पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तिस आम्ही आवाहन करतो की तुम्ही जिथे कुठे असाल, ज्या क्षेत्रात काम करत असाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारे समाजाला मदत करायची इच्छा असेल तर कृपया आम्हाला संपर्क साधावा. "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ", या उक्तीप्रमाणे एक दिवस आपण एकमेकांच्या मदतीने दुसऱ्यांसमोर आदर्श निर्माण करून समाजाला भूषणावह ठरेल अशी परिपूर्ण वेबसाईट तयार करू शकतो. भविष्यात वेबसाइट जीवंत व सक्रिय ठेवण्याची जबाबदारी मात्र समाजातील प्रत्येक व्याक्तिची आहे, आपण सुजाण व सुसंस्कृत आहात म्हणूनच आपल्या ह्या वेबसाइटचं महत्व समजुन प्रत्येकजण आप-आपली जबाबदारी, जबाबदारिने पार पाडतील ह्याची आम्हास खात्री आहे.

या वेबसाईट साठी ज्यांची ज्यांची मदत झाली आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो. दोन चार पांनांची वेबसाइट बनवणे तसे फार कठीण नसते, पण १०० एक पानांची, तीही समाजातील प्रत्येक व्याक्तिची सविस्तर माहिती संकलीत करून, परिपूर्ण अशी वेबसाइट बनवणं खुप आव्हानात्मक काम होतं. पण मला इथे सांगण्यास खुप अभिमान वाटतो, की या कामी आम्हास आपल्या १८ गावातील बंधु, भगिनी तसेच इतर शाखेतील, समाजातील आपल्या हितचिंतकांनी वेळात वेळ काढून, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जी मदत केली त्यास तोड नाही. या सर्वांना आमचा त्रिवार मानाचा मुजरा. त्यांच्या निरपेक्ष मदती शिवाय हे काम केवळ अशक्य होतं. या सर्व समाज बंधूभगिनींचे आम्ही कायम ऋणी राहू (वेबसाइटच्या क्रेडिट नोट कॉलम मध्ये त्यांची नावे सविस्तर लिहिली आहेत.)

श्री. बिपीन यशवंत पाटील आणि सौ. दर्शना बिपीन पाटील (विरार-वरोर) या दाम्पत्याचे विशेष आभार. सर्वेक्षणाद्वारे समाजाची संकलीत केलेली माहिती वेबसाइटवर नोंद करण्याचं अत्यंत गोपनीय, किचकट व जबाबदारिचं हे काम या कुटुंबाने ज्या पद्धतीने केलं ते सांगण्यास माझ्याकडे खरोखरीच शब्द नाहीत. बिपीन, तू माझा जवळचा मित्र असल्यामुळे तुझे आभार मी नक्कीच मानणार नाही, पण मित्रा, एक नक्की सांगेन, तुम्हा दोघांची कामाप्रती असलेली समर्पित वृत्ती, कामातील सचोटी पाहून आम्ही खूपच प्रभावित झालो. या वेबसाईट साठी, यापुढेही तुमचं असच योगदान राहील अशी मी आशा बाळगतो.

जेष्ठ, निस्पृह समाज सेवक तरंग पाटील ह्यांच्या बद्दल मी काय लिहावं? मागील साधारण ४० वर्षात अपवादात्मक एखाद दूसरी तीमाही सभा हजर न राहू शकलेल्या या कार्यकर्त्यास आमचा मानाचा नमस्कार. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाची मोट आमच्यासाठी मोकळी करून, वेबसाइट उभारणीसाठी अमूल्य वेळ दिल्या बद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

वेबसाइट तांत्रिकदृष्टया आपणच बनऊया असं अगोदर ठरलं होतं पण त्याचं मोठं स्वरूप पाहता, 'खर्च झाला तरी चालेल पण वेबसाइट व्यावसायिक कंपनी कडूनच बनऊन घ्यावी' हे ठरलं, त्या प्रमाणे आमचे मित्र श्री. धवल सावे यांच्या Diligence Web Technologies या कंपनीची या कामी नियुक्ति केली आणि अपेक्षे प्रमाणे त्यांनी (आऊटऑफ वे जाऊन) जी मदत केली त्या साठी धवल सावे व टीम चे आम्ही आभारी आहोत.

असे म्हणतात की आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. कुणाल व संपदा बद्दलचे माझे शब्द हे आभार नसून इतरांनाही त्या पासून प्रोत्साहन मिळावे हा उद्देश आहे. एकीकडे तरुण पिढी समाजापासून लांब जात असताना कुणाल व संपदा सारखे तरुण, समाजा प्रती एवढ्या आपुलकिने व झोकुन देऊन काम करताना पाहुन कुठेतरी समाजाचं भवितव्य उज्वल आहे ह्याची खात्री पटते. हा वेबसाइट प्रोजेक्ट यशस्विरित्या पूर्ण केल्याचं मला समाधान आहेच, पण माझ्या घरातून कुणाल व संपदा सारखे दोन उमदे कार्यकर्ते निर्माण करु शकलो, ह्याचे मला जास्त समाधान आहे. धन्यवाद कुणाल, संपदा.

शेवटचं पण खुप महत्वाचं. सो.पा.क्ष. समाजाच्या विद्यमान अध्यक्षा सौ. प्रणीता पंकज ठाकूर ह्यांनी संघाची सूत्रे हाती घेतल्या पासून त्यांनी जी-जी कामे हाती घेतली व ज्या पद्दतीने त्या ही कामं पूर्णत्वास नेत आहेत, ते पहाता, येणाऱ्या काळात आपला समाज काळाची पाऊले ओळखून, काळाबरोबर योग्य दिशेने जात असल्याची ग्वाही मिळते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी समाजाची वेबसाइट बनविण्यासाठी आम्हास जे प्रोत्साहन दिले व मदत केली त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

वर उल्लेखिलेल्या सर्व समाज बंधू-भगिनींच्या मेहनतीने तयार झालेलं रोपटं, आज मी तुमच्या हाती सुपूर्द करीत आहे. हे रोपटं जोमाने वाढण्यासाठी, समाज बंधु-भगिनींन कडून योग्य माहिती व मार्गदर्शनाची अपेक्षा वक्त करून माझे मनोगत इथेच थांबवतो.

धन्यवाद.

आपला,
राजेन्द्र लक्ष्मण राऊत,
(विरार-नरपड).
मोबाइल नं- ९८२३४५३२२३
दि. २१/०४/२०१८.