Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री. पांडुरंग माधव पाटील

"साधी राहणी उच्च विचारसरणी" या उक्तीला साजेसं असं हे व्यक्तिमत्व. आचार, विचार आणि उच्चार या तिन्ही गुणांनी युक्त अशी ही वरोर गावातील लोकप्रिय आणि आदरणीय व्यक्ती. 1940 ते 1979 पर्यंत जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकापासून ते शिक्षण विस्तार अधिकारी पर्यंत ते कार्यरत होते. निवृत्ती नंतर त्यांनी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणुन बरीच वर्षे काम केले. शिक्षकी पेशाच्या सेवाकाळात ते ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीवर निवडून येऊन 1968 मध्ये ते अध्यक्ष झाले होते.

समाज कार्याची आवड जोपासताना सो.पा.क्ष.स. संघाचे १९४६ ते १९५३ पर्यंत मुख्य चिटणीस, १९६३ साली उपाध्यक्ष, त्या आधी सहाय्यक चिटणीस व शाखा चिटणीस म्हणून काम पाहिले. १९६७ साली कमारे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. १९६८ या कालावधीत त्यांनी क्षात्रैक्य परिषदेचे कार्यवाह म्हणूनही काम पाहिले. त्यांचा संघ कार्यांचा गौरव म्हणून सन १९९९ मध्ये त्यांना राजाराम पाटील सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अश्या या बहुआयामी व्यक्तीमत्वाला नरपडच्या अमृत महोत्सवी अधिवेशनात मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.