Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री. काशिनाथ केशव राऊत

अतिशय हुशार असे श्री. राऊत १९४२ साली पी.एस्.सी. परिक्षेत ठाणे जिल्ह्यात प्रथम तर १९५० साली पी.टी.सी. परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जिल्हापरिषदेत त्यांनी शिक्षकापासून शिक्षण विस्तार अधिकारी अशा अनेक पदावर काम केले. शिक्षकीपेशातील उत्कृष्ट सेवे बद्दल त्यांना १९६५ साली तालुका पुरस्कार, १९७५ साली जिल्हा पुरस्कार, १९७९-८० सालचा राज्यपुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले होते. १९७१ सालातील जनगणना कार्याबद्दल राष्ट्रपतीनी त्यांना रौप्यपदक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले होते.

संवेदनशील मनांचे कवी आणि लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या सुमारे २५० कविता, गोष्टी, चरित्रकथा निरनिराळ्या २५ नियतकालिकामधून प्रसिद्ध झाल्या आहेत. समाज कार्याची आवड जोपासताना सलग सात वर्षे चिटणीसपद सांभाळले आहे. याच बरोबर त्यांनी उपाध्यक्ष, खजिनदार, सहाय्यक चिटणीस, युवामंडळ अध्यक्ष यापदावरही कामे केली आहेत. १९७२ साली पंचाळी अधिवेशनात ते अध्यक्ष होते. क्षात्रैक्य परिषदेच्या विविध पदावरही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या समाज सेवेची दखल घेऊन सन १९९१ साली राजाराम पाटील सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.