Villages Villages नरपड

नरपड हे समुद्रकिनाऱ्यावर अतिशय सुंदर अशा निसर्ग सान्निध्यात अरबी समुद्रकिनारी वसलेले वाडवळ (चौकळशी) समाजाचे प्राबल्य असलेले मोठे गाव आहे. नरपड ग्रामपंचायती मध्ये नरपड आंबेवाडी व ठाकूरवाडी अशी गावे आहेत. एकूण लोकसंख्या ४७०० इतकी आहे.

नरपड गाव फार प्राचीन काळापासून वसलेले असावे. ह्या गावाच्या नावावरून तरी तसे वाटते. नरपड म्हणजे नरपतनम. 'नरपतनम' हे संस्कृत नाव आहे. 'नृणां पतनम' म्हणजे श्रेष्ठ लोकांचे गाव (पत्तन म्हणजे गाव) श्रेष्ठ दर्जाचे पूर्वज ह्या गावात राहत असावेत व त्या नरपतनम वरून नरपड असा अपभ्रंश झाला असावा.

बऱ्याच वर्षापूर्वी आदरणीय कै. वामनराव जीवन पाटील यांनी "नृपनगरची पुर्नघटना" असे एक लहानसे पुस्तक लिहिले होते. त्या मध्ये नरपड गावाचा थोडासा इतिहास होता. त्या पुस्तकात ते म्हणतात की नरपड गावचे पाटील घराणे गंभीर गडावरुन आले. गंभीरगड हा डहाणूकडून सेल्वासला जाताना रस्त्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरत वर हल्लाकरून आल्यानंतर परतताना गंभीर गडावर थांबले होते. त्या ठिकाणी तळाशी मोठा खजिना पण आहे. अशी वंदता आहे. तेव्हा हे पाटील सरदार त्यांच्या बरोबर होते.

नरपडचे वाडवळ हे ही क्षत्रिय असून बिंबराजा बरोबर आलेल्या कुळांपैकी होते. असा इतिहास संगितला जातो. काहीही असले तरी श्रेष्ठ लोकांचे गाव म्हणून नरपड प्रसिद्ध होते. नरपड हे नावही भारतात कोठेही आढळत नाही. असे हे एक चार अक्षरी आकार-उकार नसलेले गाव आहे. काही लोक म्हणतात की ना रड, ना पड असे आमचे 'नरपड'.

नरपड गावातील सर्व लोक शेतकरी असून बहुतेक लोकांच्या वाड्या आहेत. पूर्वी पासून नारळी व चिकूच्या वाड्या प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारच्या पालेभाज्या व मिरची सुद्धा लावली जाते.

गावात वाडवळ चौकळशी समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचेच गावावर वर्चस्व आहे. तसेच आदिवासी वारली (शेतमजूरीसाठी) ताडी काढणारे भंडारी (ठाकूर वाडी भागात) बुरूड काम करणारे हरिजन (माह्यवंशी समाज) हे ही लोक गावातील शेतकऱ्यांना टोपल्या, सूप, इरली, पाट्या, कापूर इ. शेतीपुरक वस्तु पुरवतात. आजही हे लोक हेच काम करतात पण आता शेतकऱ्यांप्रमाणे सधन झालेले आहेत. समुद्र किनारी मांगेला व माच्छी समाज आहे. काही दुबळा समाजाची घरे आहेत. पूर्वी पारशी समाजही येथे होता. त्यांचे सॅनेटोरिअम आजही आहे. गावात फार मोठा ख्रिश्चन समाजही राहतो. ख्रिश्चनाची तर दफनभूमी ह्या गावातच आहे. नरपड गावात सर्व जातीधर्माचे लोक अतिशय एकीने व गुण्यागोविंदाने नांदतात.

नरपड गावात भेदाभेद जातीयता अजिबात नाही. सर्व समाज आता एकमेकांकडे सर्व कार्यक्रमाला जातात. जन्म, बारसे, मृत्यु कोणत्याही प्रसंगी एकी दिसते. नरपडगावाला १९६६ साजी अस्पृश्यता निवारणाचे परितोषिक मिळाले आहे.

गावतील शैक्षणिक संस्था - नरपड गावात १९६७ पर्यंत इ. ७वी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती. ह्या शाळेची स्थापना १९०६ साली झाली आहे.

१९५४ साली स्नेहवर्धन मंडळ, नरपड ही संस्था गावात गणेशोत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रम करून विकास करण्याचा उद्देशानी स्थापन झाली. ह्या संस्थेने १९६९ साली माध्यमिक शिक्षणासाठी माध्यमिक शाळा सुरू केली. आज ह्या शाळेचे नाव अज.म्हात्रे माध्यमिक विद्यालय असे आहे. आता स्नेहवर्धक मंडळाचे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले आहे.

गावतील इतर संस्था - नरपड गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना १९५० साली झाली. पहिले सरपंच कै.यशवंत रामचंद्र राऊत हे होते.

स्नेहवर्धक मंडळ नरपड ही संस्था १९५४ साली स्थापन झाली. मुंबईला नोकरी निमित्त गेलेल्या श्री. रा. बा. पाटील व इतर तरूणांनी एकत्र येऊन १९५४ साली बलिप्रतिपदेच्या दिवशी स्थापना केली. (२७-१०-१९५४) गावातील हीच संस्था रजिस्टर आहे. गावातील इतर संस्थाना मार्गदर्शन करणे व सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करणे हे संस्थेचे ध्येय आहे.

नरपड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ही सहकारी संस्था १९४७ साली स्थापन झालेली जुनी संस्था आहे. कै. भास्कर ल. पाटील यांनी ही संस्था पुढे आणली व कै. माधवराव पाटील. यांनी ती वाढविली. शेतकऱ्यांना कर्ज देणे, खते व इतर साहित्य पुरविण्याचे काम ही संस्था करते.

गावात बजरंग व्यायाम मंदिर ही व्यायमशाळा आहे. आधुनिक उपकरणांनी सज्ज अशी ही संस्था आजही तरुणांनी प्रेरणा देत आहे. गावात नवरात्र उत्सव मंडळ आहे. उत्सव मंडळातर्फे गावातील गणेशोत्सव, गोकुळष्टमी, नवरात्री उत्सव व इतर कार्यक्रम केले जातात.

गावात फार पूर्वी पासून महिला मंडळ नरपड कार्यरत आहे. महिलांच्या विकासात त्याचा फार मोठा वाटा आहे. महिला मंडळाची स्वतंत्र इमारत असून सर्व प्रकारची भांडी व खुर्च्या आदि साहित्य भाडयाने देतात. महिला मंडळाची स्थापना कै. कबु मावशी, कै. मनुताई, कै. गीता अक्का, कै. इंदुताई आदि भगिनींनी केली. आजही सौ. शैलजा अ. पाटील, सौ. यामिनी द. पाटील हे कार्य चालवीत आहेत.

नरपड गावात फार पूर्वी पासून हनुमान प्रासादिक भजनी मंडळ कार्यरत आहे. आजही हनुमान मंदीरात भजनाचे व उत्सवाचे कार्यक्रम केले जातात.

२०१५ सालापासून गावातील ज्येष्ठनागरिकांनी सहजीवन ज्येष्ठ नागरिक संस्था स्थापन केली आहे. ह्या संघटनेतर्फे अनेक उपक्रम केले जातात. योगाचे वर्ग घेतले जातात. आरोग्य शिबीरे, वाढदिवस वगैरे कार्यक्रम साजरे केले जातात. ही संस्था रजिस्टर केली जाणार आहे.

तरुणांनी नरपडच्या तलावाजवळ एक मोठे क्रीडांगण केले आहे. तेथे क्रिकेट व इतर खेळ खेळले जातात.

नरपडचे वैशिष्ट्य म्हणजे नरपडचे साईनाथ मंदीर. हे साईमंदीर नरपडचे भूषण आहे. दर गुरुवारी अनेक भक्त येथे दर्शनाला येतात. इतर दिवशी सुद्धा शिर्डीसारखा पालख्या येतात. साईनाथ सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे ह्याचे काम पाहिले जाते. येथे धर्मशाळा व राहण्यासाठी भक्तनिवास आहे. कै. दादी मायर इराणी हे पूर्वी ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांनी फारच चांगल्या सुधारणाकेल्या आहेत. कैकी गोसावी सुरती ह्या माह्यवंशी समजातील भक्ताने हे मंदीर स्थापन केलेय. साईबाबा पूर्वी डहाणूला आले असता येथे येऊन बसत असत. असे लखुभाउराव सांगत होते.

गाव पर्यटनाच्या दृष्टीने फारच सुंदर आहे. पर्यटकांना राहण्यासाठी साई प्रसाद गेस्ट हाऊस आहे. तसे विसावा धाबा हे श्री महेश राऊत यांचे रिसॉर्ट आहे. तसेच ठाकूर वाडीत हॉटेल आहे. श्री किशोर राऊत यांचे नॅचरल विकसित स्पॉट आहे. गावात अनेक ठिकाणी रूम व जेवणाची व्यवस्था आहे.

गावात पोलिस मामांचे मोठे दुकान आहे. येथे सर्व वस्तु उपलब्ध असतात. डहाणूरोड स्टेशन पासून ५ कि.मी. अंतरावर असल्याने सर्व सोयी उपलब्ध आहेत. गावात येण्यासाठी रिक्षा, एस्.टी.बस व इतर सोयी उपलब्ध आहेत.

गावातील सर्वच समाज सुशिक्षित व सुसंस्कृत आहेत. वाडवळ समाजातील १००% लोक उच्च शिक्षित आहेत.