Villages Villages केळवे

पालघर जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयाच्या पासून १३ किमी अंतरावर पश्चिम किनाऱ्यावर वसलेले निसर्ग सुंदर ‌पर्यटन‌ केंद्र म्हणजे केळवे गाव. मुंबई पासूनचे लोकसुद्धा सहलीसाठी केळवे गावात येतात. या गावाला भौगोलिक सौंदर्या बरोबर‌ इतिहास ही आहे. पश्चिम अरबी समुद्राच्या काठी हे गाव वसले आहे. या गावाला ‌पालघर तसेच केळवेरोड‌ रेल्वे ‌ स्टेशन ‌येथूनही येता येते. रिक्शा तसेच बसचीही सोय आहे.

अशा या निसर्गरम्य गावात शिरताक्षणीच नजरेस पडते ती या गावाची हिरवाई, तसेच सुंदर रंगीत आणि सोनचाफा, कवठीचाफा, सोनटक्का, जाई, जुई, मोगरा, कागडा, गुलाब, शेवंती, अबोली, झेंडू, जास्वंदी इत्यादी सुगंधी फुलांची सुगंधी आणि रंगिबेरंगी उधळण. छोट्याशा टुमदार घराभोवती नारळी, पोफळी, आंबे, फणस, वेलची केळी, भाजीची केळी, पानवेली, आंबेहळद यांची लागवड केलेली दिसते. पानवेलीच्या लागवडी बरोबर अळूवड्याच्या पानाचीही लागवड करतात, इतर भाजीपालाही लावतात. या गावाची लोकसंख्या सुमारे १०,००० असून गावाचे एकूण क्षेत्रफळ ९९३२ एकर आहे. शेतीबागायती ५०७३ एकर आहे. मिठागरे १४४० एकर आणि वस्तीची जमिन २६६० एकर आहे. पडीक जमीन ७६२ एकर आहे.

माता शितलादेवी, हनुमान, तसेच कालीकादेवी ही गावाची दैवतं आहेत. स्वयंभू श्री भवानीशंकर वालुकेश्वर व श्री. सिद्धीविनायक ही मंदिरे होळकर कालीन‌ असून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेत.

गावाच्या जडणघडणीत मच्छीमार सहकारी सोसायटी तसेच शेतकी उत्पादन खरेदी विक्री सहकारी सोसायटी या संस्था सुमारे ५० वर्षांपासून कार्यरत आहेत. गावाचा कारभार ग्रामपंचायत मार्फत चालतो. या गावात चौकळशी वाडवळ, पाचकळशी‌ वाडवळ सोबत शेषवंशी भंडारी, सूर्यवंशी भंडारी, बारी, आगरी, आदिवासी, कुंभार, ब्राह्मण इत्यदी समाज ‌गुण्यागोविंदाने नांदतात. गावात चर्च आणि मशिदही आहे. एकूण लोकसंख्येपैकी‌ सो.पा.क्ष.स.संघाची लोकसंख्या १५० इतकी आहे. एकूण ३० कुटुंबे आहेत. गांवात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. आरोग्यासाठी सरकारी आरोग्य केंद्र असून खाजगी दवाखान्याची सोय आहे. पोष्ट ऑफिस तसेच बँकेचीही‌‌ सोय आहे. बंदर विभाग कार्यालय आहे.

केळवे रोडच्या पूर्वेला असलेल्या डॅम मधून गावाला पाणीपुरवठा केला जातो. शेतीमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र मार्केटची व्यवस्था आहे. सन १९९४ साली केळवे येथे कोकण मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडले होते. क्षात्रैक्य परिषदेचा सुवर्ण महोत्सवी समारंभही येथे साजरा झाला.

सो.पा.क्ष.समाजातील कै. भास्कर सखाराम राऊत व श्री. हेमंत नारायण राऊत यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला आहे. कै. डॉ. हिराबाई भाऊराव पाटील यांनी गावांसाठी मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक अभिसारीण कै. भाऊराव देवजी पाटील पासून कै. पद्मनाभ गणपत राऊत यांनी हिरीरीने भाग घेऊन संघातील तिसऱ्या व पहिल्या कालखंडात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कै. अरविंद हरी राऊत हे केळवे येथे शिक्षक असताना त्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने संघटनात्मक कामगिरी केली आहे.

केळवे गांवाने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आहे. इथल्या स्थानिकांची मुख्य उत्पन्नाची साधने म्हणजे शेती बागायती. त्यातून मिळवणारे नारळी पोफळी चे उत्पन्न. काही वर्षांपासून पर्यटन हा व्यवसाय जोरात वाढीस लागल्याने हाॅटेलींगचा व्यवसाय वाढू लागला आहे.