Culture & Tradition Culture & Tradition गणेशोत्सव  (महिना : भाद्रपद)

Ganesh-Utsav

संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो असा सर्वांचा लाडका सण म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला येणारी गणेश चतुर्थी. आबालवृद्धांपासुन सर्वजण अत्यानंदाने साजरा होणारा हा सण. पण आपण गणपतीची प्रतिष्ठापना का करतो हे आपल्या पैकी अनेकांना माहीत नसते. महर्षि वेदव्यास ह्यांना महाभारत लिहावयाचे होते परंतु हे लिखाण करणे त्याना शक्य नव्हते, म्हणुन त्यांनी श्री गणेशांना विनंती केली ती त्यांनी मान्य केली. हे लिखाण न थांबता अविरत करायचे होते. हे करताना गणपतीला थकवा येईल शिवाय पाणीही प्यायचे नव्हते म्हणुन व्यासांनी गणपतिच्या शरीरा भोवती मातीचे लेपन केले. आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची यथासांग पुजा केली. मातीच्या लेपनाने गणपति आकडून गेला.म्हणुन त्याला पार्थिव गणेश असे नाव पडले.

हे लिखाण सतत दहा दिवस चालले. व्यासांनी गणेशाकड़े पाहिले तेव्हां त्याच्या शरीराचे तपमान भरपूर वाढले होते. तेव्हा त्याच्या शरीराचे तपमान कमी व्हावे आणि शरीरावरची माती निघावी म्हणुन व्यासांनी त्याला पाण्यात ठेवले.तो दिवस अनंतचतुर्दशीचा होता.

सतत दहा दिवस चाललेल्या ह्या उपक्रमामुळे तेव्हांपासुन दिड ते दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो . ही मुळ कथा आपल्या माहितीसाठी दिली आहे. पुर्वी घराघरात वैयक्तिक साजरा होणारा हा सण लोकमान्य टिळकांनी रस्त्यावर आणुन त्याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. त्यातुन लोकजागृति घडवुन आणली. आजतागायत हा सण दिवसेंदिवस मोठा इवेंट म्हणून साजरा होतो आहे. त्याचे लोण अगदी परदेशातही पोचले आहेत. दक्षिण कोकणात तर ह्या सणाला अपूर्व महत्व प्राप्त झालेले आहे. तेथे घरोघरी गणपति बसविले जातात. हा एकच सण असा आहे की कोकणातील ठीकठिकाणी असलेले चाकरमानी आपापल्या गावी एकत्र येतात. त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असते. मात्र अलीकडे ह्या सणाला व्यावसायिक रूप येत असुन त्यातुन काही अनिष्ट गोष्टी आणि प्रथा रूढ़ होत आहेत हे क्लेशदायक आहे. मुंबईत मोठमोठ्या गणेशमूर्ति तर पुण्यात मखरे आणि दिव्यांची आरास/रोषणाई हे गणेशभक्तांचे ख़ास आकर्षण असते. अनेक ठिकाणी ह्या निमित्ताने वेगवेगळे देखावे उभारून त्यातून ऐतिहासिक, सामाजिक वैज्ञानिक, देशभक्तिपर प्रबोधन केले जाते. अनेक प्रकारच्या स्पर्धा ,व्याख्याने आयोजित केली जातात. अश्या दहा दिवसांच्या आनंदी वातावरणानंतर गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या। असा गजर करित आपल्या लाडक्या देवाला निरोप दिला जावुन विसर्जन केले जाते.

"ॐ नमो गणपतये"