Culture & Tradition Culture & Tradition दीवाळी/दीपावली  (महिना : कार्तिक)

Diwali/Dipawali

दीन दीन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी!

आमच्या लहानपणी असे बोलत दिव्याचासण म्हणजेच दीवाळीची स्वागतमयी सुरुवात होत असे. साधारणत: आश्विन महिन्याचे शेवटचे तीन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस असे पाच दिवस दिवाळीचे समजले जातात. पण आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस किंवा गोवत्सद्वादशी. गाईला आपल्या हिंदु धर्मात एक विशिष्ट स्थान असुन तिला गोमाता असे म्हणतात. गाईच्या अंगी सत्वगुण असतात तिच्या दुधापासुन अनेक गोरस मिळतात तसेच गोमूत्र हे कोणत्याही धार्मिक विधिच्या वेळी पावित्र्यासाठी वापरले जाते.

अश्या गाईची वासरासहित पूजा वसुबारसेला केली जाते आणि दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

दुसरा दिवस हा धनतेरस (धनत्रयोदशी) ह्या दिवशी देवांचा खजिनदार कुबेराची पुजा करून घरातील कपाटात असलेल्या संपत्ति, आणि इतर वस्तुंची पूजा केली जाते ही पूजा संध्याकाळी गोरज मुहुर्तावर केली जाते. आणि कुबेराला आवाहन करतात की आमची अशीच भरभराट होवू दे. धने आणि गुळ याचा नैवेद्य दाखविला जातो व प्रसाद म्हणून खाल्ला जातो, जेणे करून येणाऱ्या थंडीच्या मोसमाला आपल्या शरीराने सामोरे जाऊन आपले आरोग्य चांगले राहील.

तिसरा दिवस म्हणजे आश्विन वद्य चतुर्दशी. ह्याच दिवसाला नरकचतुर्दशी असेही म्हणतात. ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने त्याची भार्या सत्यभामेसह नरकासुर नामक राक्षसाचा वध केला आणि त्याच्या कैदेत असलेल्या विविध ठिकाणच्या १६८०० राजकन्यांची सुटका केली. तेव्हापासुन हा दिवस नरकचतुर्दशी म्हणुन ओळखला जातो. हिंदुधर्मात ह्या दिवशी सुगंधित उटणे लावुन अभ्यंगस्नान करून नरकासुराचे प्रतीक म्हणुन पायाखाली किरात (काही ठिकाणी चिराटे असेही म्हणतात) चिरडले जाते, हे जरी असले तरी हे दिवस थंडीचे असुन त्याकालात तळपायाला भेगा जातात, चिराटातील चिकटपणामुळे त्या भेगा भरण्यास मदत होते हे ही एक शास्रीय कारण आहे.

चौथा दिवस हा आश्विन अमावस्येचा. ह्या दिवशी लक्ष्मीपुजन करतात.

प्राचीन काळी ह्या दिवशी देवांचा खजिनदार कुबेर आणि त्याची पत्नी इरिति ह्यांची पूजा केलि जात असे. परंतु गुप्तकालीन राजवटीत वैष्णव धर्माला राजाश्रय मिळाला आणि इरितिची जागा लक्ष्मीने घेतली तिची कुबेरासह पूजा न होता स्वतंत्रपणे पूजा सुरु झाली. कालांतराने कुबेराची जागा जावुन त्या जागी श्री गणेशाची पूजा होवू लागली. त्यामुळ कुबेराचे पूजन धनत्रयोदशिला होवू लागले.

आश्विन वद्य अमावास्येला हिंदू शास्राप्रमाणे स्थिर लग्न मुहुर्तावर संध्याकाळी केले जाते. घरातील देवघरासमोर रांगोळी काढुन त्यावर पाट मांडून पाटावर तांदुळ पसरवून त्यावर एक तबक ठेवले जाते. त्यात सोन्याचांदीचे दागिने आणि पैसे ठेवून अक्षता,हळद कुंकु वाहून पूजा केली जाते. आई लक्ष्मीला आवाहन केले जाते की आमची संपत्ति सतत वाढू दे. घराघरात सुखशांति नांदु दे. ह्या दिवशी काही ठिकाणी श्री सुक्ताचे पठन केले जाते. सोबत आरोग्यलक्ष्मी असलेल्या केरसुणीचीही पूजा केलि जाते. ह्या पुजेला धने आणि गुळ ह्याचा नैवैद्य दाखविला जातो पाचवा दिवस हा कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलीप्रतिपदेचा दिवस. ह्या दिवशी बळीराजाने श्रीविष्णुला एका मागणीद्वारे आपले सर्वस्व दान करून टाकले आणि मोक्षपदास गेला. त्याला श्रीविष्णुने दिलेल्या वरदानानुसार ह्या दिवशी बलीपूजन केले जाते. बलीराजाला कृषिक्रांतीचा जनक समजले जाते. म्हणुनच आपल्याकडे शेतकऱ्याला बळीराजा असे संबोधले जाते. ह्या दिवशी शेतकरी आपल्याशेतीकामाच्या सर्व अवजारांची पुजा करतात. बळीराजाला सुखसमृद्धिचे आवाहन करतात. आपले बैल आणि इतर गोधन ह्याना सजवुन तयार करतात. ह्या विषयीची माहिती "पोळा" सणाविषयी लिहलेल्या लेखात आली आहेच.

शेवटचा दिवस हा भाऊबिजेचा असतो. ह्याच दिवसाला यमबिज किंवा यमद्वितीया असेही म्हणतात. रक्षाबन्धन नंतर बहिणभावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा दुसरा सण. ह्या दिवशी बहीणाबाई आपल्या भाऊरायाला औक्षण करून त्याच्या आयुरारोग्यासाठी यमराजाला विनवणी करतात की आमच्या भाऊरायाला दीर्घायुष्य दे. त्याला सुखात ठेव. भाऊ आपल्या बहीणीला यथायोग्य भेटवस्तु देत असतो. ह्या दिवशी बहिणभाऊ एकत्रितपणे सुग्रास किंवा सामिष भोजन करतात. दिवाळीच्या फराळा बद्दल आपणास वेगळे सांगणे नकोच. घरोघरी, लाडु, करंज्या, चकल्या, अनारसे, शंकरपाळी, वेगवेगळी मिठाई अशी रेलचेल असते. हल्ली हे पदार्थ नेहमी मिळतात. पण पुर्वी फक्त सणासुदिलाच हे पदार्थ मिळत असत किंवा बनविले जात असत. शेतीच्या कामातुन थोड़ी मोकळीक मिळाल्याने गृहिणी दिवाळीच्या निमित्ताने असे गोडधोड पदार्थ बनवत असत. अशी ही सानांपासुन आजोबा-आजी पर्यन्त सर्वाना हवीहवीशी "दिवाळी".