श्री. राजाराम रघुनाथ पाटील, मूळ गांव नांदगांव, ता. पालघर, जि. ठाणे व कर्मभूमी मुंबई यांचा परिचय म्हणजे जीवनांत यशस्वी होण्यासाठी खडतर परिश्रम करुन निश्र्वित अशा ध्येयाची पाठपुरावा करणारा प्रामाणिक उद्योजक, त्याबरोबरच एक संवेदनशील दानशूर व्यक्तिमत्व अशा शब्दांतच करावा लागेल. कोणत्याही तांत्रिक विद्यालयाची पायरी न चढलेल्या किंवा कोणताही औद्यगिक वारसा पाठिशी नसताना केवळ स्वत:च्या कर्तृत्वावर अविचल विश्र्वास, त्याला अथक परिश्रमाची जोड आणि सर्वांशी मनमिळावू असा गोड स्वभाव या भांडवलावर त्यांनी रॉयल इलेव्हेटर या नावारुपाला आलेल्या कंपनीची स्थापना करुन अनेक समाज बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.
रॉयल इलेव्हेटरच्या या उद्योजकाने प्रथम मुंबईतील नातलगांच्या आश्रयाने पोर्ट, ओटीस अशा कंपन्यांतून काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविता. स्वत:कडे तांत्रिक शिक्षणाची अर्हता नसताना, नोकरीत प्रामाणिपणे केलेले काम व मिळविलेला अनुभव, जिद्द व जबर महत्त्वाकांक्षेच्या बळावर, आपल्या सर्व कुटुंबियांना विश्र्वासाने बरोबर घेऊन मुंबईतील अडचणींचे डोंगर लिलया पार करीत उद्योगाचा श्रीगणेशा केला. प्रथम उद्वाहक संबंधीत मेन्टेनन्सची कामे स्विकारुन स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली व १९७४ पासून स्वतंत्रपणे उद्वाहक उभारणीची कामे कंपनीत होऊ लागली. आज ते ह्या व्यवसायात अग्रणी आहेत.
त्यांच्या या व्यवसायांत साऱ्या कुटुंबाचेच योगदान आहे. त्यांची हसतमुख धर्मपत्नी सौ. कुमुदिनीताई, कन्या सौ. कृपाली (बी.ई), जामात श्री. विवेक कवळे (एम.ई) तसेच धाकट्या कन्या सौ. कविता (सी.ए) या साऱ्यांच्या सहकार्याने रॉयल इलेव्हेटर्सची घोडदौड अखंडपणे चालू आहे. एका आदर्श उद्योगाची धुरा सांभाळताना सामाजिक बांधिलकीचा त्यांना विसर पडलेला नाही. कर्तव्यभावनेने ते समाज सेवेची एकही संधी सोडत नाहीत. सो.पा.क्ष.स संघाच्या सर्व कार्यांत स्वयंप्रेरणेने आर्थिक योगदानासह ते सहभागी होत असतात. आजपर्यंत सो.पा.क्ष.स संघास त्यांनी सुमारे रु. १५,००,०००/- रुपयांचे योगदान केले आहे. आपल्या मातोश्री कै. रमाबाई यांचे नावे समाजसेवा मदत निधी म्हणून रु. ५,००,०००/- एक रकमी सो.पा.क्ष.स. संघाकडे दिले आहेत. या निधीचा उपयोग समाजातील निराधार महिलांना आर्थिक मदतीसाठी केला जातो.
दिवेआगार येथील एका गरीब मुलास स्वखर्चाने ऑपरेशन करुन त्याच्या जीवनाला एक नवी दिशा दिल्यामुळे तो आज शिक्षण आणि आरोग्य या दुहेरी पेचातून मुक्त झाला आहे.
सो.पा.क्ष.स. संघ, क्षात्रैक्य परिषद या संस्थांच्या माध्यमांतून समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तर गरजू समाज बांधवांना वैद्यकिय मदत ते सातत्याने करीत असतात. समाजसेवा हीच ईश्वर सेवा असे ते मानतात. त्यांचे दातृत्वऋण समाज केव्हाही विसरु शकणार नाही. त्यांच्या या कार्यात त्यांच्रूा पत्नी सौ. कुमुदिनीताई यांचा वाटा सिंहाचा आहे. प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे त्याची कर्तृत्वशील पत्नी असते त्याचे हे एक उदाहरण आहे. लाखातील अशा दात्याला आणि कुटुंबाला या शताब्दि महोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने अभिवादन करणे हे कर्तव्य आहे.
अशा दानशूर आणि समाजावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या दात्यानी सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नति संघाच्या शताब्दि महोत्सवाच्या निमित्ताने रुपये १०,००,०००/- ची मोठी देणगी देऊन समाजातील एका होतकरू आणि हुशार विद्यार्थ्याला आय्.अे.एस् अथवा आय्.पी.एस्. किंवा तत्सम उच्च विद्याभूषित व्हावा ही एकमेव मनीषा जाहीर करुन त्यानी सामाजिक ऋणाची पोहच पावती दिली आहे. शताब्दि महोत्सवाच्या समितीच्या व संघाच्या वतीने त्यांना उभयतांना व कुटुंबियाना दिर्घायू लाभो व त्यांची प्रेरणा घेऊन समाजांतील उद्योगशील व दानशून बांधवानी समाजासाठी आर्थिक योगदान करावे म्हणजे समाजसेवा हीच ईश्वरसेवा होईल हे प्रचितीचे बोलणे सार्थ ठरेल.