Culture & Tradition Culture & Tradition आठोंडा  (महिना : कार्तिक)

Aathonda

दिवाळीच्या एक आठवडा अगोदर हा सण येतो. दिवाळी जवळ आली आहे हे सूचविण्यासाठीची ही तयारी असते. या दिवशी सुवासिनी घरासभोवताली झाडू मारून स्वच्छता करतात आणि घरांपुढे तसेच घराच्या चारीबाजूला आणि अंगणात पिठाची किंवा राखाडीची रांगोळी टाकतात. या रांगोळीत गुरांच्या पावलांचे ठसे, गोलवर्तुळ तसेच समांतर रेषा अशा प्रकारची रांगोळी टाकतात. ही रांगोळी संध्याकाळी गुरे घरी येण्याच्या वेळी घालतात.लहान मुले घरातील ताटली घेऊन छोट्या काठीने वाजवितात.

रात्री बायका केळीची पाने, भेंडीचीपाने, हळदीची पाने, धामणाची पाने, कोनफळाची पाने अश्या सारख्या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीच्या पानात पानोळ्या (पानवड्या) करतात.

यालाच काही ठिकाणी तवोळी असेही म्हणतात. तवोळ्या करण्यासाठी तांदुळाच्या पीठात चळवळी हे भिजविलेले कडधान्य,लालभोपळा(डांगर),काकडी, ओले खोबरे तसेच गुळ घालून पिठाची उकड काढून वरील वनस्पतीच्या पानात थोडेसे उकडलेले पीठ पातळ थापून पान दुमडून पातेल्यात चाळणीवर ठेवून उकडतात. व नैवेद्य दाखवून प्रसाद खातात.