Culture & Tradition Culture & Tradition नारळी पौर्णिमा  (महिना : श्रावण)

Narali_Purnima

श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण मुख्यत्वे कोळीबांधवांचा सण म्हणुन ओळखला जातो. पावसाच्या काळात जुन महिन्यापासुन मासेमारीसाठी बंद करून ठेवलेली आपापली गलबते कोळीबांधव ह्या दिवशी सागराची पुजा करून सागराला नारळ अर्पण करतात व आपल्या बोटीं सागरात उतरवतात. हा पूजा करण्याचा कार्यक्रम अतिशय विधियुक्त असा होतो. कोळी बंधु-भगिनी-मुलं-वृद्ध सर्वजण आपला पारंपारिक वेष परिधान करतात, एका पूजेच्या तबकात सोन्याचा नारळ घेवुन वाजत गाजत सागरकिनारी जातात. तेथे समाजातील प्रमुख असलेली अधिकारी व्यक्ति सागराची पुजा करून सोन्याचा नारळ सर्व समाजाच्या वतीने सागराला अर्पण करतो.

मग सुवासिंनी समुद्राला साकडं घालतात की हे सागरराजा आजपासुन आमचे धनी मासेमारीसाठी तुझ्याकड़े येणार आहेत.आमचं सौभाग्य तुझ्याहाती सुरक्षित राहु दे,अवचितपणे वादळवारा सोडु नकोस, आमचा धनी आमच्याकडे सुरक्षित येवू दे. आमच्या ह्या व्यवसायातुन आमची भरभराट होवू दे. हीच आमची तुझ्याकड़े मागणी आहे. आमचा अन्नदाता तूच आहेस.

ह्या दिवशी नारळीभात, नारळवड्या असा पक्वान्नांचा बेत असतो. काही ठिकाणी नारळ फोड़ण्याच्या स्पर्धा होतात. कोळी बांधवांच्या ह्या आनंदात आपल्याकड़े इतर समाजहीं मोठ्या प्रमाणांत सामिल होतात. त्यात मुस्लिम व ख्रिस्ती समाजाचांही समावेश आहे.