Culture & Tradition Culture & Tradition होळी  (महिना : फाल्गुन)

Holi

फाल्गुन पौर्णिमा ही होळी पौर्णिमा. यालाच हुताशनि पौर्णिमा म्हणतात. हिरण्यकशपूची बहीण ढुंडा प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडामध्ये बसली तेंव्हा प्रल्हाद जिवंत राहीला आणि ढुंडा ही अग्निकुंडामध्ये भस्मसात झाली तसेच कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना राक्षसिणीला श्रीकृष्णाने त्याच दिवशी मारले व लोकांनी तिची होळी केली अशी होळीची कथा आहे. होळी म्हणजे त्याग करणे. प्रज्वलीत केलेल्या अग्निमध्ये चालत आलेले वैरभाव, अनिष्ट चालीरिती व घातक परंपरा यांचे समूळ उच्चाटण व्हावे हा हेतू आहे. त्यासाठी गावात होळी पेटविण्याची ठराविक जागा असते. तिथे जमीन शेणानी सारवून त्यावर रांगोळी टाकली जाते, मध्यभागी एक खड्डा खणून भेंडीचे झाड, किंवा सुपारीचे झाड उभे करून सभोवताली गाईच्या पांच शेण्या रचून त्यावर लाकडे रचली जातात. त्याची पूजा करून होळी प्रज्वलीत करतात. त्यामध्ये नारळ, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. गावाकडे पुरूष मंडळी आपल्याला माहीत असलेल्या अश्लील शब्दाचा मोठ्याने उच्चार करून उजवा हात ओठांवर घेऊन शंखनाद करतात. बायका गाणी बोलून होळीभोवती नाचतात. खेडेगावात पंधरा होळी उत्सव असतो. दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो, यालाच धूरवड म्हणतात. सकाळी शांत झालेल्या होळीतून राख घेऊन सर्वांगास लावतात. शास्त्रीय दृष्टया विचार केल्यास होळीमध्ये ज्या कांही औषधी वनस्पती जाळल्या जातात त्याची राख अंगाला फासल्यास उन्हाळा बाधत नाही. या दिवशी पोस्त मागितले जाते.