आजचे माहीम म्हणजे पालघर जिल्ह्यातील (उत्तर कोकणातील) सागर किनारी वसलेली, इतिहास कालीन महिकावती नावाची
नगरी होय. तसेच ती प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली निसर्ग रम्य भूमीही आहे. देवीच्या नावावरून तिला माहीम हे
नाव पडले.
बाराव्या शतकात महिकावती नगरी ही बिंब राजाची राजधानी होती. या नगरीवर प्रतापबिंब, महिबिंब आणि केशवबिंब या
राजांनी जवळजवळ १०० वर्षे राज्य केले. याचा उल्लेख महिकावतीची बखर, साष्टीची बखर, उत्तर कोकणचा इतिहास,
महाराष्ट्राची धारातीर्थे भाग दोन या पुस्तकात वाचावयास मिळतो.
माहिम गाव हे इतिहास काळा बरोबर संत वास्तव्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे एकूण चार संत पुरूषांचे वास्तव्य होऊन गेले-
- केशवनाथ स्वामी महाराज यांची जीवंत समाधी आहे (काळ-१८७३)
- स्वामी प्रज्ञानंदांचा (जन्म-१८९३)
- ह. भ. प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर (१८९६-१९६८)
- आधुनिक थोर संत श्री. भुवनेश्वर महाराज (१९१८-- १९६०)
अशा या चार थोर संतांची असलेली पुण्यनगरी म्हणजे माहिम. ब्रिटिश काळात माहिम हे तालुक्याचे ठिकाण होते. ती
नगरपालिकाही होती. तिथे मामलेदार कचेरी होती. पुढे माहिम नगरपालिका बरखास्त होऊन तिथे ग्रामपंचायतीची स्थापना
झाली. सो. पा. क्ष. संघाचे माजी अध्यक्ष कै. त्र्यंबक पांडुरंग राऊत हे पहिले सरपंच होतं.
माहीम गावची लोकसंख्या साधारणपणे वीस हजारावर असून त्यातील सो. पा. क्ष. समाजाची लोकसंख्या ४५० इतकी आहे.
गावचे हवामान उष्ण आणि दमट आहे. गाव समुद्र किनारी असल्याने निसर्गरम्य आहे तसेच ते पर्यटनकेंद्रही आहे.
गावचा व्यवसाय मुख्यतः शेती व बागायत हा आहे. शेतात भाजीपाल्या सोबत पानवेलीची लागवड केली जाते. माहिमच्या
पानवेलीची पाने देशात प्रसिद्ध आहेत. पूर्वी माहिमच्या पानवेलीची निर्यात पाकिस्तानमध्ये होत असे; परंतु सध्या ती निर्यात बंद
आहे. येथे मिरची लागवडीचाही व्यवसाय आहे तसेच वाडीतील शहाळीही बाहेर पाठविली जातात.
गांवात चौकळशी समाजाबरोबर पांचकळशी समाज, भंडारी समाज, आदिवासी समाज, मच्छिमार समाज, तसेच मुसलमान
धर्मीय ल़ोकांची वस्ती आहे. गावात एकूण १८ मंदिरे असून दोन मशिदीही आहेत. श्री. मात्रुका मंदिर, श्रीराम मंदिर, श्री
व्यंकटेश मंदिर ही मंदिरे मोठी आहेत.
गांवात एक माध्यमिक शाळा आहे, आणि एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, सात प्राथमिक मराठी शाळा आहेत, तसेच एक
आय. टी. आय. (औद्योगिक प्रशिक्षण केंद्र) आहे.
गांवात ग्रामपंचायत असून अनेक सहकारी संस्था आहेत-
- माहीम विविध सहकारी संस्था
- दुध सोसायटी
- पाणेरी वाटप संस्था
- दोन मच्छिमार संस्था आहेत
- दोन ताडी विक्री संस्था आहेत
माहीम गाव हे सहकारी संस्थेचे आगर आहे. कर्मवीर जर्नादन पांडुरंग राऊत यांचे आदिवासी क्षेत्रामध्ये असलेले कार्य
आदिवासींना सहकार क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून देणारे आहे. आपल्या समाजासाठी त्यांनी भरीव काम केले आहे.
या गावचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सक्रिय सहभाग आहे. सो. पा. क्ष. समाजातील श्री. विलास राऊत हे
सभापती होते तर सध्या श्रीमती निर्मला राऊत ह्या सरपंचपदी विराजमान आहेत.
गांवात दोन बॅंका आहेत तसेच एक पोष्ट ऑफिस आहे, पोलिस स्टेशन आहे, इथे शवविच्छेदनाची सोय आहे. एक सरकारी आरोग्य
केंद्र असून चार खाजगी दवाखाने आहेत.
गांवात सो. पा. क्ष. संघाचे कै. श्री. वामन गणेश ठाकूर समाज मंदिर माहीम आगर येथे असून त्याचा फायदा जवळच्या लोकांना
होत आहे तसेच व्यंकटेश मंदिर सभागृह ही आहे.
गांवात मुलांना खेळण्यासाठी तीन ठिकाणी क्रिडांगणाची सोय आहे-
- भुवनेश किर्तने विद्यालय
- माहीम -वडराई क्रिडांगण
- माहीम आदिवासी खंडकरी मिठागर क्रिडांगण
या क्रिडांगणाचा फायदा घेऊन आपल्या खेळाने चमकत असलेला माहीमचा सुपूत्र श्री. शार्दुल ठाकूर हा सध्या भारतीय संघात
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तो आय. पी. एल. मध्येही चमकत आहे. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे.
स्वातंत्र्य चळवळीत देखील माहीम गाव अग्रेसर राहिला आहे.