आमचं गांव पोफरण. फोपरण किंवा फोफरण नाही; पोखरणही नाही! तर पोफरण हे पालघर ह्या जिल्ह्यातील व तालुक्यात वसलेलं छोटंसं गांव. पूर्वी पोफरण हे गांव समुद्रकिनारी वसलेले होते. १९६० च्या दशकात तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची स्थापना झाली. ह्या प्रकल्पभवती जी गावं होती त्यातील एक. पैकी देलवडी ह्या गावाचे पुनर्वसन १९६९ पूर्वीच झाले, आज जो परिसर पांचमार्ग नावाने ओळखला जातो, तिथेच देलवडी गावाचे पुनर्वसन झाले आहे. पोफरण व अक्करपट्टी ह्या गावांचे पुनर्वसन २००३-२००४ दरम्यान आता जिथे गांव आहे त्या नवीन वसाहतीत झाले. घिवली अजूनही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहे.
आज जी पोफरणची नवीन वसाहत त्या वसाहतीस नवीन पोफरण, पोफरण इत्यादी नावाने ओळखले जाते. नवीन पोफरण हे भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास बोईसर, वाणगाव व तारापूर ह्या तीन प्रमुख ठिकाणांच्या त्रिकोणाचा मध्य काढल्यास ते ठिकाण म्हणजे पोफरण!
जुन्या पोफरण गावात पुरातन किल्ल्याचे अवशेष आढळतात. अशी वदंता आहे की हा किल्ला पोफ ह्या नावाच्या राजाचा होता, पोफ राजाचे रण म्हणून आमच्या गांवचे नाव पोफरण असे सांगितले जाते, परंतु त्याला कुठलेही प्रमाण नाही. पोखरण नावाची अनेक गावे आपण ऐकली असतील, डहाणू जवळ, ठाण्यातील, आणि राजस्थानमधील, पण पोफरण नावाचे दुसरे गांव असल्याचे ऐकिवात नाही.
पालघर जिल्ह्यातील इतर किनारपट्टीच्या गावांप्रमाणे पोफरण देखील मिश्र वस्तीचे गांव आहे. वाडवळ, भंडारी, मांगेले-कोळी, हरिजन, आदिवासी अशी वस्ती आहे. नाही म्हणायला एक गुजराती, एक मालवणी, एक तेलगू, एक मल्याळी आणि एक मुसलमान समाजातील घर देखील आहे. सर्व गुण्यागोविंदाने नांदतात. जुन्या पोफरण बद्दल म्हणाल तर गावातील सर्वात जास्त वस्ती भंडारी लोकांची की मांगेले लोकांची हा प्रश्न नेहमीच सतावायचा, ह्याला कारण, पावसाळ्यात मांगेलआळी पूर्ण भरलेली असायची, पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हेच मच्छिमार-मांगेले दांडी येथे मच्छिमारीसाठी जाऊन रहायचे, पैकी बरेचसे मच्छिमार दांडी येथे स्थाईक झाले, आणि बाकीच्या मच्छिमार समाजातील बांधवांनी पोफरणला कायमस्वरूपी घर बनवले. आजची पोफरणची वस्ती हजार-दीड हजाराच्या घरात आहे. भंडारी, मांगेले, हरिजन, आदिवासी, वाडवळ, मालवणी, मल्याळी, तेलगू, मुसलमान, गुजराती, अशा उतरत्या क्रमाने वस्ती आहे. पैकी गावात राहणारी वाडवळ वस्ती मात्र पन्नास. मधूकरनगरच्या एक सभेत एक कोष्टक मी पाहिलं होतं, त्याय सर्व गावांची १९५० आणि तत्कालीन लोकसंख्येची तुलना केली होती, तेव्हा ३५-४० वर्षांनंतर पोफरणची लोकसंख्या कमी झाली होती, आजही तितकीच आहे. नोकरीनिमित्त गावातून स्थलांतर हे लोकसंख्या स्थिर राहण्याचे मुख्य कारण होय.
साधारण २००१-२००२ पर्यंत शेती आणि मच्छिमारी हा पोफरणवासीयांचा मुख्य व्यवसाय होता, गावाचे नवीन ठिकाणी झालेलं पुनर्वसन हे हे दोन्ही व्यवसाय अचानक बंद पडण्याचे मुख्य कारण होय. ताडी व गावठी दारू हे दोन जोडधंदे देखील गांवचे प्रमुख व्यवसाय होते. स्थलांतर झाल्यावर शेतजमीन दिली गेली, नाही असे नाही, परंतु ती आहे, बावडे, तणाशी, वाणगाव ह्या दूरच्या ठिकाणी, आणि तरुणांचा शेतीकडे कमी झालेला ओढा ह्यामुळेच शेती व मच्छिमारीसाठी आवश्यक समुद्र किनारा दूर गेल्यामुळे तोही व्यवसाय पोफरणकर करेनासे झालेत, सद्या नोकरी हा आमच्या गावकऱ्यांचा मुख्य वयवसाय आहे. अनेक तरुण अणुकेंद्राच्या ५ आणि ६ व्या एककामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतात, आणि पुनर्वसन कायद्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून कोर्टाच्या आदेशाची वाट पाहताहेत. दुग्धव्यवसाय व इतर छोटेमोठे व्यवसाय देखील गावकरी करतात.
पूर्वी पोफरणला पोहचायचे म्हणजे जिकरीचे समजले जायचे. बोईसरला गाडी पकडायला साधारण अडीच-तीन तास लवकर निघावे लागायचे, आमचे गंगाधर जीवन, अतिशयोक्ती वाटेल पण साडेसहाची शिक्सप (6 up) पकडायला पावणेदोनला पोफरणहुन निघायचे हे मला आठवते. तेव्हा लोकल, मेमु नव्हत्या, शटल एक-दोन होत्या. तर पोफरण खूप कोपऱ्यात होतं, रात्री उशीर झाल्यावर कितीतरी वेळा विरार तर मुंबई दरम्यानच्या नातेवाईक, मित्रमंडळीकडे राहावे लागत असे, आता वयक्तिक वाहने तसेच सार्वजनिक दळणवळणाची साधने वाढल्याने तसेच पोफरणचे स्थलांतर झाल्याने पोफरणला पोहोचणं आता खूप सोईस्कर झालंय. आजही बोईसर/पांचमार्ग मुख्य रस्ता असला तरी, वाणगांव/मोगरबाव मार्गे, तारापूर/माळीस्टॉप मार्गे, चिंचणी/भेंडवड मार्गे पोफरणला पोहचू शकता. आता पोफरणच्या पूर्वेला अक्करपट्टी व दहिसर ही गांवे आहेत, पश्चिमेला कुडण व तारापूरचा काही भाग, दक्षिणेकडे दहिसर/कुरगाव/पांचमार्ग ह्या गावांचा काही भाग, तर उत्तरेकडे देदाळे/कलोली/भेंडवड चा काही भाग अशी स्थिती आहे.
जुन्या गांवात किल्ल्याचे अवशेष असल्याचे मगाशी म्हटले आहे, तसेच काही मंदिरे आहेत, गावांचे स्थलांतर झाले असले तरी मंदिरे अजूनही तशीच आहेत. पोफरण गांवात वडलेदव नावाच्या ग्रामदेवतेचं मंदिर, जरीमरी, आणि झोटिंगाचे मंदिर आहे. नवीन गावात वडलेदेवाने परशुरामाचा अवतार घेतला आहे, झोटिंग देखील ग्रामदेवतेबरोबर नांदतो, साईबाबा आणि गणपती बाप्पा नव्याने दाखल झालेत. मच्छिमारांनी दत्त आणि जरीमरीचे मंदिर बांधले आहे. गांवाचे पुनर्वसन झाले असल्या कारणाने आमचे नवीन गांव हे प्लान्न्ड गांव आहे, डामरी रस्ते, स्लॅबची घरे, मासळी मार्केट, स्मशानभूमी, समाजमंदिर, आरोग्य केंद्र, शाळा, गटारे, मैदान सर्व आहे गावात. अक्षय तृतीयेला जत्रा असते, दहीहंडी, नवरात्रोत्सव साजरा केला जातो, एक गांव/एक गणपती असतो सुभाष बोस मित्रमंडळाचा, वाडवळ आळीत.
१९९२ पर्यंत अक्करपट्टी बरोबर गृप-ग्रामपंचायत असलेली, त्यानंतर पोफरण ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, सात सदस्यांच्या पंचायतीत सध्या आदिवासी स्त्री सरपंच म्हणून काम पाहतात.
छोटं गाव असलं तरी समाजकार्यात मोठे योगदान दिले आहे. गोविंदा लक्ष्मण पाटील ह्यांचा संघाच्या स्थापनेत मोठा वाटा आहे. ते तीन वेळा संघाचे अध्यक्ष होते तर त्यांचे सुपुत्र मुकुंद गोविंद पाटील हे विश्वस्त. जयप्रकाश नथुराम पाटील हे देखील संघाचे अध्यक्ष व नावाजलेले शिक्षक होते. गंगाधर जीवन पाटील ह्यांनी संघात अध्यक्षपदासकट अनेक पदे सांभाळली, गावच्या पुनर्वसन समितीमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. श्री तरंग ज पाटील हे मागील साधारण ३५ पेक्षा जास्त वर्षांपासून संघकार्यात हिरिरीने भाग घेतात.
संघाची दोन अधिवेशन पोफरणकरांनी स्वतंत्ररित्या पार पाडली, १९८२ आणि २००३ साली, त्यापूर्वी एक अधिवेशन घिवली आणि पोफरण, दोघांनी मिळून पार पाडले होते. तर असे हे आमचे पोफरण गाव, छोटं पण महान! एकदा भेट द्या!!