बोईसर पूर्व. ता,जी: पालघर.
गावाचा ईतिहास - गावाला चारही बाजूने पाणी असल्याने बेटेगाव
पूर्वी पूल नसल्या कारणाने पावसाळ्यात थोडा अधिक पाऊस झाल्यास गावात जायचा-यायचा रास्ता बंद होत असे.पूर ओसरल्यावर गावातुन ये-जा सुरू होत असे. पूर्वी चोरी-मारी,लूट होत असे म्हणून आमच्या पूर्वजांनी मुद्दाम,हेतुपुरस्सर ह्या ठिकाणाची निवड केली असावी. आताही मोठाले पूल झाले असले तरी पावसाळ्यात १-२ वेळा गावाचा संपर्क तुटतो.
गावात मुंबई गौरक्षक मंडळी नावाची १९१७ साली स्थापन झालेली, गोशाळा आहे. ३५० एकर जमिनीत तिचा पसारा आहे. गो पालन, दूध उत्पादन व गवत संशोधन ही कामे होतात. ब्रिटिश काळात मोल-मजुरी मिळण्याचे हे एकमेव ठिकाण होते. तसेच बेटेगवाचा आठवडी बाजार. गुरुवारचा बेटेगावचा बाजार शेकडो वर्षा पासून प्रसिद्ध आहे. बाजारात सर्व जीवनावश्यक वस्तू मिळतात. विशेषतः सर्व प्रकारचे सुके मासे मिळतात. गावात Dmart आले असले तरी बाजाराचे महत्व कमी झाले नाही.
कोण-कोणत्या जाती धर्माचे लोक वसलेले आहेत
आमचा गाव हा मूलतः वाडवळ समाज्याच्या अधपत्या खाली होता. गावची पाटीलकी, जमीनदारी वाडवळ समाज्याच्या हातात होती. पाटीलकी अजूनही आहे. ब्रिटिश काळातील गावचे प्रसिध्द पाटील कै. नारायण हरी पाटील. वाडवळ समाज्या बरोबर येथे मोरे कुणबी, आदिवासी (म्हलार कोळी) हे दोनच समाज राहत होते. आता औदयोगिकरण झाले. गावाच्या हद्दीत नवीन वसाहती उभ्या झाल्या. त्यातून बहू भाषिक, बहू प्रांतिक, बहू धार्मिक लोक राहत आहेत. तरीही आम्ही आमचे गावपण जपले आहे. साधारण ३० वर्षा पूर्वी मंगेश सीताराम राऊत यांच्या कल्पनेतून गावकऱ्यांनी ग्राम सभेत एक ठराव पास करुन, गावा बाहेरील व्यक्तीस गावठाण हद्दीपैकी जमीन विकत घेणे व त्यावर मालकी हक्क प्रस्थापित करणे यास मनाई केली. ती कायम आहे. त्या मुळे गावठाण हद्दीत फक्त मूळ गावकरीच राहतो. गाव हा गावच आहे.
त्यांचे व्यवसाय
गावातील लोकांचा प्रमुख व्यासाय शेती असला तरी आता लोकांनी शेती व्यवसाय मोडीत काढला आहे. आता लोक शिक्षण करून नोकरी, व्यव्यसाय-धंदा करू लागले आहेत. त्यामुळे एकंदरीत जीवन मान सुधारले आहे.
साधारण लोकसंख्या
गावची लोक संख्या तीन हजार असावी. त्यात नव-नवीन वसाहती उभ्या राहत आहेत व दिवसा गणिक लोकसंख्येत वाढ होत आहे (गेल्या ५ वर्षात ३ ते ४ हजार लोक गावच्या हद्दीत वासाहतीतून वास्त्यव्य करून आहेत. पण त्यांची गणती ग्रामपंचायत दप्तरी नाही.)
गावाला पोहोचण्याचे मार्ग
बेटेगाव गाव, पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशन च्या पूर्वेला तीन किमी पूर्वेस वसला आहे. गावातून बाईसर-चिल्लार रोड गेला आहे, जो मुंबई-अहमदाबाद हायवेला १८ कि.मी. अंतरावर चिल्लार येथे मिळतो. मुंबई पासून रेल्वे तसेच रोडने गावाला सहज पोहचता येते.
हवामान
गाव अरबी समुद्र किनार पट्टी पासून अवघा ६-७ कि.मी. वर असल्याने समशीतोष्ण वातावरण आहे. तारापूर औधोगिक वसाहत जवळ असल्याने ,कधीतरी रात्रीच्या वेळी चोरून हवेत धूर व गॅस सोडतात त्याचा थोडा फार परिणाम हवेत होतो.
एैतिहासीक वास्तू, समाज मंदिरे, देवळं, नावाजलेल्या व्यक्ती ई.
गावात अतिशय पुरातन काळापासूनच श्री सिदोबा चे जागृत देवस्थान/मंदिर आहे. मंदिरात सिदोबा समोर श्री सरस्वती देवी ची शिळा विराजमान आहे. देवस्थान चे स्वामित्व वाडवळ पाटील कुटुंबीयांकडे आहे. दरवर्षी चैत्र वद्य (कृष्ण) तृतीया (तिज) या दिवशी एक दिवसीय (रात्र) मोठी जत्रा/यात्रा भरते. अलीकडे मुख्य गाव व पाडे मिळून चार समाज मंदिरे बांधली आहेत. गावाला नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. तसेच गावात सार्वजनिक गणेश कुंड आहे. या ठिकाणी गणपती, गौरी, दुर्गा, विश्वकर्मा यांचे मूर्ती विसर्जन होते. गावच्या ओढा (साकळ्याचा ओहोळ) याला बारमाही पाणी वाहत असते. गावाला मोठे क्रीडांगण आहे.
गावात प्रसिद्ध असे गावचे पाटील कै. नारायण हरी पाटील, तसेच आपल्या समाज्याने कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवरलेले समाजसेवक कै. सीताराम भास्कर राऊत (गुरुजी) हे अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व होते. समाजात त्यांची आठवण चिरकाल राहील.
सण, ऊत्सव, क्रिडा स्पर्धा
सर्व सण हिंदू रीती-रिवाजा नुसार गावात होतात. दसरा, नवरात्र, कोजागिरी, दिवाळी, होळी, धुळवड, गुढीपडवा, गौरी-गणपती, मकर-संक्रांती, वटपौर्णिमा नागपंचमी, दहीहंडी, रक्षाबंधन ई. सण-उत्सव साजरे होतात.
सरकारी पत ग्रामपंचायत/नगरपालीका, दवाखाना, शाळा-कॉलेज ई.
गावात मोठी ग्रामपंचायत आहे. लवकरच तिचे नगरपालिका किंवा महानगरपालिका मध्ये समावेश होणार आहे. गावापासून तीन किलोमीटर वर बोईसर येथे सर्व सोईनी युक्त असे दवाखाने/इस्पितळे आहेत. गावात व पाड्यावर जी. प . मराठी शाळा आहेत. तसेच आदिवासी मुलांसाठी शासकीय आश्रमशाळा आहे (१ ली ते १० वि). गावा लागत आदिवासी कारिता सरकारी एकलव्य विद्यालय आहे. येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली मुल-मुली ५ वी ते पदवी पर्यंत चे शिक्षण घेतात. इतर विध्यार्थी पालघर,बोईसर,किंवा मुंबई सारख्या शहरातून उच्च विद्या घेतात.
पर्यटनाची सोय, जेवणाची व्यवस्था
गावात पर्यटन उधोग नसला तरी एक दिवसीय पिकीनीक/वनभोजन उत्तम होते. जवळच असलेल्या बोईसर येथून सर्व प्रकारचे समान घेऊन, बेटेगाव गणेश कुंड, सिदोबा मंदिर, मंदिरा च्या पूर्वेस असलेली वडाची मोठी वृक्षराजी किंवा कुणी ओळखीच्या शेतकऱ्याच्या वाडीत तुम्ही एकदिवशीय पिकनिक/वनभोजन करून जीवनाचा आनंद उपभोगू शकता.