कै. कान्हा सुकऱ्या पुरव व कै. बाळा सुकऱ्या पुरव ही दोन भावंडे आपले मूळ गाव मधूकरनगर (दहिसर), सोडून वाढीव, केव, पारगाव, बहाडोली येथे काही वर्षे वास्तवास होते. तेथे बाजार पेठ नसल्या कारणाने ते रेल्वे जवळ अशा गावच्या शोधात निघाले. तिकडे त्यांना एक सी.के.पी. गृहस्थानी ओळख झाली. त्याच्या ओळखी ने ते पालघर रेल्वे स्थानका जवळ असलेल्या कमारे गावी स्थायिक झाले. वरील गावा प्रमाणे त्यांनी ह्या ठिकाणी ही सरकारमान्य दारूचा व्यवसाय चालू ठेवला. त्यालाच जोडून त्यांनी किराणा मालाचे दुकान काढले. कमारे गावी त्यांनी १० एकर जमीन विकत घेऊन आपला व्यवसाय शेती कडे वळविला. त्यांचे चुलते कै. माधव पुरव मूळगाव मधुकरनगर (दहिसर) ह्यांना पण ते कमारे गावी घेऊन आले. त्या नंतर ते कमारे येथे स्थायिक झाले. कै. माधव पुरव ह्यांची दोन मुले होती. कै. मुकुंद माधव पुरव व कै. लक्ष्मण माधव पुरव, ह्यांचा भाचा कै.शांताराम दोमोदर पाटील ह्यांचे मूळगाव नरपड सोडून त्यांनाही ते कमारे गावी घेऊन आले.
कै. कान्हा सुकऱ्या पुरव ह्यांना तीन मुले होती. कै. बाबूराव, कै. भिकू, कै. मधू हे होत. कै.बाळा सुकऱ्या पुरव ह्यांना तीन मुले व तीन मुली होत्या. कै. हरिश्चंद्र बाळा पुरव, कै.भास्कर बाळा पुरव तसेच कै. गणपत बाळा पुरव हे मुले होत. कै. गोपिका, कै. सोनी, कै.जनी ह्या मुली होत्या.
कै. कान्हा सुकऱ्या पुरव ह्यांच्या पत्नी चे निधन झाल्यामुळे त्यांनी दुसरा विवाह देवकूबाई यांच्याशी केला. देवकूबाईंचा सुध्दा दुसरा विवाह झाला होता. त्यांना एक लहान मुलगा होता. त्या मुलाला घेऊन त्या कमारे येथे आल्या. त्यांच्या मुलाचे नाव ञिंबक गणू चौधरी होय.
कै. बाबूराव कान्हा पुरव ह्यांना चार मुले व तीन मुली होत्या. कै. काशिनाथ बाबूराव पुरव हे थोरले होत. वडिलांचे लहानपणी निधन झाल्या मुळे सर्व लहान भावंडांची जबाबदारी त्यांच्या वर पडली. अशा कठीण परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी आपला संसार व्यवस्थित पणे हाताळला.
कमारे गाव जंगलाच्या पायथ्याशी असल्यामुळे दळण-वळणाची सोय नव्हती. शाळा नव्हती, रस्ते खराब तसेच नाले असल्यामुळे येण्या-जाण्या साठी त्रास होत होता. अशा परिस्थितीत त्यांनी कठीण प्रसंगांना तोंड दिले.
कै. गणपत बाळा पुरव व कै. त्रिंबक गणू चौधरी ह्यांच्या भरपूर पाठ पुरावा व प्रयत्नाने ‘जिल्हा परिषद कमारे‘ शाळेची स्थापना सन १९५६ साली झाली.
कै. गणपत बाळा पुरव हे जिद्दी व चिकाटी चे गृहस्थ होते. आपला दुकानाचा व्यवसाय नियमित ठेवून ते गवताच्या धंद्या कडे वळले. आपल्या आर्थिक परिस्थितीची प्रगती करीत असताना त्यांनी आपल्या गावातील मंडळींची सुधारणा व्हावी ह्याकडे जातीने लक्ष दिले. आपल्या समाजाची पहिली सभा १९६७ साली कमारे येथे झाली होती, त्यावेळी त्यांचे बहुमूल्य असे सहकाय्र लाभले होते. १९६७ साली झालेल्या सभेचे स्वगताध्यक्ष श्री. त्रिंबक गणू चौधरी ह्यांनी भूषविले होते. गावाच्या विकासा साठी इतर मंडळीने सहाकार्य केले होते. कै. शांताराम दोमोदर पाटील, कै. काशिनाथ बाबूराव पुरव, कै. भास्कर बाळा पुरव, कै. मुकुंद माधव पुरव, कै. लक्ष्मण माधव पुरव, कै. नारायण भिकू पुरव, कै. चिंतामण शंकर राऊत, कै. केशव विठ्ठल पाटील, ही मंडळी गावाच्या कुठल्याही प्रसंगा मध्ये मदती साठी पुढाकार घेत असत. ही मंडळी बैलगाड्या भाड्याने घेऊन लाकडे, कोळसा, विटा , गवत घेऊन ते विक्रीस नेत असत व आपल्या घरचे निवारण करीत असत. हळू-हळू भात शेतीला जोडुन बागायती करून दुधाचा जोड धंदा त्यांनी चालू केला व आपल्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या पेक्षा लहान मंडळी कै. यशवंत बाबूराव पुरव, कै. सखाराम लक्ष्मण पुरव व कै. आत्माराम मुकुंद पुरव ही मंडळी त्यांच्या धंद्या मध्ये सहकार्य करीत असत.
वरील सर्व मंडळी राजकारणा मध्ये सहभागी होत. त्याच वेळची तरूण मंडळी श्री. सागरनाथ बाबूराव पुरव, श्री. वसुदेव बाबूराव पुरव, श्री. लिलिधर त्रिंबक चौधरी, श्री. अनंत भास्कर पुरव ह्या तरूण मंडळींनी ‘सार्वजनिक गणेश् उत्सवाची’ स्थापना सन १९६२ साली केली. कै. यशवंत बाबूराव पुरव ह्यांना देव-भक्तिची अतिशय आवड असल्याने त्यांनी स्थापने साठी बहुमूल्य सहकार्य केले.
समाजाचे कमारे गावात दुसरे अधिवेशन १९८६ साली झाले होते. त्याचे स्वगताध्यक्ष श्री.सागरनाथ बाबूराव पुरव ह्यांनी भूषविले होते, ते स्पष्ट वक्ता म्हणून परिचित आहेत.
श्री. वासुदेव बाबूराव पुरव यांनी आपले शिक्षण पूर्ण करून ते राजकारणा कडे वळाले. ते समाजवादी पक्षा मध्ये सामील झाले. पुढे ते कमारे गावचे आपल्या समाजाचे पहिले सरपंच झाले, सरपंच पदाचा मान मिळाल्या नंतर त्यांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा व पाड्यातील रस्ता हे प्रश्न मार्गी लावले. कुठल्याही समाजाचे सरकारी कामे व प्रश्न सोडविण्या साठी ते हिरिरीने सहभाग घेऊन सोडवीत असत.
श्री.लिलाधर त्रिंबक चौधरी हे समाजा मध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. त्यांनी अध्यक्ष व विश्वस्त पदाचा मान मिळविला असून आजही ते कार्यकरीत आहेत.
आजच्या तरूण मंडळींचा जो विकास चालू आहे, तो खंडीत न करता आपले वेग वेगळे छोटे-मोठे उद्योग धंदे व नोकरी करीत आहेत. त्याच बरोबर महिला ही सहभाग घेत आहेत.महिलांनी महिला मंडळ, बचत गट स्थापन केले आहे. अशा प्रकारे महिला ही प्रगती कडे वाटचाल करीत आहेत.
कमारे गावातून मुली लग्न करून पर गावी गेल्या आहेत. तरी सुध्दा सासुरवाशीण ह्या नात्याने कमारे गावाच्या विकासा कडे लक्ष देत आहेत. विशेष करून सौ. हेमलता दीपक ठाकूर ह्या वेळो वेळी मदतीचा हात पुढे करून सहकार्य करीत असतात.
कै. गंगाधर पिलाजी चौधरी व त्यांचे चि. कै. वसंत गंगाधर चौधरी ह्यांचे कमारे गावाशी निकटचे संबंध होते. गावाला त्यांचे सहकार्य लाभत असे. कै. माधव नारायण पाटील हे आपले मुळगाव, नांदगाव, सोडुन कमारे गावी स्थायिक झाले. त्यांचा नातू श्री. प्रमोद शशिकांत पाटील ह्यांनी तिसऱ्या अधिवेशनाचे स्वगताध्यक्ष पद भूषवीले आहे.