सो.पा.क्ष.स ज्ञातीतील ठाणे व मुंबई जिल्ह्यांत वास्तव्य करणाऱ्या जन सामान्याचे सोने करणारे चालनाकार
अरविंद हरी राऊत हे एक परीस होते हे कोणीही अमान्य करणार नाही.
चालनाकार अरविंद राऊत यांचे मूळगाव डहाणू तालुक्याच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर वसलेले नरपड
असले तरी त्यांचा जन्म त्याच तालुक्यांतील वरोर गांवी त्यांचे आजोबा जीवन व आजी गुंजी यांचे घरी दि.
७ जून १९१५ रोजी झाला. गुंजीच्या प्रेमळ छत्राखाली प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या नंतर अरविंद भाईंनी
तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डाच्या त्या काळांत डहाणू तालुक्यांतील शिक्षणाचे माहेघर मानले जाणाऱ्या
बोर्डी गावांत प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीस सुरुवात केली. बोर्डी येथे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय
क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनुक्रमे श्री. मुकुंदराव सावे, आचार्य भिसे व श्री.शामराव पाटील यांच्या संगती-
सोबतीचा अमूल्य लाभ त्यांना मिळाला आणि त्यामुळेच या क्षेत्रांतील त्यांचे विचार समृद्ध झाले.
सोमवंशी पाठारे क्षत्रिय ज्ञातीतील समाजधुरीणांनी १९१० साली हा ज्ञाती संघस्थापन केला. ही संघटना
दोन वेळा बंद पडली. चालनाकारांनी १९३७ साली या संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यांत पुढाकार घेतला.
जिल्हा बोर्डातील नोकरी सोडून मुंबई महापालिकेत त्यांनी शिक्षकांची नोकरी करण्यास सुरुवात केली.
त्याच बरोबर आपली उन्नती साधण्यासाठी शहरा कडे चला असा नारा त्यांनी खेड्यापाड्यांत राहणाऱ्या
समाज बांधवांना दिला व त्यासाठी शिक्षणाचे महत्तव विशद केले. सदर चळवळी मुळे समाजांतील मुलांनी
शिक्षणाचा लाभ घेण्यास सुरुवात केली व शहराकडे स्थलांतर केले. अशा स्थलांतर केलेल्या व्यक्तिंची
सर्वांगीण उन्नती होण्यास उपयोग झाला.
मुंबईत आल्या वर दादर येथे राहणारे डॉ. मधुकर बळवंत राऊत यांच्याशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्या
पासून अरविंद भाईंना वैचारीक प्रकाश मिळाला. डॉ. राऊत यांच्या पुरोगामी विचारांचा आधार त्यांना
समाज प्रबोधन करण्यासाठी झाला.
संघाचे पुनरुज्जीवन केल्या नंतर समाजबांधवांनी शिक्षणांत प्रगती करावी म्हणून संघा मार्फत पुस्तके व
शैक्षणिक मदत देण्याचा उपक्रम चालू केला. ह्या उपक्रमामुळे समाजांत शिक्षणा बद्दल प्रचंड जाणीव व ओढ
निर्माण झाली. सन १९४९ मध्ये अरविंदभाईंनी उत्तरेत देहेरी पासून ते दक्षिणेत केळशी पर्यंत पसरलेल्या
परंतु पोटजातीत विभागलेल्या सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती च्या एकीकरणासाठी चळवळ केली. १९५० साली
त्यांनी एकीकरण केलेल्या समाजाची क्षात्रैक्य परिषद ही संस्था स्थापन करण्यांत पुढाकार घेतला.
चालनाकार अरविंद भाई जरी प्रामुख्याने कर्ते समाजसुधारक होते, तरी एक उत्तम पत्रकार, साहित्यिक,
कवी, चरित्रकार बुद्धी प्रामाण्यावादा चे कट्टर पुरस्कर्ते होते. चालना ह्या समाज प्रबोधन करणाऱ्या मासिका
चे ते संस्थापक संपादक होते. तसेच त्यांनी लिहलेली काही पुस्तके जसे जीवन गुंजी प्रबोधन व प्रहार,
यंत्रकार दादाबो ठाकूर, उद्योगवीर रामचंद्र हिराजी सावे, खजुरी काव्य संग्रह, सो.पा.क्ष.स. संघाची २५
वर्षाची वाटचाल अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहली आहेत. चालनाकारांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन
संघातर्फे त्यांना मानपत्र देण्यांत आले होते तसेच चालनाकारांना पहिला श्री. राजाराम पाटीज सन्मान
पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
त्यांची स्मृति कायम रहावी म्हणून सो.पा.क्ष. ससंघाने पालघर येथील डॉ. मधुकर बळवंत राऊत समाज
मंदिरात दुसऱ्या मजल्यावर चालनाकार अरविंद हरी सभागृह बांधले आहे. चालनाकार शिक्षक होते म्हणून
त्यांच्या नांवे एक निधी स्थापन करून बी.एड.शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास शिष्य वृत्ती देण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने दादर येथील त्यांच्या निवास स्थाना समोरील मार्गाला चालनाकार अरविंद हरी राऊत
मार्ग असे नाव दिले आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक प्रगतीचा इतिहास लिहिला गेल्यास त्यांच्या कार्याचा उल्लेख ठळक पणे त्या
इतिहासांत होईल यात शंका नाही.
त्यांच्या स्मृतिस समाज बंध-भगिनीं कडून अभिवादन!