Community
तेथे कर आमुचे जुळती
श्री. गंगाधर पिलाजी चौधरी
गंगाधरभाऊंचे वडिल कुलाब्याला राहत. ते बी.बी.सी.आय. मध्ये (म्हणजे पश्चिम रेल्वेत) नोकरी करीत; शिवाय त्यांची कोळशाची वखारही होती. परंतु गंगाधरभाऊ अवघे ७ वर्षाचे त्यांचे पितृछत्र हरपले. तत्कालीन परिस्थितीनुसार त्यांना जुहूगावात मामाच्या घरी त्यांच्या आईसह आणले गेले. त्याकाळी तरूण मुलगी पुन्हा माहेरी आल्यावर तिचा पुर्नविवाह करून दिला जात असे. त्याप्रमाणे त्यांच्या आईचाही विवाह कमारे येथील श्री. बाळा पुरव हयांच्याशी करून देण्यात आला. छोटा गंगाधर मात्र जुहूतच आजोळी राहिला.
सातवी पर्यंतचे शिक्षण आटोपल्यावर १५-१६ व्या वर्षी गंगाधरभाऊ बडोदा येथे गेले; तेथे त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि टाईपरायटर्स मेकॅनिझमचा डिप्लोमा पूर्ण केला. व ते परत आजोळी आले. मित्रासारख्या धाकटया मामाबरोबर प्रिटिंगचा व्यवसाय सुरू केला परंतू त्यांना ते फारसे रमले नाहीत. त्यांनी टाईपरायटर्सच्या व्यवसायात स्वत:ला पूर्णत: झोकून दिले. सुरूवातीला ते घरोघरी किंवा ऑफिस मध्ये जाऊन टाईपरायटर रिपेअर करणे, सर्व्हीसिंग करणे इत्यादी कामे करीत. नंतर व्यवसायात चांगला जम बसल्यावर त्यांनी व्यवसायासाठी फोर्टमध्ये जागा घेतली. व्यवसाय वाढला व जुहूमध्ये राहण्यासाठी जमिन घेऊन स्वत:चे घर बांधले. अत्यंत मेहनत करून त्यांनी आपला व्यवसाय नावरूपास आणला. समाजातील अनेक होतकरू मुलांना त्यांनी आपल्या घरी आधार दिलाच पण स्वत:च्या व्यवसायात तसेच अन्यत्रही रोजगारी मिळवून दिला.
आपल्या समाजाचे मधुकरमगर येथे झालेले अधिवेशन त्यांच्या अध्यक्षतेखालीच संपन्न् झाले होते. आपली लग्नाची गाणी, मंगलाष्टके गायला त्यांना मनापासून आवडत. युवक मंडळीची सहल असली तर जेवढी मौजमस्ती ते तरूण होऊन युवकांबरोबर करीत; तेवढेच समाजातील जेष्ठ मंडळीसोबत वैचारिक बैठकीतही ते समरस होत.
आपल्या मुलांवरही त्यांनी सामाजिक बांधालकी जपण्याचे संस्कार दिले. तो वारसा वसंत चौधरी व त्यांच्या भावंडांनीही जपला. परंतू दुर्दैवाने दुर्धर आजारामुळे ते अकाली म्हणजे ५८ वर्षाचे असतानाच सर्वांना दु:खसागरात लोटून आपल्यातून निघून गेले.