Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री. रघुवीर ठ. पाटील

एक तेजस्वी, चारित्र्यवान व ध्येयवादी अशा तरुणाचा जन्म ७ जून १९३० सालचा. चालनाकारांच्या पाठी सावली प्रमाणे फिरणारे, खणखणीत आवाज, लोभस हास्य लाभलेले असे रघुवीर पाटील होते. लक्ष्मण पाटील, नरेंद्र चुरी, रमेश तेंडूलकर व रघुवीर पाटील अशी चौकट होती. दि. ४.१.१९५३ च्या ९ व्या युवक संमेलनाचे अध्यक्ष ते होते. त्यांनी रेल्वेची नोकरी सोडून प्रकाश मोहाडीकरांच्या साने गुरुजी विद्यालयात शिक्षकी पेशा सुरू करुन ध्येयवादाला खतपाणी घातले. आपले जीवन पुष्प अखेर त्यांनी तेथेच वाहिले. "चालना" नवयुग नियतकालिक यामध्ये त्यांच्या कथा, व्यंगकथा प्रसिद्ध होत. तसेच दैनिक नवशक्तीतून ते पुस्तकाचे परिक्षण प्रसिध्द करीत असत. त्यांचा सन १९५५ साली "प्रतिबिंब" हा व्यंगकथा संग्रह चालना प्रकाशनातर्फे प्रसिध्द झाला. त्या व्यंगकथासंग्रहाला आचार्य अत्रे यांची प्रस्तावना लाभली होती. पूज्य साने गुरूजी व भाऊसाहेब रानडे यांच्या विचारसरणीने ते भारले होते.

क्षात्रैक्य परिषदेच्या अनुषंगानी त्यांनी वैवाहिक एकीकरणाचा स्विकार केला. दि. २३-११-१९६९ रोजी वयाच्या ३२व्या वर्षी त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. पाठोपाठ धर्मपत्नी शरयूताई सप्तपदी आठवीत गेल्या. एक गोड घरटे उध्वस्त झाले. चि. शशांक व चि. प्रशांत या कोवळ्या जीवांना पोरके केले.

त्यांच्या 'प्रतिबिंब' या व्यंगकथे मध्ये माणसाच्या स्वभावातले बारीक सारीक दोष हुडकून काढून त्यामधून हास्य कसे निर्माण करायचे ही कला रघुवीर पाटील यांना साधली होती. त्यांचे अवलोकन मार्मिक होते. हास्यनिर्मितीचे तंत्रही त्यांनी अभ्यासिले होते. वाचकांना अपेक्षा नसतांना एकदम धक्का देऊन चकीत करायचे असते म्हणजे हास्याचा स्फोट अधिक मोठा होतो, अशा विचाराने भारावलेले रघुवीर पाटील.